

पणजी: पक्षांतर केलेल्या नेत्यांबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भात कोणताही संभ्रम किंवा अफवांवर विश्वास ठेवून दिशाभूल होऊ नये. अशा पक्षांतर केलेल्यांना काँग्रेसची उमेदवारी दिली जाणार नाही. २०२२ मध्ये घेतलेला निर्णय कायम राहील, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
चोडणकर यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये घेतलेला निर्णय कायम राहील. जनतेच्या कौलाचा विश्वासघात करून काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या व्यक्तींना पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार नाही, हा निर्णय आजही कायम आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच विचारसरणी, निष्ठा आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागाचा सन्मान करत आला आहे. वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय सोयीसाठी पक्षाचा त्याग करणाऱ्यांना, कठीण काळात काँग्रेससोबत खंबीरपणे उभे राहिलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या हक्कांवर गदा आणून पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
जे काँग्रेसच्या (Congress) कठीण काळात पक्षासोबत ठामपणे उभे राहिले, काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहील. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयात कोणताही बदल झालेला नाही आणि निष्ठा, प्रामाणिकपणा तसेच राजकीय उत्तरदायित्व या मूल्यांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तत्त्वनिष्ठ राजकारण, संघटनात्मक बळकटी आणि समर्पित नेतृत्वाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तसेच भाजप सरकारला सक्षम व विश्वासार्ह पर्याय उभा करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
चोडणकर यांनी भाजपच्या ‘प्रॉक्सी वॉरियर्स’वर टीका केली असली, तरी काँग्रेसमधील अनेकांना सध्या अधिक चिंता आहे ती ‘पार्टी वॉरियर्स’ची. नेतृत्वबदलानंतर पक्षात अपेक्षित असलेली एकजूट अद्याप दिसून आलेली नाही. उलट, नियुक्तीच्या निर्णयामुळे काही स्तरांवर अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी अद्याप ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नेतृत्वाला स्वतःच्या घरातील नाराजीची आग विझवावी लागणार आहे. अन्यथा, विरोधकांवर कितीही आरोप झाले तरी जनतेच्या नजरा पक्षातील घडामोडींवरच खिळून राहणार आहेत.
माझ्यावर अचानक सुरू झालेल्या नियोजित हल्ल्यांमुळे आणि प्रायोजित अपप्रचारामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, गोव्यात काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन आणि संघटनात्मक बळकटीकरण भाजपला अस्वस्थ करत आहे. या हल्ल्यांमुळे मी कमकुवत होत नाही. उलट माझा निर्धार अधिक मजबूत होतो. माझी बदनामी करण्याचा प्रत्येक प्रयत्न गोव्याच्या जनतेसाठी लढण्याची आणि या सरकारच्या अपयशांचा पर्दाफाश करण्याची माझी बांधिलकी अधिक दृढ करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.