खरी कुजबुज: युती तुटणार? की वाद मिटणार?

Khari Kujbuj Political Satire: भाजप आणि मगो हे दोन पक्ष सत्तेत सहभागी आहेत. असे असतानाही ‘मगो’चे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजप आमदार असलेल्‍या पेडण्‍यात बैठक घेऊन पेडण्‍याची जागा ‘मगो’ लढवणार असल्‍याचे संकेत दिले.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

आश्‍‍वासन आणि भाटीकर

मुख्यमंत्र्यांनी काल फोंड्याला उपस्थिती लावून ‘जनता दरबार’ भरवला. मात्र, ‘आप’वाल्यांनी जनता दरबारात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांवर टीका करीत आधीची आश्वासने आधी पूर्ण करा; नंतरच बोला, असे सांगितले आहे. ‘आप’वाल्यांचा हा निवडणूक स्टंट असेलही; पण पाणी प्रश्न सोडाच, आयडी उपजिल्हा इस्पितळाचा प्रश्‍‍न अजून कायम आहे. फोंड्याची पोटनिवडणूक रद्द होऊन तीन महिने झाले तरी अजून आयडी इस्पितळाचा प्रश्न काही मार्गी लागलेला नाही. सुरवातीला काँग्रेस आणि त्यानंतर ‘आप’ने हा प्रश्‍‍न उचलून धरला होता. ‘आयडी’त आवश्यक सुविधा नसल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची परवड होत आहे. एक खरे, समस्‍या न सुटल्‍यास लोक डॉ. केतन भाटीकरांची आठवण नक्‍कीच काढतील. त्‍यांनी मुख्‍यमंत्र्यांचे वेधलेले लक्ष आजही लोकांच्‍या स्‍मरणात आहे. ∙∙∙

निरर्थक वाद व नाट्यसंवाद

कवी शंकर भांडारी यांची आठवण पणजीकर काढू लागले. कोकणी चळवळ भरात होती. बैठक चालली होती. भांडारी शांतपणे मडगावकरांची वक्तव्ये ऐकत होते. शेवटी बोलले - चळवळीची रूपरेषा अशी ठरवायला हे पसरे (दुकाने) नव्हे, पसरकारांनो. त्यांच्यावर सगळे तुटून पडले. वितंडवाद. मडगावला आताही सुरू झालेल्या वाद-युद्धाचे पडसाद जगभर पोहोचले; कारण तिथले गोवेकर, गोव्यातून (Goa) वादग्रस्त लेखाचे फोटो मागताहेत. लोकांना वाद, चवीने चघळायला आवडतात. सृजनशील मने ॲकेडेमिक किंवा आदोगाशीच्या वादात अधिक रमत नाहीत; कारण वादाच्या धुरातून नकारात्मकताच प्रसारित होते. मनाच्या प्रातिभ अंकुरीत अवस्थेतून निर्मितीचे आरसपानी निर्झर स्रवतात तेव्हा निरर्थक वाद करायची उर्मी मरते. कोकणी नाटकाला ५० वर्षे झाली. नाटक हा कठीण प्रकार. किती मडगावकर लेखकांची नाटके कला अकादमी स्पर्धेत झाली? टुकार वाद आणि नाट्य संवाद एका म्यानात राहणे अशक्य! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची खिलाडू वृत्ती

दामू नाईक यांचा ‘सूचक’ सल्ला!

माजी उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते बाबू आजगावकर गेल्‍या काही महिन्‍यांपासून पेडण्‍यात सक्रिय झाले आहेत. गत विधानसभा निवडणुकीत पेडण्‍यात जिंकून येण्‍याची क्षमता असतानाही भाजपने त्‍यांना मडगावात उमेदवारी देऊन बलाढ्य दिगंबर कामत यांच्‍याविरोधात उभे केले. परंतु, तेथे त्‍यांचा पराभव झाला. या पराभवाची सल बाबूंच्‍या मनात अजूनही कायम आहे. त्‍यामुळे यावेळी भाजपने पेडण्‍यात उमेदवारी न दिल्‍यास अपक्ष म्‍हणून लढण्‍याची तयारीही त्‍यांनी ठेवली आहे. त्‍यावर ‘‘बाबूंनी पेडण्‍यात अपक्ष म्‍हणून लढण्‍याची भूमिका घेतली असल्‍यास त्‍यांनी खुशाल पुढे जावे. भाजप कुणाचीही ‘ब्‍लॅकमेलिंग’ सहन करणार नाही’’, असा इशारा दामू नाईक यांनी दिला. शिवाय ‘‘उमेदवारीच्‍या अपेक्षेने पक्षात येत असाल, तर येऊ नका’’, असे आवाहनही त्‍यांनी प्रवेशासाठी इच्‍छुक असलेल्‍यांना केले. दामूंना हे सगळे काही माजी मुख्‍यमंत्री लक्ष्‍मीकांत पार्सेकर यांना सांगायचे होते, हे लपून राहिले नाही. ∙∙∙

‘अटल सेतू’ची आठवण नको!

पर्वरी उड्डाणपूल सुरू होण्याची प्रतीक्षा आता संपत आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री दिगंबर कामत यांनी चतुर्थीपूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला होणार, असे जाहीर केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे; पण या आनंदातही लोक टोमणा मारल्याशिवाय राहिलेले नाहीत. ‘‘पूल सुरू करा; पण नंतर ‘अटल सेतू’सारखी परिस्थिती करून नको,’’ असे म्हणत काहीजण प्रशासनाला चिमटे काढत आहेत. उद्‌घाटनाचा जल्लोष एक दिवसाचा असतो; पण त्यानंतर खड्डे, दुरुस्ती, वाहतूक कोंडी किंवा नव्या अडचणी नकोत, एवढीच नागरिकांची अपेक्षा असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आता चतुर्थीपूर्वी पूल सुरू होतो का? आणि सुरू झाल्यानंतरही तितकाच सुरळीत राहतो का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: वीरेश बोरकरांवर कार्यकर्ते नाराज!

वृद्धाचे रुदन!

फोंड्यातील जनता दरबारात मुख्य प्रश्न चर्चेला आला तो म्हणजे पाण्याचा. फोंड्यातील काही भागात पाण्याचा प्रश्न जटिल बनला आहे. कुठे पाणी येते तेथे दाब नाही, तर काही ठिकाणी पाणीच नसल्याने लोकांची धावपळ होत आहे. काही ठिकाणी तर रात्री दोन वाजता उठून पाणी भरावे लागते. त्यामुळे झोपेचे पार खोबरे झाले आहे. एक वृद्ध व्यक्ती मुख्यमंत्र्यांकडे आला आणि त्याने आपण गेले चार दिवस रात्री जागून पाणी भरतो, आता हे काय माझे वय आहे, जागरण करायचे, असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पण, नुसते फैलावर घेऊन चालणार नाही, थेट कृती हवी, असेही हा वृद्ध शेवटी म्हणाला. ∙∙∙

विजयचा ‘यूके’मधील पाहुणचार!

‘यूके’ संसदेकडून दिला जाणारा ‘पीपल्‍स अवॉर्ड’ हा मानाचा पुरस्‍कार स्वीकारण्‍यासाठी सध्‍या ‘यूके’ला असलेले गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई हे तिथल्‍या मान्‍यवर व्‍यक्‍तींचा पाहुणचार घेत असल्‍याची छायाचित्रे व्‍हायरल झाली असून त्‍यात गोव्‍याची पार्श्वभूमी असलेले ब्रिटनचे माजी मंत्री आणि माजी खासदार किथ व्‍हाज यांच्‍याबरोबर घेतलेले डिनर हाही चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी विजयबरोबर त्‍यांच्‍या पत्‍नी उषा सरदेसाई आणि गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत हेही दिसतात. विजय सरदेसाई यांनी फातोर्डातील लोकांशी ‘कनेक्‍ट’ वाढविण्‍यासाठी ‘संडे डायलॉग्‍स’ हा उपक्रम राबविला होता. त्‍याच धर्तीवर सध्‍या ‘यूके’मध्‍ये विजयनी ‘बल्‍काव डायलॉग्‍स’ सुरू केले असून आज हॉन्‍सलोमध्‍ये असलेल्‍या हॉन्‍सलो हॉलमध्‍ये त्‍यांचे हे डायलॉग्‍स होणार असून त्‍यात मुख्‍यत: ते ‘यूके’स्‍थित गोमंतकीयांशी संवाद साधणार आहेत. विजयचा हा ‘यूके’ दौरा सध्‍या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: कोण म्हणतोय, राजकारण 'डर्टी' आहे?

तमिळनाडूतील गिरीश करिष्‍मा!

गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांना गोव्‍यातील राजकीय वर्तुळात काहीजणांकडून फारसा मान मिळत नसला तरी सध्‍या तमिळनाडूत त्‍यांचे वजन बरेच वाढलेले आहे, असे दिसते. तमिळनाडूमध्‍ये हल्‍लीच झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत गिरीश हे काँग्रेसचे प्रभारी होते आणि त्‍यावेळी त्‍यांनी, काँग्रेसने ‘डीएमके’बरोबर युती न करता जोजफ विजय यांच्‍या पक्षाबरोबर युती करावी, असा सल्‍ला दिला होता. अर्थातच त्‍यावेळी हा सल्‍ला मानला गेला नाही. मात्र, त्‍यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले तरी सध्‍याचे तमिळनाडूचे मुख्‍यमंत्री जोजफ विजय यांच्‍याबरोबर त्‍यांची सलगी अधिकच वाढल्‍याचे दिसते. या दिवसांत गिरीश अधूनमधून चेन्नईच्‍या वाऱ्या करत असल्‍याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी तमिळनाडूचे पर्यटनमंत्री राजेशकुमार यांच्‍यासह तमिळनाडूचे मुख्‍यमंत्री जोजफ विजय यांची भेट घेतली. त्‍यावेळी वालंकिणी येथे गोवा निवास बांधण्‍यासाठी तमिळनाडू सरकारने पुढाकार घ्‍यावा, अशीही मागणी त्‍यांनी केली. गोव्‍यात नसला तरी तमिळनाडूत आपला शद्ब चालतो, हेच त्‍यांनी त्‍यातून दाखवून दिले नसावे ना? ∙∙∙

खाज एकीकडे आणि..!

थार गाड्यांच्या वाढत्या अपघातांवर उपाय म्हणून त्या कार भाड्याने देण्यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार सुरू आहे; पण हे ऐकून लोकांनी डोक्यावर हात मारला आहे. ‘अपघात चालकामुळे होतात की गाडीमुळे?’ असा सरळ प्रश्न आता सोशल मीडियावरून विचारला जात आहे. ‘चालकाची चूक असेल तर त्याच्यावर कारवाई करा, नियम कडक करा, परवाना रद्द करा; पण गाडीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे म्हणजे खाज एकीकडे आणि खाजवायचे दुसरीकडे,’ अशी मिश्किल प्रतिक्रिया नागरिक देताना दिसत आहेत. लोक म्हणतात, अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षित करणे, नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि बेफिकीर चालकांवर वचक बसवणे गरजेचे आहे; पण सरकारचा रस्ता मात्र काहीसा वेगळ्याच दिशेने जाताना दिसतो. आता हा प्रवास योग्य ठिकाणी पोहोचतो की मध्येच एखाद्या वळणावर अडकतो, हे पाहावे लागेल. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: कोकणी शिक्षणाचा बट्ट्याबोळ

विशाल देसाई आक्रमक!

निवडणुका जवळ आल्याने अनेक राजकीय नेते आता सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मतदारसंघात राजकीय नेत्यांची नावे अचानक समाजमाध्यमावर व प्रसारमाध्यमात झळकताना दिसायला लागली आहेत. कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपात एवढे दिवस सामसूम होते. केवळ काँग्रेसचे युरी व काँग्रेसमधील युरी विरोधकांचा आवाज ऐकायला मिळत होता. आता भाजप गोटातील विशाल देसाई हे अचानक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. कुंकळ्ळी बसस्थानकाजवळ स्वातंत्र्यसैनिक उद्यानाची दुर्दशा झाल्यास दहा वर्षे पूर्ण व्हायला आली. आता अचानक याची आठवण विशाल यांना झाली. स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असलेल्या विशालनी उशिरा का होईना, या विषयाला वाचा फोडली. एवढेच नव्हे महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला शौचालय उभारण्यासाठी काम हाती घेतले होते. याच्याविरोधात एल्विस गोम्स व इतरांनी आवाज उठवून काहीच फायदा झाला नव्हता. विशाल देसाई यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांना घटनास्थळी बोलावून त्या शौचालयाचे बांधकाम बंद करण्यास भाग पाडले. आता भाजपची उमेदवारी विशाल यांनाच मिळणार, अशी चर्चा आहे. पाहूया विशाल देसाई यांचे मित्र दामू नाईक यांचा आशीर्वाद त्यांना मिळतो की नाही? ∙∙∙

सावंत-कामतांचे ते हास्य!

सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद स्वीकारल्यापासून दिगंबर कामत व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अनेक कार्यक्रमांत एकत्रित येतात. आज इंडियन रोड काँग्रेसच्या परिषदेत व्यासपीठावर दोघेही शेजारी-शेजारी बसलेले होते. अधून-मधून दोघांमध्ये बरीच चर्चा होत होती. स्वागतपर भाषणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान सचिव संदीप चोडणकर उठले. त्यांनी आपल्या भाषणात मंत्री कामत यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख सुरू केला, तेव्हा मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांना भाषणाकडे लक्ष द्या, असेच काहीसे खुणावले. चोडणकर यांनी त्यांचे कौतुक केल्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले; पण दोघेही खाली पाहत असल्याने, ते हास्य नक्की कौतुकामुळे की दोघांतील चर्चेतील विनोदामुळे होते, हे त्या दोघांनाच माहीत. ∙∙∙

युती तुटणार? की वाद मिटणार?

भाजप आणि मगो हे दोन पक्ष सत्तेत सहभागी आहेत. असे असतानाही ‘मगो’चे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजप आमदार असलेल्‍या पेडण्‍यात बैठक घेऊन पेडण्‍याची जागा ‘मगो’ लढवणार असल्‍याचे संकेत दिले. त्‍यावरून पेडण्‍यातील भाजप कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी पसरली आहे. त्‍यासंदर्भात त्‍यांनी प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांचीही भेट घेतली. दामूंनी ‘मगो’ला युती धर्म पाळण्‍याचा सल्ला दिला आहे. तरीही पुढील काळात ‘मगो’ने भाजप आमदार असलेल्‍या मतदारसंघांत काम केले, तर ‘मगो’सोबतची युती निवडणुकीआधीच भाजप तोडणार की विषय सामोपचाराने मिटवणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: दामूंच्‍या नकारात लपलाय होकार?

बी.एल. संतोष यांच्या दौऱ्यानंतर!

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी.एल.‌ संतोष यांच्या दौऱ्यानंतर आता भाजप कोणकोणत्या मतदारसंघात विशेष असे काम सुरू करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले असतानाच महिनाभरात दोनवेळा संतोष यांनी गोवा दौरा केला आहे. यामुळे विधानसभेची निवडणूक कधीही होऊ शकते, असा अर्थ भाजपचे विरोधक काढत आहेत. त्याचमुळे त्यांचे भाजपच्या पुढच्या हालचालींकडे बारीक लक्ष आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

राजकारण्यांची वारी!

भक्त आपल्या ईश्वराची आराधना करण्यासाठी विविध प्रकारे भक्ती करतात. पंढरपूरच्या विठ्ठल भक्तांची ईश्वर भक्ती तर विरळाच. अनेक विठ्ठल भक्त आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी वारी करतात. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय परंपरेला मोठा इतिहास आहे. आता ही वारकरी परंपरा गोव्यातही सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या वारीत युवावर्गही मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहे. राज्य सरकारने अशा वारकरी मंडळांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या वारकऱ्यांच्या बरोबर गळ्यात भगवा मफलर घालून, हातात टाळ धरून भगवा झेंडा नाचवताना आमचे राजकारणीही दिसतात. मुख्यमंत्र्यांनी हातात वीणा घरून आपल्या मतदारसंघातील वारकऱ्यांच्या वारीला निरोप दिला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, बाबू कवळेकर, आमदार एल्टन डिकॉस्टा यांचे बंधूही वारकऱ्यांबरोबर ठेका धरताना पाहायला मिळाले. आधुनिक युगात विठ्ठल भक्तांच्या या भक्तीला तोड नाही, असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

उतावळा मिकी...

मिकी पाशेको म्हणजे एक अजब रसायन. त्यांना पुन्हा एकदा आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही स्थितीत आमदार बनण्यासाठी त्यांचा जीवाचा आटापिटा सुरू आहे. बाणावली वा नुवे हे दोन मतदारसंघ ऑप्शन ठेवून ते स्वप्ने रंगवीत आहेत. स्वप्ने जरूर बघावी. मात्र, ती खरोखरच साकार होणार का? याचाही अभ्यास करण्याची गरज असते. बाणावली तसेच नुवे मतदारसंघातील राजकारण आता वेगळे वळण घेत आहे. मिकीना ते माहीत नाही, असेही नाही. मात्र, सध्या गोव्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले असल्याने, गरम तव्यावर पोळी भाजून घेता येईल तर प्रयत्न करण्यात काय हरकत आहे, असा त्यांचा एकंदर राजकीय हिशोब असावा. मिकी आपले हात-पाय हलवू लागले आहेत खरे. मात्र, त्यांची ही धडपड यशस्वी होईल का? हे पाहण्यासाठी थोडी कळ सोसावी लागेल. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

पवित्र कला, वशिलेबाजीचा नाला

रवींद्र आमोणकर आणि स्व. अजित केरकर यांनाही जीवनगौरव पुरस्कार देणे पात्र व आवश्यक होते, असा सुजाण नेटकरींचा आवाज आहे. आमोणकर यांनी आरंभीच्या कोकणी नाट्यस्पर्धेत अनेक फार्सिकल व इतर नाटके सादर केली. ‘वसंतदाह’ हा ‘पिंपळ पेटला’ कोकणी नाटकाचा मराठी अनुवाद व दिग्दर्शन करून त्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात नाटक पोहोचवले. हल्लीच निवर्तलेले अजित केरकर यांच्याइतके अभिनयाचे योगदान कोकणी रंगमंचावर कुणाचेच नाही. आज सायंकाळी ‘कोकणी नाटक - ५०’ हा कार्यक्रम आहे. काहींचे मुद्दामहून विस्मरण करून काहींना गोंजारण्याचे सत्र कला अकादमीने चालवले आहे, त्याच्याविरुद्ध सोशल मीडियावर टीकेचा योग्य झोड चालू आहे. हे नेपोटीझमचे (आपल्यांसाठीच्या वशिलेबाजीचे) निषेधार्ह उदाहरण. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com