

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिरसा गोलचक्कर परिसरात एका तरुणाने आपल्या सहकाऱ्यावर कपडे कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लेडने हल्ला करत त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुरेश आणि आरोपी नरेश हे दोघेही एका खासगी कंपनीत एकत्र काम करत होते. त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेसोबत नरेशचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित महिला सुरेशच्या शेजारी भाड्याच्या घरात राहत होती. त्यामुळे सुरेश आणि त्या महिलेतही बोलणे सुरू झाले होते. याच गोष्टीचा संशय नरेशच्या मनात निर्माण झाला आणि दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.
घटनेच्या दिवशी रात्री सुरेश आणि नरेश सिरसा गोलचक्कर परिसरात भेटले. दोघांनी एकत्र बसून बिअरही घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर महिलेशी बोलण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात नरेशने जवळ असलेल्या कपडे कापण्याच्या ब्लेडने सुरेशवर वार केले. हल्ल्यात सुरेश गंभीर जखमी झाला. झटापटीदरम्यान आरोपी नरेशलाही किरकोळ दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, सुरेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आरोपी नरेशवर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात सुरेश, नरेश आणि संबंधित महिला तिघेही विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेचा तिच्या पतीपासून घटस्फोट झाला असून ती आपल्या दोन मुलांसह राहत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर वैयक्तिक नातेसंबंधांतील वाद किती टोकाला जाऊ शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. पोलिसांकडून घटनेतील सर्व पैलूंचा तपास सुरू असून आरोपीची सखोल चौकशी केली जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते का, याकडेही तपास यंत्रणांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.