Goa Politics Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics: शंभर कोटींचा 'तो' आरोप काँग्रेसवरच उलटणार? गिरीश चोडणकरांच्या वक्तव्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ!

Girish Chodankar statement: जो मतदार आजपर्यंत काँग्रेसचे अनेक अपराध पोटात घालून काँग्रेसच्या मागे ठामपणे उभा राहिला त्याच सासष्टीच्या मतदारांनाच त्यांनी ‘विकाऊ’ या श्रेणीत तर टाकले नाहीत ना..

दैनिक गोमन्तक डिजिटल

जो मतदार आजपर्यंत काँग्रेसचे अनेक अपराध पोटात घालून काँग्रेसच्या मागे ठामपणे उभा राहिला त्याच सासष्टीच्या मतदारांनाच त्यांनी ‘विकाऊ’ या श्रेणीत तर टाकले नाहीत ना, असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत. गिरीश चोडणकरांचे हे वक्तव्य भविष्यात काँग्रेसवर बुमरॅंग होऊन उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सासष्टीतील मते फोडण्यासाठी भाजपने १०० कोटी रुपये बाजूला काढून ठेवले आहेत. त्यासाठी भाजप एक प्रादेशिक पक्षाला पुढे काढणार आहे अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केल्यावर सर्व थरातून या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

गिरीश चोडणकर यांनी असे वक्तव्य करून नेमका कोणावर बाण सोडला हे कळणे कठीण आहे. मात्र, असे असले तरी जो मतदार आजपर्यंत काँग्रेसचे अनेक अपराध पोटात घालून काँग्रेसच्या मागे ठामपणे उभा राहिला त्याच सासष्टीच्या मतदारांनाच त्यांनी ‘विकाऊ’ या श्रेणीत तर टाकले नाहीत ना, असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत. गिरीश चोडणकरांचे हे वक्तव्य भविष्यात काँग्रेसवर बुमरॅंग होऊन उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोव्यातील निवडणुकीचा इतिहास चाळून पाहिला तर एक दोन अपवाद वगळले तर सासष्टीने नेहमीच काँग्रेसला पाठिंबा दिला. यामागे या तालुक्यातील ख्रिस्ती मतदारांवर असलेला चर्चचा प्रभाव हे मुख्य कारण आहे, ही गोष्ट १०० टक्के खरी आहे. पण ज्यावेळी काँग्रेस पक्षाने आपली मनमानी केली असे वाटले तेव्हा या तालुक्याने काँग्रेसला खालीही आपटले आहे.

दिगंबर कामत हे मुख्यमंत्री असताना गोव्यात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला, असे वाटल्यावर आणि काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी गोव्यातील जमिनी लिलावात काढल्या आहेत, अशी ठाम समजूत झाल्यानंतर याच सासष्टीने काँग्रेसला धडा शिकवला आणि तोही चर्चच्या आदेशावरून. हा सासष्टीने रचलेला इतिहास आहे.

सध्याच्या भाजप सरकारातही भ्रष्टाचार शिगेला पोचला आहे. गोवेकरांच्या जमिनी दिल्लीकरांच्या घशात घालण्यास नवनवे कायदे हे सरकार बनवत आहे. मतपेढीसाठी परप्रांतीयांना हे सरकार गोंयकार बनवू पाहत आहे, अशी सासष्टीवासीयांची भावना असून हे सरकार उलथवून टाकण्याची गरज त्यांना वाटू लागली आहे. अशा स्थितीत विरोधकांनी भाजप विरोधात एकत्र येऊन लढत द्यावी, अशी सासष्टीवासीयांची रास्त भावना आहे.

अशी भावना सासष्टीतील लोक व्यक्त करत असताना गिरीश चोडणकर हे असे वक्तव्य करत आहेत. यामागे राजकीय डावपेच तर नाहीत ना? सासष्टीच्या लोकांचा हा प्रश्न आहे. सासष्टीत ‘चिकन, मटण आनी सोरो’ मंत्र राजकारण्यांना फायदेशीर ठरतो, ही गोष्ट खरी असली तरी आणि ग्रासियससारखे काही राजकीय नेते, ‘मतदारच भ्रष्ट त्यामुळे निवडून येणारे आमदारही भ्रष्ट होतात’, अशी मुक्ताफळे अधून मधून उधळत असले तरी सासष्टीचा मतदार फक्त पैशांसाठी मतदान करतो, अशी कुणी समजूत करून घेतली तर सपशेल चूक ठरेल.

तसे असते तर झेडपी निवडणुकीत सासष्टीचे मतदार काँग्रेसमागे ठाम राहिले नसते. भाजप विरोधी मतांची विभागणी झाली तर त्याचा लाभ भाजपला होतो, हे गतनिवडणुकांनी दाखवून दिलेय. त्यामुळेच सासष्टीचे मतदार सर्वांनी एकत्र येऊन लढा, अशी आर्त हाक देताहेत. मात्र काँग्रेस सर्वांना सोबत घेण्यास तयार आहे का? जर असेल तर निवडणूक ५-६ महिन्यांवर असतानाही काँग्रेसकडून तसे प्रयत्न का होत नाहीत?

‘सेक्युलर’ मतांसाठी नव्या पक्षाची गरज आहे?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भले ‘सेक्युलर’ मतांच्या विभागणीसाठी शंभर कोटी रुपये खर्चून नवा पक्ष स्थापन करण्यात येत असल्याचा आरोप केला असला तरी आज त्याची खरंच गरज आहे का? एकेकाळी हा प्रयोग करून झाला आहे. ॲड. राधाराव ग्रासियस आणि इतरांनी ‘युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पार्टी’ हा पक्ष काढला आणि त्यांनी चर्चिल आलेमाव, माथानी साल्ढाणा, मिकी पाशेको आदींना उमेदवाऱ्या दिल्या.

ते सगळे भाजपच्या वळचणीला गेले. एवढेच नव्हे तर धर्मनिरपेक्षतावाद्यांचा महामेरू माथानी यांच्या पत्नी एलिना भाजप उमेदवारीवर याच ‘सेक्युलर’ मतांनी निवडून आल्या. त्यामुळे ‘सेक्युलर’ मतांत फूट पाडण्यासाठी आता नव्या पक्षांची खरीच गरज आहे का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

‘सेक्युलर’ मत विभागणीला काँग्रेसच कारणीभूत

‘सेक्युलर’ मतांची विभागणी होण्यासाठी काँग्रेसचीच रणनीती कारणीभूत ठरत आहे. नावेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रतिमा कुतिन्हो यांना कॉंग्रेस प्रवेश देणार आहेत.

याआधी चर्चिल आलेमाव हे आपली कन्या वालंका तिच्यासह काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना भेटून आले आहेत. यामुळे काही झाले तरी नावेलीत ‘सेक्युलर’ मतांची विभागणी होणार नाही का? नुवेमध्ये लिंडन मोंतेरो हे सध्या काँग्रेसचे स्वयंघोषित उमेदवार आहेत. इतर काही जणांनाही तेथे उमेदवारीचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. त्यामुळे कोणालाही उमेदवारी दिली तरी ‘सेक्युलर’ मतांमधील फूट तेथे ठरून गेलेली आहे. त्यामुळेही ‘सेक्युलर’ मते फुटण्यासाठी वेगळ्या पक्षाची गरज आहे का?

कोणत्याही राजकीय पक्षावर आर्थिक गैरव्यवहाराचे किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्याचे आरोप करायचे असतील, तर त्यामागे विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे. अन्यथा अशा आरोपांमुळे राजकारणातील विश्वासार्हता कमी होते आणि मतदारांची दिशाभूल होऊ शकते. काँग्रेसने सासष्टीतील पक्षाच्या संघटनात्मक कमकुवतपणावर, स्थानिक नेतृत्वातील मतभेदांवर आणि निवडणुकांतील पराभवाची कारणे अंतर्मुख होऊन शोधण्याची गरज आहे. पक्षाने स्वतःच्या उणिवांचा प्रामाणिकपणे विचार करायला हवा.

- ॲड. राधाराव ग्रासियस,

राजकीय विश्‍लेषक

गिरीश चोडणकर हे ‘रेजिग्नेशन चॅम्पियन’ आहेत. तामिळनाडूत २८ जागा लढल्या. तेथील खासदार ज्योतिमनी यांनी त्यांच्यावर तिकिटे विकल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांना त्यातल्याच नोटा दिसत असतील. त्यांनी भाजपवर केलेला ‘सेक्युलर मतं फोडण्यासाठी भाजपने १०० कोटी ठेवलेत’ हा आरोप बिनबुडाचा आणि पुराव्याविना केलेला आहे. चोडणकर यांच्याकडे आरोप सिद्ध करणारे पुरावे असतील तर ते सार्वजनिक करावेत.

-सिद्धार्थ कुंकळकर,

माजी आमदार, पणजी

चोडणकर यांनी केलेला आरोप हा राजकीय स्वरूपाचा आहे. निवडणुकीपूर्वी असे आरोप, प्रत्यारोप नवे नाहीत. आरोप करणाऱ्यांनी पुरावेही जनतेपुढे ठेवावेत. गोव्यातील मतदार जागरूक असून अशा आरोपांपेक्षा विकास, स्थानिक प्रश्‍न व पक्षाच्या कामगिरीवर मतदार निर्णय घेतात.

- विशाल पै काकोडे, राजकीय विश्‍लेषक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: शाळा वाढल्या पण बाकडी रिकामी! 6 वर्षांत 49 सरकारी शाळा बंद, तर विनाअनुदानित शाळांमध्ये ८ ने वाढ!

डोंगर माफियांची खैर नाही! डोंगरकापणीवरून कुठ्ठाळीतील राजकारण तापले; चौकशीच्या फेऱ्यात अडकणार दोषी

Mapusa Open Drains: पावसाळ्यात म्हापशात 'मृत्यूचे सापळे'! उघडी गटारे ठरतायत जीवितास धोका; आमदारांचा थेट अ‍ॅक्शन प्लॅन!

Goa Assembly Election: 'जागावाटप नंतर, आधी एकत्र या!' 2027 च्या रणधुमाळीसाठी काँग्रेसने फुंकले रणशिंग; 'आप'सोबत आघाडीच्या हालचालींना वेग

उठून पुन्हा खेळायला गेला, पण नियतीने डाव अर्ध्यावरच संपवला! बाणावलीच्या मैदानावर 26 वर्षीय खेळाडूचा मृत्यू

SCROLL FOR NEXT