

विजय-गिरीशचे सूत जमले
एकेकाळी विजय सरदेसाई आणि गिरीश चोडणकर हे दोघेही काँग्रेसमध्ये असताना एकमेकांचे राजकीय शत्रू होते. असे म्हणतात, विजयचे फातोर्डातील काँग्रेसचे तिकीट कापण्यामागेही गिरीशचाच हात होता. मात्र, त्यानंतर विजय काँग्रेसच्या बाहेर गेले आणि आमदारही झाले. पण गिरीश आणि विजयमधील तणावाचे नाते कधी दूर झाले नाही. म्हणतात ना... सगळ्याच गोष्टींवर काळ हा सर्वांत चांगला उपाय असतो. सध्या विजय आणि गिरीशबाबतही असेच झाले. एकेकाळचे हे विरोधक आता एकत्र आले आहेत. शनिवारी गिरीश यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून विजय यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याच. त्याशिवाय, गिरीशने विधानसभा निवडणूक जिंकावी, असेही सांगितले. बदलत्या राजकीय गणितात विजय आणि गिरीशचीही गणिते बदलली आहेत, असेच म्हणायचे का?
आजारी आयडी हॉस्पिटल
काही बुटांचं असं असतं. विकत घ्यायला गेलात तर तुमच्या आवडीचं डिझाइन सापडतं, पण नंबर नसतो. फिट होणारा नंबर मिळाला तर आवडणारं डिझाइन नसतं. फोंड्याच्या आयडी हॉस्पिटलाची स्थिती अशीच आहे. इमारत छान, सुंदर; पण आत सुविधांचा अभाव. हाडांचे डॉक्टर कुशल असतील, परंतु शस्त्रक्रिया करायला किमान आवश्यक शल्य-उपकरणेच नाहीत. सुविधा नाहीत. मग फायदा काय? आटापिटा करून भव्य, दिमाखदार इमारत उभारली. पण आत डॉक्टर, परिचारिका, कर्मचारीबळ, उपकरणे आणि सुविधा परिपूर्ण नसतील तर त्याचा उपयोग काय? फोंडा हे गोव्याचं हृदय आहे. मध्यवर्ती ठिकाण. इथे कायम रुग्णांची गर्दी असते. हॉस्पिटलच आजारी असेल, प्रत्येक व्याधीने ग्रस्त असेल तर उपचार कसे होणार? हिंदीत म्हण आहे, ‘अंधे को अंधा मिला, रास्ता कौन बताय,’ तशी ही स्थिती.
कुडचडेत भाजपा विरुद्ध भाजपा?
‘मोठ्या झाडाच्या सावलीत दुसरे रोपटे तग धरत नाही,’ हे शास्त्र राजकारण्यांनाही लागू पडते. मोठ्या नेत्याच्या छत्रछायेत दुसरा नेता तयार होणे कठीण. कुडचडे मतदारसंघाचा इतिहास हेच सांगतो. रामराव देसाई यांच्या बोटाला धरून श्याम आमदार बनला. श्यामच्या छत्रछायेत राहून काब्राल कुडचड्याचे आमदार झाले. आता या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? काब्रालला बाजूला करून रोहन आमदार बनणार का? या प्रश्नावर कुडचडे मतदारसंघात कोपऱ्या-कोपऱ्यावर चर्चा रंगत आहे. कुडचडे मतदारसंघात सध्या भाजपा विरुद्ध भाजपा असेच चित्र पाहायला मिळते. भाजपा सोडल्यास काँग्रेस व इतर पक्षांचे कार्य या मतदारसंघात अभावानेच पाहायला मिळते. आता पाहूया, भाजपाचे कमळ कोणाला मिळते? रोहन आपल्या खिशाला कमळ लावतात की काब्राल आपल्याकडे कमळ राखतात?
आता धडपड श्रेय घेण्यासाठी...
कुणाच्या पाठिंब्याने, कोण जाणे; पण भाजप सरकारच्या शिक्षण विभागातील अनास्थेविरोधात देशातील विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला आणि शेवटी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने या विद्यार्थ्यांचा विजय झाला. गोव्यातही या निमित्ताने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. एका अर्थाने गोव्यातील विद्यार्थ्यांचाही हा विजय. आता या विजयाचे श्रेय घेण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू झाली. या आंदोलनात सक्रिय नसलेले काही घडीभगतही पुढे सरसावले असून त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही ‘जेन झी’ आहे हेही आता विसरता कामा नये. त्यांचा वापर करताना राजकाण्यांना जरा विचार करावा, असे बोलल्या जात आहे
‘थांबा-थोडं’ सेवा?
रस्त्यावर जखमी होऊन तडफडणाऱ्या महिलेसाठी सांतिनेज येथे तब्बल ५० मिनिटे रुग्णवाहिका पोहोचत नसेल, तर नागरिकांनी संकटात १०८ वर फोन करावा की देवाचा धावा करावा, असा प्रश्न पडतो. तोपर्यंत मदतीचा हात प्रशासनाचा नव्हे, तर सामान्य माणसांचाच पुढे येतो. लाखो रुपयांची यंत्रणा, मोठमोठे दावे आणि ''त्वरित सेवा''च्या जाहिराती एका बाजूला; तर प्रत्यक्षात जखमी नागरिकाला रस्त्याच्या कडेला खुर्चीवर बसवून प्रतीक्षा करण्याची वेळ दुसऱ्या बाजूला. जर आपत्कालीन सेवेलाच इतका ''आपत्कालीन'' विलंब होत असेल, तर जखमींनी अपघातानंतर घड्याळ पाहावे की जीव वाचण्याची आशा धरावी? शनिवारच्या घटनेनंतर असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पार्किंगची ‘पीएचडी’!
पणजीत गाडी चालवण्यापेक्षा ती पार्क करणं जास्त अवघड झालंय. काही चालकांची पार्किंगची स्टाईल पाहिली की, एका गाडीने तीन गाड्यांची जागा कशी अडवावी, याचं त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलं असावं, असा संशय येतो. गंमत म्हणजे, हे पराक्रम बहुतेक सुशिक्षित मंडळींच्याच हातून घडतात. गाडी रेषांच्या आत लावायची असते, हे कदाचित परवाना मिळाल्यानंतर विसरून जात असावेत. परिणामी, मागचे चालक हॉर्न वाजवत राहतात, पार्किंगच्या शोधात फेऱ्या मारत राहतात आणि वाहतूक कोंडी वाढतच जाते. त्यामुळे आता ‘आरटीओ’ने वाहन चालविण्याच्या परीक्षेसोबत ‘गाडी नीट पार्क करण्याचा’ छोटासा तासही घ्यायला हवा, अशी मागणी कुणी केली तर ती फारशी चुकीची ठरणार नाही. नाहीतर काहींच्या ''कलात्मक'' पार्किंगमुळे अनेकांचा वेळ, संयम आणि इंधन तिन्ही वाया जातच राहणार!
नेमके कारण काय?
आपण ‘आरजीपी’चा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत, आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षाच्या राज्य समित्या बरखास्त केल्या. परंतु, माजी खजिनदार अजय खोलकर मात्र आमदार बोरकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नसून, कोअर समितीचे सदस्य असल्याचे म्हणत, त्यांना राज्य समित्या बरखास्त करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत आहेत. शिवाय आरजीपी इतर पक्षात विलिन करण्यासाठीच आमदार बोरकरांनी ही खेळी खेळल्याचा दावाही ते करीत आहेत. त्यामुळे पक्षात अंतर्गत बंडाळी माजलेली असतानाही बोरकरांनी जे मौनव्रत धारण केलेले होते, त्यामागे नेमके कारण विलिनीकरणाचे होते की पक्षाला बळकटी देण्याचे? याचे कारण कधी समोर येणार? याकडे पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या नजरा लागून आहेत.
शिल्लक काय आहे?
आमदार मायकल लोबो यांनी पर्रा येथे पूर्वजांची जमीन विकू नका, असे आवाहन शनिवारी केले. त्यावर "विकण्यासाठी आता जमीन तरी शिल्लक राहिली आहे का?" असा प्रश्न चर्चेत आला आहे. पूर्वजांची जमीन विकू नका, शेतीचे रूपांतर इमारतींमध्ये करू नका, असा भावनिक सल्ला आता दिला जातोय; पण हा साक्षात्कार विकासाच्या नावाखाली हजारो चौरस मीटर जमिनींचे रूपांतर झाल्यानंतरच का झाला, असा सवाल लोक विचारू लागले आहेत. आधी सिमेंटच्या जंगलाला परवानग्या, मग शेतजमिनी वाचवण्याची हाक... म्हणजे घराला कुलूप लावायचे ते चोर गेल्यानंतरच, अशीच ही गोमंतकीय विकासाची नवी व्याख्या म्हणायची का
पायाखालची वाळू सरकली!
‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर छेडलेले आंदोलन रोखण्यात भाजपला अपयश आल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सिद्ध झाले. युवकांनी छेडलेले हे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कशाही पद्धतीने उलथवून लावतील, असा ठाम विश्वास गोव्यासह भाजपशासित राज्यांतील मंत्री, आमदारांना होता. परंतु, त्यांचा हा विश्वास पूर्णपणे फोल ठरला आहे. या आंदोलनाला गोव्यातील युवापिढीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आल्याचे आणि त्यातच विधानसभा निवडणूक अवघ्या सात महिन्यांवर येऊन ठेपल्याने भाजपच्या अनेक विद्यमान मंत्री, आमदारांच्या पायाखालची वाळू सरकल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘मयडे’ कात्रीत
म्हापशालगतचे मयडे गाव हे गाव की शहर, असा प्रश्न ग्रामस्थांना पडू लागला आहे. ते शहर असल्याचे चक्क दिल्लीत ठरवण्यात आल्याची चर्चा आहे. "मयडे गाव शहर करायचे की नाही?" हा प्रश्न विचारण्यासाठी आधी दिल्लीहून पत्र येते, मग पंचायत म्हणते, ‘ग्रामसभेत लोक काय म्हणतात ते ऐकू.’ म्हणजे आधी गावकऱ्यांना न विचारता गावाचे भवितव्य कागदावर ठरवायचे आणि नंतर लोकशाहीची आठवण काढायची! आता गावकऱ्यांनाही कळून चुकले आहे—आज ‘सर्वे’ होतोय, उद्या ‘सूचना’, परवा ‘मंजुरी’ आणि मग बुलडोझर. म्हणूनच मयडेवासीयांचा संदेश स्पष्ट आहे : गावाचा निर्णय एसी कार्यालयात नाही, तर ग्रामसभेतच होणार!
लॉर्ना यांची क्रेझ!
पाच-सहा दिवसांपूर्वी लंडनमधील पश्चिम लंडनच्या हाउन्स्लो येथील क्रॅनफोर्ड येथे ‘शोबिझ ग्लोबल लिमिटेड’ आणि ‘रेव्ह नेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोवा डे लंडन’ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवात ९ हजारांहून अधिक लोकांनी गोमंतकीय संगीत, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचा आनंद लुटला. गोव्याच्या सुप्रसिद्ध गायिका लॉर्ना सलग चौथ्या वर्षी या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. जगभरातील गोमंतकीयांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या आपल्या गाजलेल्या कोकणी गाण्यांच्या सादरीकरणाने त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले. लोर्नांसोबतच रीटा रोझ तसेच एंगलबर्ट आणि अल्रिया रोझ यांनी लंडनमधील या ‘गोवा डे’ महोत्सवात प्रथमच सादरीकरण केले. विशेष म्हणजे, लॉर्ना यांच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहून या उत्सवात त्यांची क्रेझ अजूनही कायम असल्याचे दिसून आले.
गोमंतकीय विठ्ठल भक्तांतही रुजते वारीची परंपरा!
आपली श्रीमंत आणि वैभवशाली परंपरा, तसेच रितीरिवाज यांना तोडच नाही. आपल्या गोव्यात विठ्ठलभक्तीची परंपरा आजच्या युवा पिढीने आपल्या खांद्यावर उचलल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळते. ‘सन, सँड ॲण्ड सी’ अशी जरी गोव्याची ओळख असली आणि गोमंतकीयांना ‘फिश, मीट व ड्रिंक’ आवडत असले, तरी गोव्यातील आजच्या युवकांमध्ये देव-धर्मावर आणि आपल्या समृद्ध भक्तीपरंपरेवर श्रद्धा आहे, हे निश्चितच अप्रूपाचे आहे. पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या भक्तीच्या महाकुंभात म्हणे पंचवीस लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाले. त्यांपैकी हजारो वारकरी गोमंतकीय आहेत, हे निश्चितच सकारात्मक आणि आनंददायी चित्र म्हणावे लागेल.
मेलोडी खाव, खुद जान जाव!
‘मेलोडी’ची चव गोडच असते, पण यावेळी तिचा राजकीय स्वाद अधिकच चर्चेत आला. पंतप्रधानांनी इटलीच्या पंतप्रधानांना दिलेल्या ‘मेलोडी’ चॉकलेटची आठवण आता सरकारविरोधातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आझाद मैदानावर तरुणांनी करून दिली. आंदोलनाचा ‘गोड शेवट’ साजरा करत चॉकलेटचे वाटप झाले; पण या गोडव्यातून सत्ताधाऱ्यांना चिमटाही तितकाच बोचरा होता. एकेकाळी परदेशी पाहुणचाराचे प्रतीक ठरलेली ‘मेलोडी’ आता जनआंदोलनाच्या विजयाची ‘प्रसादाची वडी’ बनली, एवढाच फरक!
रात्रीची गस्त वाढवल्यावर...
पर्वरी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवला, कचरा टाकणारा शुक्रवारी रात्री रंगेहात पकडला. पण प्रश्न एवढाच की, रस्त्याच्या कडेला कचरा फेकणाऱ्यांना आता पोलिसांची भीती वाटेल की पुन्हा एखादा अंधारा कोपरा सापडेल? पर्वरी परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त प्रशासनाची नसते, हे विसरलेल्या काही ‘स्वच्छतादूतां’ना आता दंड आणि वाहन जप्तीची भाषा समजावी लागणार दिसते. कचरापेटी काही पावले दूर असतानाही रस्ता डंपिंग यार्ड समजणाऱ्यांसाठी हा इशारा पुरेसा ठरतो का, हे मात्र पुढच्या रात्रीच्या गस्तीच सांगतील!
स्थानिक प्रश्नांवरही एकत्र येणार?
देशभरातील युवकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि अखेर शिक्षणमंत्र्यांचा राजीनामाही घेतला. या आंदोलनाला गोव्यातील युवकांनीही रस्त्यावर उतरून समर्थन दर्शवले. पण चर्चा अशी आहे की, गोव्यात पाणी, वाहतूक, रोजगार, किनारपट्टी, विकासकामे असे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. मात्र, त्यावर एकत्र येण्याची वेळ आली की, ‘कोणीतरी पुढे जाईल, आपण नंतर पाहू,’ अशीच भूमिका काही युवकांकडून घेतली जाते. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की, गोव्याच्या प्रश्नांवरही युवक, म्हणजेच ‘जेन झी’, एकदिलाने उभे राहणार की फक्त इतर राज्यांतील आंदोलनांना ‘लाईक’ आणि ‘शेअर’ करून समाधान मानणार? गोव्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत किंवा समाजातील उणिवा, त्याकडे आता स्थानिक ‘जेन झी’ कसे पाहतात आणि त्यासाठी किती सक्रियपणे पुढे येतात, याचीही चर्चा सुरू आहे.
सावर्डेकरांना ‘गणेश’ पावणार की बदलाचा ‘संकेत’ मिळणार?
राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. कालपर्यंत एकमेकांना शिव्या देणारे गरज पडली की एकाच ताटात जेवतात. एकत्र असलेले स्वार्थासाठी एकमेकांचा गळा कापण्यातही मागे सरत नाहीत. आता सावर्डे मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान आमदार गणेश गावकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते संकेत आर्सेकर यांनी "आता माघार नाही" असा संदेश दिला आहे. आता पाहूया, सावर्डे मतदारसंघातील मतदार येणाऱ्या निवडणुकीत गणेशभक्त बनतात की आमदार बदलाचा संकेत देतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.