खरी कुजबुज: निवडणुकीचे टायमिंग

Khari Kujbuj Political Satire: केपेचे काँग्रेस आमदार तथा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष एल्टन डिकॉस्‍टा यांनी एका कार्यक्रमात भाजपचा ‘पायगुण’ चांगला असल्याचे सांगताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

निवडणुकीचे टायमिंग

माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा म्हणून पुन्हा मोहीम सुरू केली आहे. मात्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असतानाच हा उत्साह का जागा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांचे म्हणणे आहे की, बाबू सत्तेत असताना हा प्रश्न का सोडवू शकले नाहीत? भाजपमध्ये प्रवेश करतानाच त्यांनी ही अट घालायला हवी होती, असेही ते म्हणतात. त्यामुळे सध्याची धडपड ही समाजकारणापेक्षा राजकारणच अधिक असल्याची कुजबूज रंगली असून, मतदारही हा ‘स्टंट’ ओळखतील, अशी चर्चा सुरू आहे.

कुंकळ्ळीत तीन बाबांची रंगणार मोठी जुगलबंदी!

माजी अधिकारी एल्विसबाब गोम्स कुंकळ्ळीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगत आहे. काँग्रेसऐवजी ‘स्वाभिमानी कुंकळकार’च्या पाठिंब्यावर ते मैदानात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून युरीबाब, तर सांगे मतदारसंघ आरक्षित झाल्यास भाजपकडून सुभाष फळदेसाई यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे कुंकळ्ळीत ‘तीन बाबां’मध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता या राजकीय रंगमंचावर कोणत्या ‘बाबा’ची एंट्री टाळ्यांच्या गजरात होते आणि कोणाचा पडदा लवकर पडतो, याचीच उत्सुकता मतदारांना लागली आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Sindhudurg Sand Transport: गोवा-सिंधुदुर्ग रेती वाहतूक 8 दिवसांत सुरळीत! नीलेश राणेंचा विश्‍‍वास

एल्‍टनबाब घसरलेच!

केपेचे काँग्रेस आमदार तथा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष एल्टन डिकॉस्‍टा यांनी एका कार्यक्रमात भाजपचा ‘पायगुण’ चांगला असल्याचे सांगताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम पूर्ण करता येते, असे सांगताना त्यांनी भाजपचे कौतुक केले की कार्यकर्त्यांना संदेश दिला, हेच अनेकांना कळले नाही. नंतर आपण काँग्रेसचे नेते आहोत, याची जाणीव होताच त्यांनी भाषणाची दिशा बदलली. हा जिभेचा घसरगुंडीचा प्रकार होता की मनातील भावना नकळत बाहेर पडल्या, यावर आता जोरदार चर्चा सुरू आहे. एल्टनबाब मात्र यावर काय खुलासा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजीव कला मंदिराला ‘आईबाप’ कधी मिळणार?

फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिर सध्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नव्या समितीशिवायच चालले आहे. त्यामुळे कार्यालयात ‘सुकाणू नसलेली नाव’ अशी अवस्था आहे. समितीवर खऱ्या अर्थाने लेखक, नाट्यकर्मी, संगीतकार, नर्तक अशा कलावंतांनाच स्थान मिळावे, कलेशी संबंध नसलेल्यांची खोगीरभरती नको, असा सूरही उमटत आहे. स्पर्धांचा हंगाम दारात उभा असताना ‘मांजर नसल्यावर उंदरांचा हैदोस’ ही म्हण खरी ठरू नये, एवढीच कलारसिकांची अपेक्षा!

देसाई-सरदेसाईंची स्कूटर सवारी

कुडचड्यात विजय सरदेसाई आणि दत्तराज राऊत देसाई यांची स्कूटर सवारी चांगलीच चर्चेत आली, मात्र अपेक्षित राजकीय चमकाऐवजी हेल्मेट नसल्याचीच चर्चा. पर्रीकर-कायतू यांची स्कूटर सवारी आठवून लोकांनी तुलना सुरू केली आहे. गोवा फॉरवर्डला सकारात्मक प्रसिद्धी मिळेल असे वाटत असताना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस पडला. ‘कायद्याचे धडे देणारेच नियम विसरले’ अशी मिश्किल चर्चा रंगली आहे. वाहतूक नियम मोडल्याने कारवाई होणार का, असा प्रश्नही पुढे आला. कुडचड्यातील या स्टंटबाजीमुळे राजकीय हेतू की निष्काळजीपणा, यावर उलटसुलट चर्चा आहे. विरोधकांनीही यावर टीकेची संधी साधली आहे. ‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’ अशी अवस्था गोवा फॉरवर्डची झाली आहे.

Khari Kujbuj Political Satire
B L Santosh Goa Visit: 'स्वबळावर सत्ता मिळवा!' गोव्यात बी. एल. संतोष यांची मंत्र्यांना आणि आमदारांना सूचना

विद्यापीठाचा गलथान कारभार

गोवा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल अजून जाहीर झालेले नाहीत. मे महिन्यात परीक्षा झाल्या होत्या. खास चाचणी घेऊन एमएवगैरे वर्ग सुरू केले. गंमतच ही. परंतु त्या विद्यार्थ्यांना अपुरी कँटीन सुविधा असल्याने अतोनात त्रास होत आहे. ओळखपत्र न दिल्याने दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण बस तिकीट घ्‍यावे लागते. तात्पुरते कार्ड तरी द्यायला पाहिजे होते, कारण दिवसाचा खर्च शंभरावर जातो ही विद्यार्थ्यांची व पालकांची तक्रार. वसतिगृह सुरू होण्याची चिन्हं नाहीत. विद्यार्थ्यांची व्यवस्था पाहण्याचा वकुब विद्यापीठ प्रशासनाकडे असायला हवा की नाही? एकेकाळी मुंबई विद्यापीठाचे निकाल डिसेंबर-जानेवारीत यायचे. हजारो विद्यार्थी असायचे. अवघे शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या शाखांमध्ये असताना निकाल इतका उशिरा येणे याला कसलंच ‘रजांव’ नाही म्हणून पालक खवळले आहेत.

‘फी’चा मुद्दा की फक्त चर्चा?

मुख्यमंत्र्यांनी काही वकील जास्त फी घेतात, असे विधान केले आणि वकिलांनी लगेच निषेधाची तलवार उपसली. यानंतर खरी गंमत सुरू झाली. लोक म्हणतात, प्रत्येक व्यवसायात अपवाद असतातच. काही डॉक्टर, काही कंत्राटदार, काही व्यापारी आणि काही वकीलही. त्यामुळे ‘काही’ म्हणायचे आणि ‘सगळे’ दुखावायचे, हा प्रकार नेमका कसा घडतो, याचे उत्तर अजून कुणालाच सापडलेले नाही. चर्चा अशी रंगली की, जर विधानात तथ्यच नसते तर एवढी खळबळ उडाली असती का? आणि जर तथ्य असेल, तर त्यावर विचार व्हायला नको का? निषेधाचा हक्क प्रत्येकाला आहेच; पण आत्मपरीक्षणाची संधीही तितकीच महत्त्वाची असते, असे काही जाणकार म्हणतात. अर्थात, हे सगळे बोलणे. खरे-खोटे ज्याचं त्याने ठरवायचं.

युवक काँग्रेसला उशिरा आलेली जाग

‘झोपी गेलेला जागा झाला’ असे गोवा युवा काँग्रेसला म्हणावे लागेल. ‘नीट’ परीक्षा पेपर फुटीच्या निषेधार्थ गोवा युवा काँग्रेसने परवा निषेध मिरवणुकीचे आयोजन केले होते. अर्चित नाईक व काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी युवा काँग्रेस व जेष्ठ काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘नीट’ पेपर फुटीची जबाबदारी युवा काँग्रेसने केली. मागणी ठीक आहे, मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी एवढा उशीर का? ‘नीट’ परीक्षा रद्द होऊन पुन्हा नीट घेण्यात आली आणि झोपी गेलेल्‍या काँग्रेसला जाग आली का? या विषयावरून कॉक्रोच पार्टीने भव्य विरोध प्रदर्शन केले. पण या मुद्यावरून आवाज उठविण्यासाठी एवढे दिवस गोवा युवा काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते झोपले होते काय? असा प्रश्‍‍न आम्‍ही नव्‍हे, विद्यार्थी विचारायला लागले आहेत. ∙∙∙

मडगाव पालिकेत ‘दुपारची डुलकी’

मडगाव पालिकेत प्रशासक आल्यानंतर तरी शिस्त येईल अशी लोकांची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. दुपारच्या सत्रात कामासाठी गेले तर अनेक कर्मचारी ‘वामकुक्षी मोड’मध्ये आढळतात. जेवणानंतर थोडीशी झोप ही सवय झाली की ती सुटणे कठीण, आणि हेच आता पालिकेत नवा नियम झाल्यासारखे वाटते. बाहेर सर्वसामान्य नागरिक आपले काम होईल या आशेने ताटकळत उभे, तर आत सरकारी बाबू शांत झोपेत हरवलेले. पालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असले तरी त्याची भीती कुणालाच वाटत नाही. कारण बहुतेक कर्मचारी राजकीय वशिल्यानेच रूजू झाल्याची चर्चा. ‘कॅमेरा बघतो, पण कारवाई कोण करणार?’ असा प्रश्नच आता सामान्य माणूस विचारतो. परिणामी मडगाव पालिकेत शिस्त नव्हे तर दुपारची डुलकीच जणू परंपरा बनली आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com