Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

Goa Politics Shiroda Constituency: शिरोडा हा फोंडा तालुक्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ. मडगाव-फोंडा या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता या मतदारसंघातील बोरी गावातून जात असल्यामुळे शिरोड्याला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
Goa Politics Shiroda Constituency
Goa Politics Shiroda ConstituencyDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: शिरोडा हा फोंडा तालुक्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ. मडगाव-फोंडा या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता या मतदारसंघातील बोरी गावातून जात असल्यामुळे शिरोड्याला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत शिरोड्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

बोरीशिवाय शिरोडा, पंचवाडी व बेतोडा - निरंकाल अशा तीन पंचायती या मतदारसंघात येतात. मंत्री सुभाष शिरोडकर यांचे या मतदारसंघावरील वर्चस्वही दुर्लक्षित न करण्यासारखे. १९८४ ते २०२२ पर्यंत ते या मतदारसंघातून तब्बल आठवेळा विजयी झाले आहेत.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यानंतर आठवेळा निवडून येणारे ते गोव्यातले दुसरे आमदार. २००७, २०१२ साली मात्र त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या सुभाषभाऊंचा भाजपच्या माजी मंत्री महादेव नाईक यांच्याकडून पराभव झाला होता.

पूर्वी मगोपचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असलेल्या शिरोडा मतदारसंघाला काँग्रेसमय करण्यातही सुभाषभाऊंचाच सिंहाचा वाटा होता. २०१९ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र या मतदारसंघात काँग्रेसची दयनीय अवस्था झाली. म्हणून तर २०२२ साली काँग्रेसच्या तुकाराम बोरकर यांना फक्त १,९५३ मते प्राप्त होऊन ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले होते.

काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी सुभाषभाऊंसोबत भाजपमध्ये गेल्यामुळे सध्या शिरोड्यातील काँग्रेसची अवस्था ‘असुनी नाथ मी अनाथ’ अशी झाल्यासारखी वाटते. आता विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे मतदारसंघातील वातावरण तापले आहे.

Goa Politics Shiroda Constituency
Goa Weather Update: पावसाची दडी अन् उन्हाचा चटका; बळीराजाच्या चिंतेत दिवसागणिक भर!

सुभाषभाऊ यंदा परत रिंगणात उतरणार, की शिरोड्याची जिल्हा पंचायत सदस्य असलेली मुलगी गौरी यांना रिंगणात उतरविणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यातच बोरीच्या जिल्हा पंचायत सदस्य पूनम सामंत याही भाजपच्या उमेदवारीचा दरवाजा खटखटावत असल्यामुळे भाजपच्या उमेदवारीकरता चुरस लागू शकते. तरीही सद्यस्थिती पाहता सुभाषभाऊंचे पारडे जड वाटते.

दुसऱ्या बाजूला माजी मंत्री महादेव नाईक हेही रिंगणात उतरण्याची तयारी करताना दिसत आहेत. मात्र, ते एखाद्या पक्षाचा आधार घेणार, की अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार, हे स्पष्ट झालेले नाही. गेल्यावेळी आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर रिंगणात उतरलेल्या महादेव नाईक यांना ६,१३३ मते प्राप्त झाली होती.

आता ते यावेळी कोणती रणनीती अवलंबतात, हे पहावे लागेल. शिरोड्याचे माजी आमदार रामचंद्र उर्फ बाबय प्रभू यांचे चिरंजीव अभय, ‘इनफ इज इनफ’ चळवळीतले हृदयनाथ शिरोडकर, शिवप्रसाद शिरोडकर हेही रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागलेले दिसत असले तरी त्यांची भूमिका अजून तरी धूसरच दिसते आहे.

काँग्रेस अजूनही अनिश्चिततेच्या भोवऱ्यात फिरताना दिसत असून सुभाषभाऊंनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसश्रेष्ठींनी शिरोड्याकडे बिलकुल लक्ष दिलेले दिसत नाही. त्याचेच परिणाम पक्ष सध्या भोगताना दिसत आहे. आता यावेळी काँग्रेस कोणती व्यूहरचना आखतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Goa Politics Shiroda Constituency
Goa Politics: आप कार्यकर्त्यांनी फोंड्यात मगोपला दाखविले काळे झेंडे, शाब्दिक चकमक; काही काळ तणावाचे वातावरण

मगोपचीही या मतदारसंघात बऱ्यापैकी ताकद असून गेल्यावेळी मगोपचे संकेत मुळे यांना २,३९७ मते प्राप्त झाली होती. आता यावेळी मगोप - भाजपची युती होते की काय, यावरही अनेक समीकरणे अवलंबून आहेत. गेल्यावेळी आरजीच्या शैलेश नाईक यांना ५,०६३ मते प्राप्त झाली होती. पण सध्या आरजीमध्ये संघर्षाचे वातावरण असल्यामुळे ते किती झेप घेतील, हे सांगणे कठीण आहे.

त्याचबरोबर काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, आरजी यांची युती झाल्यास हा मतदारसंघ कोणाकडे जातो, हेही पहावे लागेल. तसे झाले तर मात्र ते भाजप पुढे बऱ्यापैकी आव्हान निर्माण करू शकतात. पण सद्यस्थिती पाहिल्यास शिरोडा मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व दिसत आहे. आता प्रत्यक्षात काय होते, हे कळायला मात्र आणखी सहा महिने तरी जावे लागतील, हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com