Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

मुक्तीनंतर गोव्यात उदयास आलेल्या अनेक पक्षांचा इतिहास पाहिला तर हे अपेक्षितच होते असे म्हणावे लागेल
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

प्रमोद प्रभुगावकर

‘उजो’, ‘उजो’ म्हणून गोव्यातील राजकीय पटलावर काही तरी नवे करण्यासाठी पुढे सरकलेल्या गोवा रिव्होल्यूशनरी पक्षात सध्या जे काय घडले आहे ते गोव्यातील आजवरच्या म्हणजे मुक्तीनंतर गोव्यात उदयास आलेल्या अनेक पक्षांचा इतिहास पाहिला तर हे अपेक्षितच होते असे म्हणावे लागेल.

गोव्यात भाजप म्हणजे मनोहर पर्रीकर असे समीकरण झाले होते, त्या मागील कारणे अनेक होती. पण पक्षात पर्रीकर व श्रीपाद नाईक असे दोन गट सतत होते. पर्रीकर दिल्लीत गेल्यानंतर व त्यांच्या गंभीर आजारानंतर त्या पक्षात निर्माण झालेला पेच त्या पक्षाबाबतचा भ्रमनिरास करणारा होता. नंतर मिटला तो पर्रीकर व श्रेष्ठींमुळेच. त्यामुळे गोव्यातील राजकीय पक्षांमधील असा पेच वा कलह नित्याचेच म्हणतात; आरजीमधील घडामोडही अशीच गणली जाते. पक्ष मूळ धरू लागला की त्यावर प्रभुत्व मिळविण्याचा हा प्रकार वा पुनरावृत्ती म्हणावी लागेल.

Goa Politics
Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

गोवा मुक्तीनंतर व नंतरच्या जनमत कौलानंतर सत्तेवर आलेल्या मगोला म्हणजेच भाऊसाहेबांनासुद्धा त्या काळात पक्षातील अशा कलहाला-बंडखोरीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी के. बी .नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रा. मयेकर व अँथनी डिसोझा, मंजू गावकर व इतरांनी बंड करून वेगळा (नव म. गो.) गट स्थापन केला होता. त्यामागील कारण काय, ते शेवटपर्यंत उघड झाले नव्हते; पण गोव्यातील एक उद्योगपती त्या बंडामागे असल्याची चर्चा त्या वेळी होती. या बंडाने सरकार अल्पमतात आले नव्हते, पण भाऊसाहेबांनी त्यांचा तो डाव हाणून पाडताना यु. गो. मध्येच फूट घडवून आणली.

इलु मिरांडा व अन्य काही यु. गो. आमदार पक्षापासून वेगळे झाले व त्यांनी सभागृहात सरकारचे समर्थन केले. म्हणजे यु.गो.लाही ही बाधा झाली होती. नंतरच्या निवडणुकीत हे सगळे फुटीर म्हणजे म. गो. व यु.गो, वालेही पराभूत झाले. भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर शशिकलाताईंकडे मुख्यमंत्रिपद आले. पण यु. गो. मध्येही गटबाजी तयार झाली. बाबू नायक यांचा गट प्रभावी ठरला. जॅक सिकेरा बाजूस पडले. तशातच आणीबाणीची संधी हेरून बाबूंनी यु. गो. चे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण केले.

Goa Politics
Goa Opinion: ‘प्रभु व्हायोलेटा’ प्रकरणातून निर्माण झालेले नवे प्रश्न

पण नंतर केंद्रात जनता पक्षाचे सरकार आल्यावर यु. गो.चे खासदार असलेले एराज्मू सिकेरा यांनी जनता पक्षात प्रवेश करून आपली वेगळी चूल मांडली. म्हणजेच गोव्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांतही त्या काळात कलह चालू होता, हेच दिसून येते. केंद्रात जरी जनता राजवट असली तरी गोव्यात मात्र म. गो.चीच सत्ता राहिली, पण ती खिळखिळी करण्याचे प्रयत्न मात्र भरपूर झाले. त्याचीच परिणती म.गो.चे सभापती असलेले नारायण फुग्रो व स्वतःस सडेतोड आमदार म्हणविणारे दयानंद नार्वेकर व दिलखुश देसाई यांना हाताशी धरून कपात सूचनेवर सरकारचा पराभव घडविण्यात विरोधक यशस्वी ठरले.

पण फुटीरांचे सरकार येऊं शकले नाही. विधानसभा विसर्जित होऊन राष्ट्रपती राजवट जारी झाली. पण नंतरच्या म्हणजे १९८०मधील निवडणुकीत मतदारांनी दयानंद नार्वेकर वगळता इतरांना घरी बसविले. त्यात नारायण फुग्रोंचाही समावेश होता. त्या निवडणुकीत कॉंग्रेस(अर्स)सत्तेवर आली खरी. पण त्या कॉंग्रेसच्या सगळ्या आमदारांनी एका रात्रीत इंदिरा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

Goa Politics
अग्रलेख: एका दिवसात 5 ठिकाणी आंदोलने होणे हा योगायोग नाही! उभयतांनी संवादच टाळला तर प्रश्‍न सुटायचे कसे?

प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री झाले. पण पक्षात गटबाजी माजली. त्यातून दयानंद नार्वेकर व जोईल्द आगियार या दोन मंत्र्यांना हटवून त्याजागी विल्फ्रेड डिसोझा व बाबू नायक यांचा समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळ एकजिनसी व्हावे हा त्यामागील हेतू असल्याचे जरी सांगण्यात आले. पण ते मंत्री झाल्यावरही गटबाजी चालूच राहिली; उलट वाढली. त्याची परिणती १९८५मध्ये बाबू नायक यांचा पराभव होण्यात झाली. ही झाली कॉंग्रेसची गोष्ट तिकडे सत्ताभ्रष्ट झालेल्या म. गो.ची हालत वेगळी नव्हती.

पराभूत झालेल्या शशिकलाताईंचे खच्चीकरण अन्य नेत्यांनी सुरू केल्याने त्यांनी म. गो.चे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करायचे ठरवले, त्याला इतरांनी म्हणजे खलप, जल्मी, प्रकाश वेळीप यांनी हरकत घेऊन स्वतंत्र अस्तित्व कायम राखले. नंतर ताई कॉंग्रेसमधून बाहेर पडल्या व भाबांगो हा वेगळा पक्ष स्थापला. पण त्यालाही लोकांनी अव्हेरले. त्यामुळे त्या म.गो.त परतल्या. दरम्यानच्या काळात रमाकांत खलप व इतरांनी कॉंग्रेस प्रवेश केला होता.

Goa Politics
Goa Opinion: आंदोलने कितीही चालू असोत, त्यात सरकार ‘यशस्वी’ होते आहे; विकल्प

पण या गटबाजीमुळे म. गो . पुन्हा सत्तेवर येऊ शकला नाही. आता म. गो. ढवळीकर बंधूंच्या हातात आहे त्यामागील कारण कदाचित त्या पक्षात अन्य कोणी सत्ताकांक्षी वा आर्थिकदृष्ट्या समर्थ नसावा. मध्यंतरीच्या काळात सेव्ह गोवा पार्टी, गोवन पीपल्स पार्टी, युगोडेपासारखे अनेक पक्ष आले पण त्यांत गटबाजी वा कलहाला जागा नव्हती. नाही म्हणायला सेव्ह गोवामध्ये तसा कलह होणार होता, पण त्यापूर्वीच चर्चिल व रेजिनाल्ड कॉंग्रेसमध्ये सामील झाले.

आतासुद्धा कॉंग्रेसमध्ये पक्षसंघटना व विधिमंडळ गट यांचे पटत नाही. आपमध्ये तर ज्या पद्धतीने संघटनात्मक बदल केले जातात ते विचित्र आहेत. राहता राहिला तो गोवा फॅारवर्ड; पण त्यात गटबाजी होण्याचे धाडस कोणी करेल वा तशी कुवत कोणाकडे असेल असे वाटत नाही. पण आरजीत जे काय झाले ते तसे कोणाला नवल वाटण्यासारखे नाही. ‘ये तो होना ही था’ असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com