

खोलकरही नांगी टाकणार?
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजी) राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दावा केल्यानंतर आमदार वीरेश बोरकर यांनी हळूहळू पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाईस सुरवात केली आहे. मनोज परब यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार बोरकर आणि माजी सरचिटणीस विश्वेश नाईक व माजी खजिनदार अजय खोलकर यांच्यात अंतर्गत वाद धुमसत होता. त्यामुळेच बोरकर यांनी तत्काळ या दोघांचे निलंबन केले आणि लगेचच शिस्तपालन समितीची स्थापना करीत विश्वेश नाईक यांना नोटीस जारी करून आरोपांच्या चौकशीसाठी बोलावले; पण चौकशीला जाण्याआधीच नाईक यांनी राजीनामा दिला. आता शिस्तपालन समितीने खोलकर यांना नोटीस बजावत ७ ऑगस्टला बोलावले आहे. परब यांच्या राजीनाम्यानंतर खोलकर यांनी बोरकर यांना थेट शिंगावर घेत पक्षाचा ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले होते. त्यावेळी आक्रमक राहिलेले खोलकर आता चौकशीला जाणार? की विश्वेश यांच्याप्रमाणेच नांगी टाकणार? याकडे अनेकांचे लक्ष आहे.
तारीख पे तारीख!
हिंदी चित्रपटात, जर तो न्यायालयीन खटल्यासंदर्भात असेल तर ‘तारीख पे तारीख’ हे एक वाक्य हिरोच्या तोंडी असते. प्रत्यक्ष न्यायालयातही एखादा खटला वर्षानुवर्षे चालत असतो. तसेच काहीसे चित्र आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण मागणीसाठीच्या निर्णयाबद्दल दिसत आहे. त्यांची मागणी २००३पासून सुरू आहे. संसदेतही राजकीय आरक्षण मंजूर होऊन त्यावर राष्ट्रपतींची सहीही झाली आहे. केवळ अधिसूचना बाकी आहे. तरीही नेतेमंडळी आज होणार, उद्या होणार, केंद्रीय गृहमंत्र्यांनी सहानुभूती दाखविली आहे, असे सांगून समाजाला झुलवत ठेवत आहेत. मात्र, अधिसूचना न काढण्यामागे नेमके कारण काय, हे मात्र जाहीर केले जात नाही. आता विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. तरीही ‘तारीख पे तारीख’ सांगण्यात येत आहे. पुढील निवडणुकीत निश्चित आदिवासींना राजकीय आरक्षण मिळेल, असे कोणी जर सांगितले तर त्यात कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
विजय रंगले फुटबॉलमध्ये!
सध्या काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात युती हा विषय फुटबॉल झालेला असताना काल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे मात्र खऱ्या खुऱ्या फुटबॉल सामन्यात रंगलेले दिसले. राय स्पोर्टिंग क्लबने आपल्या वार्षिक कणसांच्या फेस्तानिमित्त आयोजित केलेल्या फुटबॉल सामन्याच्या अंतिम फेरीला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर खास निमंत्रित म्हणून माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन हे उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय सरदेसाई यांनी फुटबॉलला कधी ज्याने पायही लावला नाही असले सध्याच्या या भाजप सरकारात क्रीडामंत्री आहेत, अशी टीका करताना गोयकारपण राखणाऱ्यांनाच येत्या निवडणुकीत जिंकून आणा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी काँग्रेसचाही फुटबॉल करा, असा संदेशही त्यांनी दिलाच.
गोमेकॉजवळ दूषित खाद्य
रुग्णालयाजवळचे खाद्यपदार्थ म्हणजे सुरक्षिततेची हमी असावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा; पण प्रत्यक्षात गोमेकॉजवळ स्वच्छतेचा बोजवारा आणि नोंदणीच नसलेली आस्थापने चालत असल्याचे पुन्हा उघड झाले. आधी तीन, आता आणखी दोन दुकाने बंद केल्यानंतरच अन्न व औषध प्रशासनाला जाग आली, हेच खरे दुर्दैव. प्रश्न एवढाच की, कारवाईची काठी फिरल्यावरच नियम आठवतात का? रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर केवळ दुकानबंदी नव्हे, तर अशी वेळच पुन्हा येऊ नये यासाठी सातत्याने धडक तपासण्या आणि कठोर शिक्षा होणे तितकेच गरजेचे आहे.
युरी आउट ऑफ रिच!
सध्या गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस पक्षातील संबंधात बाधा येण्याचे जे वादळ उठले आहे, त्याला निमित्त ठरले आहेत ते विरोधी पक्षनेते युरी आलेमाव. मुद्दाम म्हणा किंवा अनावधानाने युरी यांनी विरोधी पक्ष आमदारांच्या बैठकीचे आमंत्रण विजय सरदेसाई यांना पाठविले नाही आणि संतापलेल्या विजयनी युतीच्या बोलणीलाच ब्रेक दिला. त्यामुळे आता काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्यात युती होणार की नाही, हा प्रश्न उभा राहिला आहे. एवढे सगळे राजकीय रामायण होऊनही युरी आलेमाव यांनी त्यावर अजून कोणताही खुलासा केलेला नाही. काल बुधवारी त्यांचा फोनही म्हणे आउट ऑफ रिच होता. आता ही गोष्ट खरी की खोटी, हे आम्हास ठाऊक नाही; पण गोवा फॉरवर्डचे समर्थक युरी आउट ऑफ रिच का? असा सवाल समाजमाध्यमांवर करू लागले आहेत, एवढे नक्की.
...म्हणून युरींना विजयची भीती
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्यात गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून जुंपली आहे. याआधीही युरींनी विजयचा उल्लेख ‘ज्युडास’ असा केला होता. पण, युतीचा विचार करून गोवा फॉरवर्डचे नेते शांत बसले होते. परंतु, आता मात्र युरींकडून विजय यांच्यावर पुन्हा आरोप झाल्याने फॉरवर्डच्या राजकीय व्यवहार समितीने काँग्रेससोबतच्या युतीची चर्चा तूर्तास स्थगित ठेवत पक्षसंघटना बळकट करण्यावर भर दिला. युतीत असूनही युरी गेल्या अनेक वर्षांपासून विजय यांच्यावर आरोपबाजी करीत असल्याचे मुख्य कारण, ‘भविष्यात विजयनी गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलीन केला आणि राज्यात काँग्रेसचे सरकार आले, तर मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार तेच असतील’ याची भीती तर त्यांना नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दळवी-वेरेकरांची ‘जुगलबंदी’
काँग्रेसचे कुशावती जिल्हाप्रमुख राजेश वेरेकर यांनी फोंड्याचे नगरसेवक तथा भाजप नेते विश्वनाथ दळवी यांना भाजपचा राजीनामा देऊन मगच फोंड्याच्या पाणीटंचाईवर आवाज उठवा, असे आव्हान केल्यानंतर दळवी हेही आता पुढे सरसावले आहेत. आपला राजीनामा मागण्यापेक्षा वेरेकरांनी लोकांकरता काम करावे, असे प्रतिआव्हान दळवी यांनी वेरेकरांना केले आहे. त्याचबरोबर मागे दिवंगत डॉ. केतन भाटीकर यांनी जे वेरेकरांना ‘कुंभकर्ण’ म्हटले होते, त्याचीही आठवण दळवी यांनी करून दिली आहे; पण वेरेकरांना ‘कुंभकर्ण’ म्हणणारे भाटीकर रद्द झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार झाल्यावर वेरेकरांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले होते. म्हणजे राजकारणात शब्दांचा अन्वयार्थ प्रसंगानुरूप बदलत असतो, हेच शेवटी खरे. तरीही सध्या दळवी व वेरेकरांची ही ‘जुगलबंदी’ फोंड्यात लोकांचे मनोरंजन करत आहे, एवढे निश्चित.
तुम्ही पिताय बनावट दारू!
‘की थोडी थोडी पिया करो’ म्हणत पोटभर दारू ढोसणारे आपल्या गोव्यात अनेक सापडणार. गोव्यात दारू पिणे हे पाप किंवा गुन्हा असे मानाले जात नाही. दारू स्वस्त असल्यामुळे पिणारेही अनेक आहेत. शिवाय गोव्याच्या सोशल जीवनात दारूला मोठे स्थान आहे. गोमंतकीय तशी ब्रँडेड दारू पीत असावेत. गोव्यात विषारी दारू असे प्रकार कधी ऐकलेले नाहीत. मात्र, जे मदिरेचे सेवन करतात त्यांना दारू कंपन्या खोटी दारू पाजतात, हे सिद्ध झाले आहे. व्हिस्की व रमच्या नावाने गोव्यातच नव्हे भारतातल्या मदिरालयात बनावट मदिरा विकली जात असून व्हिस्कीच्या नावाने स्पिरीट पाजले जात असल्याचा खुलासा झालेला आहे. आता थोडी थोडी पिणाऱ्यांनी व बादलीभर पिणाऱ्यांनी सावधान राहायला नको का?
मत्स्यपुराण
ऑयस्टरमध्ये (कालवा)मध्ये कॅडमियम आढळलेय, असे संशोधन एका संस्थेने केल्याच्या बातम्या मागील दोन दिवसांपासून प्रकाशझोतात येत आहेत; परंतु असल्या प्रकारांना आता गोमंतकीय मत्स्यप्रेमींनी मीठ घालायचे नाही, असे ठरविले आहे. कारण म्हणजे काही वर्षांपासून माशांमधले ‘फॉर्मेलिन’ पचवून, त्याला गपगुमान पोटाशी धरून आम्ही ताठ मानेने जिवंत उभे आहोत! ज्यांच्या शरीराने आधीच फॉर्मेलिनची ‘केमिकल ट्रायल’ यशस्वीपणे पार पाडली आहे, माशांमधील अतिरिक्त धातू पचवून वरून सोलकडीची धार प्यायली आहेत त्यांना हे कॅडमियम काय घाबरवणार? अशी चर्चा रंगू लागली आहे.
नशायुक्त गोवा?
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे गोवा ‘नशायुक्त गोवा’ बनला असल्याची टीका काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी केली आहे. राजकारण बाजूला ठेवून आपण जर विश्लेषण केले तर गोव्याची वाटचाल ‘नशायुक्त गोव्या’कडे चालल्याचे सिद्ध होते. भारत सरकारने नशामुक्तीची शपथ घेण्याची सक्ती केली आहे, हे बरोबर आहे. मात्र, गालात गुटखा व ओठावर सिगारेट ठेवून नशामुक्तीची शपथ घेऊन काय फायदा? गोव्यात सरकारच्या कदंब महामंडळाच्या बसवाहतुकीचा वापर गुटख्याचा प्रचार करण्यासाठी होतो. राष्ट्रीय महामार्गावर गुटख्याची मोठमोठी होर्डिंग्ज पाहायला मिळतात. एवढेच काय आपले वाहतूक पोलिस वाहतूक सांभाळण्यासाठी ज्या बॅरिकेड्सचा वापर करतात त्याच्यावरही गुटख्याची जाहिरात होते. शाळा परिसर तंबाखू वर्ज्य झोन म्हणून जाहीर केले आहेत खरे; मात्र शाळेच्या बाजूलाच गुटखा, सिगारेट एवढेच काय अमलीपदार्थांचीही विक्री होते. शिवाय गोव्यात मदिरेची स्थानके पावलोपावली आहेतच. अशा स्थितीत गोवा नशामुक्त होणे शक्य आहे का?
खड्डे आणि फेरारी
गोव्याच्या रस्त्यांवर आता तब्बल १२ कोटींची फेरारी पुरोसांग्यू धावणार! पण, हा विरोधाभासही तितकाच वेगाने धावत आहे. एका बाजूला कोट्यवधींच्या सुपरकार्सची संख्या वाढतेय, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिक अजूनही खड्डे, वाहतूक कोंडी, अपुऱ्या सार्वजनिक सुविधा आणि रखडलेल्या विकासकामांत अडकले आहेत. गोव्याच्या रस्त्यांवर गाड्यांचा दर्जा जागतिक झाला असला, तरी रस्त्यांचा दर्जा अजूनही स्थानिक तक्रारींच्याच खड्ड्यात अडकलेला दिसतो, त्यामुळे फेरारीचा वेग कितीही असला, शेवटी तिलाही गोव्याच्या वास्तवापुढे ब्रेकच मारावा लागणार!
मौलिक नाटककार
उर्मटपणा, उद्धटपणा, लाचखोरी, संहिताचोरी यापासून फार-फार दूर असलेले कलाकार, लेखक आहेत. नागेशीचे प्रशांत सतरकर हे असे निर्मळ सद्गृहस्थ. छक्के-पंजे, बनेलपणा यापासून अलिप्त. ‘रंग रंगी सतरंगी’ हे त्यांच्या लेखणीतले एक लाजबाब नाटक. प्रशांत यांनी स्पर्धात्मक व व्यावसायिक कोकणी रंगभूमीवर आपली पावले चिन्हांकित केली. प्रशांतपासून युवा नाटककारांनी शिकण्यासारखे खूप आहे. त्यांच्याकडे असलेली विनम्रता, मितभाषी स्वभाव हे गुण अगोदर आत्मसात करावेत. मंचावर गेल्यावर अवसर आल्यासारखी चपळता या कलाकाराठायी आहे. प्रशांत यांच्या संहितेतील भाषाशैली, संवाद यात सामान्य मनुष्याचे प्रतिबिंब दिसते. इथेतिथे हात मारून जोडणी करून ‘कोलाज’ (कपयाळें) सदृश्य संहिता बनवून चोरलेखक बनतात, त्यांनी प्रशांत यांच्या संहिता अभ्यासाव्यात. नागेशी-बांदिवडेच्या मातीतील सुगंध त्यातून दरवऴतो. पात्रे स्थानिक, कोकणी इडीयम अस्सल. अहंकाराची चरबी छाटून शिका हो, प्रशांतकडून मनुष्यत्व व नाटक.
‘कला’ विषयाचे तीनतेरा!
‘वेताक चुकल्यार वावाक चुकता आणि वावाक चुकल्यार गावाक चुकता’, अशी कोकणीत एक म्हण आहे. आपल्या शिक्षणाचे असेच झाले आहे. सरकारने राज्यात पहिली ते दहावीपर्यंत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली आहे. ‘एनईपी’प्रमाणे कला, व्यावसाय, ‘आयडीए’ व शारीरिक शिक्षण हे विषय सक्तीचे केले आहेत. हे विषय इतर विषयांप्रमाणे महत्त्वाचे आहेत. कला विषय शिकविण्यासाठी कला व संस्कृती खात्याने शिक्षक नेमले आहेत, तर व्यावसायिक विषय शिकविण्यासाठी समग्र शिक्षा अभियानाने शिक्षक नेमले आहेत. शिक्षण खाते व कला व संस्कृती खात्यात समन्वय नसल्यामुळे कला शिक्षक कोणत्या शाळेत पाठवायचे याचा पाठपुरावा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. कला व संस्कृती खात्यातर्फे नाटक व संगीत शिक्षक नेमलेले आहेत. संबंधित शाळांना न कळविता कला व संस्कृती खाते आपल्या मर्जीनुसार शिक्षकांची बदली करीत असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. अचानक शिक्षकाची बदली केली तर त्या जागेवर दुसरा शिक्षक पाठविला जात नाही. परिणामी शाळांना कला शिक्षक मिळत नाहीत आणि नववी व दहावीत बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गोची होते. शिक्षणमंत्री यावर लक्ष देणार का? हा गोंधळ थांबणार का? असा प्रश्न शाळाचालक विचारीत आहेत.
‘त्यांना’ तातडीने रिलिव्ह करा!
अनेक पोलिस बदलीचा आदेश येऊनही पूर्वीच्याच जागेवर चिकटून होते. मात्र, आता या पोलिसांना बदलीच्या जागेवर जावेच लागेल, हे निश्चित आहे. गुरुवारी त्याबाबतचा बिनतारी संदेश पोलिस मुख्यालयातून पोलिस ठाण्यात पाठवून देण्यात आला आहे. त्यात बदली झालेल्यांना त्वरित रिलिव्ह करण्याचा आदेश दिला आहे. आता त्याची तत्काळ अंमलबजावणी होते की नाही, हे पाहावे लागणार आहे; कारण बदली झालेले अनेक पोलिस नव्या पोस्टिंगवर जाण्यास तसे मनापासून इच्छुक नाहीत. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी, आहेत त्या जागेवर मिळणारा हफ्ता हेही एक प्रमुख कारण आहे. आपल्या राजकीय गॉडफादरकडे जाऊन काही करा, मात्र आम्हाला रिलिव्ह करू नका, अशी मिनतवारी करण्यासही काहींनी सुरवात केली आहे. बघूया पुढे काय घडते ते?
चित्रपट निर्मिती व महोत्सव
झाडाला काजू लागले तरच ना काजू महोत्सव करायचा? आंबे लागले तरच ना आंबा महोत्सव करायचा? रानभाज्या झाल्या तरच ना भाजी महोत्सव करायचा? कोकणीत वर्षाला चित्रपट किती येतात ते दिसते. ते झालेच, महोत्सव केला तर तो प्रभावी वाटेल ना? चार आंब्यांचा महोत्सव होऊ शकतो का? कोकणी चित्रपट आला तर चित्रपटगृहात जाऊन पाहणारे लोक किती असतात? चोवीस सोडा बारा तास सोडा, कोकणी टीव्ही चॅनलच नाही. मराठी चित्रपट महोत्सवाचा दणका असा आहे की, तिथे तिकीट मिळणे मुश्कील. सरकारी स्तरावर कोकणी फिल्म महोत्सव झाला तरीही किती लोक येतात, हे दिसते. आपापसांत भांडण्यापेक्षा व राजकारण करण्यात वाया जाणारी ऊर्जा सृजनशील चित्रपट घडवण्यात वापरली तर भाषेचा उद्धार होईल, असे लोक म्हणतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.