मायकलकडून दामूंची स्तुती!
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या गीतांवर आधारित ‘गीत चित्रंगी’ या मडगाव रवींद्र भवनात झालेल्या कार्यक्रमाला एक अतिथी म्हणून मायकल लोबो हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी जुन्या आठवणी काढताना दामू नाईक आमदार असताना ज्या तडफेने विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडायचे याची आठवण करून दिली. दामूंची भाषणे मनोहर पर्रीकर यांच्या तोडीची असायची, असे मायकल म्हणाले. जाता जाता दामू यांना पुन्हा विधानसभेत आमदार म्हणून पाहायला आपल्याला आवडेल, असेही ते म्हणाले. दामू नाईक यांनी सध्या फातोर्ड्यात कार्यक्रमांचा धडाका लावला आहे, तो पाहिल्यास मायकल म्हणतात त्याची तयारी दामू करू लागले तर नाहीत ना?
राजकीय आरोग्य शिबिर?
निवडणुकीला अजून तब्बल ५ महिने बाकी असताना दीपक प्रभू पाऊसकर पुन्हा एकदा राजकीय रणांगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्याचा ‘श्रीगणेशा’ म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, मतदारसंघात त्याचे फलकही झळकू लागले आहेत; पण गंमत अशी की, आज स्वतः दीपकराव एका दुसऱ्या पंचायतीच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन कुळे बाजारात फिरताना दिसले. नागरिकांना आरोग्य शिबिराच्या निमंत्रण पत्रिका देत त्यांनी चक्क बाजारपेठेतच प्रचाराचा माहोल तयार केला. आता प्रश्न असा पडतोय की, बाजारात रुग्ण शोधत फिरण्याची वेळ दीपकरावांवर का आली?
संकेत-रोहनची कमाल
सध्या सावर्डे आणि कुडचडे या दोन जवळ-जवळ असलेल्या मतदारसंघांत प्रत्येकाच्या तोंडात संकेत आर्सेकर आणि रोहन गावस देसाई ही दोन नावे ऐकू येतातच. या दोन्ही युवा नेत्यांनी आगामी निवडणूक लढविण्याची आपली इच्छा यापूर्वीच प्रगट केली असून त्यादृष्टीने त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपला लोकसंपर्क वाढवण्यास सुरवातही केली आहे. त्यात विद्यार्थीवर्गालाही त्यांनी जवळ ओढले आहे. संकेत आर्सेकर यांनी पाठिंबा दिलेले ‘अभाविप’चे पॅनल धारबांदोडा महाविद्यालयात जिंकले असून रोहनचा पाठिंबा असलेल्या अपक्ष पॅनलने केपे शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी मंडळाची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे संकेत आणि रोहन ही दोन नावे साहजिकच पुन्हा चर्चेत आली आहेत.
खर्गेंच्या मार्गदर्शनानंतर...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोव्यातील काँग्रेसच्या गटाध्यक्षांना मार्गदर्शन करून संघटना मजबूत करण्याचा मंत्र दिल्यास अवघे ४८ तास उलटत नाहीत तोच पेडणे काँग्रेसचे गटाध्यक्ष कृष्णा नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या ‘संघटना बळा’ची पोलखोलच केली आहे. खर्गे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचे धडे दिले आणि इकडे पेडण्यात गटाध्यक्षांनीच हातातील झेंडा बदलला, त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नेमके चाललेय तरी काय, असा बोचरा सवाल आता उपस्थित होत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून मार्गदर्शन घेऊन बाहेर पडताच काही पदाधिकारी थेट विरोधकांच्या गोटात दाखल होत असतील, तर त्या मार्गदर्शनाचा परिणाम नेमका कोणावर झाला, असा प्रश्नही विचारला जात आहे.
गावकरांचा फिटनेस!
रविवारी धारबांदोडा येथे धारबांदोडा युवा विकास संघ आणि भारतीय जनता युवा मोर्चा, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला सावर्डेचे आमदार व गोवा विधानसभेचे सभापती गणेश गावकर उपस्थित होते. उद्घाटनानंतर केवळ शुभेच्छा देऊन थांबण्याऐवजी गणेश गावकर स्वतः मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. निसरडे रस्ते व प्रतिकूल वातावरणाची पर्वा न करता त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. गणेश गावकर यांना अशा उत्साहाने धावताना पाहून कार्यकर्त्यांमध्येही उत्साही वातावरण निर्माण झाले. त्यांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या चर्चांनाही या सहभागामुळे चांगलाच ब्रेक लागला. ‘गणेश गावकर आता पूर्वीसारखे फिट राहिले नाहीत,’ असे मानणाऱ्यांना रविवारी धारबांदोड्याच्या रस्त्यावर त्यांच्या जोशपूर्ण सहभागातूनच अशा लोकांना उत्तर मिळाले.
जेव्हा कुंपणच खाते शेत!
कोलवाळ कारागृहात कार्यरत महिला होमगार्ड कर्मचाऱ्याकडूनच कैद्यांना अमलीपदार्थ पुरवल्याचा प्रकार समोर येणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. कैद्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले कर्मचारीच गैरप्रकाराचे माध्यम बनत असतील, तर ‘कुंपणच शेत खाते’ असे म्हणावे लागेल. या प्रकारामागे आर्थिक लालसा, पैशांचे आमिष की अन्य कारण होते, याचा तपास होणे आवश्यक आहे. सरकारी नोकरी मिळविणे कठीण असताना झटपट पैशांच्या मोहापायी नोकरी धोक्यात घालणे संबंधित कर्मचाऱ्याला महागात पडणार आहे. मुख्यमंत्री या प्रकाराबाबत नाराज असून, कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता अमलीपदार्थ कारागृहात पोहोचविणाऱ्या संपूर्ण साखळीचा शोध घेणेही गरजेचे आहे. संबंधितांवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
डिचोलीत मोफत ‘वॉशिंग सेंटर’
मुस्लिमवाडा-डिचोली येथे जलवाहिनी फुटली अन् पाण्याचे कारंजे हवेत उडू लागले. पाण्याची नासाडी होत असतानाच काहींना मात्र त्यात ‘फुकटचा फायदा’ दिसला. वॉशिंग सेंटरमध्ये पैसे मोजण्यापेक्षा फुटलेल्या जलवाहिनीखाली वाहने धुण्यासाठी त्यांनी गर्दी केली. पाण्याच्या तुषारांखाली वाहनांची स्वच्छता करताना त्यांच्या चेहऱ्यांवरील समाधान बघण्यासारखे होते; कारण पाणी सरकारी, वॉश फुकट आणि बिलही शून्य! पाणीटंचाईच्या काळातही ‘फुकट ते पौष्टिक’ या मानसिकतेचे दर्शन घडविणारा हा प्रकार मात्र चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
रक्षकच गप्प, मग सत्य बाहेर येणार कसे?
तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था अभेद्य असल्याचे अनेकदा सांगितले जाते. मात्र, ज्या ठिकाणी कायद्याचे रक्षण केले जाते, त्याच ठिकाणी एका महिला सुरक्षा रक्षकाकडे अमलीपदार्थ आढळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे, हे अमलीपदार्थ नेमके कुणाकडून आले, याची माहिती संबंधित महिला सुरक्षा रक्षक देत नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे. जर पोलिसांना एका सुरक्षा रक्षकाकडून माहिती मिळत नसेल, तर मग चौकशी नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, महिला सुरक्षा रक्षक मौन बाळगून असल्याने या प्रकरणामागे एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हात तर नाही ना, अशी चर्चाही सध्या राज्यभर ऐकू येत आहे.
वेगळा कायदा का?
सरकारकडून दिलेली सुरक्षा ही केवळ एक सुविधा नसून ती कायद्याने दिलेली जबाबदारी असते. त्यामुळे अशा सुरक्षेमध्ये कोणी अडथळा आणला, तर त्याच्यावर कारवाई होणे अपेक्षित असते. मग तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा कितीही प्रभावशाली असो. सध्या राज्यात याच विषयाची चर्चा रंगली आहे. एका काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या सुरक्षेत अडथळा आणल्याचा आरोप समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कायद्याचे नियम सर्वांसाठी समान आहेत की काहींसाठी वेगळे, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता कायदा आपले काम करणार की हा विषयही चर्चेपुरताच मर्यादित राहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विषय नामकरणाचा...
पर्वरीच्या नव्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचताच राजकीय वर्तुळात त्याच्या नामकरणाची चर्चा भलतीच रंगू लागली आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भाग्यविधाते स्व. दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांचे नाव या पुलाला मिळावे, यासाठी भाऊप्रेमींनी म्हापशात पत्रकार परिषद घेऊन थेट रणशिंगच फुंकले. पर्वरी उड्डाणपूल नामकरण समितीची ही आक्रमक भूमिका सध्या राजकीय कट्ट्यांवर चर्चेचा विषय ठरतेय. बहुजन समाजाचा सामाजिक स्तर उंचावणाऱ्या आणि राज्यात शाळा-रस्त्यांचे जाळे विणणाऱ्या भाऊसाहेबांचे नाव देऊन त्यांच्या योगदानाचा सन्मान व्हावा, असा दबाव सरकारवर टाकला जात आहे. आता प्रश्न एवढाच उरतो की, राजधानीच्या प्रवेशद्वारावरील या महत्त्वाकांक्षी पुलाला भाऊसाहेबांचे नाव देऊन प्रशासन जनतेची भावना जपणार की, नावावरून पुन्हा एखादा नवा राजकीय वाद पेटणार? त्यामुळे, सत्ताधारी नक्की काय निर्णय घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेती लागवडीतील आत्मनिर्भरता
गोव्यात झेंडूच्या फुलांचे उत्पादन वाढवायचे प्रयत्न सुरू झालेत, ही समाधानाची बाब. शेतकऱ्यांनाही रोजगार मिळून जाईल. आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल पडेल. गोव्यात इतरही काही फुलझाडे, फळझाडे यांची लागवड करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. तरीही संपूर्णपणे स्वावलंबी व्हायची गरज आहे. आजही बेळगाव व इतर ठिकाणांहून भाजी आणली जाते. टोपल्यांत भरून येणारी ही भाजी इतका प्रवास करून कोमेजते. ताजेपणा राहात नाही. महागही पडते. म्हणून स्थानिक स्तरावर शेती करणे हे फायद्याचे. गुलाब व इतर फुले ही राज्यात शेतीनिशी तयार व्हावीत. ग्राहकांना ती स्वस्त पडतील. वांगी, कोकण दुधी व इतर भाजी मोठ्या प्रमाणात गोव्यात तयार व्हायला हवी. सर्व तालुक्यांत असे प्रयत्न सातत्याने व्हायला पाहिजेत.
पाऊस ओसरता ओसरता छत्र्या निघाल्या!
‘सोशल मीडिया’वर सध्या एका सामाजिक कार्यकर्त्याचा केपेतील शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मुळात यंदाचा पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले असून आता पावसाचा जोरही ओसरत आहे. अशा वेळी ऐन पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना ‘भाऊ’ अचानक विद्यार्थ्यांना छत्र्या वाटताना दिसल्याने परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. नेटिझन्सनी या अजब प्रकारावर विविध उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हा उशिरा झालेला उपक्रम पाहून नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे, ‘भाऊंची ही तयारी पुढच्या पावसाळ्यासाठी आहे की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमानसात छाप पाडण्यासाठी चाललेली ही धडपड?’ या उशिरा केलेल्या मदतीमुळे समाजकार्यामागील मूळ हेतूविषयी आता उलटसुलट तर्कवितर्क लढविले जात आहेत.
तक्रारींचा ‘स्पीड पोस्ट’ खेळ!
गोव्यात आता तक्रार करायची नवी पद्धत आली की काय? असा प्रश्न पडावा, अशी गंमत समोर आली आहे. एखाद्याच्या संमतीशिवाय त्याच्या नावाने तक्रारी, ‘आरटीआय’ अर्ज आणि पत्रे पाठविली जात असतील, तर कुरिअरवाल्यापेक्षा सही करणाऱ्यालाच त्याची चिंता अधिक वाढली आहे. त्यात क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांविरोधातही तक्रारी गेल्याने प्रकरणाला आणखी रंग चढला आहे. आता पोलिसांनी ‘यूपीआय’चा माग काढला, ‘सीसीटीव्ही’ तपासले की या ‘टपालवीरां’चा पत्ता लागेल. तोपर्यंत प्रश्न एवढाच- तक्रार कोणाची आणि त्रास कोणाला?
त्यावर कारवाई का नाही?
महामार्गाच्या बाजूला आणि अनेक शहरांतील रस्त्यांच्या बाजूला मोठमोठे होर्डिंग्स लागलेले आहेत. हे होर्डिंग्स आता धोकादायक ठरू लागले आहेत. ज्या कंपन्यांनी होर्डिंग्स उभारलेले आहेत, त्या कंपन्या त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी दाबोळी येथील महामार्गालगतच्या होर्डिंग्सच्या पत्र्याचा एक भाग कोसळून तो महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर पडला, त्यात युवक जखमी झाला. विशेष बाब म्हणजे हे होर्डिंग्स लांबून दिसावेत म्हणून उंच उभारले जातात. त्यात हवेचा दाब कोणत्या दिशेने असतो याचा अजिबात विचार केला जात नाही. त्यामुळे हवेच्या दाबाने बांबोळी येथील होर्डिंग्सची दुरवस्था झाली आहे आणि त्याचे पत्रे आता हवेमुळे निसटून पडू लागले आहेत. आजची घटनाही अशीच असल्याने धोकादायक होर्डिंग्स हटणार का? त्या कंपन्यांवर कारवाई होणार का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
भाजी सेवनाचे महत्त्व
आजकाल मुलांना माहिती ज्ञान देण्यासाठी शाळा, हायस्कुलांत वनस्पती-भाज्या तसेच फुलांचे उत्सव सुरू झाले आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे. काही प्राथमिक शाळांतही मुलांना आईकडून तायखिळो व इतर भाजी कापून आणायला सांगतात. शाळेतील स्वयंपाकी त्या भाज्या बनवतात. शिक्षक मुलांना त्या त्या भाज्यांचे मूळ घटक सांगून पौष्टिक तत्त्वांचे व जीवनसत्त्वांचे महत्त्व सांगतात. हे संस्कार गरजेचे. मुलांना बाहेरचे फास्ट फूड खाण्याची सवय झाल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. जंक फूड खाऊन किती विकार होतात, हे डॉक्टर परत परत सांगू लागले आहेत. म्हणून कवळ्या भाज्या खाणे किती महत्त्वाचे, हे संस्कार कवळ्या मुलांवर करायला सुरवात केली जाते, ही अत्यंत चांगली गोष्ट. शाळेच्या बागेत व घराकडे जागा असल्यास भाजीची अवश्य लागवड करावी व ही एक चळवळ कशी पुढे जावी, असे तज्ज्ञ सांगतात.
चवथीची उलटी मोजणी
गणेशचतुर्थी पुढच्या महिन्यात; परंतु महिना अगोदर वेध लागतात. गुंगी लागल्यासारखे. लोकांची लगबग सुरू झाली आहे. लवकरच चतुर्थीचे बाजार भरू लागतील; परंतु धान्ये व इतर खरेदी करण्यासाठी लोक कामाला लागले आहेत. कारण नंतर बाजारात गर्दी असते. गणेशचतुर्थी हा सर्वात मोठा सण असल्याने विदेशात वा देशात इतर ठिकाणी कामानिमित्ताने असलेले लोक गावघरी संयुक्त कुटुंब जमते तिथे येतात. गणपतीच्या निमित्ताने एकत्र येणे हे सामाजिक बंधुत्वाचे फार मोठे यश होय. गोव्यात हल्ली सार्वजनिक गणपती महोत्सव वाढले आहेत. भरगच्च कार्यक्रम असतात. त्यात बहु करून देशभक्ती, संस्कृती, कला, संगीत, वक्तृत्व स्पर्धा मुलांसाठी व्हाव्यात व त्या आपल्या परंपरेकडे केंद्रीत असाव्यात, असे संस्कृती रक्षकांना वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.