खरी कुजबुज: राजकीय अळंबी की...

Khari Kujbuj Political Satire: राज्यात आता पावसाचा जोर वाढला आहे. मध्ये-मध्ये ऊनदेखील पडत आहे, त्यामुळे आता अळंबी डोकी वर काढू लागली आहेत.
Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुजDainik Gomantak
Published on
Updated on

राजकीय अळंबी की...

राज्यात आता पावसाचा जोर वाढला आहे. मध्ये-मध्ये ऊनदेखील पडत आहे, त्यामुळे आता अळंबी डोकी वर काढू लागली आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्याने राजकीय ‘अळंबी’देखील हळू-हळू डोकी वर काढू लागली आहेत. अनेक हवसे...नवसे...गवसे... आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत. आपल्याला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळू शकते याची चाचपणीदेखील काहींनी सुरू केली आहे. या अळंब्यांमुळे कुणाला लाभ होईल किंवा नाही, हे माहित नाही; परंतु जनतेच्या पैशांचा चुराडा मात्र निश्‍चितपणे मोठ्या प्रमाणात होणार आहे. ∙∙∙

एल्विसनी दंड थोपटले!

मैदानात उतरल्याशिवाय सामना जिंकता येत नाही. प्रयत्न केल्याशिवाय यश पदरी पडत नाही, असे म्हणतात. विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांत गोंधळाचे वातावरण आहे. अशात काँग्रेस पक्षाचे नेते एल्विस गोम्स यांनी कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात काँग्रेस पक्षाचाच आमदार असताना एल्विस गोम्स यांना या मतदारसंघात काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणार नाही, हे निश्चित. याचा अर्थ एल्विस गोम्स यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे निश्चित केले आहे का? की ते राज्यात येणाऱ्या नव्या गोवा काँग्रेस पक्षाची वाट धरणार? एल्विस सध्या विद्यमान आमदार युरी आलेमाव यांच्याविरोधात दंड थोपटण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळेच ते आता जोरदार डरकाळ्या फोडू लागले आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: निवडणुकीपूर्वीच प्रतिमा विरुद्ध वालंका सामना? नावेलीत उमेदवारीवरून चुरस; सिप्रू कार्दोझ यांच्या नावाचीही चर्चा

मृत्यू अटळ!

‘जो जन्मास येतो तो एक ना एक दिवस मृत्युमुखी पडतो. मृत्यू अटळ आहे, अमर कोणीही नाही’. हे विधान काल सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी केले. देवाने ही पृथ्वी तयार करताना सर्व बाजूंचा विचार केलेला आहे. यात प्रामाणिकपणा, शिस्त, निस्वार्थीपणा, प्रेम यासारख्या चांगल्या गोष्टींबरोबरच द्वेष, स्वार्थ, राग, लोभ यासारख्या स्वभावातील वाईट गोष्टीही निर्माण केल्या आहेत. आता तर कलियुग सुरू आहे, म्हणजे सर्वांची पावले चांगल्याकडून वाईटाकडे जास्त पडू लागली आहेत. अशा परिस्थितीत सर्वांना मृत्यू अटळ आहे, हे माहीत असूनही द्वेष, स्वार्थ, लोभ, मोह या गोष्टींपासून दूर राहता येत नाही. वरून या गोष्टींना लोक जास्त चिकटून राहू लागले आहेत. त्यामुळे कामतांचे हे विधान खूप महत्त्वाचे आहे. ∙∙∙

त्यामुळे पंचायती कात्रीत!

‘१५ दिवसांत परवाना, नाहीतर आपोआप मंजुरी!’ पंचायत विभागाच्या नव्या फर्मानाने ग्रामपंचायतींची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कर्मचारी अपुरे, कागदपत्रांचे ढीग, विविध खात्यांच्या मंजुऱ्यांचा खोळंबा आणि प्रत्यक्ष पाहणीची कसरत सुरू असताना सरकारने मात्र ‘घड्याळ’ पुढे ठेवले आहे. ठरावीक मुदतीत निर्णय झाला नाही, तर परवाना आपोआप मंजूर! म्हणजे जबाबदारी पंचायतीची आणि घाई सरकारची. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या नावाखाली ‘इज ऑफ गेटिंग लायसन्स’ तर होणार नाही ना, असा सवाल आता गावागावांत विचारला जात आहे. उद्या एखादा वादग्रस्त परवाना आपोआप मंजूर झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, याचे उत्तर मात्र परिपत्रकात नाही. त्यामुळे ‘वेळेवर निर्णय द्या’ हा आदेश जितका कडक, तितकाच तो वास्तवापासून दूर असल्याची भावना पंचायत वर्तुळात व्यक्त होत आहे. माझे घर, माझ्या फ्लॅटनंतर माझा बांधकाम परवाना ही योजना चांगलीच चर्चेत येणार आहे. अडवणूक करणाऱ्यांच्या मुळावर ही योजना येईल, अशी चर्चा आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: शंभर कोटींचा 'तो' आरोप काँग्रेसवरच उलटणार? गिरीश चोडणकरांच्या वक्तव्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ!

‘मिशन’मधून सॅमी गायब!

बोलण्यात आणि कृतीत फरक असतो. कधी-कधी आपण भावनेच्या भरात बोलून जातो. मात्र, प्रत्यक्षात वेळ आल्यावर माघार घेतो. कुंकळ्ळीचे सुपुत्र, सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक, तियात्र दिग्दर्शक सॅमी तावारीस यांनी कुंकळ्ळी मतदारसंघाबाहेरील उमेदवार नको, म्हणत ‘स्वाभिमानी कुंकळ्ळीकर’ या मिशनमध्ये आपणही असल्याचे जाहीर केले होते. एल्विस गोम्स, डॉ. जॉर्सन फर्नांडिस यांच्यासोबत ‘मिशन स्वाभिमानी कुंकळ्ळीकर’मध्ये सॅमीही होते. मात्र, काल ‘मिशन स्वाभिमानी’च्या बैठकीत सॅमींची गैरहजेरी जाणवली. सॅमी साहेबाने आपला विचार बदलला की काय? असा प्रश्न कुंकळ्ळीकरांना पडला आहे. ∙∙∙

‘ग्रँड’ निरोप!

म्हापसा पालिका अधिकारी असलेल्या एका साहेबांची बदली झाली तरी शेवटच्या रात्रीपर्यंत कार्यालयात बसून फाइल्स निकाली काढत होते. अर्थात, एवढ्या रात्री त्यांना एकटे वाटू नये म्हणून पालिकेचे काही कंत्राटदार सोबतीला होतेच! दुसऱ्या दिवशी त्यांचा निरोप समारंभ थेट एका हॉटेलमध्ये, दुपारच्या जेवणावळीत पार पडला. तिथे पालिका कर्मचारी आणि काही माजी नगरसेवकही हजर होते. साहेब कार्यालयातून चालले म्हणून बहुतांश कर्मचाऱ्यांच्या जीवात जीव आलाय आणि ते सुटकेचा श्वास घेत आहेत; पण ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना हल्लीच कृपेने सेवावाढ मिळाली आहे, ते मात्र साहेबांच्या गुणांचे पोवाडे गात फिरत आहेत! एकूणच, जाता जाता साहेबांनी काहींना आनंद दिला, तर काहींना ‘निसरडा’ रस्ता! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: भविष्‍यात बोरकर यांना पूर्णपणे उघडे पाडू, पक्ष कधीही त्‍यांच्‍या ताब्‍यात देणार नाही; विश्‍‍वेश नाईकांची टीका VIDEO

युरी आलेमाव यांच्यापुढे पेच...

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे सध्या चिंताग्रस्त आहेत. त्याला तशी कारणेही आहेत. त्यांचे काका चर्चिल आलेमाव हे कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी धडपडत आहेत. आपली लाडली बेटी वालंका यांना कुठल्याही स्थितीत आगामी विधानसभेत आमदार करायचेच यासाठी त्यांचा हा जीवाचा आटापिटा सुरू आहे. नावेलीत कॉंग्रेस मतदारसंघ हा सुरक्षित आहे, हे राजकारण कोळून पिलेले चर्चिलबाब जाणून आहेत. तर दुसरीकडे वॉरन आलेमाव यांचीही आमदार बनण्याची इच्छा आहे. ते बाणावली मतदारसंघात हातपाय हलवीत आहेत. या सर्व आलेमाव कुटुंबीयांना एकवेळ कॉंग्रेस पक्षात सामावून घेणे शक्य आहे. मात्र, सर्वांनाच उमेदवारी देणे महाकठीण आहे. ‘फॅमिली राज’ हे आलेमाव कुटुंबासाठी नवीन नसले तरी याच घराणेशाही राजकारणामुळे त्यांना यापूर्वी मतदारांनी घरी पाठवून दिले होते, हा इतिहास आहे. कॉंग्रेस पक्ष हे जाणून आहे. युरींसमोर आपला कुंकळ्ळी मतदारसंघ शाबूत ठेवण्याचेही आव्हान आहेच म्हणा. या सर्व अडचणींवर युरी कसा तोडगा काढतात, हे नंतर कळेलच. तूर्त वेट अँड वॉच. ∙∙∙

सारेच इच्छुक एका व्यासपीठावर!

विधानसभा निवडणूक नक्की कधी होणार, हे जरी अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सावर्डे मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली असून विद्यमान आमदार गणेश गावकर यांच्यासह विनय तेंडुलकर, दीपक पाऊसकर, संकेत आर्सेकर, रमाकांत गावकर, बालाजी गावस, भाजपचे सावर्डे गट अध्यक्ष विलास देसाई अशी इच्छुकांची लांबलचक यादी आहे. काल काले येथे भाजप गट अध्यक्ष विलास देसाई आपले दिवंगत भाऊ कालिदास रामा गावस देसाई यांच्या नावे जो ट्रस्ट स्थापन केला आहे त्या ट्रस्टमार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे आणि सायकलींचे वाटप करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला गणेशभाऊ आणि विनयभाई सोडल्यास बाकी सर्व इच्छुक एका व्यासपीठावर आले होते. २०२२ च्या निवडणुकीत सावर्डेचे तत्कालीन आमदार आणि मंत्री दीपक पाऊसकर यांच्याविरोधात सगळेच एकत्र आले होते. आणि त्यामुळे भाजपने शेवटी दीपकना उमेदवारीही नाकारली. आता २०२७च्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होणार, याचे हे संकेत तर नाहीत ना? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्या'! LOP युरींचे प्रतिपादन; काँग्रेस आमदारांतर्फे राज्यपालांना निवेदन

सांताक्रूझमध्ये गुंडांचा वावर!

सांताक्रूझ परिसर एकेकाळी गुंडगिरीमुळे चर्चेत होता. आता काही दिवसांपासून या ग्रामपंचायत क्षेत्रात जुन्या घटनांना उजाळा मिळू लागला आहे की काय, असे वाटू लागले आहे. कारण रात्री ११ नंतर या पंचायत क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली, त्याशिवाय पोलिस स्थानकापासून पुढे गेलेल्या बांबोळीकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांच्या उतारावर काही गुंडांची टोळकी उभी राहू लागली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी बांबोळी येथील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना रात्री साडेअकराच्या सुमारास चोप दिल्याची घटना घडली. त्याची वाच्यता फारशी झाली नाही; पण मारहाण झालेल्या युवकांचा रस्ता पुन्हा या गुंडांकडून अडवण्याचा प्रकार घडला. पोलिसांची रात्रीची गस्त नेमकी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असते, ते काही समजत नाही. या प्रकारामुळे सांताक्रूझमध्ये पोलिस स्थानक असूनही या घटना कशा घडतात, हाच प्रश्‍न उपस्थित होतो. ∙∙∙

सावर्डेतील चढाओढ?

सावर्डेचे युवा नेते संकेत आर्सेकर यांनी सध्या कामाचा झपाटाच लावला असून त्यामुळे इतरही तशीच कामे करू लागले आहेत. काल काले येथे झालेल्या एका कार्यक्रमात खुद्द संकेत यांनीच तसा खुलासा केला. काले येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पुरेशी वाहनांची सोय नसल्याने आपल्या शाळेतील बस कालेच्या विद्यार्थ्यांसाठी देण्याची त्यांनी घोषणा केली. त्यापुढे जाऊन ते म्हणाले, मी कोणतीही सुविधा कुणाला उपलब्ध करून दिली तर लगेच तसलीच सेवा दुसरेही उपलब्ध करून देऊ लागले आहेत. त्यामुळे मी बस दिल्यावर कदाचित दुसरेही तुमच्यासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढे येतील. संकेतची ही कोपरखळी गणेशभाऊंसाठी तर नव्हती ना? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: आप कार्यकर्त्यांनी फोंड्यात मगोपला दाखविले काळे झेंडे, शाब्दिक चकमक; काही काळ तणावाचे वातावरण

साहेब जोडप्यांचा जोडधंदा...

सरकारी वेतनात काही भागत नाही म्हणून अनेक सरकारी अधिकारी दुसरा व्यवसाय करतात, हे कधीही लपून राहिलेले नाही. कायद्याने तसा व्यवसाय करण्यास बंदी असली तरी त्यासाठी चोरवाट काढली जाते. आता हे सर्व सांगायचे कारण म्हणजे पोलिस अधिकारी असलेल्या एका जोडप्याची करामत. पतीराज कुशावती जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात ‘आयआरबी’ निरीक्षक तर सौभाग्यवती दक्षिण गोव्यात एका ठाण्यात ‘पीएसआय’ आहेत. पतीने फातोर्ड्यात एक वाईन शॉप सुरू केले आहे. कामावर कमी तर जास्त वेळ ते आपल्या या वाईन शॉपवर घालवतात. पतीराज बाहेर गेले तर पत्नी कामाला दांडी मारून गल्ला सांभाळते. वरिष्ठ पोलिसांना ही बाब माहीत आहे खरे; मात्र ते त्यांना याबाबत विचारण्याचे धाडस करीत नाहीत. कारण त्यांचेही तसे जोडधंदे आसतील? सर्व एकाच माळेचे मणी. ∙∙∙

‘प्रोव्हेदोरिया’चा चांगला पायंडा!

‘प्रोव्हेदोरिया’ हे राज्य सरकारचे खाते जनतेच्या मदतीसाठी वावरत असते. या खात्यातर्फे ‘वृद्धाश्रम’ चालवले जात आहेत. मडगाव येथील नूतनीकरण केलेल्या वृद्धाश्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी खात्याच्या अधिकाऱ्याने उपस्थित वृद्धांचे पाय धुतले, त्यावर फुले वाहिली व त्यांना हार अर्पण करून त्यांच्याप्रति प्रेम व आपुलकीची भावना व्यक्त केली. या कृतीने उपस्थित वृद्धांच्या डोळ्यात पाणी तरळले. हे दृश्य खरोखरच संस्मरणीय होते. प्रोव्हेदोरियाने हा चांगला पायंडा घातला आहे, असे उपस्थित मंत्रिमहोदय दिगंबर कामत यांनीही म्हटले. प्रोव्हेदोरिया मंत्री सुभाष शिरोडकर यांनी तर वृद्धांशी आपुलकीने वागा, असे कर्मचाऱ्यांना आवाहन केले. तेथील वृद्धांसाठी हा क्षण अलौकिक होता, एवढे खरे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

जुने ते सोने?

हल्लीच पुण्याचे नाटककार अतुल पेठे यांनी नाटक केले. अगोदरच ठरवले फक्त २० प्रयोग करायचे. दौरा नाही. हा विचार फार उच्च. गोयकारांना सवय झाली आहे. ४० वर्षांआधीची नाटके परत परत काकडी किसतात तशी किसत राहायची. संदर्भ, काळ, कथानकाचे क्राफ्ट, आकृतीबंधाची इकोसिस्टम संपूर्ण मानदंड बदललेले आहेत व काही कालबाह्य झालेले आहेत. तरीही असे प्रयोग केले जातात. पाहिले जातात की नाही, दाद मिळते की नाही याची पर्वा नाही. कोकणीत एक शब्द आहे ‘जुनेर’. म्हणजे जुने कापड. अशी ‘जुनेर’ मराठी व कोकणी नाट्यस्पर्धेत सादर होतात, ही नाट्यविश्वातील वैचारिक दिवाळखोरी होय. स्पर्धेत कुणीही काहीही सादर करो. कला अकादमीने जर ‘जुनेर’ प्रदर्शित केली तर हसे होईल, इतकेच. ∙∙∙

फोंड्याचे पालकत्व?

फोंड्यात सध्या आमदार नसल्याने अनेक समस्या भेडसावत आहेत. फोंड्याला आमदार नसल्याने कुणाकडे दाद मागावी? हा प्रश्न आहे. वास्तविक खुद्द मुख्यमंत्र्यांनी फोंड्याचे पालकत्व आपल्याकडे असल्याचे जाहीर केले होते; पण दुर्दैवाची बाब म्हणजे पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फोंड्यात यायचेच बंद केल्याने फोंडावासीयांना वाळीत टाकले आहे की काय, अशी फोंडेकरांची भावना बनली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन फोंड्याबाबत भूमिका घ्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: निवडणुकीपूर्वीच प्रतिमा विरुद्ध वालंका सामना? नावेलीत उमेदवारीवरून चुरस; सिप्रू कार्दोझ यांच्या नावाचीही चर्चा

रितेशची फेरनिवड!

राजीव गांधी कला मंदिराच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा रितेश नाईक यांची सरकारने फेरनिवड करून अखेर कला मंदिराचे तारू रितेशबाबच्या हाती सोपवले आहे. त्यामुळे भाजप सरकारने अप्रत्यक्षरीत्या पुन्हा एकदा रितेशवर विश्वास ठेवला असून कदाचित येत्या विधानसभा निवडणुकीसाठी रितेश नाईक यांची वर्णी लागण्याची शक्यताही आहे, असे एकंदर परिस्थितीवरून दिसते. आता एक मात्र खरे आहे, ते म्हणजे रितेश नाईक हे कलाकार नसले तरी प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे आणि फोंड्यातील सर्वांत मोठ्या ‘पीईएस’ शिक्षण संस्थेचा सुरवातीला सचिव आणि आता अध्यक्ष या नात्याने घडी बसवताना आपल्यातील क्षमताही सिद्ध केली आहे. मागच्या काळात केवळ दोन महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कला मंदिराचे इन्स्पेक्शन करताना कुठे काय कमी आहे, त्याचा अहवालही रितेशनी तयार केला होता, तो आता पुढे नेला जाईल, हे नक्की! ∙∙∙

सुमारांचा आकडा बेसुमार!

कला अकादमीने कोकणी नाट्यस्पर्धेसाठी मौल्यवान योगदान देणाऱ्या लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नटांचा सत्कार करण्याचे ठरवले आहे. उत्तम. नाटककार डॉ. जयंती नायक, अभिनेत्री गौरी कामत यांचा समावेश अतीव समाधानकारक. गौरी (नीना) बालपणापासून रंगभूमीवर चमकत आहेत. कोणे एकेकाळी दोन की तीन नाटके खरडणाऱ्यांचा समावेश खटकणारा व असमाधानकारक. बिन-सातत्य सुमारपणा आणते. कोकणी स्पर्धेला ५० वर्षे झाली त्यानिमित्ताने लवकरच कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘म्हाजें नाटक’ या नावाची योजना कदाचित घोषित होईल, या आशेवर कोकणी कलाकार प्रतीक्षेत आहेत. सुमारपणाचे काहीही घेतले की लागलीच वाट. विजया मेहता म्हणत - साचलेपणा हा नाट्यवाढीस अडथळा. नवकल्पना, नावीन्य हवे. ‘महाभारत’ नाटक ९ तास चालणारे. ते उभे करणारे विदेशी दिग्दर्शक पीटर ब्रूकही हेच सांगत - कलेच्या अंगणात मीडियॉक्रिटी (सुमारपणा) आणू नका. तुम्ही आणि कला दोन्ही संपेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com