खरी कुजबूज: कुंकळ्ळीत भाजपचा शिलेदार कोण?

Khari Kujbuj Political Satire: प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. मात्र राजकारणात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांबरोबरच नशिबाची साथ ही लागते असे म्हणतात तेही तेवढेच खरे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

शिरोड्यात महादेवाने केली गर्जना

" तिकीट मिळो वा न मिळो, निवडणूक रिंगणात उतरणारच" असा इशारा देत माजी मंत्री महादेव नाईक यांनी शिरोडा मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा तापवायला सुरुवात केली आहे. लोक अजूनही माझ्या कामांची आठवण काढतात, असे सांगत त्यांनी निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचा संदेश दिला आहे. साहजिकच शिरोड्यात इच्छुकांची संख्या वाढली असली तरी 'मी अजून मैदानात आहे' हे दाखवण्याचा महादेव यांचा प्रयत्न स्पष्ट दिसू लागला आहे. विशेष म्हणजे, कोणत्या पक्षाकडून लढणार हे काही दिवसांत स्पष्ट होईल, या त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्ष बदलाची शक्यता, नाराज गटांची हालचाल आणि निवडणुकीआधीचे राजकीय गणित यामुळे शिरोड्यातील समीकरणे पुन्हा ढवळून निघण्याची चिन्हे आहेत....

कुंकळ्ळीत भाजपचा शिलेदार कोण?

प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. मात्र राजकारणात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांबरोबरच नशिबाची साथ ही लागते असे म्हणतात तेही तेवढेच खरे. भाजपने गोव्यात दोन आमदारांपासून आपला राजकीय प्रवास सुरू केला आणि हळूहळू सत्ताही मिळविली. मात्र सासष्टी तालुक्यात भाजपला हवे तसे यश प्राप्त झाले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत सासष्टीतून केवळ नावेली मतदारसंघात भाजपचे 'कमळ' फुलले. कुंकळ्ळीत आपला आमदार निवडून आणण्यासाठी भाजपने अनेक प्रयोग केले. त्यांचा फक्त राजन नाईक हा एकमेव आमदार या मतदारसंघात एकदाच यश संपादन करू शकला. आता भाजप तेथे नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. केपे मतदारसंघ एसटींसाठी आरक्षित झाला तर बाबू कवळेकर यांना कुंकळ्ळीत उमेदवारी मिळू शकते किंवा सांगे एसटी आरक्षित झाला तर सुभाष फळदेसाईसुद्धा येऊ शकतात. कुंकळ्ळीत महिला उमेदवार उतरविण्याचे प्रयत्न चालले आहेत. हे सर्व शक्य नसेल तर पुन्हा एकदा क्लाफास डायस यांच्या पदरात उमेदवारी पडेल, अशी कुजबूज सुरू झाली आहे.....

Khari Kujbuj Political Satire
Ravi Naik Political Career: नगरसेवक ते मुख्यमंत्री...गोव्याच्या राजकारणातील 'दीपस्तंभ' रवि नाईक, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

फोंड्यात अनेकांचा भ्रमनिरास

पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कदाचित निवडणूक पुन्हा होईल असे अनेकांना वाटत होते. मात्र आव्हान याचिकाच न्यायालयाने निकाली काढल्यामुळे पोटनिवडणुकीची आस धरलेल्यांची उरली सुरली आशाही मावळली. त्यातच आणखी एक वाईट घटना घडली ती म्हणजे डॉ. केतन भाटकर यांचा आकस्मिक मृत्यू. आता आणखी आठ महिने फोंड्याला लोकप्रतिनिधी नाहीच अशी खूणगाठ फोंडावासीयांनी मनात घट्ट बांधली आहे....

मानकुरादचे बंपर पीक

कधी नव्हे ते यंदा मानकुराद आंब्यांचे बंपर पीक यंदा आले आहे. विपुल उदंड खूपच स्वस्त झाल्याने आंबे सामान्यांच्या आवाक्यात आले आहे. मानकुराद आंबे गोव्यात आणण्याचे

पोर्तुगिजांनी केले असे म्हटले जाते. ते असो. परंतु हापूसपेक्षा हा आंबा रूचकर, स्वादिष्ट असा गोंयकारांचा दावा. पावसाचे पाणी वाहून वाया जाते. ते पाणी साठवण्याचे काम सरकाराकडून होत नाही. त्याचप्रमाणे यंदा मानकुराद आंबा जास्त पिकून कुजू शकतो अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यावर उपाय म्हणजे शेती खात्याद्वारे साठवण करण्याच्या शीतकेंद्रांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. देशात कित्येक आंबा संशोधन केद्रे आहेत. त्यांचाही आधार घ्यायला हवा. करण्यासारखं खूप आहे, फक्त इच्छा हवी.....

Khari Kujbuj Political Satire
Goa Political Satire: खरी कुजबूज! आता ‘आयआयटी’ कुठे?

चर्चिलचा बर्थ-डे वालंकिणी

चर्चिल आलेमाव यांनी शनिवारी वयाची ७७ वर्ष पूर्ण केली. आपला हा बर्थडे त्यांनी कुटुंबासह तामिळनाडू राज्यातील वालंकिणी येथे साजरा केला. तेथील चर्चमध्ये त्यांनी मीसही केले. तर, वार्का येथील आपल्या घरी हितचिंतकासाठी चहा-नाश्ताचेही आयोजन केले होते. चर्चिलबाबची वालंकिणी सायबीण मायवर अपार श्रद्धा. त्यामुळेच ते यावेळी बर्थडेसाठी तेथे गेले असावेत. येथे मात्र त्यांच्या चाहत्यांची घोर निराशा झाली. कारण त्यांचा वाढदिवस म्हणजे एक शाही मेजवानीच. आता पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे आणि आपण ही निवडणूक लढविणारच असे चर्चिलने अलीकडेच सांगताना बाणवली वा कुंकळी हे ऑप्शनही दिले होते. मग त्यांनी या वर्षी आपला बर्थडे गोव्यात का बरे साजरा केला नाही? त्यांचे समर्थक या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत म्हणे.

पदवी हवी, शिक्षकांना ज्ञानसुद्धा हवंच!

राज्यातील माध्यमिक विद्यालयांमध्ये साहाय्यक शिक्षकांच्या सुमारे १०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. शिक्षकांची निवृत्ती आणि बढती यामुळे या जागा भराव्या लागणार आहेत. हायर सेकंडरीची एक शिक्षिका माणसाला एकच किडनी (मूत्रपिंड) आहे असे शिकवत होती. पालकांनी प्राचार्यांना कळवलं. इतिहास शिक्षकांना मुलाखतीला हमखास एक प्रश्न विचारला जातो. गोवा मुक्ती वर्ष? 1961 हे त्यांना माहीत नाही. भूगोल शिक्षकांना गोव्यातील नद्यांची नावे येत नाहीत. गाळणी प्रक्रियेतून जे उमेदवार उरतात, ते शिक्षक पदावर रूजू होतात. माध्यमच इंग्रजी असल्याने इंग्रजी शिकवावं लागतं. परंतु बहुतेकजण जी इंग्रजी बोलतात, ती 'तांबडी' असते. एक शिक्षक, यू अण्डस्टूड्स? म्हणजे तुम्हांला समजलं? या अर्थी परत परत विचारत होता. भूतकाळाचं तो अनेकवचन करायचा! 20 चे 20 टक्के किती हे गणित शिक्षकांना विचारावं. तात्पर्य...पुढच्या वर्षी नियुक्तीवेळी चांगल्या सक्षम शिक्षकांना निवडावं, असे पालक बोलतात....

Khari Kujbuj Political Satire
Digambar Kamat Political Career: सातवेळा मडगावातून विजयी, 2007 ते 2012 काळात मुख्यमंत्रिपदी; दिगंबर कामत यांची चढ-उताराची वाटचाल

बॅकलॉग भरून काढण्यासाठी युरी सक्रिय

आमदाराने स्वतःच्या मतदारसंघाचा विकास साधावा व मतदारांची कामे करावीत अशी प्रत्येक मतदाराची अपेक्षा असते. जो आमदार किंवा राजकारणी मतदारांच्या अपेक्षांची पूर्ती करतो, त्यालाच मतदार साथ देतात. हे गणित आता कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांना समजले असावे. आमदार झाल्यापासून गेल्या चार वर्षांत युरी आपल्या मतदारसंघात नियमित भेटी देत नव्हते. विरोधी पक्ष नेत्याची भूमिका निभावताना त्यांचे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले होते. युरी भेटत नाहीत, विकासकामांना खीळ बसली आहे, अशा तक्रारी मतदारसंघात ऐकायला यायच्या. कदाचित युरीला आपली चूक समजली असावी. आता ते मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. अनेक विकासकामांना सुरुवात केली आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे का असेना, युरी आपला बॅकलॉग भरून काढण्यासाठी व्यस्त झाले आहेत. 'देर आए, दुरुस्त आए' असे आता कुंकळ्ळीचे मतदार म्हणायला लागले आहेत ...

दोन पंचायती, एक सचिव !

राज्यातील पंचायती जशा हव्यात, तशा कार्यक्षम नाहीत. याचे कारण बहुतांश सचिव. पंच, सरपंच कितीही धडपडत असले तरी सचिवांमुळे त्यांची सर्व मेहनत वाया जाते. विशेष म्हणजे दोन-दोन पंचायतींवर एका सचिवाची नियुक्ती करण्यात आली आहे. यातून सरकारजवळ या पदासाठी उमेदवार नाहीत किंवा वरिष्ठांच्या कोणत्याही आदेशाला, निर्णयाला केवळ 'होयबा' करणारे सरकारला पसंत असावे. आता हेच बघा ना नावेली व आके-बायश या दोन पंचायतींना एकच सचिव आहे. त्याने नावेलीतील रातवाडो मेगा प्रकल्पाला जशी मंजुरी दिली, तशीच आके-बायश येथील मेगा प्रकल्पालाही ग्रामसभेत मान्यता दिली. या दोन्ही प्रकल्पांमुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. असे असेल तर पंचायती, ग्रामसभा हव्याच कशाला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे....

Khari Kujbuj Political Satire
Ramesh Tawadkar political career: रमेश तवडकर यांची 'श्रम-धाम फळाला, क्रीडा शिक्षक ते सभापतीपदापर्यंत यशस्वी वाटचाल, वाचा त्यांची कारकीर्द

तोच तो सोळावा जि.पं. सदस्य का?

दक्षिण गोव्याचे जिल्हा पंचायत सदस्य सुनील मी यांचा वाढदिवस अलीकडेच साजरा झाला. दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात केक कापून त्यांना इतर सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. फोटो सर्वत्र व्हायरल झाला. आता तो फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर जी टिप्पणी केलीय, त्यावर काँग्रेस भवनात चर्चा रंगली. या फोटोत भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्यांसोबत काँग्रेसचे गिरदोलीचे जिल्हा पंचायत सदस्य संजय वेळीप हेसुद्धा उपस्थित असल्याचे दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस व 'आप'चे इतर जिल्हा पंचायत सदस्य फोटोत नाहीत. दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचा निवडणुकीत भाजप समर्थक १५ सदस्य असतानाही त्यांना १६ मते मिळाली होती. त्यानंतर तो सोळावा कोण, यावर चर्चा रंगली होती. वाढदिवासाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो कोण ते स्पष्ट झाले, असे आम्ही नाही काँग्रेसवालेच दबक्या आवाजात बोलत आहेत. आता पाहुया, वेळी काय उत्तर देतात ते....

वीरेशचा 'सावध' पवित्रा

गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत वाद सुरू असलेल्या रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजीपी) केंद्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी पणजीतील कार्यालयात झाली. या बैठकीला आमदार वीरेश बोरकर आणि त्यांचे समर्थक सदस्य उपस्थिती लावतील, असे वाटत असतानाच त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यावरून परब समर्थकांनी पुन्हा त्यांच्यावर तोफ डागली. आमदार बोरकर आणि त्यांचे समर्थक पक्ष स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा अध्यक्ष मनोज परब करत असले, तरी बोरकर मात्र तो फेटाळत आहेत.पण,सांत-आंद्रेसह इतर काही भागांतील कार्यकर्त्यांना परब अध्यक्ष म्हणून नको असल्यामुळे वीरेश यांनी सावधपणे पक्ष हातात घेण्याची तयारी सुरू केल्याची कुजबूज पक्षात सुरू आहे.....

Khari Kujbuj Political Satire
OneIndia Political Survey 2024: वनइंडिया सुरु करणार ऐतिहासिक सर्वेक्षण, सरकारांच्या कारभाराबाबत जाणून घेणार देशाचा मूड!

कोकणीतील गूढ कायम

कोकणी समृद्ध म्हणी आहेत. त्यातील एका काव्यमय म्हणीत, 'बावकादेवतेक नाशिल्लो घोव' अशी ओळ आहे. अनेक संस्थांना अध्यक्ष नाही, त्यावरून ही ओळ आठवली. कुंकवाला आधार असायला हवा असे म्हणतात. कोकणी भाषा मंडळाची वार्षिक आमसभा होणार होती. त्यात नवीन समिती, नवा अध्यक्ष वगैरे निवडायचे होते. तशी घोषणा करण्यात आली होती. मात्र ही बैठक झाली की नाही, अध्यक्ष नियुक्त केला की नाही, काहीच समजत नाही. कुणी जाऊन एका 'पितामह' स्तराच्या धुरंधर म्हालगड्याला ही गोष्ट विचारली. त्याने चष्मा पुसला व दीर्घ श्वास घेतला. बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद जसा पटावरील सोंगट्यांकडे अतीव एकाग्रतेने पाहत चालींविषयी योजन करतो, तसा डीप थॉटमध्ये गेला. विचारणारा या गुढत्वाच्या वलयातून अजूनही बाहेर आलेला नाही. त्याला म्हणे मोठा मानसिक धक्का बसलाय, आता बोला!...

मनोजचा वीरेशला पुन्हा चिमटा!

मोपा येथील टॅक्सीवाल्यांच्या एका प्रश्नामुळे काही महिन्यांपूर्वी आमदार विजय सरदेसाई आणि आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब एकत्र आले. त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीआधी आरजीपीने इंडिया आघाडीत सहभागी व्हावे, यासाठी सरदेसाईंनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, अखेरच्या टप्प्यात काँग्रेसवर खापर फोडत परब यांनी जिल्हा पंचायत निवडणुकी वेगळी चूल मांडली. त्यामुळे विजय आणि मनोजमध्ये पुन्हा दुरावा निर्माण झाला. पण, रविवारच्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोजनी, "विजय सरदेसाई विधानसभा अधिवेशनांआधी अभ्यास करतात. त्यामुळे त्यांची सभागृहातील कामगिरी उत्तम होते, असे म्हणत वीरेश बोरकर यांना डिवचले. मुळात विरोधी आमदार असतानाही वीरेश यांच्या सभागृहातील कामगिरीचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडूनही कौतुक होत असताना परब मात्र त्यांच्या कामगिरीवर खूश नसल्याने आरजीपीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यां त्यांच्याबाबतच्या नाराजीत आणखी भर पडली आहे. हा संघर्ष आणखी वाढणार, अशीच चिन्हे दिसू लागली आहेत....

Khari Kujbuj Political Satire
Telangana Political Crisis: BRS पक्षाचे आमदार, नेते गोव्यात तळ ठोकून का बसलेत? केटी रामाराव यांनी घेतली भेट

कलहाचे कारण नेमके काय?

'आरजी'तील अंतर्गत वादाला नेमके कारण काय आहे, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. काही नेटकऱ्यांनी पक्षातील नेत्यांना अनेक सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. एकाने आमदार वीरेश बोरकर यांचा विदेश दौरा कदाचित स्थानिक नेत्यांच्या पचनी पडला नसावा, असे कारण पुढे केले आहे. शिवाय आमदार म्हणून बोरकर यांचे महत्त्व अधिक वाढले आहे, हेही त्यामागील कारण असू शकते. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पक्षाची आमसभा एकदाही झाली नसल्याचे काल पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याने सर्व काही एकतंबू कार्यक्रम चालला काय, असा संशय बळावतो. तर, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने 'आरजी'तील नेत्यांमध्ये चाललेला वाद हा नौटंकी असल्याचे असून, त्यांना कोणी विचारत नाहीत म्हणून प्रसिद्धीसाठी हा स्टंट असावा, अशीही प्रतिक्रिया दिली. खरे काय, खोटे काय देवच जाणे!...

एआय आणि कोकणी

आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारून कोकणी बळकट करण्याची गरज सुलक्षणाताई सावंत यांनी व्यक्त केली. त्या काल मंगळूर येथे एका कोकणी कार्यक्रमात बोलत होत्या. तेथे त्यांनी कोकणी सेवकांचे, लेखकांचे कान व्यवस्थित टोचले बरे झाले. यू-ट्युबवर मुलांसाठी व सर्वांसाठी अनेक व्हिडिओ अपलोड करण्यास वाव आहे. कोकणी उच्चार म्हणजे फोनेटिक्स शिक्षण, कोश, म्हणी, वाक्प्रचार यांचे व्हिडिओ बनवले तर जगभरातील कोकणी लोकांना त्याचा फायदा होईल.'एआय' प्रणालीचा वापर करून खूप उपक्रम राबविता येतात.. तसे बुद्धिमान अभियंते कोकणीकडे आहेत. पण सहाजणांच्या चिमुटभर कंपूला दुसऱ्या कुणाला विश्वासात घ्यायलाच भीती वाटते. आधुनिक तंत्रज्ञान झपाट्याने विस्तारत आहे. खुर्च्या कवटाळण्यापेक्षा एआयला मिठी मारली तर कोकणी रॉकेटसारखी उंच जाईल. फाटी उरतले आं नाजाल्यार' असा अंत:प्रवाह सुलक्षणाताईंच्या आवाहनात होता. ....

Khari Kujbuj Political Satire
Goa Political News: भाजपच्या उमेदवारीवर दिल्लीमध्ये खल सुरू! मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

डिक्सनचा व्हेंझींवर पलटवार

बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी साळ नदीच्या स्वच्छतेसाठी खारेबांद येथे या नदीच्या पात्रात कारंजे सुरू केले. सभोवतालच्या परिसराचे सौंदर्यीकरण केले. मात्र केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांना हे मानवलेले नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, साळ नदीच्या स्वच्छतेसाठी केवळ आमदार नव्हे तर आम्हीसुद्धा प्रयत्नरत आहोत. स्वतः श्रेय घेणे व जाहिरातबाजी करणे आमच्या तत्त्व बसत नाही. साळ नदीच्या स्वच्छतेसाठी अनेकांचा हातभार आवश्यक आहे. सांडपाणी प्रथम बंद व्हायला पाहिजे. कोलवा खाडीचा प्रश्न का सुटत नाही? लोकांना, पंचायतींना, संबधित खात्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. केवळ भपकेबाजी करून चालणार नाही असे वाझ म्हणतात. त्यात तथ्यसुद्धा आहे म्हणा. डिक्सनबाब आता बाणावलीतून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बाळगून आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारावर टीका करणे हे स्वाभाविकच. नाही का? ...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com