

‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. लाखो झाडे लावण्याचे उद्दिष्ट जाहीर झाल्यानंतर शाळांमध्येही या उपक्रमाची तयारी सुरू झाली. मात्र, याच चर्चेदरम्यान काही अनुभवी शिक्षक हसत आहेत. कारण, त्यांच्या मते झाडे लावण्याचा कार्यक्रम काही आजचा नाही. पूर्वी ‘वनमहोत्सव’ म्हणून तोच उपक्रम उत्साहात राबविला जायचा आणि विद्यार्थ्यांकडून झाडेही लावून घेतली जायची. त्यामुळे काही शिक्षक म्हणत आहेत की, ‘झाड तेच, खड्डा तोच, पाणी तेच आणि मेहनतही तीच; बदलला तो फक्त उपक्रमाच्या फलकावरील मजकूर!’ काहीजण तर ‘वनमहोत्सव ते एक पेड माँ के नाम’ हा प्रवास म्हणजे सरकारी योजनांच्या नामकरणशास्त्राचा एक अभ्यास विषयच ठरू शकतो, अशी टिप्पणी करू लागले आहेत. शेवटी झाडांना नावातील बदलाचे काही देणेघेणे नसते; ती तर प्रेमाने लावली आणि जपली गेली की वाढतात. पण नाव बदलले की चर्चेला मात्र नवी पालवी फुटते, एवढे नक्की! ∙∙∙
अलीकडे पोलिस स्थानकात तक्रार देऊन आलेल्या काही नागरिकांमध्ये एक नवीच चर्चा रंगू लागली आहे. ‘तक्रार दिल्यावर चौकशीच होत नसेल, तर तक्रार करून फायदा काय?’ असा प्रश्न ते विचारू लागले आहेत. त्यात भर म्हणजे न्यायालयांकडून वेळोवेळी पोलिसांच्या कामकाजातील त्रुटी आणि चुका निदर्शनास आणून दिल्या जात असल्याच्या बातम्याही सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे काहीजण मिश्कीलपणे म्हणू लागले आहेत की, तक्रार अर्जाचा पंचनामा होतो की नाही माहीत नाही; पण लोकांच्या विश्वासाचा मात्र हळूहळू पंचनामा होताना दिसत आहे. आता या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे संबंधितांनीच सांगावे. मात्र, पोलिस स्थानकाबाहेर गप्पांच्या कट्ट्यावर हा विषय सध्या चांगलाच रंगताना दिसत आहे. ∙∙∙
‘जो बळवंत तो टिकणार’ असे म्हटले जाते. राज्यात सध्या ‘एसटी’ आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. ‘एसटी’ आरक्षण येणाऱ्या निवडणुकीत लागू होणार की पुढे हे अजून निश्चित झालेले नाही. मात्र, सत्ताधारी भाजपला ‘एसटी’ आरक्षण येणाऱ्या निवडणुकीत लागू झालेले हवे आहे. या आरक्षणामुळे काही प्रस्थापित राजकारण्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. सुभाष फळदेसाई, एल्टन डिकॉस्टा, बाबू कवळेकर, दीपक ढवळीकर यांना या आरक्षणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. जर ‘एसटी’ आरक्षण लागू झाले तर आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याच्या तयारीत काही इच्छुक आहेत. केपे मतदारसंघ आरक्षित झाला तर बाबू कवळेकर कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडक लढविणार, अशी चर्चा आहे. केपे मतदारसंघाचे विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्टा वेळ्ळी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा करणार असल्याची चर्चा आहे. काहीजण आरक्षण लागू न होवो, यासाठी देवाचा धावा करीत आहेत. आता पाहूया, अमित शहा नक्की कोणाला पावतात ते! ∙∙∙
‘कोणाच्या म्हशी आणि कोण काढतो उठाबशी’ असे म्हणण्याची वेळ प्राथमिक शिक्षकांवर आली आहे. नव्या शिक्षण धोरणानुसार आता पहिली ते चौथीपर्यंत चाळीस मिनिटांच्या सात तासिका घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शिक्षकाला एका आठवड्यात अठ्ठावीस तासांचा वर्कलोड पडतो. मात्र, शिक्षण खात्याच्या कायद्याप्रमाणे शिक्षकाला एका आठवड्यात एकवीस तासांपेक्षा जास्त वर्कलोड देणे गैर आहे. आता शिक्षण खाते प्राथमिक शाळांना अतिरिक्त शिक्षक न दिल्यास प्राथमिक शिक्षकांना सकाळी आठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत न थांबता वर्ग घ्यावे लागणार, जे कठीणच नव्हे तर अशक्यही आहे. ∙∙∙
नुवे हा फक्त एक अपवाद वगळता प्रत्येकवेळी काँग्रेसचा भरवशाचा मतदारसंघ ठरला असून केवळ एकाच निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या हाताबाहेर गेला. मागच्यावेळी आलेक्स सिक्वेरा हे या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर जिंकून आले त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण? हा प्रश्न विचारला जात आहे. दुसऱ्याबाजूने केपेचा मतदारसंघ ‘एसटी’साठी राखीव ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास सध्या काँग्रेस प्रदेश समितीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांचे काय होणार, हाही प्रश्न विचारला जात आहे. असे म्हणतात, केपे मतदारसंघ राखीव झाल्यास काँग्रेस एल्टनला नुवे मतदारसंघात उभे करेल. बाणावली मतदारसंघातही एल्टनला काही सरपंचांचा पाठिंबा आहे. त्यामुळे याही मतदारसंघात त्यांची वर्णी लागल्यास कुणाला आश्चर्य वाटू नये, असे सांगितले जात आहे. ∙∙∙
पर्वरी मतदारसंघात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी येथील खेळाडूंसाठी आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी पर्वरी जिमखान्याची निर्मिती झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी या जिमखान्याचे लोकार्पण केले. मतदारसंघाला आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करण्याची कामे खंवटे यांनी विरोधात असताना सुरू केली होती. ती कामे आता पूर्ण होत आहेत, असे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले. खंवटे यांनी ज्यापद्धतीने पर्वरी मतदारसंघासाठी पाण्यापासून मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पापर्यंतची विकासकामे उभी केली आहेत, ती पाहता खरोखरच इतर सर्वच मंत्र्यांना त्यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखे आहे, असे म्हणता येईल. कारण आता प्रत्येक मतदारसंघातील मंत्र्याला पर्वरीत जे होतेय, ते आपल्या मतदारसंघात का नाही, असा सवाल मतदारांनी विचारला तर नवल वाटायला नको. ∙∙∙
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवारीच्या रेसमध्ये नाही, असे जाहीर केले आहे. आपले लक्ष्य फातोर्डात भाजपचा उमेदवार निवडून आणणे एवढेच आहे, असेही त्यांनी सांगितले. आता त्यात कितपत तथ्य आहे हे उमेदवार जाहीर झाल्यावरच दिसून येईल. मात्र, दामू यांच्या या गोष्टीमुळे कित्येकांच्या मनात नाही म्हटले तरी खुशी के लड्डू फुटू लागले आहेत. दामू नाईक यांना जवळ असलेल्या काहीजणांना आता फातोर्डाचा पुढील आमदार आपणच अशी स्वप्ने पडू लागली तर कुणी त्यांना दोष देऊ शकेल का? ∙∙∙
म्हापशातील २२ वर्षीय सॅम्युअलच्या आत्महत्येने सोशल मीडियाची बेफाम न्यायाधीशगिरी आणि यंत्रणेची संवेदनाहीनता पुन्हा एकदा समोर आणली आहे. रस्त्यालगत कचरा टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि क्षणात एका तरुणाला समाजमाध्यमांवर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनीही तत्परता दाखवत गुन्हा नोंदवला. कायद्याची अंमलबजावणी आवश्यक असली, तरी त्यात मानवी संवेदनशीलतेची जोड तितकीच महत्त्वाची असते. एका बाजूला सोशल मीडियावरील ट्रोलिंग, अपमान आणि कठोर प्रतिक्रिया; तर दुसऱ्या बाजूला कायद्याचा दबाव. या दुहेरी मानसिक तणावात एका तरुणाने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. कचरा टाकणे चुकीचे होते, यात वाद नाही; पण त्या चुकीची किंमत एखाद्याच्या जीवाने मोजावी लागणे, हे अधिक गंभीर वास्तव आहे. हा मृत्यू नेमका सिस्टिमचा बळी आहे की, डिजिटल मॉबच्या मानसिक छळाचा, याचे उत्तर शोधताना समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही का? ∙∙∙
फोंड्यात काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर यांचा वाढदिन दणक्यात साजरा झाला. या वाढदिन सोहळ्याला काँग्रेसचे नेते आवर्जून उपस्थित राहिले. काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासह उपस्थिती खास ठरली. विशेष म्हणजे बर्थडे बॉय राजेश वेरेकर यांनी गिरीश चोडणकर यांच्यामुळेच आपण काँग्रेस प्रवेश केला होता त्याची आठवण करून दिली. काही का असेना; पण राजेश वेरेकर यांच्या वाढदिन सोहळ्याला फोंडेकरांची प्रचंड उपस्थिती नक्कीच भाजपवाल्यांना घाम काढावी अशीच ठरली. ∙∙∙
फोंड्यात मागच्या पोटनिवडणुकीवेळी काँग्रेस पक्षातर्फे केतन भाटीकर हे उमेदवार होते. केतन भाटीकर यांना काँग्रेस पक्षात घेताना अनेक वादविवाद झाले; पण शेवटी समझोता झाला आणि भाटीकर यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी जाहीर झाली, प्रचार झाला आणि मतदानाच्या आदल्या दिवशी माशी शिंकली व निवडणूकच रद्द झाली. केतन भाटीकर असताना काँग्रेस पक्षात येत्या विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार असेल, असा खल सुरू होता; कारण काँग्रेस पक्षाचे आणखी एक प्रबळ दावेदार ज्यांनी पोटनिवडणुकीत स्वतःहून माघार घेतली होती, ते राजेश वेरेकर की केतन भाटीकर असा वाद सुरू झाला होता. मात्र, केतन भाटीकर यांच्या आकस्मिक निधनामुळे हा वाद संपुष्टात आला असून आता येत्या विधानसभा निवडणुकीत वेरेकर यांनाच उमेदवारी मिळेल, असे संकेत मिळाले असून राजेश वेरेकर यांच्या वाढदिन सोहळ्याला काँग्रेसच्या नेत्यांनी लावलेली उपस्थिती ही त्याची साक्ष असल्याचे बोलले जात आहे. ∙∙
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कन्या पार्थिवी सावंत हिचे साखळी येथील रवींद्र भवनातील रेकॉर्डिंग स्टुडिओमधील छायाचित्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. संगीत आणि कला क्षेत्राविषयीची तिची आवड या छायाचित्रातून अधोरेखित होत असून, तरुण पिढीतील कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या नव्या चेहऱ्यांपैकी ती एक म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओतील तिची उपस्थिती आणि आत्मविश्वासपूर्ण वावर यामुळे अनेकांनी या छायाचित्राचे कौतुक केले असून, सांस्कृतिक क्षेत्रातील तिच्या संभाव्य वाटचालीबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे. ∙∙∙
भाजप पक्षात नेमके काय सुरू आहे, हा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनाच पडलेला आहे. याचे कारण म्हणजे नुकतीच जाहीर झालेली दक्षिण गोवा कार्यकारिणी. भाजपच्या एक ज्येष्ठ कार्यकर्त्या शैला पार्सेकर यांची या जिल्हा कार्यकारिणीवर नियुक्ती केलेली आहे. वास्तविक यापूर्वी शैलाबाई राज्य कार्यकारिणीवर होत्या. मात्र, आता त्यांना जिल्हा कार्यकारिणीवर आणले आहे. म्हणजे शैलाताईंचे केलेले हे डिमोशन म्हणायचे का? शैलाताईंनी आपल्यावर झालेल्या अन्यायावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडेही दाद मागितली असल्याची चर्चा सुरू आहे! ∙∙∙
दर वर्षी एक कलाकार, स्पर्धात्मक रंगभूमीपासून दूर जाण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो, दूर जातो. एकाने बक्षिस परत केले म्हणून त्याला बोलावून गोंजारणाऱ्या कला अकादमीने या दूर जाणाऱ्या कलाकारांची मनधरणी केली का? कलाकार कला अकादमीच्या स्पर्धांपासून दूर जातात तेव्हा ती जबाबदारी अकादमीची. मराठी व कोंकणी स्पर्धा निकालांचा बक्षिस सोहळा होतच नाही. कोंकणी नाट्य स्पर्धेला ५० वर्षे झाली म्हणून वर्षभराचे उत्सवी कार्यक्रम होणार अशी सिंहगर्जना झाली होती. वर्ष सरत येते, एकही झालेला नाही. आपलाच कलंकीत हताश अधिकारी सोशल मिडीयातून तारे छेडतो, त्याच्यावर सीसीएस नियमांखाली कारवाई करण्याची धमक अकादमीला नाही. लाचखोरांची चौकशी नाही. सवतीभाव न ठेवता सगळ्यांचंच समुपदेशनात्मक कुरवाळणं व्हायला हवं. या वर्षी एक की दोन प्रतिज्ञा व कुणाच्या, त्याकडे रसिकांचे लक्ष लागून आहे, असं चर्वितचर्वण चालू आहे. ∙∙∙
‘चुकीतून माणूस शिकतो’ असे म्हणतात ते खरे. शिक्षण खात्याने दोन वर्षांपूर्वी राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली होती. नव्या धोरणानुसार शाळेची वेळ वाढवली होती. यापूर्वी मार्च महिन्यात परीक्षा संपल्यावर मुलांना दोन महिन्यांची उन्हाळी सुट्टी मिळत होती. नव्या धोरणाचे निमित्त सांगून पालकांचा व शिक्षकांचा विरोध डावलून शिक्षण खात्याने एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवण्याचा हुकूम काढला होता व गेल्या दोन वर्षांपासून एप्रिल महिन्यात शाळा भरत होत्या. मात्र, याचा मुलांना कोणताच फायदा होत नाही, हे लक्षात आल्यावर शिक्षण खात्याने आता पूर्वीप्रमाणे एप्रिल व मे महिना अशी मुलांसाठी उन्हाळी सुट्टी घोषित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करणे स्वाभाविक आहे. शिक्षण खाते ‘देर आए दुरुस्त आए’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ∙∙∙
कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधीला गोवा फॉरवर्डचे प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई आणि दुर्गादास कामत यांनी उपस्थिती लावली होती. शिवकुमार यांनी त्यांना खास निमंत्रण दिले होते; परंतु शपथविधीनंतर शिवकुमार सरकारातील मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सतीश जारकीहोळी यांची सरदेसाई यांनी खास भेट घेतली आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. या भेटीत चालू घडामोडी, प्रादेशिक आकांक्षा आणि इतर मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली, असे पक्षाच्या समाजमाध्यमातील अकाउंटवर पोस्टमध्ये म्हटले आहे. परंतु खरेतर दोन्ही नेत्यांमध्ये गोव्यातील की कर्नाटकातील राजकारणावर चर्चा झाली, हे दोघांनाच माहीत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.