

कुंकळ्ळीत काँग्रेसच्या विरोध प्रदर्शनात मोजकेच समर्थक!
जनशक्ती सरकारला वाकवू शकते. दिल्लीत चालू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. मात्र, जर आपल्याकडे जनाधार नसेल, तर त्या आंदोलनाला हवा राहत नाही. कुंकळळी काँग्रेस गट समितीने काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष आसीस नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली कुंकळळीत धरणे कार्यक्रम आयोजित केला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी पोलिसांनी दुर्व्यवहार केल्याच्या विरोधात धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खरे म्हणजे राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या मतदारसंघात राष्ट्रीय नेत्याच्या समर्थनार्थ काढलेल्या धरणे कार्यक्रमाला अल्प प्रतिसाद मिळावा, हे दुर्दैवच. कुंकळळी मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांची भरमार आहे. असे असूनसुद्धा भाजपविरोधात काढलेल्या धरणे कार्यक्रमात युरी आलेमाव यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी व युरीच्या सहयोगाने भावी नगरसेवक बनण्यास इच्छुक असलेले हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते उपस्थित राहावे, हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाचे अपयश नव्हे काय?
प्रतिमा काँग्रेसमध्ये रमल्या पण...
हल्लीच काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या प्रतिमा कुतिन्हो या पक्षकार्यात थोड्याच दिवसांत बऱ्याच सक्रिय झाल्या आहेत. त्याचा प्रत्यय गुरुवारी नावेली येथे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांवर पोलिस कारवाईच्या विरोधात आयोजित निदर्शनावेळी आला. मॅडमचे समर्थक यावेळी उपस्थित होते. मात्र, त्यांची संख्या तशी नगण्यच होती म्हणा. त्याची चिंता न घेता प्रतिमा यांनी नेहमीच्या शैलीत आवेशपूर्ण भाषण ठोकले. उपस्थित हितचिंतकांनी टाळ्या वाजविल्या. त्यामुळे त्या खुश झाल्या. प्रतिमा या लढवय्या आहेत, याबाबत कुणाचेही दुमत नाही. मात्र, नावेली विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस उमेदवारी देणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण ‘रेस’मध्ये अनेक इच्छुक आहेत. शिवाय जिंकून येणे हा निकषही महत्त्वाचा आहे.
वाळवीचा धसका
रस्त्यावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाळवीची उपमा देऊन भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी नव्या वादाला तोंड फोडल्यानंतर आता सगळीकडे हाच चर्चेचा विषय बनला आहे. "माझ्या त्या पोस्टचा विद्यार्थी चळवळीशी काहीच संबंध नाही," असा खुलासा सावईकर यांनी केला असला तरी, त्यांच्यावर आणि भाजपवर ‘जेन जी’मध्ये प्रचंड राग उफाळून आलेला आहे. "आम्हाला तुम्ही वाळवीची उपमा दिलीच कशी?" असा सवाल हे युवा करीत आहेत. त्यामुळे आता ही ‘जेन जी’ वाळवी भाजपलाच तर पोखरणार नाही ना... अशी भीती भाजपला वाटू लागली आहे. त्यामुळे ही नाराजी दूर कशी करावी, याबद्दल नव्या ‘स्ट्रॅटेजी’वर काम सुरू असल्याचे सांगितले जाते आहे. एकूण माजी खासदाराने भाजपला नव्या कामाला लावले असेच कपाळाला हात लावून दामू नाईक म्हणत असतील.
तुम चंदन, हम पानी...
५० व्या कोंकणी नाट्य स्पर्धेचे कवित्व गेयतेनिशी इतकं गाजत आहे की, ५१वी आली तरी गेल्या स्पर्धेच्या दुर्लौकिकाची दुर्गंधी वाढतच आहे. एका परीक्षकाने अकादमीला पत्र लिहून निकालात फेरफार का केला, असा सवाल केला. परीक्षकांनी नाट्यलेखनाचे पहिले बक्षीस न देता दुसरे दिले होते. बक्षीस वितरणावेळी अकस्मात तो पुरस्कार म्हणून देण्यात आला आणि हे परीक्षकांच्या संमतीविना. कोट्यवधी रुपयांच्या दुरुस्ती कामातील भ्रष्टाचाराचा विषय असंवेदनशीलतेने हाताळणाऱ्या कला अकादमीला हा विषय अगदी गौण असेल. कलेच्या निरोगी स्वास्थ्यासाठी हा शेवटच्या टप्प्यातील कॅन्सर. अकादमीच्या प्रत्येक अवयवातून असाध्य व्याधीचे जंतू बाहेर येत आहेत. विवेकशील, सत्यनिष्ठ परीक्षक कला अकादमीच्या भानगडीत पडणार नाहीत. जलोटांचे भजन आहे, ‘प्रभुजी, तुम चंदन हम पानी’. अकादमीच्या कुठल्याही अवयवावर कितीही शुद्ध पाल घेऊन, शुद्ध सहाणीवर घासा, नाक जळावे इतकी असह्य घाण प्रसवत राहणार.
शक्कलकडे लक्ष
‘फॉर्म्युला रेसिंग’ कंपनीचे तब्बल दोन कोटी रुपयांचे वीजबिल माफ झाल्याची चर्चा रंगताच राजकारणही तापले. विरोधकांना आता नवा मुद्दा मिळाल्याने सरकारपुढे आव्हान निर्माण झाले आहे. पण सरकारला अशी आव्हाने पेलण्याची सवयच झाली आहे, असे लोकांनाही चांगले ठाऊक झाले आहे. विरोधकांचा आवाज कमी करायचा, जनतेचा कसा राग निवळायचा आणि विषय दुसरीकडे वळवायचा, यात भाजप सरकारचा हातखंडा आहे. परंतु, आता वीजबिल माफीचा हा मुद्दा दूर करण्यासाठी सरकार नवी ‘जादूची शक्कल’ कोणती आणणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही जण तर गंमतीने म्हणत आहेत, वीजबिल माफ करण्यापेक्षा लोकांचा राग माफ करून घेण्याची ‘योजना’ आधी जाहीर झाली, तरच खरी कमाल!
एका शिक्षिकेचा वाढदिवस!
फक्त राज्यच नव्हे, तर सध्या संपूर्ण जग दिल्लीत आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या निरपराध विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहे. अशा वेळी मोठमोठ्या सेलिब्रिटींनीही या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपला वाढदिवस साजरा करण्याचे टाळले. पण, गोव्याच्या कुशावती जिल्ह्यातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात मात्र अगदी उलटेच घडले. विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन एका शिक्षिकेने आपला वाढदिवस साजरा केला म्हणे. हे कितपत योग्य? हे सर्व सुरू असताना विद्यालयाचे प्राचार्य नेमके काय करत होते? असे नेमके कोणते कारणं असावे, ज्यामुळे ते या सर्व प्रकाराचे समर्थन करत आहेत? असे काही प्रश्न आता उपस्थित होत आहेत. याशिवाय, एका सहलीची जुनी यादी पुढे करून या प्राचार्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत ही शिक्षिका आपली कामे करून घेत असल्याचीही चर्चा रंगत आहे... काहीही असो, विद्यार्थ्यांच्या पैशातून वाढदिवस म्हणजे कमालच.
अजिब है मडगावकर
मडगावला दिवसाढवळ्या अपहरणाची घटना घडली. तपासानंतर सत्य उघडकीस येईल. त्या अगोदर जांबावलीच्या गोशाळेतून रात्री गायींना बाहेर काढण्याची घटना ताजीच आहे. पूजा केल्यानंतर गायींसाठी पान ठेवण्यासाठी जाण्याची समाजात चाल आहे. भारतीय संस्कृतीत गायीला देवत्वाचे प्रतीक म्हणून अपार मान आहे. मुक्या प्राण्यांची क्रूरतेने दयनीय अवस्था करण्याची ही विकृती पाहून लोकांचे डोळे पाणावले. या लोकांची हृदये द्रवत नाहीत. काळ उत्तरं देतो, अपराधांचे रांजण भरल्यावर. भाषेचे जनक गोंयबाब यांच्यावरील वादग्रस्त लेखावरून वादळ उठले ते मडगावलाच. हथोड्याला कोंकणीत ‘तुती’ कोण म्हणत नाही. मडगावलाच म्हणत असावेत. ‘तुतयो’ म्हणतात. गोंयबाबांच्या डोक्यावर हथोडा, हा मथळाच विकृतीच्या बाजूने कलतो. कोंकणीचे हे ज्वलंत प्रश्न आपसात सोडवण्यापेक्षा काही लोक दिल्लीच्या जंतरमंतर आंदोलनावर व्हिडिओ काढून सल्ले देतात, हा सहस्रकातील विनोद असावा.
लोबो आणि राणेंची खास भेट!
गोव्यात आमदार मायकल लोबो आणि शेजारच्या सिंधुदुर्गात नितेश राणे हे दोघेही नेहमीच चर्चेत असणारे प्रमुख नेते. वेगवेगळ्या वादांशी नावे जोडली गेली तरीसुद्धा दोघांचाही आपापल्या भागात खूप मोठा चाहता वर्ग आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. गुरुवारी हे दोन्ही नेते अचानक म्हापसा न्यायालयाच्या आवारात एकत्र पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती आणि दोघांच्याही चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि समाधान दिसत होते. या आनंदामागचे कारणही तसेच मोठेच. कित्येक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या स्वतंत्र जुन्या खटल्यांमधून न्यायालयाने अखेर दोघांचीही निर्दोष मुक्तता केली होती. न्यायालयाकडून इतका मोठा दिलासा मिळताच, दोघांनाही एकमेकांशी हस्तांदोलन करण्याचा आणि आनंद व्यक्त करण्याचा मोह आवरला नाही. न्यायालयाच्या पायऱ्यांवर रंगलेली ही हस्तांदोलनाची भेट आणि दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व कार्यकर्तेही भलतेच खूश झाले.
फोंड्याकडे लक्ष
फोंड्याकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. येथे विद्यमान नगरसेवक आणि भाजपचे एक वरिष्ठ पदाधिकारी विश्वनाथ दळवी यांच्या ‘प्रोग्रेसिव्ह फोंडा’ या संस्थेतर्फे केली जात असलेली कामे चर्चेत आहेत. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच गरजूंना साहाय्य करण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. भाजपच्या फोंड्यातील उमेदवारीवर दावा करण्यापूर्वीच विश्वनाथ यांनी या संस्थेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यांच्या कार्याची दखल म्हणून समर्थकांकडून त्यांना फोंड्यात भाजपची उमेदवारी मिळावी, अशी मागणी पुढे आली होती. मात्र, पोटनिवडणुकीवेळी रवीपुत्र रितेश नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली होती. पुढे दुर्दैवाने ही पोटनिवडणूकच रद्द झाली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी विश्वनाथ यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारीबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे आता पुढे विश्वनाथ की रितेश, असा मोठा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपुढे असेल.
दम बिर्याणीचा ‘दम’च निघाला!
‘सोशल मीडिया’वरून तक्रार आली आणि ‘एफडीए’ने कळंगुट परिसरात छापा टाकताच सातपैकी सहा बिर्याणी केंद्रांचा ‘दम’ क्षणात निघाला. जे ग्राहकांना मसाल्याचा सुगंध देत होते, त्यांच्याकडे अन्न हाताळणाऱ्यांची आरोग्य प्रमाणपत्रेच नव्हती, तर पिण्याच्या सुरक्षित पाण्याचीही व्यवस्था नव्हती. इतके दिवस नियमांना बिर्याणीच्या भातात मिसळून ठेवणाऱ्यांना आता परवान्याचाही वास जाईल, असा इशारा मिळाला आहे. प्रश्न एवढाच, की सोशल मीडियावर आवाज उठेपर्यंत यंत्रणा आणि हे खाद्यव्यवसायिक दोघेही नेमके ‘दम’ काढत कुठे बसले होते?
चाल शांत, डाव भारी!
आमदार वीरेश बोरकर यांनी काढलेल्या एका आदेशामुळे आधीचे निलंबन रद्द करताच गावोगावी मिश्किल चर्चा रंगली आहे. सुरुवातीला विरोधकांवर कारवाया होत असताना बोरकर शांत का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण, आता ती शांतता नव्हती, तर योग्य वेळेची वाट पाहणारा डाव होता. काही जण गंमतीने म्हणतात, बुद्धिबळात प्रत्येक मोहरा धावत नाही; योग्य वेळी चालणारा मोहराच खेळ फिरवतो. या एका निर्णयाने विश्वेश आणि अजय यांचाच डाव उलटला. खरं-खोटं नेत्यांनाच ठाऊक; पण सध्या तरी राजकारणात शांत चेहऱ्यामागे मोठा ‘प्लॅन’ असतो, यावर लोकांमध्ये चांगलीच खुसखुशीत चर्चा रंगली आहे.
अनुदान दिले, काम संपले!
जांबावलीतील गोशाळा जमावाने जमीनदोस्त केली, जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले; पण पशुसंवर्धन मंत्र्यांची भूमिका मात्र कमालीची निर्विकार. ‘एफआयआर’ झाला, आमचं काम अनुदान देणं! मग प्रश्न असा की, गोशाळांना फक्त धनादेशाचीच गरज असते की संरक्षणाचीही? सरकारची जबाबदारी अनुदानाचा धनादेश देऊन संपत असेल, तर उद्या गोशाळा, परवा शाळा आणि त्यानंतर इतर सार्वजनिक मालमत्तेचेही संरक्षण पोलिसांच्या नशिबावरच सोपवायचे का? अनुदान देऊन हात झटकण्यापेक्षा, गोसंवर्धनाच्या गप्पांइतकीच गोशाळांच्या सुरक्षेचीही तळमळ कृतीत दिसली, तरच ती खरी जबाबदारी ठरेल.
‘एनआयटी’त स्थानिकांना नोकऱ्यांचे काय झाले?
कुंकळळीत उभारण्यात आलेल्या ‘एनआयटी’त स्थानिकांना नोकऱ्या मिळायला हव्यात. त्या संदर्भात आपण केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. कुंकळळीतील ‘एनआयटी’त स्थानिकांना नोकऱ्या मिळणार. कार्यालयीन कर्मचारी व प्राध्यापक सोडून इतर नोकऱ्यांत स्थानिकांना प्राधान्य मिळणार, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ‘एनआयटी’त सुरक्षा रक्षकांपासून चपराशी, वाहनचालक व सफाई कर्मचारी सगळेच कर्मचारी बिगर गोमंतकीय आहेत. जर स्थानिकांना ‘एनआयटी’चा काडीचाही फायदा नसेल, तर ‘एनआयटी’ काय कामाची? असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.
उतारावरील निष्काळजीपणा
गाडी उभी करताना ‘हँडब्रेक’ ओढण्याची दोन मिनिटांची काळजी घेतली असती, तर घराच्या आवारात थेट ‘अनाहूत पाहुणा’ बनून प्रवेश करण्याची वेळ आली नसती. दोनापावल येथे शुक्रवारी हा अनुभव आला. उतारावर निष्काळजीपणे उभी केलेली चारचाकी मागे सरकत थेट घराच्या गॅरेजमध्ये घुसली; दुसऱ्या चारचाकी, दुचाक्या आणि कंपाउंडचेही नुकसान झाले. आता निष्काळजीपणाची किंमत पोलिस कारवाईच्या रूपाने मोजावी लागणार आहे. वाहन चालविण्याइतकेच ते सुरक्षितपणे उभे करणेही महत्त्वाचे असते, याची आठवण या घटनेने पुन्हा करून दिली.
दोन-दोन सरकारी शाळांना एकच मुख्याध्यापक!
‘मजबूत शिक्षण व्यवस्था, मजबूत भविष्य’ हे ब्रीद आपल्या सरकारला माहीत नाही काय? असा प्रश्न सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षणतज्ज्ञांना व आम जनतेला पडू लागला आहे. आपल्या राज्यातील अनेक सरकारी माध्यमिक शाळांना पूर्णवेळ मुख्याध्यापक नाहीत. अनेक सरकारी शाळांतील मुख्याध्यापकांना दोन-दोन शाळांचा भार सांभाळावा लागत आहे. मुख्याध्यापकांना दोन शाळांचा ताबा असल्यामुळे त्यांना शाळांना न्याय देता येत नाही. तीन दिवस एका शाळेत तर तीन दिवस दुसऱ्या शाळेत अशी कसरत या सरकारी मुख्याध्यापकांना करावी लागते. अनेक अनुभवी सरकारी शिक्षक मुख्याध्यापकाची जबाबदारी स्वीकारण्यास पात्र आहेत. अशा अनुभवी शिक्षकांना बढती देऊन मुख्याध्यापकाची जबाबदारी देणे सहज शक्य आहे.
‘त्यांना’ शांती मिळणार का?
हरिशंकर परसाई यांची ‘भोलाराम का जीव’ ही कथा कदाचित आपण वाचली असावी. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा आजही तेवढीच ‘समर्पक’ आहे. या कथेतील नायक सरकारी पेन्शनच्या प्रतीक्षेतच जीवन यात्रा संपवतो आणि त्याचा आत्मा नंतर पेन्शनच्या प्रतीक्षेत भटकतो, अशी ही कथा. या कथेत सरकारी कार्यालयाची निष्क्रियता व भ्रष्टाचारावर व्यंग केले आहे. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे आपल्या गोव्यात आजही असेच होते. आजच्या घडीला अनेक असे पेन्शनच्या प्रतीक्षेतील आत्मे भटकत असणार. अनेक सरकारी कर्मचारी जे सेवेत असताना किंवा सेवानिवृत्त झाल्यावर दिवंगत झाले त्यांची पेन्शन वर्षानुवर्षे अडकून आहे. त्या दिवंगत सरकारी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक कार्यालयात खेपा घालतात. मात्र, सगळे व्यर्थ. लेखा कार्यालयातील ते अधिकारी व कर्मचारी अमानवीय असल्यासारखे का वागतात? असा प्रश्न त्या आत्म्यांनाही पडला असणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.