खरी कुजबूज: मनोज पुढे काय करणार?

Khari Kujbuj Political Satire: गेल्‍या काही दिवसांपासून पक्षात सुरू असलेल्‍या वादाच्‍या पार्श्वभूमीवर रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे (आरजीपी) अध्‍यक्ष मनोज परब यांनी गुरुवारी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदासह सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसवर भरोसा नाय काय?

मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी आकाशपाताळ एक करणारे माजी मंत्री मिकी पाशेको यांनी काल मडगाव येथे बोलताना, ‘काँग्रेसने मला उमेदवारी दिली तरी ती मला नको’ असे तावातावाने सांगितले. मिकी यांनी यावेळी बाणावलीवर तर त्यांच्या पत्नी व्हियोला यांनी नुवे मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मिकी यांना मागच्यावेळी काँग्रेसचा कटू अनुभव आला होता. बाणवलीत आपल्याला काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांचे जामात रॉबर्ट वाद्रा यांच्याकडे थेट फिल्‍डिंग लावली होती. पण काँग्रेसने त्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवत शेवटी उमेदवारी भलत्यालाच दिली. अशा परिस्थितीत मिकी यांचा काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. या पक्षावर भरोसा कोण ठेवणार, असेच ते सर्वांना सांगत सुटले आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Telangana Political Crisis: BRS पक्षाचे आमदार, नेते गोव्यात तळ ठोकून का बसलेत? केटी रामाराव यांनी घेतली भेट

अब रिझर्व्हेशन दूर नही

विधानसभा निवडणूक अवघ्‍या काही महिन्‍यांवर आली असताना गोव्‍यातील एसटी बांधवांना राजकीय आरक्षण मिळण्‍याच्‍या आशा पुन्‍हा पल्‍लवित झाल्‍या आहेत. यावेळी कोणत्‍याही परिस्‍थितीत हे आरक्षण पदरात पाडून घेऊच, असा पण आदिवासी कल्‍याणमंत्री रमेश तवडकर यांनी केला आहे. त्‍यासाठी इतर नाराज एसटी नेत्‍यांना एकत्र आणण्‍यासाठी त्‍यांनी काम सुरू केले आहे. सोमवारी २५ मे रोजी आंबावली-केपे येथे होणाऱ्या ‘प्रेरणादिन’ कार्यक्रमात पुन्‍हा एकदा सर्व एसटी नेते एका व्‍यासपीठावर दिसतील, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे. हा कार्यक्रम झाल्‍यानंतर लगेच तवडकर केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्‍यामुळे सर्व एसटी बांधवांमध्‍ये ‘अब रिझर्व्हेशन दूर नही’ अशा प्रकारची भावना निर्माण झाली आहे.

हिमालयाच्या कुशीत चहा दिवस

गोव्याच्या ज्येष्ठ नागरिकांनी यंदाचा जागतिक चहा दिवस आगळ्‍यावेगळ्‍या थाटात साजरा केला. केदारनाथच्या वाटेवरील हिमालयाच्या कुशीत, थंडगार वाऱ्यांत आणि धुक्याच्या साक्षीने चहाचा प्रत्येक घोट अधिकच संस्मरणीय ठरला. गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर चहाचे घोट घेणारे हे ज्येष्ठ, आज हिमालयाच्या उंच शिखरांमध्ये ‘चहा म्हणजे फक्त पेय नाही, तर प्रवासातील ऊर्जा आणि मैत्रीचा उत्सव आहे’ हेच जणू जगाला सांगताना दिसले. एका हातात गरमागरम चहा, समोर बर्फाच्छादित निसर्ग आणि चेहऱ्यावर समाधानाचे हास्य...‘वय फक्त आकड्यांत असतं; उत्साह मात्र मनात असतो’ याची ही सुंदर अनुभूती.

Khari Kujbuj Political Satire
Goa Political News: भाजपच्या उमेदवारीवर दिल्लीमध्ये खल सुरू! मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

मनोज पुढे काय करणार?

गेल्‍या काही दिवसांपासून पक्षात सुरू असलेल्‍या वादाच्‍या पार्श्वभूमीवर रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे (आरजीपी) अध्‍यक्ष मनोज परब यांनी गुरुवारी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदासह सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला. शिवाय राजकारणातून संन्‍यास घेत असल्‍याची घोषणा केली. त्‍यानंतर पक्षाच्‍या केंद्रीय कार्यकारणीनेही (सीईसी) त्‍यांचा राजीनामा मंजूर केल्‍याने मनोज आपल्‍या निर्णयावर ठाम होते, हे स्‍पष्‍ट झाले. पण, ते खरेच राजकीय आखाड्यातून बाहेर पडणार की आगामी विधानसभा निवडणुकीत ‘थिवी’ जिंकण्‍यासाठी इतर कुठल्‍या पक्षाचा आसरा घेणार?, कुजबूज मात्र सुरू झाली आहे.

‘एआय’वरून वाड:मय चौर्य

कॉमनवेल्थ लघुकथा कॅरेबियन विभागात जमीर नझीरला पुरस्कार मिळाला. काही समीक्षक व एआय-शोध माध्यमांनी ही कथा एआयने लिहिली असावी असा आरोप केला. ग्रांटा मासिक व कॉमनवेल्थ फाऊंडेशन यांनी या आरोपांची दखल घेतली, मात्र ठोस पुरावा नसल्याचे सांगितले. नझीर यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मौलिकता, विश्वासार्हता यावर सध्‍या वितंडवाद चाललेत. सोशल मीडियावर प्राध्यापकांनी ही कथा एआयची कॉपी असं म्हटलं आहे. गोव्यातील कोकणी-मराठी लेखक ‘एआय’स्नेही नसल्यामुळे अजून तरी ते या चौर्य स्रोताकडे गेले नसावेत. आतापर्यंत कोकणी नाटके थेट चोरली जात होती. ‘एआय’निर्मितीचा आधार 51व्या नाट्यस्पर्धेत कुणी घेतला तर ‘सॉल्लेट’ मज्जा येईल. नाटक थेट ढापा किंवा एआयच्या मदतीने चोरा, आयोजकांना काहीच पडून गेलेलं नाही!

Khari Kujbuj Political Satire
Goa Political News: विकासकामांचे रिपोर्ट कार्ड द्या!

‘कॉक्रोच’ आणि सहनशक्ती

देशभरात सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. जेन-झी पिढीने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उपरोधिक भाष्य करत हा भन्नाट प्रयोग सुरू केला आणि पाहता पाहता पक्षाला व्हायरल लोकप्रियता मिळाली. आता या पक्षाची हवा गोव्यातही पोहोचल्याची चर्चा आहे. काही उत्साही मंडळींनी तर ‘आम्हीही तयार’ असा पवित्रा घेतल्याचे समजते. काही सामाजिक कार्यकर्त्यांचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागल्याने ‘हे खरंच उमेदवारीसाठी तयारी करतायत की फक्त रीलसाठी पोझ देतायत?’ असा सवाल उपस्थित होतोय. गोव्यात आधीच अनेक पक्ष असताना आता ‘कॉक्रोच’ची भर पडल्यास मतदारांनाही मतदानपत्रिकेसोबत भिंग द्यावे लागेल की काय, अशी चर्चा रंगली आहे. काही जाणकारांचे म्हणणे आहे की, ‘गोव्याच्‍या राजकारणात टिकायचं असेल, तर कॉक्रोचसारखी सहनशक्ती लागतेच’. त्यामुळे या पक्षाचे चिन्ह काहीही असले तरी प्रतिकात्मकता मात्र जबरदस्त असल्याचे बोलले जात आहे.

चहाचा कप...माझा नि तुझा!

आंतरराष्ट्रीय चहादिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी समाजमाध्यमावर शेअर केलेले एक साधेसुधे छायाचित्र अनेकांच्या नजरा खिळवून गेले. चहाच्या कपातून दरवळणारा आपुलकीचा सुगंध, चेहऱ्यांवरील सहज हास्य आणि साधेपणात दडलेली आत्मीयता यामुळे हे छायाचित्र विशेष लक्षवेधी ठरले. राजकारणाच्या धावपळीतील क्षणभराची ही निवांत ‘चहापान मैफल’ अनेकांना भावली.

Khari Kujbuj Political Satire
OneIndia Political Survey 2024: वनइंडिया सुरु करणार ऐतिहासिक सर्वेक्षण, सरकारांच्या कारभाराबाबत जाणून घेणार देशाचा मूड!

घोषणा जास्‍त; कार्यकर्ते कमी!

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ‘एनएसयूआय’ने पणजीतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. घोषणांचा आवाज एवढा जोरदार होता की आसपासच्या कबुतरांनीही क्षणभर उड्या मारल्या. पण आंदोलनाला उपस्थितांची संख्या पाहून आयोजकांनाच क्षणभर ‘आम्हीच आलोय ना?’ असा प्रश्न पडला. विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाला किमान ५० विद्यार्थी तरी अपेक्षित असताना, उपस्थिती मात्र ‘टॉप-१०’ यादीतच अडकली. काहींच्या मते, आंदोलनात घोषणांपेक्षा सेल्फींची संख्या जास्त होती. यामागचे कारण काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. गोव्यातील ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्षपद अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने ‘कॅप्टनशिवाय टीम मैदानात उतरली की असंच होतं’ अशी मिश्कील प्रतिक्रिया उमटत आहे.

वीरेश अध्‍यक्ष होणार?

मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर हे ‘आरजीपी’चे प्रमुख आधारस्‍तंभ. परंतु याच दोन नेत्‍यांमध्‍ये गेल्‍या काही दिवसांपासून वाद सुरू असल्‍याने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. आमदार बोरकर पक्ष स्‍वत:च्‍या ताब्‍यात घेण्‍यासाठी प्रयत्‍न करत असल्‍याचा आरोप परब यांनी केला. तर, आपण अजूनही पक्षासोबतच आहे. पण, नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्‍याचे आमदार बोरकर यांनी म्‍हटले आहे. आता परब यांनी अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिल्‍याने बोरकर पक्षाच्‍या अध्‍यक्षपदी विराजमान होणार का? याकडे समस्‍त गोमंतकीयांच्‍या नजरा आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Political Satire: खरी कुजबूज! आता ‘आयआयटी’ कुठे?

पंचायत सचिवाच्‍या ताफ्‍यात ‘रेंज रोव्हर’

‘पाद्री शेरमाव व्हन्येक न्हय’ अशी कोकणीत एक म्हण आहे. सरकारने इंधन वाचविण्यासाठी मंत्री व अधिकाऱ्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या आहेत. एवढेच नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या वाहनाचा वापर न करता सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.अशात उत्तर गोव्यातील एका मोठ्या वजनदार पंचायतीचा सचिव ‘रेंज रेव्हर’ने फिरत असल्याची कुजबूज त्या कोस्टल पंचायत क्षेत्रात सुरू आहे. या पंचायत सचिवाने म्हणे सेकंड हँड रेंज रोव्हर गाडी घेतली आहे. आता मोठ्ठा पगार नसताना या पंचायत सचिवाच्या ताफ्यात रेंज रोव्हरसह चार चाकी गाड्या व बुलेट कशी आली? कोण उत्तर देईल का?

विधानसभेत ‘फॅमिली पॅक’?

गोव्याच्या राजकारणात पती-पत्नी जोड्यांचा ट्रेंड वाढताे आहे. विद्यमान विधानसभेत आधीच तीन जोड्या असताना, आगामी निवडणुकीत ही संख्या आणखी वाढण्याची चर्चा रंगली आहे. माजी मंत्री मिकी पाशेको यांनी आज स्वतः आणि पत्नी व्‍हियोला निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने ‘एक जोडी फिक्स’ झाल्याचे मानले जात आहे. फक्त पती-पत्नीच नव्हे, तर पिता-पुत्र, सासरे-सून अशी कौटुंबिक समीकरणेही विधानसभेत दिसू शकतात, अशी कुजबूज आहे. त्यामुळे भविष्यात गोवा विधानसभा ‘कौटुंबिक केंद्र’ बनले तर आश्चर्य वाटू नये, अशी मिश्किल चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ‘गोवा के लोग अजीब है’ असे माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी म्हटल्याचे स्‍मरणही यानिमित्ताने काहींना झाले. आता बघायचे एवढेच, गोमंतकीय मतदार या ‘फॅमिली पॉलिटिक्स’ला किती पसंती देतात ते!

Khari Kujbuj Political Satire
Tivim Political News: हळर्णकर-कांदोळकर आमनेसामने ; थिवीत आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले

फातोर्ड्यात नवीन ‘सायब’

उशिरा का होईना, अखेर फातोर्डा पोलिस ठाण्याला आता पूर्ण वेळ ‘पीआय’ लाभला. राहुल नाईक यांची या पोलिस ठाण्यात बदली झाली.बदलीचा आदेश मिळताच त्यांनी रात्रीच नव्या पोस्टिंगचा ताबा घेतला. यापूर्वी या पोलिस ठाण्यात दितेंद्र नाईक हे पोलिस निरीक्षक होते. त्यांच्याकडे सांगे पोलिस ठाण्याचीही जबाबदारी होती. दोन्ही पोलिस ठाणे सांभाळताना त्यांना बरीच कसरत करावी लागायची. आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या या मतदारसंघातील पोलिस ठाण्यात पूर्णवेळ निरीक्षक मिळावा अशी सातत्याने मागणी करून त्याचा पाठपुरावा केला होता. राहुल नाईक यांनी फातोर्डा पोलिस ठाण्यात एंट्री घेतल्यानंतर पोलिसांनीही नव्या सायबाचे वेलकम चांगल्या प्रकारे केले. आता बघू, नवीन साहेब काय ‘उजेड’ पाडतात ते!

आता आम्‍हाला ‘वाली’ कोण?

‘आरजी’चे संस्थापक अध्यक्ष मनोज परब यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे फोंडा तालुक्यातील या पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. तसे पाहिले तर फोंड्यातील चारही मतदारसंघांमध्‍ये ‘आरजी’चे मतदार बऱ्यापैकी आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते स्पष्ट झाले होते. त्यावेळी आरजीवाल्यांनी भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणला होता. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरजीने बऱ्यापैकी जनमत गोळा केले होते. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच आता हे राजीनामानाट्य घडत असल्याने ‘आरजी’चे कार्यकर्ते एकमेकांच्‍या तोंडाकडे बघत आहेत. ‘आता आपल्‍याला वाली कोण?’ असा सवाल ते करत आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Political Election: गोव्यात भाजप 30 पेक्षा अधिक जागा जिंकेल! केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक योजनांचा घेतला आढावा

युरी आलेमाव ‘अडखळले’

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसजन दरवर्षी बांबोळी येथील राजीव गांधी यांच्‍या पुतळ्यासमोर जमतात. गुरुवारी (२१ मे) काँग्रेसजन तेथे आदरांजली वाहण्यासाठी गेले असता विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना प्रशासकीय दुर्लक्षाचा फटका बसला. पुतळ्याला पुष्‍पहार अर्पण करण्यासाठी तेथे शिडी आहे. त्याच्या पायऱ्यांचे प्लायवूड खराब झाले आहे. आलेमाव यांनी पाय ठेवला आणि एका पायरीचे प्लायवूड तुटले. त्‍यामुळे युरी यांना दुखापत झाली. मात्र यावरून गोमेकॉच्या प्रशासनाला जबाबदार धरणे काँग्रेस नेत्यांनी टाळले नाही. युरींना मात्र डॉक्‍टरकडे जावे लागले.

पाणी जाते वाया, नाही दयामाया!

‘पाणी अडवा पाणी जिरवा’, ‘जलयात्रा’ अशा काही चळवळी गोव्यात काही ठिकाणी अजून सुरू आहेत. गोव्यात यंदाही मुबलक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज आहे. ही एक शुभवार्ता आहे. नेमेचि येतो पावसाळा. खूप खूप बरसतो; परंतु तो अडवण्याचे भांडे आमच्याकडे नाही; कारण आमचे विचारांचे, चिंतनाचे भांडे लहान आहे. इच्छा लहान आहे. पाणी वाहून सागराला जाते. निसर्गाचे इतके विपुल पाणी जर साठवले तर शेती क्षेत्रात बहार येईल. फुले, फळे, कडधान्ये, तांदूळ यासाठी आम्ही गोवेकर आत्मनिर्भर नाही; पण पाणी एकवटले तर हरित क्रांती शक्य होईल. त्या दिशेने पावले टाकली तर अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. शासनाद्वारे अनेक गोष्टी शक्य आहेत. युवाशक्तीही याकडे वळविल्यास पाण्याच्या संवर्धनाबाबत जागृती होईल, असे जाणकारांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com