

शरीरावर मोठी जखम झाली की प्रथम ती स्वच्छ करावी लागते. जखमेचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करावे लागतात. त्यानंतरच मलमपट्टीचा उपयोग होतो. अन्यथा वरवरची मलमपट्टी जखम लपवू शकते, ती भरून काढू शकत नाही. गोव्यातील काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीकडे पाहिल्यास मल्लिकार्जुन खर्गे यांचा दौरा मलमपट्टीच्या प्रयत्नासारखा वाटतो. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून खर्गे यांनी गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना एकीचा संदेश दिला, भाजपवर टीका केली, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. त्यांच्या अपेक्षा उत्तुंग आहेत. तथापि, पक्षातील वास्तव वेगळेच चित्र दाखवते.
राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीतच पक्षातील मतभेद उघडपणे समोर येणे, हे कोणत्याही संघटनेसाठी चिंतेचे कारण ठरते. वेर्णा येथील सभेच्या निमंत्रणावरून माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर - प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यात निर्माण झालेला वाद संघटनात्मक विसंवादाचे ठळक उदाहरण आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या दौऱ्यादरम्यान अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप समोर येणे म्हणजे पक्षातील जखम किती खोलवर गेली आहे, याचेच द्योतक होय.
खर्गे यांचे संपूर्ण राजकीय आयुष्य संघर्ष, निष्ठा आणि संघटनबांधणीसाठी ओळखले जाते. कामगार चळवळीतील त्यांचे योगदान व पक्षाप्रती बांधिलकी निर्विवाद आहे. त्यामुळेच त्यांनी गोव्यातील काँग्रेसजनांना एकत्र राहण्याचा संदेश दिला. मात्र, एकीचे आवाहन करणे व प्रत्यक्षात एकी निर्माण होणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यासाठी नाराजीची कारणे दूर करावी लागतात, कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकावा लागतो. नेतृत्वाबाबत स्पष्टता निर्माण करावी लागते. खर्गे यांच्या दौऱ्यादरम्यान १०८ बीएलएंनी दिलेले राजीनामे हे देखील दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. पक्ष संघटनेत अस्वस्थता असल्याशिवाय अशी परिस्थिती निर्माण होत नाही.
भाजपवर टीका करणे काँग्रेससाठी (Congress) सोपे आहे. परंतु भाजपला प्रभावी पर्याय म्हणून स्वतःला सिद्ध करणे ही खरी कसोटी आहे. गोव्यात पक्षांतरांचे राजकारण, निवडून आलेल्या आमदारांचे पक्ष सोडणे व कार्यकर्त्यांमधील निराशेमुळे काँग्रेसची विश्वासार्हता आधीच डळमळीत झाली आहे. जनतेचा तसेच समविचारी पक्षांचा विश्वास पुन्हा संपादन करणे भाषणांमुळे शक्य होणार नाही. विधानसभा निवडणुकीला फारफारतर सहा महिने उरले आहेत.
अशा वेळी काँग्रेसला आत्मपरीक्षणाद्वारे सुधारणेचे आव्हान स्वीकारावे लागेल. माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची नाराजी दूर करणे अपरिहार्य आहे. त्यांना सोबत घेणे किंवा स्पष्टपणे बाजूला करणे, यापैकी एक ठोस निर्णय पक्षाला घ्यावाच लागेल. कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासोबत गटबाजी थांबवणे, नेतृत्वाभोवती एकसंघ वातावरण निर्माण करणे हीच आता पक्षासमोरील खरी गरज आहे.
अन्यथा भाजपविरोधी मतदारांच्या अपेक्षांचे नेतृत्व करण्याची संधी पुन्हा एकदा हातातून निसटू शकते. खर्गे यांनी गोव्यात एकीचा संदेश दिला आहे. निदान पुढे तरी तो संघटनात्मक परिवर्तनात रूपांतरित होतो का, यावरच काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल. विसरता नये, दक्षिण गोव्यातून ‘गोवा काँग्रेस’चा उदय होत आहे. वरवरची मलमपट्टी करून काँग्रेसची जखम भरणार नाही. आता ती मुळापासून बरी करण्याची वेळ आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.