

आजच्या धावपळीच्या आयुष्यात जोडीदार शोधण्याचे मार्गही बदलत आहेत. पूर्वी लग्नासाठी नातेवाईक, मित्रमंडळी किंवा मॅट्रिमोनी वेबसाइट्सचा आधार घेतला जायचा. आता डेटिंग अॅप्समुळे जोडीदार शोधणे अधिक सोपे झाले असले तरी प्रत्येकाला या माध्यमातून अपेक्षित व्यक्ती मिळतेच असे नाही. अमेरिकेतील एका महिलेने याच समस्येवर चक्क भन्नाट तोडगा शोधला आणि पती शोधण्यासाठी थेट Google Form तयार केला.
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या शार्लोटमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय एरिन पॅटरसन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. डेटिंग अॅप्सवर बराच वेळ घालवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी नेहमीच्या पद्धतींपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला.
मॅट्रिमोनी वेबसाइटवर प्रोफाइल तयार करण्याऐवजी एरिन यांनी थेट ‘पतीसाठी अर्ज’ अशा धाटणीचा Google Form तयार केला. त्यांनी हा फॉर्म आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर पिन केला. त्यानंतर या अनोख्या प्रयोगाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि 240 हून अधिक लोकांनी फॉर्ममध्ये रस दाखवल्याचे वृत्त आहे.
एरिन यांच्या Google Formची सर्वाधिक चर्चा त्यातील प्रश्नांमुळे होत आहे. जोडीदार शोधण्यासाठी त्यांनी अगदी नोकरीच्या मुलाखतीसारख्या पद्धतीने प्रश्न विचारले आहेत. संभाव्य पार्टनरचे करिअर, दैनंदिन जीवनशैली, फिटनेस, नातेसंबंध आणि भविष्यातील कुटुंबाविषयीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न या फॉर्ममधून करण्यात आला.
आपल्या अपेक्षांबद्दलही एरिन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांना असा जोडीदार हवा आहे जो समजूतदार, दयाळू आणि प्रेमळ असेल. त्याचबरोबर कॉफी किंवा डिनरवर बसून चांगल्या गप्पा मारण्याची आवड असलेला व्यक्ती त्यांना अपेक्षित आहे.
फॉर्ममधील काही प्रश्न विशेष लक्ष वेधून घेत आहेत. संभाव्य जोडीदाराला त्याच्या करिअरची उद्दिष्टे काय आहेत, दिवसाची दिनचर्या कशी असते, फिटनेसकडे किती लक्ष दिले जाते, यासारखे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
याशिवाय लग्न आणि कुटुंबाबाबतच्या अपेक्षाही जाणून घेण्यात आल्या आहेत. म्हणजेच केवळ फोटो किंवा काही ओळींच्या बायोडेटावरून निर्णय घेण्याऐवजी व्यक्तीची जीवनशैली आणि भविष्यातील विचार समजून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते.
एरिन यांचा हा प्रयोग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी ही कल्पना मजेशीर असल्याचे म्हटले, तर अनेकांनी त्यांच्या वेगळ्या दृष्टिकोनाचे कौतुक केले.
काही सोशल मीडिया युजर्सनी एरिन यांना या प्रयोगाचा पुढील निकालही शेअर करण्याची विनंती केली. तर काही महिलांनी जोडीदार शोधण्यासाठी अशाच प्रकारचा फॉर्म तयार करण्याची कल्पना व्यक्त केली.
पारंपरिक पद्धतींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या मार्गाने जोडीदार शोधण्याचा एरिन यांचा हा प्रयोग असल्याने त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. डेटिंग अॅप्सवर सतत प्रोफाइल पाहणे आणि स्वाइप करण्याऐवजी संभाव्य जोडीदाराकडून सुरुवातीलाच काही महत्त्वाची माहिती घेण्याची ही पद्धत आहे.
या प्रयोगातून एरिन यांना अपेक्षित जोडीदार मिळतो का, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र लग्नासाठी जोडीदार शोधण्याच्या पारंपरिक पद्धतींपासून वेगळा विचार केल्यामुळे त्यांचा Google Form सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.