खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी?

Khari Kujbuj Political Satire: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रसंगी कशी टोलेबाजी करू शकतात याचा प्रत्यय परवा फोंडा येथे झालेल्या जनता दरबारात आला.
Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुजDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रसंगी कशी टोलेबाजी करू शकतात याचा प्रत्यय परवा फोंडा येथे झालेल्या जनता दरबारात आला. यावेळी एका पत्रकाराने त्यांना फोंडा येथे सुरू होणाऱ्या ‘मगो’ कार्यालयासंबंधी विचारले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण इथे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फोंडेकरांच्या समस्या सोडवण्याकरता आलो असून राजकारण करण्याकरता आलेलो नाही, असे सरळ सांगितले. आणि काही लोक फक्त राजकारणच करत असतात, अशी वर पुस्तीही जोडली. आता त्यांनी हे कोणाला उद्देशून म्हटले याचीच चर्चा नंतर कला मंदिरात बराच वेळ सुरू होती. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या समर्पक टोलेबाजीचे कौतुकही होत होते. शेवटी ‘समझनेवालों को इशारा काफी है’ हेच खरे. नाही का?

रेडा शोधून द्या, बक्षीस घ्या!

सासष्टीत धीरयोचे प्रेम कधीच लपून राहिलेले नाही. कायद्याने अशा रेड्या-पाड्याच्या झुंजीला बंदी असली तरी या तालुक्यात अनेकांनी आपल्या पदरी रेडे पोसले आहेत, हेही तेवढेच खरे आहे. आपल्या रेड्यावर या मालकांचे जीवापाड प्रेमही असते. त्यामागील कारण हे अर्थकारण आहे, हे सुज्ञास सांगणे न लगे. आता हे सगळे रेडे पुराण येथे सांगायचे कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी वार्का येथून एक रेडा चोरीला गेला आहे. त्याच्या शोधात मालक आहे. त्याने सोशल मीडियाचा आधार घेऊन आपला रेडा शोधून देण्याऱ्याला दहा हजार रुपयांचे बक्षीस देऊ, असे जाहीर केले आहे. पोलिसांच्या हाती हा व्हायरल झालेला व्हिडिओ लागला आहे. पोलिस आता या रेड्याच्या मालकाचा शोध घेत आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: ‘ब्‍लॅकमेलिंग’ खपवून घेणार नाही! आजगावकरांच्या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं; उमेदवारीच्‍या अपेक्षेनं पक्षात न येण्‍याचं केलं आवाहन

काब्रालच्या वाढदिवसाला तोबा गर्दी!

गर्दी नको, दर्दी हवे आहेत, असे मैफलीत म्हटले तरी चालते. मात्र, राजकारण्याची प्रसिद्धी ही गर्दीवरच ठरते. कुडचडे मतदारसंघाचे आमदार नीलेश काब्राल यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक व मतदारांची तोबा गर्दी उसळली होती. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काब्राल जनतेच्या शुभेच्छा स्वीकारत होते. या गर्दीत काब्राल यांनी पूर्णवेळ उभा राहून प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. जनतेनेही शिस्तबद्धतेने काब्राल यांना वाढदिवसाच्या व भावी राजकीय प्रवासाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याबरोबर फोटोसेशन केले. हजारो मतदारांनी काब्राल यांना शुभेच्छा दिल्या. यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. काब्राल यांच्या लोकप्रियतेची झलक प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पाहिलीच असणार आणि ही झलक बी.एल. संतोषही पाहणार हे निश्चित. आता काब्राल यांना पक्षश्रेष्ठींना आपल्या ताकदीचे आणखी पुरावे द्यावे लागणार का?

आधीही आल्या होत्या तक्रारी!

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा विद्यापीठातील कॅन्टीनबाबत अशाप्रकारची ही पहिलीच वेळ नाही. साधारण सहा महिन्यांपूर्वीही कॅन्टीनमधील अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यावेळी ‘एफडीए’ने पाहणी करून संबंधितांना स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार व्यवस्था सुधारली होती. मात्र, पुन्हा एकदा नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्याने आता विभागाने थेट कॅन्टीन बंद करण्याची कडक पावले उचलली आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

पुरस्कारावरून वावटळ!

गोवा फॉरवर्डचे नेते आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या ‘यूके’मधील झालेल्या सन्मानावर भाजपने टीका केली. त्यावर त्यावर काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी पत्रक काढीत नाईक यांना सल्ला दिला आहे. त्याशिवाय गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत यांनीही एक पोस्ट केला आहे, त्यात ज्या संस्थेने सरदेसाई यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, त्या संस्थेने यापूर्वी ‘ग्लोबल डायव्हर्सिटी ॲवार्ड’ हा ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान या अभिनेत्यांना, त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनाही देऊन सन्मानित केले असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. याविषयी काही माहिती गुगलवरही उपलब्ध आहे. त्यामुळेच कामत यांनी पोस्ट करून आमदार सरदेसाई यांनी स्वीकारलेल्या पुरस्काराचे समर्थन केलेले आहे. ‘यूके’तील या पुरस्कारावरून सुरू झालेला हा वाद किती दिवस चघळला जाणार, हे पाहावे लागणार आहे. ∙∙∙

फक्त आम्हालाच का?

गोव्यात बेकायदा व्यवसाय, नियमभंग, परवान्यांचा गैरवापर, पर्यटकांकडून मनमानी दरवसुली आणि रस्त्यांवरील बेफिकीर स्पर्धा या समस्या नव्या नाहीत. अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणे आवश्यकच आहे. मात्र, कायद्याचा बडगा निवडकांवरच उगारला गेला, तर त्यातून न्याय नव्हे तर पक्षपाताचा संदेश जातो. नियम सर्वांसाठी समान असतात आणि त्यांची अंमलबजावणीही तितकीच नि:ष्पक्ष असली पाहिजे. स्वतःचा व्यवसाय सुरक्षित राहावा म्हणून इतरांवरच कारवाईची मागणी करणे ही भूमिका योग्य ठरत नाही. प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता सर्व बेकायदा प्रकारांवर समान निकष लावून कारवाई केली, तरच कायद्यावरील जनतेचा विश्वास कायम राहील.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; अमित पालेकर कोणता झेंडा घेणार?

काब्राल यांना रोहनच्‍या शुभेच्‍छा!

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांचा काल वाढदिवस झाला. त्‍यांना वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा देण्‍यासाठी स्‍वत: मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे अन्‍य नेते उपस्‍थित होते. त्‍यामुळे कुडचडेत काल त्‍याबद्दल दिवसभर चर्चा सुरू होतीच; पण त्‍याहीपेक्षा आणखी एक चर्चेचा विषय जो सर्वांच्‍या मुखी होता ताे म्‍हणजे, भाजपमधील त्‍यांचे पक्षांतर्गत असलेले प्रतिस्‍पर्धी रोहन गावस देसाई यांनी नीलेश काब्राल यांना शुभेच्‍छा देण्‍यासाठी साेशल मीडियावर टाकलेला पोस्‍ट. रोहन गावस देसाई यांनी आपल्‍या शुभेच्‍छा संदेशात काब्राल यांना दीर्घायुष्‍य प्राप्‍त होवो, असे मागितले आहे. यापूर्वी पणजी येथे झालेल्‍या भाजप बैठकीतून बाहेर आल्‍यानंतर रोहननी कुडचडेची भाजप उमेदवारी काब्राल यांना मिळाल्‍यास आपण त्‍यांच्‍यासाठी काम करू, असे म्‍हटले होते. आज त्‍यांनी हा संदेश टाकला आहे, त्‍यामुळे कुडचडेतील राजकीय वारे बदलले तर नाही ना? असे आता लोक म्‍हणू लागले आहेत.

संयमी कुलसचिव!

गोवा विद्यापीठात ज्यावेळी विद्यार्थी आंदोलन करतात, आपल्या मागण्या घेऊन जाब विचारतात, त्यावेळी सहजासहजी कोणताच अधिकारी समोर येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत नाही. शक्यतो काही मोजक्याच विद्यार्थी प्रतिनिधींशी संवाद साधला जातो; परंतु आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कुलसचिव प्रा. सुंदर धुरी यांच्यावर त्यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसत प्रश्‍नांचा भडीमार केला. या संतप्त विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना संयमाने हाताळत ज्या पद्धतीने प्रश्‍न सोडविला त्याबाबत त्यांची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. एखादा संयमी आणि विद्यार्थी, कर्मचाऱ्यांमध्ये मिळून मिसळून काम करणारा कुलसचिव आल्यास काय करू शकतो, याचे उदाहरण त्यांच्या कृतीतून दिसून आले.

Khari Kujbuj Political Satire
Goa politics: काँग्रेसचा 'पिग्मॅलिअन' कोण?

ओळखपत्राचा मासा!

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, आता मासे विकायचे असतील तर ओळखपत्र आवश्यक. बस्स... एवढे ऐकताच माशांपेक्षा जास्त खळबळ माशांच्या बाजारात उडाली! पणजी, म्हापसा आणि इतर शहरांत अनेक वर्षांपासून मासे विकणारे अनेक विक्रेते गोमंतकीय नाहीत, मग त्यांचे काय? त्यांनाही ओळखपत्र मिळणार की नाही? आणि मिळाले नाही तर मासे विकणार कसे? त्याहून मोठा प्रश्न म्हणजे ग्राहकांनी मग मासे घ्यायचे कुणाकडून? लोक म्हणतात, उद्या बाजारात आधी मासा दाखवायचा की ओळखपत्र, हेच कळेनासे होईल! त्यामुळे हे ओळखपत्र नेमके कुणासाठी, कोणत्या निकषांवर आणि त्याचा नेमका फायदा काय, याचे उत्तर संबंधित खात्याने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले तर बाजारातील गोंधळ कमी होईल. तोपर्यंत मात्र बाजारात माशांपेक्षा चर्चेचाच ‘भाव’ जास्त असल्याचे बोलले जात आहे!

‘अभाविप’ आऊट, ‘भाजयुमो’ इन!

गोवा विद्यापीठात मागील दोन-तीन वर्षे कधीच कुठल्या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाने सहभाग घेतला नव्हता. अभाविप संघटना सर्व आंदोलने, विद्यार्थ्यांचे प्रश्‍न आणि निवडणूक रिंगणात उतरायची; परंतु गेल्यावर्षी सत्तापालट झाल्यानंतर आता ‘अभाविप’ऐवजी ‘भाजयुमो’ने धुरा आपल्या हाती घेतली आहे का? हा प्रश्‍न चर्चिला जात आहे. आता ‘भाजयुमो’ विद्यार्थ्यांचे प्रश्‍न घेऊन जाब विचारते याचाच अर्थ येत्या गोवा विद्यापीठ विद्यार्थी निवडणुकांमध्येदेखील त्यांचेच उमेदवार असणार का? म्हणजे यंदाची विद्यापीठ निवडणूक अधिक रंगतदार ठरणार असल्याचे, हे संकेत म्हणावे लागतील.

Khari Kujbuj Political Satire
Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

दणकेबाज कार्यक्रम

कला अकादमीचा कोकणी नाटक-५० हा कार्यक्रम दिमाखदार झाला. याचे कारण म्हणजे श्रेष्ठ नाटककार पुंडलिक नाईक यांना दिलेला जीवनगौरव पुरस्कार. हृद्य सुंदर सोहळा. कार्यक्रमात जीव आणला तो गच्च भरलेल्या रसिक प्रेक्षकांनी, कलाकारांनी, पुंडलिकबाबांच्या चाहत्यांनी. तथापि आरंभीला सुंदर वाद्यसंगीत वाजवून झाल्यावर बक्षिसे देताना वर्सावळीप्रमाणे कर्णकर्कश, भेसूर पाश्चात्य संगीत ‘ढ्यां ढ्यां ढ्यां’ वाजवण्याचे प्रयोजन गूढ होते. निवेदन सफाईदार होते; परंतु पंचमवेद असा उच्चार असताना चमचा शब्दातील ‘च’ उच्चारला गेला तो खटकला. कोकणीत ‘नवीन’ हा शब्द बोलतानाही कधीच वापरत नाही. नवो, नवी, नवें असे म्हणतात. प्रा. च्यारीसाहेबांनी जे व्याख्यान लावले ते लांब झाले. पुंडलिकबाबांच्या अतीव प्रेमाने दूरदूरहून आलेल्या लोकांना सोसावेच लागले. पुंडलिकबाबांची प्रेरणा घेऊन जमलेल्या युवा लेखकांनी मौलिक (कॉपी नव्हे) नाटके लिहिली तर कोकणी गुटगुटीत होईल.

आढळले हो गांजाचे रोप!

म्हापसा येथील जुन्या अर्बन हेल्थ सेंटरजवळ गांजाचे संशयास्पद रोप आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर काही अंतराने पणजीत मागील वर्षी अनेक ठिकाणी गांजाची रोपे आढळली गेली होती. शहरात रस्त्याच्या बाजूला शोभेची रोपे लावली, त्याठिकाणी अशी गांजाची रोपे आढळली होती. पोलिसांनी यावरून प्राथमिक अंदाज काढला होता तो असा : कांपाल परिसरात गांजा विक्रेत्यांवर कारवाई झाली होती आणि कांपाल परिसरातील माती झाडे लावण्याच्या ठिकाणी वापरण्यात आली होती, त्यामुळे त्या गांजा विक्रेत्यांनी या परिसरातील मातीत गांजा टाकला गेला असावा, त्यामुळे तो पुढे शोभेची रोपे लावण्यासाठी वापरलेल्या मातीत आला असावा. आता म्हापसा शहरात गांजाचे रोप आढळले असल्याचे वृत्त बनले आणि ज्या परिसरात ते आढळले, यावरून पोलिसांचा प्राथमिक अंदाज पणजीप्रमाणेच असावा, यात सध्यातरी काय शंका नसावी.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: निवडणुकीपूर्वीच प्रतिमा विरुद्ध वालंका सामना? नावेलीत उमेदवारीवरून चुरस; सिप्रू कार्दोझ यांच्या नावाचीही चर्चा

कुंकळ्ळीत उमेदवार वाद?

राजकारण्यांना जुने वाद उकरून काढण्याची सवय असते. कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार म्हणून मतदारसंघाचे मतदार नसलेल्या मानू फर्नांडिस यांनी दोन टर्म प्रतिनिधित्व केले. बाहेरील आमदार नको, या मुद्यावर निवडणूक जिंकून मतदारसंघातील बाहेरील ज्योकीम आलेमाव यांनी कुंकळ्ळी मतदारसंघाचे दोन टर्म प्रतिनिधित्व केले. कुंकळ्ळीचे मतदार असलेल्या दत्ताराम देसाई व दिलखुश देसाई हे इतर मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघातील मतदार शांताराम नाईक उत्तर गोव्याचे खासदार म्हणून निवडून आले. एवढेच काय एल्विस गोम्स यांनी पणजी मतदारसंघातून निवडणूक लढविली. गेली विधानसभेची निवडणूक मतदारसंघाबाहेरील आमदार नको? या मुद्यावर लढली गेली तरी बाहेरील उमेदवार युरी आलेमाव प्रचंड मतांनी निवडून आले. एवढे असले तरी आता पुन्हा बाहेरील उमेदवार नको? हाच मुद्दा पुन्हा डोकेवर काढायला लागला आहे. हा चोथा झालेला वाद एल्विस गोम्स समर्थकांनी पुन्हा उकरून काढला आहे. जो वाद व मुद्दा मतदारांनी नाकारला तो पुन्हा वर काढणे मूर्खपणाचे नाही काय?

बाबूश यांचे आश्वासन!

दोनापावला जेटीवर स्थानिकांनी उभरलेली तात्पुरती दुकाने काढून त्यांना गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे नव्याने तयार गाळे निर्माण करून देण्यात येतील, असे आश्‍वासन महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी शुक्रवारी दिले. मंत्री बाबूश यांनी यापूर्वीही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना याठिकाणी आणून त्या विक्रेत्यांना आश्वस्त केले होते. येथील विक्रेत्यांचा नक्की प्रश्न केव्हा मार्गी लागणार हे माहीत नाही; परंतु यापूर्वी या भागाचे असलेले नगरसेवक नेल्सन काब्राल यांनी वारंवार येथील विक्रेत्यांच्या गाळ्यांचा विषय मांडला होता. मागील काही वर्षे पावसाच्या तोंडावर येथील विक्रेते आपला विषय बाबूश यांच्याकडे मांडत आले आहेत, आताही त्यांना बाबूश यांनी आश्वासन दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या विक्रेत्यांना बाबूश यांच्यावर विश्वास असल्याने ते वारंवार त्यांच्याकडे आपली कैफियत मांडतात; पण आश्वासन पूर्ण होवो अगर न होवो; पण बाबूश आले आणि आपणास भेटले, हीच या विक्रेत्यांसाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

रस्त्यावरील हिशेब!

गोव्यात आता रस्ते केवळ वाहतुकीसाठी राहिलेले नाहीत, तर ते थेट हिशेब चुकते करण्याची रंगभूमी बनत चालल्याचे चित्र आहे. पर्रा-साळगाव रस्त्यावर भरदिवसा झालेल्या हाणामारीत गाडीची काच फोडली गेली, वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा पुन्हा एकदा बळी गेला. कायदा हातात घेऊन रस्त्यावरच न्यायदान करण्याची ही वाढती प्रवृत्ती चिंताजनक आहे. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले असले तरी अशा घटनांमुळे गोव्यात कायद्याचा धाक उरलाय की केवळ पोलिसांची गाडी आल्यानंतरच शहाणपण सुचते, असा बोचरा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

समस्या सुटली असेल?

‘वाह!’ आता पाण्याच्या टँकरांची संख्या १५० वरून २५ वर आली म्हणे. म्हणजे गोव्यातील प्रत्येक नळातून २४ तास पाणीच वाहत असेल, असा समज करून घ्यायचा का? अजूनही अनेक भागांत नागरिकांना थेंबथेंब पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते, टँकर मागवण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात आणि नळ कोरडेच असतात. आकडे कमी झाले म्हणून समस्या संपल्या, असे होत नाही; लोकांच्या घरातील नळ नियमित वाहू लागले, तेव्हाच ‘यशोगाथां’वर विश्वास बसेल. तोपर्यंत टँकर कमी झाल्याचा गवगवा आणि नागरिकांची तहान, या दोन्ही वास्तवातला फरक कायमच बोचत राहणार!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com