

जिल्हा पंचायत निवडणुकीत आलेले अपयशानंतर प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलिलेल्या ॲड. अमित पालेकर यांनी आम आदमी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे ते आता कोणता झेंडा हातात घेणार आहेत, हे तात्काळ जाहीर करण्याची घाई त्यांनी केली नाही. सांताक्रूझ मतदारसंघातील मतदारांना तथा जनतेशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे पालेकरांनी जाहीर केले आहे. काँग्रेसमध्ये जाणार की आणखी कोणत्या पक्षाकडून आवतान येतेय का, हे ते पाहणार आहेत हे लवकरच स्पष्ट होईल. ते काँग्रेसमध्येच जातील, अशी अटकळही अनेकजण मांडत आहेत. काँग्रेसकडून त्यांना यापूर्वी ऑफरही होती, पण त्यांनी आपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. सध्या निवडणुकीचे वारेही नाही, नगरपालिका निवडणुकांचे वारे वाहण्यास काही कालावधी राहिला आहे. त्यामुळे ते सध्या घाई नको, असे म्हणत सावध पावले टाकत आहेत हे नक्की. ∙∙∙
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे ताळगाव ग्रामपंचायत किंवा पणजी महानगरपालिकेची निडवणूक असल्यानंतर आत्मविश्वासाने सांगतात. ‘क्लिनस्वीप'' हा निवडणुकीविषयी विचारल्यानंतर त्यांचा परावलीचा शब्द. त्याशिवाय नवे चेहरे देणार असेही ते सांगत असतात, पण प्रत्यक्षात फारसे नवे चेहरे नसतात, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तेच ते उमेदवार असल्याचे महानगरपालिका निवडणुकीतून दिसून आले आहे. यावेळी मात्र त्यांनी पुन्हा नवे चेहेऱ्यांना संधी देण्याचे आणि सर्वस्वी भाजप श्रेष्ठींकडे चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी नुकतेच मत व्यक्त केले आहे. असो काही उमेदवारांची त्यांनी निश्चितताही केली आहे. अलीकडे पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच ते पावले टाकतात. त्यांच्यात झालेल्या या बदलाची पणजीतील जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांत अधिकच चर्चा असते. ∙∙∙
आम आदमी पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर ‘गोमन्तक’ टीव्हीच्या साश्टीकार या कार्यक्रमात या पराभवाचा ऊहापोह करण्यासाठी मागच्या आठवड्यात ‘आप’चे गोवा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष जर्सन गोम्स यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी टीव्हीच्या अँकरने आम आदमी पक्षाला गोव्यात लवकरच आणखी गळती लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. अर्थातच गोम्स यांनी ही शक्यता नाकारत आमचे सगळे कार्यकर्ते एकत्र आहेत. त्यामुळे राज्यात पक्षाचे काहीही नुकसान होणार नाही, असे ठामपणे सांगितले होते. मात्र काल आपचे माजी गोवा अध्यक्ष अमित पालेकर आणि सध्याचे हंगामी अध्यक्ष श्रीकृष्ण परब यांच्यासह चेतन कामत आणि रोहन नाईक यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यामुळे गोमन्तक टीव्हीने केलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात उतरली! ∙∙∙
चिंबलमध्ये सध्या एकच प्रश्न चहाच्या टपरीपासून व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत फिरतोय, पंचायत लोकांची आहे, की मॉलची? लोक म्हणतात, पंचायत म्हणजे गावाची आई, पण येथे आईचे लक्ष कुणावर जास्त आहे? सरपंच साहेब स्वतः भाजपचे स्थानिक मंडळ अध्यक्ष, मग लोकांचा संशय वाढणार नाही तर काय? न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही मॉलसाठी बांधकाम परवाना कसा काय मिळाला, हा प्रश्न आता साधा राहिलेला नाही, तर मिलियन-डॉलर प्रश्न झाला आहे. काहींचे म्हणणे असे, की हा परवाना दबावाखाली दिला गेला असावा, तर काही लोक हसतहसत विचारतात, दबाव नाही, तर ‘व्हिटॅमिन’ पॉवर असेल. गावातली चर्चा इतकी वाढली आहे, की लोक आता म्हणू लागलेत “युनिटी मॉल बांधायचा आहे, पण आधी पंचायत आणि लोकांमध्ये युनिटी राहिली पाहिजे ना!”∙∙∙
जागोर महोत्सव म्हणजे गोमंतकीय लोकसंस्कृतीचे एक ‘दायज'' आहे. जागोर अव्याहतपणे सुरू रहावा आणि पुढील पिढीपर्यंत पोचवावा, यासाठी जागोर अकादमी स्थापन करणे आवश्यक असल्याचे मत विद्यमान मंत्री दिगंबर कामत यांनी फोंड्यातील जागोर महोत्सवात व्यक्त केले. यापूर्वी दिगंबरबाब कला संस्कृती खात्याचे मंत्री होते. त्यावेळेला त्यांनी तियात्र अकादमी स्थापन करून तियात्र प्रकाराला उर्जितावस्था प्राप्त करून दिली होती. आताही तीच गरज असल्याचे दिगंबर बाब म्हणतात. हे सगळे खरे आहे, सध्या दिगंबरबाब सरकारातील मंत्री आहेत, अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांनीच जर याबाबतीत पुढाकार घेतला, तर हे काम होऊनही जाईल, अशाच प्रतिक्रिया जागोरियांकडून व्यक्त होत आहेत. कारण जागोर महोत्सव आयोजित करणारे गोविंदबाब सध्या मंत्रीपदाविना आहेत ना! ∙∙∙
पैसे खाणाऱ्यांच्या पोटाचा आकार वाढतो आणि शुद्ध चारित्र्य असलेले राजकारणी स्लिम व ट्रिम असतात, असे भाष्य विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी युनिटी मॉलच्या विरोधात बोलताना केले . मात्र युरी म्हणतात, त्याप्रमाणे जर सत्ताधारी मंत्री व आमदारांची पैसे खाऊन पोटे वाढली आहेत, तर आपले मुख्यमंत्री स्लिम आणि ट्रिम आहेत. आरोग्यमंत्री स्लिम आहेत. महसूलमंत्री स्लिम आहेत. सत्ताधारी भाजपचे अनेक आमदार स्लिम आहेत. तसे पाहिले, तर पोट वाढलेले आमदार काँग्रेस पक्षातही आहेत. ते ही भ्रष्टाचारी आहेत का? मग युरीचा भ्रष्टाचारामुळे पोट वाढते हा फॉर्म्युला सर्वांना लागू होतो का? असे लोक विचारत आहेत. ∙∙∙
विरोधकांच्या भूलथापांना बळी पडून आंदोलन करण्याऐवजी माझी भेट घेऊन चर्चा करा, असे आवाहन युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारलेल्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी केले. मुळात राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाला होत असलेला विरोध हा विरोधी आमदारांनी फूस लावल्यामुळेच आहे, हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी थेट स्थानिक आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार आंदोलकांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली, तरीही सरकार हा प्रकल्प चिंबलमध्येच उभारण्यावर ठाम आहे. या निर्णयावरून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ठरवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री–स्थानिकांतील चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरणार असल्याची चर्चा सरकारी अधिकाऱ्यांत सुरू आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.