

पणजी: पर्वरी येथील मैदान नूतनीकरण कामामुळे नियोजित वेळेत तयार होण्याबाबत अनिश्चितता आहे, या कारणास्तव गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) मोसमातील तिसरा रणजी करंडक क्रिकेट सामनाही कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळविण्याचे निश्चित केले.
२०२६-२७ मोसमातील एलिट अ गटातील सातपैकी तीन सामने गोव्याचा संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. गतमोसमापर्यंत पर्वरी मैदान गोव्याच्या रणजी संघासाठी घरचे (होम) केंद्र होते. यंदा पंधरा वर्षांनंतर या मैदानाचे नूतनीकरण काम जीसीएने हाती घेतले आहे. मैदान काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन असले, तरी संबंधित प्रक्रिया लांबू शकते.
त्यामुळे १७ ते २० जानेवारी या कालावधीत होणाऱ्या पुदुचेरीविरुद्धच्या सामन्यासाठी मैदान सुसज्ज बनण्याची शक्यता कमी असल्याची जाणीव झाल्याने ‘जीसीए’ धोका न पत्करता तिसरा सामनाही ऐतिहासिक पणजी जिमखान्यावर खेळविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळला (बीसीसीआय) कळविण्यात आले असून पणजी जिमखान्याकडेही संबंधित सोपस्कार केल्याची माहिती सूत्राने दिली.
रणजी करंडक स्पर्धेतील
गोव्याचा यावेळचा पहिला सामना ११ ते १४ ऑक्टोबर रोजी बडोद्याविरुद्ध होणार आहे. ही लढत पणजी जिमखान्यावर खेळविली जाईल. त्यानंतर दुसरा ‘होम’ सामना बिहारविरुद्ध २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पणजी जिमखान्यावर खेळला जाईल. ‘अवे’ मैदानावर गोव्याचा रणजी संघ चार सामने अनुक्रमे उत्तर प्रदेश (१८ ते २१ ऑक्टोबर), विदर्भ (२६ ते २९ ऑक्टोबर), मध्य प्रदेश (२४ ते २७ जानेवारी) व जम्मू-काश्मीर (१ ते ४ फेब्रुवारी) या संघांविरुद्ध खेळेल.
वयोगट स्पर्धेतील पाच सामने सांगे मैदानावर
२०२६-२७ मोसमातील बीसीसीआय वयोगट स्पर्धांतील पाच सामने गोव्याचा संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. हे सारे सामने कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील तिन्ही चार दिवसीय सामने सांगे येथे होतील. या ठिकाणी गोव्याचा संघ २७ ते ३० ऑक्टोबरला ओडिशाविरुद्ध, ३ ते ६ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशविरुद्ध, तर २ ते ५ फेब्रुवारीला बंगालविरुद्ध खेळेल. १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धेतील घरच्या मैदानावरील दोन चार दिवसीय सामनेही सांगे येथे खेळले जातील. गोव्याचा संघ ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत बंगालविरुद्ध, तर २६ ते २९ डिसेंबर या कालावधीत हरियानाविरुद्ध खेळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.