
गोवा विधिकार दिनी विरोधी पक्षनेते युरीबाब आलेमाव यांनी केलेल्या भाषणाचा माजी आमदार ॲड. राधाराव ग्रासियस यांच्यावर भरपूर प्रभाव पडला असावा. कारण त्यांनी त्यानंतर समाजमाध्यमांवरून युरीबाबांना उज्ज्वल भवितव्य असल्याचे जाहीरही करून टाकले. राधारावना तशी आलेमावांबद्दल ॲलर्जी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मग अचानक युरीबाबांबद्दल त्यांना एवढा कळवळा का यावा? यावर कॉंग्रेसवाल्यांमध्ये चर्चा रंगली. २०२७ च्या निवडणुकीत राधाराव यांना युरी आलेमाव यांना ‘युगोडेपा’चा उमेदवार म्हणून कुंकळ्ळीतून रिंगणात उतरवायचे तर नाही ना? काहीजणांना अशी शंका आल्याशिवाय राहिली नाही. ∙∙∙
‘दोन तलवारी एका म्यानेत राहू शकत नाहीत’, हा नैसर्गिक मापदंड. एकाच मतदारसंघात एकाच पक्षाचे दोन नेते तयार झाले तर आपल्या भविष्यासाठी दोघांत स्पर्धा ,मत्सर, द्वेष व इर्षा वाढणे स्वाभाविक. कुडचडे मतदारसंघात नीलेश काब्राल यांच्या पुढे रोहन गावस देसाई यांनी आव्हान उभे केल्याचा दावा रोहन समर्थक करतात. मतदारसंघात क्रिकेट स्पर्धा व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात दोघांत स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळते. काब्राल समर्थकांनी रोहन गावसला कार्यक्रमात बोलावलेले व त्याच्याकडून आर्थिक मदत स्वीकारल्याचे काब्राल यांना आवडत नाही. मात्र, काल एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्यासोबत रोहन व काब्राल एकत्र व्यासपीठावर दिसले. काब्राल यांच्या उपस्थितीत रोहन यांचा सत्कारही करण्यात आला. कदाचित काब्राल व रोहन यांना कळले असणार, लढाई २०२७ च्या निवडणुकीत आहे. तोपर्यंत निदान चांगले संबंध ठेवले तर काय बिघडले? ∙∙∙
पणजीत शुक्रवारपासून मत्स्यमहोत्सव सुरू झाला आहे. दोन दिवस तो चालेल. या काळात राज्यभरातून अनेकजण मासे पाहण्यासाठी पणजीत येणार आहेत. पणजीत सध्या कोणते रस्ते बंद असतील आणि कोणत्या रस्त्यावर खुदाई केली जाईल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे इतर ठिकाणांहून पणजीत येणाऱ्यांना पणजी शहरात आल्यावर अचानकपणे रस्ता बंदला सामोरे जावे लागू शकते. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर वाहने शहरात आल्याने पार्किंगची समस्या निर्माण होणार ती वेगळीच. सारे काही पणजीतच करण्याचा सरकारी अट्टहास पणजीवासीयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा आता कानी पडू लागली आहे. ∙∙∙
कुंकळ्ळीचे भाग्य कधी व कसे उजळणार हे सांगता येत नाही. कुंकळ्ळीच्या मतदारांनी काँग्रेस आमदाराला निवडून दिले म्हणून मतदारसंघाचा विकास खुंटणार, असे अनेकांना वाटत होते. आमदार जरी विरोधी असला तरी कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असल्यामुळे कुंकळ्ळीचे भाग्य खुलायला लागले आहे. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात नगर आरोग्य केंद्र व क्रीडा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार युरी आलेमाव यांचे या साठी कौतुक व्हायला लागले आहे आणि झाले पण पाहिजे. मात्र जनतेची एकच अपेक्षा आहे युरी यांच्या वडिलांनी दहा वर्षांपूर्वी आणलेल्या इनडोअर क्रीडा प्रकल्प, हुतात्मा स्मारक, स्वातंत्र्य सैनिक स्मारक, गावागावात उभारलेली सभागृहे व एकही दिवस न पेटलेले पदादिप आणि भव्य सभागृह या प्रकल्पांची दशा झाली आहे, तशी येणाऱ्या प्रकल्पांची होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ∙∙∙
पणजी बेती जलमार्गावरील वाढती रहदारी लक्षांत घेऊन सरकारने म्हणे दोन नव्या मोठ्या आकाराच्या व क्षमतेच्या फेरीबोटी बांधण्याचा म्हणजेच घेण्याचा निर्णय चालविला आहे पण त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ते सदर फेरीबोटी बांधण्यापूर्वी पणजी व बेती येथील धक्क्यांचा विचार करून त्या त्या धक्क्यांवर नांगरता येतील, अशा असाव्यात, असे सुचवू लागले आहेत. कारण सरकारने पूर्वी म्हणजे कॉंग्रेस राजवटीत या मार्गासाठी रो रो फेरीबोटी घेण्याचे पक्के केले होते पण नंतर त्यांना हा मार्ग उचित नसल्याचे स्पष्ट झाल्याने तो बेत रद्द केला होता. त्या नंतरच्या भाजप सरकारने कोणताच विचार न करता काही कोटींची सौर फेरीबोट आणली खरी पण एकही फेरी न टाकता ती पडून आहे. कारण तिला योग्य असे धक्के नाहीत व तसे धक्के बांधणेही शक्य नाही असे आढळून आले. सदर बोट नंतर कोणाला भाडेपट्टीवर देण्याचे ठरले पण ती घ्यायलाही कोणीच तयार नाही म्हणून सरकारने शितापुढे मीठ न खाता, नव्या फेरीबोटींबाबत साकल्याने विचार करावा. घाई घाईत आणलेले एसजीपीडीएचे रस्ता सफाई यंत्र, मडगाव पालिकेची इलेक्ट्रीक सफाई रिक्षा यांबाबत संबंधितांची जी दिवाळखोरी उघडकीस आली. तोच प्रकार नव्या फेरीबोटींबाबत होऊ नये, असे ही मंडळी म्हणतात. ∙∙∙
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण या प्रश्नाची चर्चा कधी नव्हे, ती सुरू झाली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन संघटनेसाठी भरपूर वेळ देऊ शकणारी व्यक्ती या पदावर येईल, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्ष संघटना आणि सरकार या दोन समांतर व्यवस्था आहेत. त्यामुळे दोहोंत समन्वय असण्याची फार गरज असते. अशावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मत प्रदेशाध्यक्षपदी कोण असावा यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा ऐकू येतेय. सरचिटणीसपदी असलेले माजी आमदार दामू नाईक आणि ॲड. नरेंद्र सावईकर यांच्यापैकी कोणाला झुकते माप मिळेल याची केवळ आता औपचारिकता शिल्लक राहिल्याचे सांगण्यात येते. अर्थात या साऱ्याला दिल्लीश्वरांचा आशीर्वाद हवा. तेथून कोणाच्या सांगण्यावरून कोणाची निवड होईल तेही सांगता येत नाही, अशी दबकी चर्चा काहीजण करत आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांचा शब्द अंतिम असेल, असे अनेकजण सांगत आहेत. ∙∙∙
किनारी भागात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. पण समस्या दुसरीच आहे. रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना काय, काय पहावं लागेल, अशी चर्चा किनारी भागातील शॅक तसेच रेस्टॉरंट व्यावसायिकांत रंगली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.