आता लक्ष वरद यांच्यावर!
२०१२च्या विधानसभा निवडणुकीनंतर ‘बॅकफूट’वर गेलेल्या प्रदेश काँग्रेसला ‘जिवंत’ ठेवण्याचे काम करणाऱ्यांत संकल्प आमोणकर, वरद म्हार्दोळकर आणि जनार्दन भंडारी या तिघांचे योगदान मोठे होते. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत संकल्प आमोणकर काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. परंतु, त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर अमित पाटकर प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर वरद म्हार्दोळकर आणि जनार्दन भंडारी यांनीही पक्षाकडे पाठ फिरवली. त्यामुळे त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांनीही पक्षाचे काम करणे सोडून दिले होते. पण, आता गिरीश चोडणकर प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर वरद आणि जनार्दन भंडारी पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. वरद म्हार्दोळकर यांनी रविवारी चोडणकर यांच्यासोबत जाऊन फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ∙∙∙
मुख्यमंत्र्यांची हमी, पण..!
खासगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या किमान वेतनात अनुभवानुसार वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारच्या रोजगार मेळ्यात बोलताना केली. खासगी कंपन्यांना जमीन, पाणी, वीज बिलांत सरकार सूट देते. त्यामुळे त्यांना कामगारांच्या वेतनात वाढ करावीच लागेल, असेही ते म्हणाले; पण सरकारच्या निर्देशांना कायमच ‘केराची टोपली’ दाखवणाऱ्या कंपन्या मुख्यमंत्र्यांना वाढीव वेतनाबाबत सकारात्मक प्रतिसाद देतील का? की मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केवळ आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केली आहे? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
विधानसभा निडवणूक लढण्याची इच्छा!
विधानसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे अनेक नेत्यांना आपण निडवणूक लढवावी, पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी, असे वाटत असते. पणजी मतदारसंघात काँग्रेसची हक्काची बऱ्यापैकी मते आहेत आणि ती मते निर्णायक ठरतात. काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी सोमवारी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तीही काँग्रेसच्या उमेदवारीवर. काँग्रेसने अजूनही उमेदवार निश्चित केले नाहीत, अशा इच्छा अनेकजण व्यक्त करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे फुर्तादोंचे मित्र आहेत, ते त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी वजन वापरतील, असा फुर्तादोंना विश्वास वाटतो. दुसऱ्या बाजूला त्यांचे मित्र दत्तप्रसाद नाईक हे पत्नी शीतल नाईक यांना ताळगाव मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे; परंतु कोणत्या पक्षातून हे निश्चित नाही. विधानसभा रिंगणात उतरण्याची इच्छा पुरी करण्याची जादू ही चोडणकरांच्या हाती आहे, हे फुर्तादोंना कधीच उमगलेही असेलच. ∙∙∙
खोगीरभरती थांबवा!
राज्यातील एनआयटी ही केंद्रशासित शैक्षणिक संस्था चर्चेत आहे ती नोकर भरतीवरून. तसे पाहिले तर एनआयटीत गोमंतकीयांना प्राधान्य द्यायला हवे होते, पण तसे होत नाही. तेथे आपल्याच सग्यासोयऱ्यांची भरती केली जाते. राज्य सरकारही याबाबत अंधारात होते. पण विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय लावून धरला आणि सरकारला जाग आली. आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपण चौकशी करणार, असे जाहीर केले असले तरी ही खोगीर भरती थांबलेली नाही. इकडे गोमंतकीय रोजगाराच्या प्रतीक्षेत तर तिकडे बिगरगोमंतकीय रोजगार घेत आहेत. मुख्यमंत्री साहेब, काही तरी करा, पण ही खोगीर भरती थांबवा, असे लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙
चर्चा ‘त्या’ पुतळ्याची!
मुरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला, त्याची परवानगी होती की नव्हती? जमीन कोणाची होती? नियम पाळले की नाहीत? यावरून थेट उच्च न्यायालयापर्यंत मजल गेली. युक्तिवाद झाले, कागदपत्रे फिरली आणि अखेर न्यायालयाने पुतळा हटविण्याचा आदेशही दिला; पण आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. लोक विचारतात, ‘पुतळा हटविला का?’ मात्र, याचे ठाम उत्तर कुणाकडे नाही. त्यामुळे आता चर्चेचा विषय न्यायालयाचा आदेश नसून पुतळ्याचे सध्याचे अस्तित्व बनले आहे. काही मंडळी तर मिश्कीलपणे विचारू लागली आहे की, ‘जर पुतळा अजूनही जागेवर असेल, तर मग याचिकेचा अंतिम उद्देश काय होता? पुतळा हटविणे की चर्चेचा पुतळा उभारणे?’ सध्या मात्र पुतळ्यापेक्षा पुतळ्याभोवतीच्या चर्चेचीच उंची जास्त वाढल्याचे दिसत आहे. ∙∙∙
गुरू-शिष्य एकाच माळेचे मणी!
शरमेची गोष्ट ऐकू येत आहे ती अशी की, कुडचडे मतदारसंघातील कथित लैंगिक छळ प्रकरणातील संशयित ज्या उच्च माध्यमिक शाळेत शिकत होता, त्याच शाळेच्या प्राचार्यांवरही गंभीर आरोप होत असून गुरू आणि शिष्य एकाच माळेचे मणी आहेत का? असा सवाल केला जात आहे. असे म्हणतात, तो या शाळेत शिकत असताना, जेव्हा एका शिक्षकाने याच विद्यार्थ्याची कृत्ये उघडकीस आणली, तेव्हा त्या शिक्षकालाही धमकी देण्यात आली आणि हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. जर शाळेच्या प्राचार्यांनी आणि शिक्षकांनी तेव्हाच त्याचे कान पिळले असते, तर इतक्या मुलींचा अपमान झाला नसता. जे देवाच्या सेवेत आहेत, त्यांनी इतरांना दुष्कृत्ये करण्यापासून रोखले पाहिजे आणि त्यांना सदाचाराचा मार्ग दाखवला पाहिजे. पण जसे त्याने बी पेरले, तसेच त्याला पीक मिळाले. त्या दुष्ट विकृतीला आणखी वाईट कृत्ये करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. या आरोपात तथ्य असल्यास त्या शिक्षकाला म्हणायचे तरी काय? ∙∙∙
काँग्रेसमध्ये खरेच दोन गट?
कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या गोवा फॉरवर्डची अजूनही कॉंग्रेसकडे युती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वि मात्र, शेवटी म्हटले की, ‘त्यांची कॉंग्रेससोबत युती यापुढेही राहील; पण कोणत्या कॉंग्रेसकडे हे पाहावे लागेल.’ या शेवटच्या त्यांच्या वाक्याने कॉंग्रेस पक्षात वादळ निर्माण झाले तर त्यात कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये. त्यांचा असे म्हणण्याचा अर्थ नेमका काय होता, हे मात्र कळले नाही. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमध्ये दोन गट असतील तर पाटकर यांनाच विचारलेले बरे नाही का? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी कॉंग्रेस पक्षात दोन गट नाहीत, हे ठामपणे सांगितले. कॉंग्रेसची परंपरा व सध्याच्या पक्षातील परिस्थितीचा कानोसा घेतला तर चोडणकर यांच्या उत्तराने लोकांचे समाधान होईल का? ∙∙∙
युरींपुढे ‘विशाल’ आव्हान!
जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतशी आमदार बनण्यास उत्सुक असलेल्यांची फौज वाढायला लागली आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपचे युवा नेते विशाल देसाई सक्रिय झालेले आहेत. ओपिनियन पोलचे हिरो शाबू देसाई यांचे सुपुत्र असलेले विशाल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये विविध पदे भूषविली आहेत. पालिकेचे नगरसेवक म्हणूनही सेवा दिली आहे. शिवाय अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. परवा त्यांनी पालिका कामगारांना मोफत रेनकोट वाटून आपल्या प्रचारास सुरवात केली. भाजपची उमेदवारी मिळाल्यास आपण युरीला टक्कर देऊ शकताे, असा त्यांचा दावा. आता बघू, युरींपुढे कोणाकोणाची डाळ शिजते
वेळ निभावण्याचे कसब
रविवारी गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांच्या झालेल्या वाढदिवसाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. परंतु कोणत्यातरी कारणाने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरदेसाईंना शुभेच्छा देण्याचे टाळले. काँग्रेस भवनात आलेल्या युरींना नेमका हाच प्रश्न पत्रकारांनी सोमवारी केला. ‘काल विजय सरदेसाईंचा वाढदिवस होता का?’ असे सांगून युरी आलेमाव यांनी त्यातल्या-त्यात राजकीय शहाणपण दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सरदेसाईंना ‘बी लेटेड’ शुभेच्छा देण्यास ते विसरले नाहीत. मात्र, जी गोष्ट आलेमाव यांनी टाळण्याचा प्रयत्न केला, त्यावर पत्रकारांच्या अतिशहाणपणामुळे युरी यांना दुसऱ्या दिवशी का होईना, शुभेच्छा देऊन वेळ निभावून न्यावी लागली.∙∙∙
युरींची ‘गोंय राखण यात्रा’
बऱ्याच वर्षापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी देशभर रथयात्रा काढली होती व त्याचा फायदा पक्षाला झाला होता. आता गोव्यात काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘गोंय राखण यात्रा’ काढण्याचा संकल्प जाहीर केला आहे. ही यात्रा कधी, केव्हा, कशी हे निश्चित झाले नाही तरी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवीन आत्मविश्र्वास आणण्यासाठी यात्रा जाहीर केली तेवढेच पुरेसे आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रेचे आयोजन करणे याला मोठे महत्त्व आहे. मात्र या यात्रेसाठी पक्ष श्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला आहे का?, युरी साहेबांना पक्ष निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्याचा आदेश दिला आहे का? हे अजून स्पष्ट झाले नसले तरी ही यात्रा काँग्रेसला फायदेशीर पडू शकेल अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेसुद्धा एखाद्या यात्रेचे आयोजन केले तर नवल वाटायला नको. ∙∙∙
काँग्रेसमधील कलगितुरा!
गिरीश चोडणकर यांनी गोव्यातील काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर सध्या आजी-माजी अध्यक्षांच्या समर्थकांमध्ये गटबाजी सुरू झाली असून काल विजय सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही त्याचे दर्शन झाले. विजय सरदेसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे आपल्या समर्थकांसह फातोर्ड्यात दाखल होऊन एकप्रकारे त्यांनी शक्तिप्रदर्शनच केले. आमच्यात काही मतभेद नाहीत, असे अमित आणि गिरीश दोघेही म्हणतात. तरीही काल प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटकर यांनी काँग्रेस पक्षात सध्या मला कुठले स्थान आहे, हे तुम्ही नवीन प्रदेशाध्यक्षांनाच विचारा, असे म्हणत आपली नाराजी अप्रत्यक्षपणे दाखवून दिली आहे. एकूणच सध्या काँग्रेसमध्ये दाेन्ही आजी-माजी प्रदेशाध्यक्षांमध्ये एकप्रकारे कलगितुराच सुरू झाला आहे. ∙∙∙
ढवळीकर समर्थकांत नाराजी
स्मार्ट वीज मीटरप्रकरणी आता वीजमंत्री सुदिन ढवळीकर एकाकी पडले असल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटू लागले आहे; कारण स्मार्ट मीटर लावण्यास सुरवात होऊन वाढीव बिले येऊ लागल्यामुळे विरोधक आणि जनतेचा आक्रोश वाढला. सरकारातील मंत्री दिगंबर कामत स्मार्ट मीटरविरोधात मडगावात वीज खात्याच्या कार्यालयात जातात, त्यामुळे वीजमंत्री ढवळीकर यांनी स्मार्ट मीटरचा विषय मुख्यमंत्र्यांच्या गोटात ढकलून दिला. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्मार्ट मीटर बसविण्यावर स्थगिती दिली आणि त्याविषयीचे तापत असलेले वातावरण शांत केले. तोच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी वीज खात्याने लोकांना विश्वासात घेतले नाही, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ‘मगो’चे कार्यकर्ते तथा ढवळीकरांच्या समर्थकांना सरकारकडून आपल्या नेत्याला एकाकी पाडले जात असल्याचे वाटू लागले आहे. त्यामुळे या नाराजीचे पुढे काय पडसाद उमटतात हे लवकरच पाहायला मिळतील. ∙∙∙
चर्चा ‘त्या’ संदेशाची
राज्यातील एका मंदिराच्या सुशोभीकरणावरून न्यायालयात रंगलेल्या चर्चेत एक वाक्य मात्र सगळ्यांच्या कानात घुमत राहिले. न्यायालयानेच निरीक्षण नोंदवले की, सुशोभीकरण केलेले असले तरी शेकडो वर्षांची कलाकृती आणि तिचे वेगळेपण पाहायला पर्यटक मंदिरास भेट देतात. बस्स! त्यानंतर न्यायालयाबाहेर चर्चा सुरू झाली. काहींचे म्हणणे, ‘रंगरंगोटीपेक्षा वारसा महत्त्वाचा,’ हा संदेश न्यायालयाने अप्रत्यक्षपणे दिला. आता हा संदेश कितीजणांच्या डोक्यात गेला आणि कितीजणांच्या फक्त कानावरून गेला, हे समजण्यासाठी याची मात्र स्वतंत्र याचिका दाखल करावी लागेल, अशीही मिश्कील चर्चा रंगली! ∙∙∙
सह्यांची लाज राखणार का?
‘डू नॉट अंडर एस्टिमेट कॉमन मॅन’ म्हणतात खरे. मात्र, या इंग्रजी बोधवाक्यावर सामान्य माणसाचा विश्वास कमीच आहे, असे दिसते. गोव्यात कोकणी भाषेबरोबर मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा म्हणून मराठी भाषाप्रेमींनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा द्या, या निवेदनावर पाच लाख मराठीप्रेमींच्या सह्या घेण्यासाठी कार्यकर्ते गावागावांत फिरत आहेत. या निवेदनावर सह्या घ्यायला गेलेल्या एका कार्यकर्त्याला वेगळाच अनुभव आला. एका बुजुर्ग भजनी कलाकाराने मराठी राजभाषा झालीच पाहिजे, या निवेदनावर सही करताना एक भाबडा प्रश्न केला. माझ्या सहीमुळे मराठी राजभाषा होणार का? हे सरकार या पाच लाख सह्यांची लाज राखणार का? ∙∙∙
कुंकळ्ळीचा पंधरावा प्रभाग!
माणसाने महत्त्वाकांक्षी असणे गैर नाही. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रांत असे अनेक महत्त्वाकांक्षी राजकारणी आहेत. येणाऱ्या पालिका निवडणुकीत नशीब अजमावण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कुंकळ्ळी नगरपालिकेचा एक प्रभाग वाढणार असून पंधरावा प्रभाग कुठे होणार, याचे गणित काहीजण मांडत आहेत. प्रभाग पुनर्रचनेचे काम लवकरच सुरू होणार असून आपल्या समर्थकांना फायदेशीर ठरणार, अशी प्रभाग पुनर्रचना व्हावी म्हणून राजकारणी शक्ती पणाला लावत आहेत. भिवसा, जुझेगाळ व दांडोडा या तीन प्रभागांतील मतदार बाजूला काढून पंधरावा प्रभाग करण्याची तयारी राजकीय नेत्यांनी केल्याची चर्चा आहे. आपल्या समर्थकाला फायदेशीर पडेल, असा पंधरावा प्रभाग व्हावा यासाठी एक राजकारणी कष्ट घेत असल्याची खबर आहे. आता पाहूया कोणता प्रभाग कोणाला फायदेशीर ठरतो. ∙∙∙
नाकापेक्षा ‘दुरुस्ती’ जड
धिंडवडे म्हणजे काय, असे विचारले तर त्याचे उत्तर कला अकादमी. साडेसाती लागल्यासारखे भवताप त्या संकुलाला लागले. त्याचा संताप फक्त कलाकारांना होत आहे. ती बंद करणार, असा एक आवाज झाला. बंद म्हणजे तात्पुरती बंद. दुरुस्तीसाठी. आता काल अध्यक्षांनी सुतोवाच केलेय की, आज तज्ज्ञ समिती पाहणी करणार. बंद म्हणजे तात्पुरती बंद करण्याविषयीचा निर्णय अजून तरी झालेला नाही, असे ते म्हणतात. मद्रास आयआयटीने दुरुस्ती कामातील चुका व अभाव असे दाखवलेत की धिंडवडे छिद्रमय हे कळते. छिद्रे छपराला, छिद्रे दुरुस्ती कार्यपद्धतीत. छिद्रांची नुसती चाळण. पाणी गळती, साप पडणे अनेक प्रकार घडले. दुरुस्तीकामावरचे कितीतरी कोटी सहज मांडवीत गेले त्याला वाली कोण? ‘पिंजलां हाचें कलसांव, मारता मोटें कोनिसांव’ या कोकणी म्हणीप्रमाणे हे पिकासांव बनले आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.