

भाजप कार्यकर्त्यांसाठी खास दरबार!
भारतात लोकशाही आली तरी दरबारी संस्कृती आजही जिवंत आहे. आपले राजकारणी कार्यकर्त्यांचे व जनतेचे म्हणणे व समस्या ऐकून घेण्यासाठी दरबार भरवितात. आता अशा दरबाराचा आम जनतेला किती फायदा होतो, हा प्रश्न वेगळा. मुख्यमंत्री प्रत्येक आठवड्यात साखळीत दरबार भरवतात. दिगंबर कामतही हल्ली मडगावात दरबार भरवायला लागले आहेत. विजय सरदेसाई यांचा ‘फ्रायडे बालकांव’ आहे. एवढेच काय आमदार नीलेश काब्रालही दरबार भरवतात. परवा मुख्यमंत्र्यांनी मडगावात सासष्टीतील भाजप कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खास दरबार भरविला होता. या दरबाराला बरीच गर्दी होती. जिथे भाजपचा आमदार नाही, त्या फातोर्डा व कुंकळ्ळी मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आपल्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. समस्या काय तर हितचिंतकांच्या बदल्या व कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी तोंडभर स्मित हास्य करून कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. असे दरबार प्रत्येक मतदारसंघात भरवायला हवेत, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.
ही ‘लॉटरी’ कुणाला?
फोंड्याच्या गेल्या पोटनिडणुकीवेळी भाजपतर्फे रवी पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळेला भाजपचे एक पदाधिकारी अपूर्व दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी थयथयाट केला. शेवटी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अपूर्व दळवी यांची समजूत काढली आणि शेवटी मनोमीलन झाले. आता विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. पुन्हा एकदा भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. यावेळेला रितेश की अपूर्व, असा प्रश्न तर आहेच; पण दोघांनाही डावलून शेवटी नरेंद्र सावईकर यांना उमेदवारी दिली जाणार काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शेवटी रितेश आणि अपूर्व यांच्यात मनोमीलन झाले नाही तर सावईकर यांना लॉटरी लागणार, असाच सध्या राजरंग दिसतो आहे.
गणेशभाऊंची भूमिका
सध्या सावर्डे मतदारसंघात भाजपची उमेदवारी नक्की कुणाला मिळणार, याबद्दल शंका-कुशंका व्यक्त केल्या जात असतानाच सावर्डेचे विद्यमान आमदार आणि सभापती गणेश गावकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सावर्डेत ज्या कुणाला भाजपची उमेदवारी मिळणार त्याला मी पाठिंबा देणार आणि त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, असे म्हटले आहे. वास्तविक गणेशभाऊंनी हे वक्तव्य वरच्यावर केले आहे की गंभीरपणे? यावरही लोक चर्चा करत आहेत. काही दिवसांपूर्वी याच गणेशभाऊंनी विनय तेंडुलकर यांचे पुत्र विनील तेंडुलकर यांची स्तुती करताना तेही पुढे येणारे एक चांगले युवा नेते आहेत, असे म्हटले होते. त्यामुळे भाऊंची ही वक्तव्ये गांभीर्याने घ्यायची की सहज, यावर सावर्डेतील लोक बुचकळ्यात पडले आहेत, एवढे खरे!
‘वाहतूक कोंडी’चे कारण
अपघात झाला, गाडी मोडली, ठीक आहे; पण मग रस्त्याच्या मध्यभागी गाडी सोडून ‘मी निघाले’ म्हणत चालत जाणे, हा नवीन वाहतूक व्यवस्थापनाचा फॉर्म्युलाच दिसतो! एका व्यक्तीच्या अशा वागण्याने मंगळवारी बोडगेश्वर ते ग्रीनपार्कपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या, शेकडो प्रवाशांचा वेळ वाया गेला. अपघातापेक्षा मोठा गुन्हा म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकून इतरांना वेठीस धरणे. वाहन चालविण्याचा परवाना मिळवणे सोपे असेल; पण वाहतूक शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे भानही तितकेच आवश्यक आहे; अन्यथा एका व्यक्तीचा निष्काळजीपणा हजारो नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेत राहील.
दीपक पाऊसकरांचा फॉरवर्ड प्रवेश कधी?
गोवा फॉरवर्ड पक्षाने आपला विस्तार सुरू केलेला असताना कित्येक नेते या पक्षात आता सामील होऊ लागले आहेत. या परिस्थितीत आपण गोवा फॉरवर्डमध्ये जाणार, अशी कित्येक महिन्यांपूर्वी घोषणा केलेले सावर्डेचे माजी आमदार दीपक पाऊसकर हे अजून या पक्षात सामील झालेले नाहीत, याचे कारण काय? असा प्रश्न लोकांना पडला आहे. काहीजण यामागे गणेश गावकर यांचाच हात असावा, असेही म्हणू लागले आहेत. खरे खोटे देवच जाणे!
अहंकारामुळे सांघिक भावनेचा अभाव
शफात खान हे जबरदस्त तबलावादक वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी अकाली गेले. ८०च्या दशकात त्यांनी गोव्यात अनेक गायकांना तबल्याची साथ केली. त्यांचे हात कुस्तीपटूसारखे घसघशीत होते. डग्ग्याची घुमी डमरूसारखी रेंगाळत राहायची. तबल्याचा दणका म्हणजे ऐकणाऱ्याला भारावून टाकणारा अनुभव असे. आपण गायकाच्या मैफलीचा एक घटक आहोत, याचे भान त्यांना सदैव होते. हल्लीचे काही दिग्दर्शक मात्र ‘नाटक माझंच’ (डायरेक्टर्स ड्रामा) हे वर्चस्व गाजवत नाटकाचाच अपहार करत आहेत. परिणामी, लेखकाला जे साधायचे, जे द्यायचे असते त्याचा पचका होतो, विचकाच होतो. शफात खान यांना समज होती की आपण साथ करत आहोत; लोक दिल्ली घराण्याचा एकल तबला किंवा गिमिक्स ऐकायला आलेले नाहीत. नाटकाच्या मूलभूत गोष्टींबाबत अज्ञान असलेले काही नव-मास्तर लेखकाने कलिंगड दाखवले तर त्याचा पेरू करून टाकतात. रसिकांनी अभिनंदन केल्यावर शफातजी नेहमी म्हणायचे, ‘मी फक्त साथ केली.’ गोव्याचे काही दुबे-चौबे मात्र आपणच नाटकाची वाट लावत आहोत, याचे भान नसल्याने लोक हस्तांदोलन करतील, याची वाट पाहत ताटकळत उभे असतात.
आषाढस्य प्रथम दिवसे!
आज आषाढाचा प्रथम दिवस. लग्न झालेल्या लेकी माहेरी आलेल्या आहेत, आषाढ सरी पाहायला. त्यांना आषाढ पावळी अनुभवण्यासाठी पाऊस लवकर येवो. आज महाकवी कालिदास दिन. एव्हीतेव्ही कवितांचा पाऊस ओतणाऱ्या कवींनी आज कविसंमेलने भरवायला हवी होती. महाकवी कालिदासांचे ‘मेघदूत’ म्हणजे आषाढातल्या आल्हाददायी वातावरणात निसर्गाशी सख्य साधण्याची एक सुरेख पर्वणी. यात संवेदना आहेत, विरही मनातील व्याकुळता आहे, निसर्गसौंदर्य आहे, शब्द चमत्कृती आहे, उपमा आहेत, मनाला हर्षोल्लासित करणारे अप्रतिम वर्णन आहे. कालिदासांचे ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ हे प्रख्यात नाटक उत्तर भारतात व केरळात अजून होत असते. विदेशी नाटके रूपांतरित वा कॉपी मारण्यापेक्षा स्पर्धात्मक कोकणी रंगभूमीवर आमच्या संस्कृतीचे ते अजरामर नाटक करण्याची इच्छा आषाढ सरी आणतील, अशी आशा करूया?
चर्चा ‘त्या’ फोन कॉल्सची!
राज्यातील नागरिकांना हल्ली फोन येत आहेत की, विद्यमान मुख्यमंत्र्यांचे काम कसे आहे? कोणता मंत्री अधिक सक्षम वाटतो? आरोग्यमंत्र्यांचे काम कसे आहे? तुमचे मासिक वेतन किती? व्यवसाय की नोकरी करता? कोणत्या पक्षाला मतदान करणार? असे नानाविध प्रश्न विचारून सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हे करणाऱ्या व्यक्ती मात्र गोमंतकीय नाहीत; कारण त्यांना कोकणी येत नाही, हे सर्व प्रश्न इंग्रजी आणि हिंदीतून विचारले जातात. काही नागरिक या प्रश्नांची उत्तरे देतात काहीजण त्यांना शाल-जोड्यातूनही काय सांगायचे ते सांगतात. एकंदरीत विविध पक्ष आपल्या पद्धतीने जनतेच्या मनात काय आहे? निवडणुकीला सामोरे जाताना कोणते नियोजन करावे? यासाठी हा खटाटोप करत आहेत. मात्र, अशाप्रकारच्या ‘फोन कॉल्स’ची चर्चा राज्यात सुरू आहे.
अपघातांस असेही निमंत्रण!
अपघातांची मालिका सुरू आहे, नागरिकांचा आक्रोश वाढतोय, तक्रारींचे ढीग साचत आहेत; पण प्रशासनाची झोप काही उडत नाही. खरे तर रस्ता वाहतुकीसाठी आहे की, ट्रक पार्किंगसाठी, असा प्रश्न आता केरये-खांडेपार परिसरातील नागरिक विचारू लागले आहेत. चार-पाच अपघात झाल्यानंतरही कारवाईचा ब्रेकच लागलेला दिसतो. बहुधा संबंधित यंत्रणा एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत असावी; कारण जीव गेल्याशिवाय फाईल हलत नाही, अशीच धारणा निर्माण झाली आहे. नियमांचे पालन नागरिकांनीच करायचे आणि नियमभंग करणाऱ्यांना मात्र मोकळे रान, हीच जर व्यवस्था असेल तर पुढचा बळी कोणाचा? एवढाच प्रश्न उरतो.
मद विहरतो चोहीकडे!
मद (माज) या शब्दाचा उच्चार ख्रिस्ती बांधव ‘मोद’ असा करतात. ‘मोद माल्ला, मोद भॉल्ला’ असे संवाद तियात्रांत ऐकायला मिळतात. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात इकडे तिकडे चोहीकडे ही कविता होती. त्यात ओळ होती – ‘वरती, खाली मोद फिरे, नभात भरला, दिशांत फिरला...’ येथे मोद म्हणजे आनंद. किती दिग्दर्शकांना हे ठाऊक आहे? लहान बालकांसारखे मला सर्व येते हेच त्यांचे बालीश पालुपद असते. आगाथा ख्रिस्तीचे कोणते नाटक किती वर्षे निरंतर चालू आहे, ते विचारा. शेक्सपियर असू दे. भारतीय नाटककारांवर पाच मिनिटे बोलायला सांगा. नाटक हे विचारांचे घनरूप आहे. विचारांचा अभाव असेल, तर विकारांसह येतो तो मद. रोमरोमांत, अणुरेणूत मद. विद्या विनयेन शोभते असे म्हणतात. विनय असेल तर मध; नसल्यास मद. डायरेक्टरचा मोद विहरतो चोहीकडे!
एकवाक्यतेचा अभाव!
फोंड्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. यावेळेला भाजपला शह देण्यासाठी विरोधकांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या योजल्या जात असल्या तरी खरे म्हणजे विरोधकांत एकवाक्यता नसल्याने ते भाजपच्या पथ्यावर पडत आहे. गेल्या पोटनिवडणुकीच्या वेळेला भाजपविरोधात काँग्रेस आणि ‘आप’ या दोन्ही विरोधी पक्षांनी आपापला उमेदवार उभा केला. मात्र, हे दोन्ही उमेदवार एकमेकांचीच मते फोडणार, हे निश्चित असल्याने भाजपवाल्यांनी निश्वास टाकला. मात्र, ऐनवेळी पोटनिवडणूक रद्दच झाल्याने पुढील घडामोडी टळल्या. आता पुन्हा एकदा ‘आप’, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आपापल्यापरीने फोंडावासीयांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, एकीच्या बळावर भाजपला हरवण्याचे सूत्र त्यांना अजून गवसले नाही काय? असा सवाल भाजपविरोधी मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.
संकेतना ‘हमी’!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे संयुक्त सचिव असलेल्या संकेत आर्सेकर यांनी काहीच दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक ते लढवणारच, यावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे सावर्डेचे भाजप आमदार गणेश गावकर हे सध्या विधानसभेचे सभापती आहेत. त्यामुळे भाजप निवडणुकीत पुन्हा आपल्यालाच उमेदवारी देईल, यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे; परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी यावेळी नवा चेहरा म्हणून सावर्डेची उमेदवारी आर्सेकर यांना देण्याची हमी दिल्यामुळेच आर्सेकर सावर्डेत सक्रिय झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
चोरीचा प्रयत्न; पण तक्रार नाही!
राज्यात आता सामान्य माणसांच्या घरांवरच नव्हे, तर पोलिस अधिकाऱ्यांच्या घरांतही चोरट्यांची नजर पोहोचल्याची चर्चा आहे. ते म्हणतात, चोरी झाली नाही, फक्त प्रयत्न झाला; पण खरा विषय तर पुढेच सुरू होतो. इतरांना तक्रार करा, कायद्यावर विश्वास ठेवा, असा सल्ला देणारेच जर आपल्या घरातील चोरीच्या प्रयत्नाची तक्रार नोंदवत नसतील, तर त्यामागे नेमके कारण काय? चोरी झाली नाही, म्हणून गुन्हाच नाही, असा काही नवा कायदा आला आहे का? असा सवाल लोक विचारू लागले आहेत. काहीजण तर हसत-हसत म्हणतात, ‘तक्रारच नाही, म्हणजे चोरालाही दिलासा!’ अर्थात हे सारे गावगप्पांचे बोल; पण या चर्चेने मात्र कायद्याचे धडे देणाऱ्यांनाच कायद्याचा आरसा दाखवला, एवढे मात्र खरे!
शिक्षक देणार परीक्षा!
एकदा शिक्षकाची कायमची नोकरी लागली म्हणजे आपण कायमचा शिक्षक झालो, आता आपले कोणी काही बिघडू शकत नाही, असा जो समज शिक्षकांना होता तो आता कालबाह्य ठरला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शिक्षकाला शिक्षक पात्रता चाचणी द्यावी लागत आहे. ही परीक्षा केवळ नवीन शिक्षकांनाच नव्हे तर सगळ्या जुन्याजाणत्या शिक्षकांना देण्याची सक्ती करण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व शिक्षक या महिन्याच्या बावीस तारखेला गोवा शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा देणार आहेत. आता पाहूया विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारे किती शिक्षक, हे परीक्षा उत्तीर्ण होतात.
फ्रीजची भाडे वसुली
थंड पेयाची बाटली ३५ रुपये; पण ती थंड करून दिल्यास तिची किंमत ५० रुपये! म्हणजे आता पुढे पाण्याचा ग्लास थंड असेल तर वेगळे, गरम चहा योग्य तापमानात असेल तर वेगळे आणि ‘एसी’मध्ये बसून खाल्ले तर श्वास घेण्याचाही हिशेब लावला तर नवल वाटू नये. बागा येथे एकाला आलेला हा अनुभव त्यावर आधारित व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. ग्राहकांना सेवा देणे, हा व्यवसायाचा भाग असतो; त्यासाठी वेगळा ‘कूलिंग चार्ज’ आकारणे म्हणजे नियमांना थंडगार फ्रीजमध्ये ठेवून ग्राहकांच्या खिशालाच ताप देण्याचा प्रकार. अशा प्रकारांना वेळेत लगाम बसला नाही, तर उद्या ‘बाटली उघडण्याचे शुल्क’, ‘हसून सेवा दिल्याचे शुल्क’ आणि ‘दुकानात पाऊल ठेवल्याचे शुल्क’ अशी नवी दरपत्रकेही पाहायला मिळाली, तर आश्चर्य वाटायला नको!
ऑक्टोवियोंवर भार!
बंदर कप्तान खात्याचे नामकरण ‘गोवा सागरी मंडळ’ झाले आहे. या मंडळाची कार्यकारिणी निर्मितीचे काम सुरू आहे. त्याशिवाय दुसऱ्या बाजूला या मंडळाच्या कायद्याचा अभ्यासही सुरू आहे. त्याची रूपरेषा कशी असावी, यासाठी सध्याचे मंडळाचे संरक्षक म्हणून जबाबदारी पेलणारे ऑक्टोवियो फर्नांडिस कामाला लागले आहेत. विशेष बाब म्हणजे नव्या इमारतीत अजूनही कार्यालय स्थलांतराचे काम सुरू आहे. कर्मचारी आपापले साहित्य जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत आणत आहेत. टर्मिनलची इमारत पुढे सागरी मंडळ म्हणून ओळखली जाणार आहे; परंतु पेशाने मरिन इंजिनियर असलेल्या ऑक्टोवियो यांनी कॅप्टन म्हणून काम करताना अनेक समस्यांना आणि टीकेलाही तोंड दिले. त्यांच्या मागे या खात्याचे मंत्री ठामपणे उभे राहिल्याने ते जोमाने काम करीत आहेत. मात्र, त्यांच्या या भोळेपणाचा काहीजण गैरफायदा घेत असल्याची चर्चा खात्यात आहे, याकडेही त्यांनी जरा गांभीर्याने पाहणे गरजेचे नाही का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.