

आमोद कुलकर्णी
लावणीची साहित्यिक आणि ऐतिहासिक बाजू दुर्लक्षित राहून ती केवळ ‘उथळ नृत्या’पुरती मर्यादित मानली गेली. आधुनिक मनोरंजनाची साधने आणि चित्रपट-दूरदर्शनच्या प्रभावामुळे या पारंपरिक कलेला उतरती कळा लागली, परिणामी कलावंतांना सामाजिक उपेक्षेचे जीवन जगावे लागले.
राठी मातीतील कलासक्त मनाचा आणि रांगड्या संस्कृतीचा विचार केला की, ढोलकीची थाप आणि घुंगरांचा आवाज काळजाचा ठोका चुकवतो. ‘लावण्य’ या शब्दापासून उगम पावलेली ‘लावणी’ केवळ एक शृंगारिक नृत्य नसून तो मध्ययुगीन मराठी समाजजीवन, राजकारण आणि संस्कृतीच्या इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. लावणीच्या नामाभिधानाबद्दल दोन प्रमुख प्रवाह आहेत; एकीकडे सौंदर्याचे वर्णन करणारे ‘लावण्य’, तर दुसरीकडे शेतात पिकांची ‘लावण’ (लागवड) करताना गायली जाणारी ती ‘लावणी’, अशी ही या कलेची मातीशी जोडलेली अतिशय सुंदर आणि वास्तववादी व्याख्या आहे.
शब्दसौंदर्य, ताल आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम असलेली ही कला मराठी शाहिरी परंपरेचे वैभव आहे. राम जोशी, होनाजी बाळा, प्रभाकर, सगनभाऊ, अनंत फंदी यांसारख्या दिग्गज शाहिरांनी आपल्या लेखणीतून लावणीला साहित्याची उंची मिळवून दिली. त्यांनी रचलेल्या लावण्यांमधून शनिवारवाड्याचे वैभव, पुण्यातील पेठा आणि तत्कालीन स्त्रियांचे वज्रटीक, तन्मणी, चिंचपेटी यांसारखे अलंकार आजही जिवंत होतात. मराठी साम्राज्याच्या विस्तारानुसार ही कला मध्यप्रदेश, गुजरात आणि तंजावरपर्यंत पोहोचली.
लावणीची सांगीतिक आणि तांत्रिक मांडणीही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रामुख्याने ‘मुखडा’ आणि ‘अंतरा’ अशा दोन भागांत विभागलेली ही रचना ढोलकीच्या ठेक्याशी एकरूप झालेली असते. मुखडा ही लावणीची पहिली आणि अत्यंत प्रभावी ओळ असते, ज्यावर संपूर्ण लावणीची लय अवलंबून असते. लावणीच्या सादरीकरणात जिवंतपणा आणण्यासाठी ती लिहिताना ‘यमक’ आणि ‘अनुप्रास’ या अलंकारांचा कल्पक वापर करावा लागतो.
अंतऱ्यामध्ये नवनवीन आशय मांडताना त्यातील शेवटची ओळ मुख्य मुखड्याच्या यमकाशी जुळवून पुन्हा मूळ लयीत परतणे, हे या लेखनाचे खास कौशल्य आहे. अस्सल मराठी मातीतील ठसकेबाज शब्द, नखरा आणि ग्रामीण बोलीचा वापर केल्यामुळे ही कला अधिक रसरशीत वाटते. लावणीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. ‘फडाची लावणी’ ही मोठ्या जनसमुदायासमोर ढोलकीच्या थापेवर सादर केली जाते, तर ‘बैठकीची लावणी’ ही अत्यंत सुसंस्कृत आणि अभिजात मानली जाते.
लावणी हा मराठी तमाशाचा प्राण आहे. सुरुवातीला केवळ पुरुष कलावंत स्त्री वेशात लावणी सादर करत असत. मात्र, पठ्ठे बापूराव यांच्या काळात ‘पुतळाबाई’ या पहिल्या स्त्री नर्तकीने मंचावर पाऊल ठेवले आणि लावणीचे स्वरूप पूर्णपणे बदलले. पुढे यमुनाबाई वाईकर, विठाबाई नारायणगावकर, गुलाबबाई संगमनेरकर आणि माया खुटेगावकर यांसारख्या समर्थ कलाकारांनी ही परंपरा खंबीरपणे जपली. काळाच्या ओघात मात्र तमाशा आणि लावणी यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलला आणि ही कला ‘निषिद्ध’ मानली जाऊ लागली.
लावणीमध्ये वाढलेला अतिशयोक्तीपूर्ण शृंगार आणि तमाशातील काही अंशी अश्लील वाटणारा विनोद यामुळे सुशिक्षित समाजाने याकडे पाठ फिरवली. लावणीची साहित्यिक आणि ऐतिहासिक बाजू दुर्लक्षित राहून ती केवळ ‘उथळ नृत्या’पुरती मर्यादित मानली गेली. आधुनिक मनोरंजनाची साधने आणि चित्रपट-दूरदर्शनच्या प्रभावामुळे या पारंपरिक कलेला उतरती कळा लागली, परिणामी कलावंतांना सामाजिक उपेक्षेचे जीवन जगावे लागले.
लावणीचा प्रवास आता केवळ ग्रामीण फडापुरता मर्यादित न राहता, तो जागतिक मंचावर पोहोचला आहे. आधुनिक काळात लावणीने स्वतःचे रूप बदलले असले, तरी तिचा मूळ गाभा म्हणजेच ती ‘ढोलकीची थाप’ आजही कायम आहे. आज अनेक तरुण मुली आणि नर्तकी लावणीकडे एक उत्तम ‘करिअर’ आणि ‘कला’ म्हणून पाहू लागल्या आहेत, ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र, चित्रपट किंवा रिॲलिटी शोमधील लावणी आणि अस्सल फडावरची लावणी यांतील अंतर समजून घेणे गरजेचे आहे.
केवळ अंगविक्षेप म्हणजे लावणी नसून, शब्दांतील आर्तता आणि नखऱ्यातील शालीनता यांचा समतोल साधणे हीच खरी कसरत असते. लावणीला केवळ ‘आयटम नंबर’च्या चौकटीत न अडकवता, तिला एका अभिजात भारतीय नृत्यशैलीचा दर्जा मिळवून देणे आवश्यक आहे. जेव्हा आपण या कलेला प्रतिष्ठा देऊ, तेव्हाच खऱ्या अर्थाने शाहिरांच्या लेखणीचे सार्थक होईल. लावणीच्या प्रत्येक ठेक्यात आपल्या पूर्वजांचा संघर्ष आणि आनंदाचे क्षण गुंफलेले आहेत, त्याची जाणीव ठेवूनच आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल. ही लोककला म्हणजे मराठी संस्कृतीचा आरसा आहे, जो आपण कधीही धूसर होऊ देता कामा नये.
ही केवळ करमणूक नाही, तर ती आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवणारी प्रेरणा आहे. लावणीच्या शब्दांत इतिहास दडलेला आहे आणि तिच्या ठेक्यात आपली संस्कृती. तरुण पिढीला या कलेतील साहित्याची आणि भाषेची ओळख करून देणे आवश्यक आहे. शैक्षणिक पातळीवर लावणीचा अभ्यास आणि संशोधन झाल्यास या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. पारंपरिक कलाकारांना राजाश्रय आणि लोकाश्रय मिळवून देणे, हे आपले कर्तव्य आहे. लावणी जिवंत राहिली, तरच मराठी संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा आणि मराठी मनाचे ‘लावण्य’ पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.