

विविध कारणांनी सरकारप्रति असंतोष आहे, हे खरे असले तरी केंद्रातील सत्ता व त्यातून गोव्यात गेल्या चौदा वर्षांत विकासकामांवर झालेला हजारो कोटींचा खर्च व साकारलेले प्रकल्प या जमेच्या बाजू आहेत.
गोवा विधानसभेची निवडणूक आता अगदी तोंडावर येऊन ठेपली असून त्यासाठी सगळेच पक्ष कंबर कसून तयारीला लागलेले आहेत. सत्ताधारी भाजपही त्याला अपवाद नाही. गेली चौदा वर्षे हा पक्ष राज्यात सत्तेवर आहे व त्यामुळे हाती असलेली सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान समोर आहे. राज्यात जरी प्रस्थापितांविरुद्धची लाट नसली तरी विविध कारणास्तव सत्तेप्रती लोकांमध्ये असंतोष आहे व अनेक वर्षे उलटल्याने तसा तो असणे स्वाभाविकही आहे. पण, सत्ताधाऱ्यांची जमेची बाजू म्हणजे विरोधकांमध्ये नसलेली एकजूट. त्यामुळे लोकांमधील असंतोषाचे मतदानात रूपांतर करण्यात, किंबहुना या विरोधी असंतोषाला मतदानकेंद्रापर्यंत नेण्यात ते अपयशी ठरत आहेत.
मनोहर पर्रीकरांचे २०१८ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी अकल्पितपणे मुख्यमंत्री झालेले डॉ. प्रमोद सावंत दिवसेंदिवस त्या खुर्चीवर आपली मांड घट्ट ठोकून बसलेले, एवढेच नव्हे तर त्यानंतर झालेल्या एकूण एक सगळ्या निवडणुकांत ते भाजपला विजयश्रीकडे नेताना दिसत असले तरी पुढील दोन-तीन महिन्यांत होणारी विधानसभा निवडणूक भाजपसाठी खचितच नवे आव्हान उभे करणारी असेल, अशी चिन्हे दिसतात. त्यामागील कारणे अनेक आहेत व त्याला विरोधीपक्ष नव्हेत तर स्वतः भाजपमधील अंतर्गत राजकारणच कारणीभूत ठरणार आहे, असे म्हणावे लागते.
भाजपसाठी २०१२ मधील निवडणूक मनोहर पर्रीकर यांनी एकहाती लढवून पक्षाला सत्तेपर्यंत नेले होते. खरे तर त्यावेळी केंद्रातही पक्ष सत्तेवर नव्हता. त्यामागील कारण गोव्यातील विरोधी काँग्रेस पक्ष व त्या काळात झालेले विविध घोटाळे व त्यांतून ढासळलेली व्यवस्थाच होती. त्याचा परामर्श येथे घेण्याचे कारण नाही. त्यानंतर २०१४च्या निवडणुकीत केंद्रात सत्तापालट होऊन भाजप सत्तेत आला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांना केंद्रात नेले व पार्सेकर गोव्यात मुख्यमंत्री झाले.
त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप खरे तर सत्ताच्युत झाला होता. खुद्द मुख्यमंत्री हरले; पण केंद्रातील सत्ता व स्थानिक विरोधी पक्षांमधील हाराकिरीमुळे पुन्हा भाजपला सत्तेचा मुकुट मिळाला व पर्रीकरांना पुन्हा गोव्यात आणून मुख्यमंत्री केले गेले. पण ते नियतीला मान्य नसावे, कारण त्यांना असाध्य दुखणे जडले व त्यांचा मृत्यू झाला व सभापती असलेल्या सावंतांकडे नेतृत्व आले. राजयोग म्हणतात तो हाच.
त्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये विधानसभेच्या, २०२४ मध्ये लोकसभेसह अनेक निवडणुकांत पक्षाला विजयाप्रत नेले. तसेच विधानसभेतही कधी नव्हे तेवढे पक्षाला बहुमत मिळविले. पण, त्यासाठी अवलंबिलेले उपाय मात्र अनेकांना खटकले. अर्थात, त्याला सत्ताधारी पक्षात येणारे लोकप्रतिनिधीही तेवढेच जबाबदार असतात, हेही खरे. म्हणूनच आता होणारी विधानसभा निवडणूक ही एकप्रकारे सगळ्यांसाठीच कसोटीची ठरणार आहे. भाजपकडे यावेळीही पर्रीकरांचा करिष्मा नाही.
तसेच विविध कारणांमुळे सरकारप्रति असलेला असंतोष व खदखद आहे, हे जरी खरे असले तरी केंद्रात असलेली सत्ता व त्यातून गोव्यात गेल्या बारा-चौदा वर्षांत विकासकामांवर झालेला हजारो कोटींचा खर्च व साकारलेले प्रकल्प या जमेच्या बाजू आहेत. प्रमोद सावंत यांनी पर्रीकरांप्रमाणेच आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्या साखळीत भरणाऱ्या जनता दरबारांत राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोक हजेरी लावत असतात. मुख्यमंत्र्यांनी आपली समस्या जाणून घेतली, यात तो धन्यता अनुभवतो. त्या समस्येवर तोडगा निघाला याचे त्याला पडून गेलेले नसते. म्हणजे, ‘माझे घर’ तसेच ‘माझा फ्लॅट’ या योजनेचा भाजपला निवडणुकीत काय लाभ होतो, हेही निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
मनोहर पर्रीकर यांनी २०१२ मध्ये एक वेगळ्या प्रकारचे सामाजिक राजकारण केले होते व त्याचा भाजपला बराच लाभ झाला होता. नीलेश काब्राल, कार्लुस आल्मेदा, माथानी साल्ढाणा, आवेर्तान फुर्ताद यांसारख्यांना आपलेसे केल्याने भाजपप्रति कॅथॉलिक समाजाचा असलेला दृष्टिकोन बदलला होता व त्याचा परिणाम अन्य काही मतदारसंघांतही झाला होता. आताही कुठ्ठाळीचे वाझ वा कुडतरीचे रेजिनाल्ड यांच्यामुळे भाजपचे वेगळे चित्र साकारलेले असले तरी सध्या काब्राल भाजपपासून दुरावल्याची चर्चा आहे. कार्लुस आल्मेदा तर पक्षात उरलेलेच नाहीत. दुसरीकडे शिवोलीचे दयानंद मांद्रेकर, थिवीचे किरण कांदोळकर, काणकोणचे विजय पै खोत यांचेही तसेच आहे. मांद्रेत जरी पार्सेकर सर पक्षात परतलेले असले तरी अन्य अनेक भागांत वेगळेच चित्र आहे.
त्यामागील कारण अनेक नवे चेहरे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आजवर सतत सत्तेत असलेले नेते हटायला तयार नाहीत व त्यामुळे अनेक मतदारसंघांत बंडखोरी होऊ शकते. त्यांना शांत करण्याची धमक तेव्हा पर्रीकर-धोंड यांच्यात होती. आज त्याचीच वानवा आहे. दुसरीकडे भाजप-मगोप युती अजून तरी अधांतरी आहे. मात्र निकालानंतर नियतीनेच त्यांना एकत्र आणले. कदाचित यावेळीही तसेच होईल, असे दोघेही मानत असावेत; पण पुन्हा तसेच होईल या भ्रमात राहणे धोक्याचे ठरू शकते. स्वप्नात रमणाऱ्यांना ते कोण सांगणार?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.