

दामूंचा कुंकळ्ळी दौरा!
निवडणुकाजवळ आल्या की नेत्यांना कार्यकर्ते आणि मतदारांची आठवण होते. गेली साडेचार वर्षे कुंकळळी मतदारसंघाकडे भाजपच्या नेत्यांचे विशेष लक्ष गेले नव्हते. विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर आणि त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या उमेदवाराला अपेक्षित मतदान न मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजपने केवळ कुंकळळी मतदारसंघालाच नव्हे, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही अडगळीत टाकल्याची भावना खुद्द भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करतात. आता निवडणुकाजवळ आल्यामुळे भाजपकडून ‘रेनकोट’ आणि छत्र्यांचे वाटप सुरू झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांनी नुकताच कुंकळळीचा दौरा केला. दामू नाईक यांनी माजी आमदार राजन नाईक, माजी आमदार आरेसियो डिसोझा तसेच माडडीकटा येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी माजी आमदार क्लाफास डायसही उपस्थित होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष येणार म्हटल्यावर कार्यकर्त्यांमध्ये जसा उत्साह अपेक्षित होता, तसा तो दिसला नाही. इतर मतदारसंघांप्रमाणे या मतदारसंघात भाजपचे संघटनात्मक बळ का दिसत नाही, याचा शोध आता प्रदेशाध्यक्षांनाच घ्यावा लागेल.
शेकडो ग्रंथालयांचा वापर होवो...
मुलांना लवकरच राज्यातील १६८ ग्रंथालयांच्या माध्यमातून आधुनिक पुस्तके आणि राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयातील स्रोतांचा लाभ घेता येणार आहे. लोकांपर्यंत ग्रंथालयांची पोहोच अधिक बळकट करण्यासाठी सरकार कंटेनर ग्रंथालये सुरू करण्याचाही विचार करत आहे. ग्रंथालय सेवा अधिक समुदायांपर्यंत विस्तारण्याचा प्रस्ताव असून, या प्रकल्पावर सरकार ७४ कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. ‘वाचाल तर वाचाल’ असे उगाचच म्हटले जात नाही. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते; पण पाणी पिण्याची इच्छा आणि तहान त्यालाच लागावी लागते. तहान निर्माण करण्यासाठी इंजेक्शन देता येत नाही. त्याचप्रमाणे, कागदी पुस्तके असोत वा डिजिटल माध्यमे, ज्ञान संपादनाची आणि वाचनाची आवड तसेच सवय मुलांमध्ये रुजविण्याची गरज आहे. सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. या सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी यूपीएससी, आयएएससह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली, तर या उपक्रमाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
युरींचा १२-० स्कोअर, किती खरा!
सध्या जगभर फुटबॉलच्या स्पर्धांची धूम आहे. कोणावर किती गोल झाले आणि कोणत्या संघाने किती गोल केले, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी १२-० असा स्कोअर दर्शविणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यापासून नव्या चर्चेला ऊत आला आहे. युरी आलेमाव यांनी दावा केला आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी आघाडी सासष्टी आणि मुरगाव तालुक्यांतील बारा पैकी बाराही विधानसभा मतदारसंघ जिंकणार आहे. मात्र, सध्या या बारा मतदारसंघांपैकी चार जागा भाजपविरोधी पक्षांच्या ताब्यात आहेत. मग ८ विरुद्ध ४ चे गणित थेट १२-० कसे होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता पाहायचे, युरीबाब ही जादूची छडी नेमकी कशी फिरवतात!
दरबारानंतरची ‘परीक्षा’
अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी फोंड्यात जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. लोकांशी थेट संवाद साधण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह मानला गेला. मात्र, दरबारात मांडण्यात आलेले अनेक प्रश्न नवे नसून, अनेक महिन्यांपासून नागरिकांना भेडसावणारे! याची नोंद घेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या उपक्रमाची संभावना ‘जखमेवर मीठ चोळण्याशी’ केली. अर्थात, विरोधकांची टीका म्हणून हा आक्षेप काही सहजपणे बाजूला सारता येणार नाही. गाऱ्हाणी ऐकून घेणे ही प्रक्रियेची सुरवात, तर तिचे मोल कार्यवाहीत असते. त्यामुळेच जनता दरबारात मांडलेल्या प्रश्नांवर किती तत्परतेने उपाययोजना होतात, याकडे फोंडावासीयांचे लक्ष लागले आहे. शेवटी जनतेच्या मनातील खरा जनता दरबार प्रत्यक्ष कामांच्या पूर्ततेनेच भरत असावा, नाही का!
विश्वजीत यांची तत्परता!
राजकारणात टीका करणारे अनेक असतात; पण संकटाच्या वेळी तातडीने मदतीचा हात पुढे करणारे मात्र मोजकेच असतात. ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे दानतही लागते, असे म्हणतात. काहींकडे असूनही नसल्यासारखी स्थिती असते. अनेक मंत्री-आमदार गरजूंना आपल्या खिशातून मदतीचा हात देत असतात. त्याशिवाय, कोणाच्या घरावर आपत्ती कोसळली तर त्याच्या मदतीला धावून जाणारेही अनेकजण असतात. काहीजण आपल्या मतदारसंघासाठी काम करतात, तर काही त्याही पलीकडे जाऊन काम करतात. मंत्री विश्वजीत राणे हे त्यात अग्रस्थानी आहेत, असे म्हणता येईल. सांताक्रूझ येथील एका कुटुंबासाठी मदतीचे आवाहन झाल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबाला मदत करण्याचे जाहीर केले. आगीत एका कुटुंबाचे घर जळाले. ते पुन्हा उभारण्यासाठी त्या कुटुंबाकडे पैसे नव्हते. त्यामुळे माजी सरपंच मारियानो दो आरावजो यांनी मदतीचे आवाहन केले आणि त्या आवाहनाला राणे यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. त्या कुटुंबाचे घर उभारून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अर्चित नाईक यांची उपमा!
गोवा विद्यापीठातील खानावळीतील जेवणात किडे आढळल्याचा प्रकार घडल्याने त्याविरोधात भाजयुमोने मोर्चा काढला. सत्ताधारी पक्षाच्या युवा आघाडीनेच याविरोधात मोर्चा काढल्याने विद्यार्थी संघटनांमध्ये आश्चर्य व्यक्त झाले. याशिवाय, भाजयुमोच्या या कृतीवर प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनीही टीका केली. विशेष बाब म्हणजे राज्य सरकार सध्या ‘माझे घर’ या योजनेचा प्रसार करीत आहे. त्यालाच धरून, विद्यापीठातील जेवणात किडे आढळल्याने सरकारने ‘माझे किडे’ ही योजना सुरू करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. याशिवाय त्यांनी शिक्षणमंत्र्यांनाही सल्ला दिलाच आहे. या प्रकरणावरून आता भाजयुमो अर्चित नाईक यांच्या या सल्ल्याला कसे प्रत्युत्तर देते, हे पाहावे लागेल.
खेळ, खेळाडू, खिलाडूवृत्ती
गोव्यात बुद्धिबळाचा प्रसार बराच वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. क्रिकेट आणि फुटबॉल राज्यात लोकप्रिय आहेतच. मात्र, एकेकाळी राष्ट्रीय स्तरावर चमकलेले व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिसचे अनेक खेळाडू गोव्यात होते. सध्या मात्र या खेळांचा तितकासा जोर दिसत नाही. बॅडमिंटनचाही १९८० ते २००० या कालावधीच्या तुलनेत प्रभाव कमी झाल्याचे जाणवते. एका सरकारी खात्यात टेबल टेनिसचे टेबल जेवणासाठी आणि चहा-पाण्यासाठी वापरले जात असल्याचे पाहायला मिळाले. त्या खेळाची झालेली ही अप्रतिष्ठाच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांनाही त्याची लाज वाटत नव्हती. काही शैक्षणिक संस्थांमध्ये टेबल टेनिसची टेबले आणली जातात; मात्र विद्यार्थ्यांमध्ये खेळण्याची आवड कमी होताना दिसते. फुलात भृंग अडकून पडावा तसे विद्यार्थी स्मार्टफोन आणि डिजिटल विश्वात गुरफटले आहेत. त्याचाच हा परिणाम असल्याचा निष्कर्ष विविध तज्ज्ञ काढतात. खेळ कमी होत चालल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे पणजीतील एका सरकारी खात्यात कर्मचाऱ्यांसाठी आणलेल्या टेबल टेनिसच्या टेबलावर दुपारच्या जेवणासाठी ताटे मांडलेली दिसली. ते दृश्य पाहून हसावे की रडावे, हेच कळेना.
पणजी मार्केट किती सुरक्षित?
पणजी महानगरपालिकेच्या मालकीच्या मार्केटमधील एका मोबाईल दुकानात चोरी झाली आणि सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचा माल लंपास करण्यात आला. मार्केट इमारतीला चारही दिशांनी दरवाजे आहेत. तसेच रात्री साडेआठ ते नऊनंतर या मार्केटचे सर्व दरवाजे कुलूपबंद केले जातात. त्यामुळे मार्केटमध्ये चोरी झालीच कशी, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. काही दिवसांपूर्वी मार्केटमधील समस्यांवर नगरसेवक लिओनिड फुर्तादो यांनी जोरदार टीका केली होती. राजधानीतील मार्केटची स्थिती पाहिल्यानंतर हे पर्यटन राज्यातील मार्केट वाटते का, असा सवाल त्यांनी केला होता. त्याशिवाय, महानगरपालिकेच्या कारभारावरही त्यांनी टीका केली होती. आता या चोरीच्या घटनेमुळे मार्केटमधील दुकानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मार्केट समितीचे अध्यक्ष कॅरिलोना पो आता काय पावले उचलणार, हे पाहावे लागेल.
मनोज संन्यास मागे घेणार!
रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या (आरजी) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोज परब यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. परंतु, राजकारण हे राजकारण असल्याने संन्यास घेतलेला नेता संन्यास कधी मागे घेईल, हे सांगता येत नाही. ‘आरजी’ला रामराम ठोकल्यानंतर मनोज परब महाराष्ट्र व कर्नाटकातील काही प्रादेशिक पक्षांच्या वरिष्ठ मंत्र्यांना भेटत आहेत. ते पाहता, परबही संन्यास मागे घेऊन दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मतभेद व मनभेद
भांडण झाल्यावर ते नंतर मिटते. त्यावेळी गळाभेट, आलिंगन, मिठी मारली, समेट असे शब्दांचे बुडबुडे वापरण्याची गरज नसते. मन चंचल होते, तेव्हाच मतभेद होतात. मग मनभेद हा शब्द कसा घडला... डोंबलाचे! प्रत्यक्षात दोन्ही शब्दांत काहीही फरक नाही. शब्दांचा खेळ करून बुद्धिभेद करत शब्दांचा फेस काढण्याचाच हा प्रकार आहे. एक निवेदक सापेक्षी विद्वान असे म्हणताना ऐकले. ते चूक आहे. ते साक्षेपी विद्वान असे असायला हवे. सापेक्षता सिद्धांत म्हणजे आईन्स्टाईनचा ‘थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी’. चकवणारे काही शब्द असतात. उदाहरणार्थ, वादातीत आणि वादग्रस्त. ज्यावर वादच नाही तो वादातीत. मात्र, वादग्रस्त हा शब्द त्याचा समानार्थी म्हणून वापरण्याचे नवे अज्ञानी फॅड सुरू झाले आहे. त्याचा शुभारंभही वादग्रस्त लोकांनीच केला आहे. अशा शब्द-फ्रॉडस्टरपासून सावध राहावे.
रेजिनाल्ड यांची अग्निपरीक्षा
कुडतरीचे आमदार हे जरी अपक्ष म्हणून निवडून आलेले असले, तरी त्यांची पार्श्वभूमी काँग्रेसच्या तत्त्वांचीच आहे. आता तर ते सत्तेत असलेल्या भाजप सरकारला पाठिंबा देऊन बसले आहेत. त्यांच्या कुडतरी मतदारसंघात भाजपला मुळीच पाठिंबा नाही. आता मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने भाजपची थोडीफार मते आहेत. पण रेजिनाल्ड पुन्हा निवडून येतील, एवढी ताकद या मतांमध्ये नाही. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही संकल्पना भाजपनेच आणली. त्यामुळे सरकार या संकल्पनेला पाठिंबा देत आहे. मात्र, सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रेजिनाल्डबाब यांची अवस्था काय प्रतिक्रिया द्यावी अशी झाली आहे. त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सोयीस्कर बगल दिली. ते म्हणाले, ‘जेव्हा इतर सर्वांनी आपली मते मांडली, तेव्हा आपल्याला त्याबद्दल बोलण्यास काहीच उरले नाही.’ तसेच, या संकल्पनेची अंमलबजावणी २०२९ मध्ये होणे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले. संयुक्त संसदीय समितीसमोर अनेकांनी या संकल्पनेच्या समर्थनार्थ व विरोधात मते मांडली. मात्र, रेजिनाल्डबाब या दोन्हींपैकी नेमके कोणत्या भूमिकेत आहेत, हे अखेरपर्यंत स्पष्ट झाले नाही.
जॉगिंग पार्कमध्ये ‘अंधेरा कायम रहे’...
फातोर्डा येथील जॉगिंग पार्कमध्ये चालण्यासाठी दररोज शेकडो नागरिक येत असतात. काही जण रात्रीच्या वेळीही येथे येतात. या जॉगिंग पार्कमध्ये २७ सोलर वीजेचे खांब आहेत. ही एक चांगली व्यवस्था आहे. मात्र, त्यांची व्यवस्थित देखभाल होत नसल्याने काही दिवसांपासून सर्व वीज खांबांवरील दिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावरील वीज खांबांच्या उजेडाचा आधार घेऊन जीव मुठीत धरून चालावे लागते. याचे आणखी एक कारण म्हणजे येथे अनेकदा साप फिरताना दिसतात. जॉगिंग पार्कच्या बाजूला झाडेझुडपे आहेत. तेथून तसेच लगत असलेल्या गटारातून हे साप वर येतात. सोलर वीज खांबांची देखरेख करण्यासाठी कोणत्याही कंपनीला कंत्राट दिले नाही का, असा प्रश्न चालायला येणारे नागरिक विचारू लागले आहेत. स्टेडियम व्यवस्थापकाला विचारले असता, ‘दुरुस्तीसाठी सांगितले आहे,’ एवढेच उत्तर मिळते.
फोंड्यातून लढणार ‘बडा नेता’
माजी मंत्री स्व. रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंड्यात होणारी पोटनिवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रद्द करण्यात आली. तेव्हापासून फोंडा मतदारसंघ आमदाराविना आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण फोंडावासीयांचे लक्ष आहे. फोंड्यात भाजपकडून लढण्यासाठी रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक, माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांच्यासह अनेकजण उत्सुक आहेत. परंतु, यावेळी मात्र भाजप फोंड्यात वेगळाच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रितेश आणि दळवी यांना चकवा देत पक्षातील एक ‘बडा नेता’ फोंड्यातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या भाजपमध्ये सुरू आहेत.
लंडनस्थित गोमंतकीयांना आता गोवा फॉरवर्डचा पर्याय?
जे विश्वासाला पात्र ठरत नाहीत, स्वार्थासाठी जनहिताची पर्वा करीत नाहीत, त्यांना जनता माफ करीत नाही, हे सत्य आहे. गोव्याचे हित जपण्याच्या आणि गोमंतकीयांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘आरजी’कडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. लंडनसह विविध देशांत स्थायिक झालेल्या गोमंतकीयांनीही ‘आरजी’ पक्षाला भरभरून पाठिंबा दिला होता. मात्र, ‘आरजी’मध्ये फूट पडल्यानंतर आता परदेशस्थ गोमंतकीय पर्याय म्हणून ‘गोवा फॉरवर्ड’कडे पाहू लागल्याची चर्चा आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या लंडन दौऱ्यावेळी तेथील मूळ गोमंतकीयांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याचे आवाहन केल्याने गोवा फॉरवर्डचे राजकीय वजन निश्चितच वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भानगडींचे पुढे काय...?
भानगडींची चौकशी सुरू असताना ती प्रकरणे अकस्मात गडप कशी होतात, हे लोकांना कळत नाही. मात्र, त्यात गुंतलेल्या लोकांची पत तेवढी धुळीस मिळालेली असते. कला अकादमीतील दोन अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत सुरू झाली, होणार, करणार असे फुसके बारच उसळले. नाट्यस्पर्धेच्या परीक्षकांना लाच दिल्याचा हा भयंकर प्रकार होता. कलेच्या क्षेत्राला काळिमा फासणारे हे प्रकरण होते. मध्यंतरी परीक्षकांनी मुंबईत जाऊन तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची फाईल सरकारदरबारी पोहोचली. त्या घटनेला आता अनेक महिने लोटले. मात्र, या प्रकरणाचे दमन झाले की मंथन, हेच कळत नाही. करपल्याशिवाय धूर येत नाही, असे म्हणतात. ‘खाके ओरशे’ (नामानिराळे) केले म्हणजे आपण मोकळे झालो, असे वाटत असेल; पण आतल्या सद्सद्विवेकबुद्धीच्या वायर्स (असल्यास) त्या कुरतडतच राहतील. इतर प्रक्रिया दाबल्या, तरीही. ∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.