

Pakistan Sindh Protest Asim Munir Punjab Establishment: पाकिस्तान पुन्हा एकदा तीव्र राजकीय आणि प्रादेशिक वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, देशाच्या सिंध प्रांतात सरकार आणि लष्कराविरोधात जनक्षोभ उसळला. लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि पंजाबचे वर्चस्व असलेली सत्ताव्यवस्था सिंध प्रांताचे विभाजन करण्याचा कट रचत असल्याचा आरोप करत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले.
कराची, हैदराबाद, नवाबशाह आणि लरकाना यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये निदर्शने होत असून, सिंधच्या ऐतिहासिक ओळखीशी आणि जमिनीशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. 22 नोव्हेंबर रोजी कराचीमध्ये 'जिये सिंध रहबर कमिटी'च्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या भव्य रॅलीत पारंपरिक सिंधी अजरक आणि टोप्या परिधान केलेले हजारो नागरिक, वकील व सामाजिक कार्यकर्ते लाल झेंडे घेऊन सहभागी झाले. सिंध ही केवळ एक प्रशासकीय सीमा नसून हजारो वर्षे जुनी संस्कृती आणि सभ्यता असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
सिंधमधील तेल, वायू, कोळसा, कृषी जमीन आणि सागरी बेटांवर ताबा मिळवून या नैसर्गिक संसाधनांचा फायदा इतर प्रांतांना दिला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी संघटनांनी केला. या पार्श्वभूमीवर 'जिये सिंध मुत्तहिदा महाज' या संघटनेने पंजाबकडे जाणारे महामार्ग आणि वाहतूक मार्ग रोखून पंजाबची आर्थिक नाकेबंदी करण्याचा इशारा दिला असून, 1971 मध्ये जीएम सय्यद यांनी मांडलेली स्वतंत्र 'सिंधुदेश'ची मागणी पुन्हा जोर धरु लागली.
पाकिस्तानचे (Pakistan) गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी लहान प्रशासकीय प्रांत निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर आणि नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी प्रांतांची संख्या बारा ते पंधरापर्यंत वाढवण्याचे संकेत दिल्यानंतर हा वाद पेटला. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी यावर सार्वमताची शक्यता वर्तवली असली, तरी पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी प्रांत विभाजनाला तीव्र विरोध दर्शवला. दुसरीकडे एमक्यूएम-पीने या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून, येत्या 29 नोव्हेंबर रोजी कराचीमध्ये समर्थक आणि विरोधकांच्या स्वतंत्र रॅली होणार असल्याने पाकिस्तानमधील अंतर्गत तणाव अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.