

फोंडा: फोंड्यात रविवारी सकाळी एका खासगी बैठकीसाठी आलेले वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना आम आदमी पक्षाच्या चार कार्यकर्त्यांनी काळे निशाण दाखविल्यामुळे संतप्त मगोप कार्यकर्ते आणि सुदिन ढवळीकर यांच्या समर्थकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निषेध करीत ‘आप’विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण काही काळ तंग बनले होते.
मंत्री सुदिन ढवळीकर हे बैठक आटोपून घरी जात असताना इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या ‘आप’च्या अवघ्याच कार्यकर्त्यांनी काळे निशाण दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटर आणि वाढीव बिले त्वरित रद्द करताना वीज ग्राहकांविरोधात ‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ या वीजमंत्र्यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला.
यावेळी तेथेच असलेल्या मगोपच्या कार्यकर्त्यांनी त्वरित धाव घेत ‘आप’च्या या कृतीला आक्षेप घेतला आणि ‘आप’च्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे येथील वातावरण काही काळ तंग झाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती आटोक्यात आली.
वाहन रोखण्याचा प्रयत्न
यावेळी हातात काळे निशाण घेतलेल्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या कारसमोर येत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांचे वाहनही रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गर्दीतूनच वाट काढत मंत्री ढवळीकर कारमधून पुढे गेले. मात्र, नंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.