खरी कुजबुज: ना घरका, ना घाटका!

Khari Kujbuj Political Satire: अनिश्चिती हा राजकारणाचा स्थायीभाव. कुठल्याही नेत्याने वा कार्यकर्त्याने भावुक, संवेदनशील असून चालत नाही.
Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुजDainik Gomantak
Published on
Updated on

प्रस्ताव कोण घेऊन जाणार?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती अथवा पक्ष विलिनीकरणाचा काँग्रेस आता पुन्हा आमदार विजय सरदेसाई यांच्यापुढे प्रस्ताव ठेवणार आहे. त्याबाबतचे सुतोवाच प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केले. सरदेसाई यांच्याशी त्या विषयावर चर्चा करण्यासाठी पक्षातील काही नेत्यांना काम करावे लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरदेसाई यांनी मागील पक्ष विलिनीकरणाच्या प्रस्तावावर काँग्रेसकडून कसा विलंब झाला, हे आता उघड केले आहे; परंतु जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसबरोबर युती राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार सरदेसाई यांच्याकडे विलिनीकरणाचा प्रस्ताव घेऊन जाणारे नेते कोण असणार आहेत? याची उत्सुकता काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. ∙∙∙

मनोज गेले कुणीकडे?

मनोज परब यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, काही दिवसांपासून त्यांनी घेतलेली शांत भूमिका अनेक प्रश्न निर्माण करत आहे. मनोज सध्या पडद्यामागे का आहेत? याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत त्यांच्या समर्थकांकडून जुने व्हिडिओ आणि भाषणे सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल केली जात आहेत. हा केवळ पाठिंब्याचा संदेश आहे की, मनोज यांच्या पुनरागमनाची चाहूल? कार्यकर्तेच आता त्यांना पुन्हा सक्रिय राजकारणात पाहू इच्छित आहेत का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

‘त्यांचा’ हक्क कोणी मारला?

गोव्यातील धनगर समाजाला ‘एसटी’ दर्जा मिळणे हा त्या समाजाचा हक्क आहे. मात्र, ‘एसटी’ दर्जा मिळण्यासाठी या समाजाच्या बरोबर राहून ‘मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या’ म्हणणाऱ्या काही स्थानिक नेत्यांनीच दगाबाजी केल्यामुळे केंद्राने या समाजाला ‘एसटी’ दर्जा नाकारल्याचा आरोप आता धनगर समाज करायला लागला आहे. या समाजाला एसटी दर्जा मिळणार, असा विश्वास या समाजाचे ज्येष्ठ नेते बाबू कवळेकर यांना होता. मात्र, बाबू यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणाऱ्या काही स्थानिक नेत्यांनी या समाजाच्या तोंडात आलेला घास हिरावून घेतल्याची भावना त्या समाजात निर्माण झाली आहे. या समाजातील काही जुन्या जाणत्यांना हा विश्वासघात पचनी न पडल्यामुळे त्यांनी आपल्या वन देवीकडे गाऱ्हाणे घालून या वादाचा सोक्षमोक्ष लावण्याची प्रार्थना केली आहे. आता पाहूया समाजाचा देव घातकी नेत्यांना काय धडा शिकवतो? ∙∙∙

पडद्यामागचा कलाकार!

गत विधानसभा निवडणुकीत एक आमदार निवडून आणण्‍यासह दर्जेदार कामगिरी केलेल्‍या- रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षात (आरजी) गेल्‍या काही महिन्‍यांपासून ‘तांडव’ माजले आहे. मनोज परब यांनी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदासह संस्‍थापक सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिल्‍यानंतर सरचिटणीस विश्‍‍वेश नाईक आणि खजिनदार अजय खोलकर यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्‍याविरोधात कुरघोड्या सुरू केल्या आहेत. त्‍यातून पक्षाने मंगळवारी बोरकर यांच्‍या मर्जीतील दहा पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केल्‍याने नाईक-खोलकर आणि बोरकर यांच्‍यातील वाद टोकाला गेल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसते. पण, आमदार बोरकर यांना अशाप्रकारे नामोहरम करण्‍याचा खेळ मनोज परबच पडद्यामागून खेळत आहेत आणि नाईक-खोलकर तो अधिकृतरीत्‍या पुढे नेत आहेत, अशी चर्चा पक्षाच्‍या पदाधिकाऱ्यांत सुरू आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: आप कार्यकर्त्यांनी फोंड्यात मगोपला दाखविले काळे झेंडे, शाब्दिक चकमक; काही काळ तणावाचे वातावरण

स्वत:चे घर सांभाळा!

आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपचा पराभव करणे शक्य आहे, असे म्हटले जाते व कॉंग्रेसचेही हेच मत आहे; पण कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह पाहता इतर पक्षांकडे युती करण्यापूर्वी स्वत:चे घर सांभाळण्याची गरज आहे, असे लोक बोलू लागले आहेत. माजी प्रदेशाध्यक्षांना बैठकीला न बोलावणे, माजी सरचिटणीस मनीषा उसगावकर, समाजमाध्यम समन्वयक शमिला सिद्दीकी यांना निलंबित करणे हे कशाचे द्योतक आहे? २०१७ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते तर भाजपचे १३ आमदार; पण मुख्यमंत्री कोण होणार? या मतभेदावरून कॉंग्रेसने सत्ता काबीज करण्याची संधी गमावली व भाजपने संधी साधून सत्ता काबीज केली, हे लोक विसरले नाहीत. त्यानंतर कॉंग्रेसचे कित्येक आमदार भाजपमध्ये आले, ही वेगळी गोष्ट. यावेळी तरी कॉंग्रेसने आपल्या वर्तनात सुधारणा करावी, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. ∙∙∙

ना घरका, ना घाटका!

अनिश्चिती हा राजकारणाचा स्थायीभाव. कुठल्याही नेत्याने वा कार्यकर्त्याने भावुक, संवेदनशील असून चालत नाही. कॉंग्रेस पक्षाने दोन महिला नेत्यांवर कारवाई करून निलंबन केले. मनीषा व शमिला या तडफदार, चमकदार बाण्याच्या वीरांगना. अमुक पातळीनंतर घरच्यांनाच जाब विचारले, तर थेट कारवाई. बराच काळ या दोघांनी विरोधकांवर आरोपांच्या तोफा डागल्या होत्या. त्याचा दाह जळजळणारा होता. घरातल्यांवर तोफ डागली गेली तेव्हा पोळण्याचा अनुभव श्रेष्ठींना तापदायक होतो. राजकारणात आणि प्रेमात चुकले कोणाचे हे वियोग झाला तरी कळत नाही. द्वार बंद केले असले तरी या दोघांना निवडणुकीआधी परत सन्मानाने घरात घेण्याची शक्यता नाही, असे नाही. हा ट्रेलर. निवडणुकीआधी आखाडा गुलालासारखा रंगून जाणार. शेवटी हे राजकारण. विनाकारण तर्क लढवणे म्हणजे डोक्याला ताप. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; अमित पालेकर कोणता झेंडा घेणार?

रोहनचा वाढता जनसंपर्क!

कुडचडे मतदारसंघात भाजपची उमेदवारी नक्की कुणाला मिळेल? याबद्दल लोकांमध्ये तर्क-वितर्क सुरू असतानाच या उमेदवारीवर दावा केलेले युवा नेते रोहन गावस देसाई यांनी विविध उपक्रम हाती घेत मतदारसंघातील आपला जनसंपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. सुरवातीला त्यांनी विहिरी साफ करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. आता त्यांनी ‘पर्यावरण जागृती’ या नावाखाली मतदारसंघातील प्रत्येक घराला भेट देत रोपटी वाटण्याची मोहीम हाती घेतली आहे. यादरम्यान ते लोकमनाचा कानोसा घेऊ लागले आहेत. याचा फायदा त्यांना होणार की नाही, हे आता काळच स्पष्ट करणार आहे. ∙∙∙

पेट्रोल पंप आणि बंगला!

विधानसभा निवडणूक हाेण्‍यासाठी अजून सहा महिने बाकी असले तरी फातोर्डा ग्राउंडवरील वातावरण आताच तापू लागले आहे. हे सध्‍या गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई आणि भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांच्‍यामधील वाक्‌युद्धाने दिसू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना, दामू नाईक हे पेट्रोल पंप बांधत असल्‍याचा आरोप केला होता. आता दामू नाईक यांनी विजय सरदेसाई यांच्‍या बंगल्‍यावर आक्षेप घेत सरदेसाई यांनी हा बंगलाही शेतकऱ्यांना परत करावा, असे म्‍हटले आहे. यावर सरदेसाई यांनी जमीन विकत घेऊन मी बंगला बांधला आहे, असे म्‍हटले आहे. एकूणच या दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये आता आरोप आणि प्रत्‍यारोप सुरू झाले आहेत. आणि फातोर्ड्यातील लोकांसाठी हा राजकारणाबरोबरच एक करमणुकीचाही विषय बनला आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: भाजप, मगो आणि काँग्रेसच्या चक्रव्युहात अडकलेला प्रियोळ मतदारसंघ!

आम्ही माणसांत येत नाही काय?

‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ ही शिकवण आपण लहानपणापासून ऐकतो; पण वारगती मळ (पाडी-केपे) येथील धनगर समाजाच्या वस्तीची अवस्था पाहिली तर ही शिकवण विसरल्याचे दिसते. आजही या गावात रस्ता, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या मूलभूत सुविधा नाहीत. मुलांना शाळेसाठी पायपीट करावी लागते, तर नागरिकांना नैसर्गिक ओहोळाचे पाणी पिण्याची वेळ येते. बकरीपालनावर उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना आहे. ‘आम्ही माणसे नाही का?’ असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत असून, ट्रायबल खात्याने प्रत्यक्ष भेट देऊन वास्तव पाहावे, अशी मागणी होत आहे. ∙∙∙

मैदानाची निगा राखणार?

‘धा जाणाच्या आवयक कोण रडता?’ असे कोकणीत म्हटले जाते. सरकारच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांची योग्य निगा राखण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना अपयश येत असल्यामुळे अशा प्रकल्पांची अल्पकाळातच काय दुर्दशा होते, हे पहायचे असेल तर कुंकळ्ळी पालिका क्षेत्रातील जर्जर अवस्थेतील सरकारी प्रकल्प योग्य उदाहरण आहे. आता सरकारने लाखो रुपये खर्चून कुंकळ्ळीत भव्य फुटसाल मैदान उभारलेले आहे. रात्रीच्या वेळी फुटसाल मैदान विजेच्या रोषणाईने चमकते. मात्र, हा झगमगाट कायम राखण्यासाठी मैदानाची निगा पालिकेला राखावी लागेल. वीज बिल फेडण्यासाठी पालिकेकडे निधी नाही म्हणून पालिका क्षेत्रातील अनेक हायमास्ट दिवे कायमचे बंद पडले आहेत. तीच स्थिती फुटसाल मैदानाची व्हायला नको? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड-भाजप युतीच्या बातम्या फक्त अफवा', मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांना आमदार सरदेसाईंनी सुनावले

झुम्बा नृत्य खेडेगावातही

सध्‍या लाट आहे ती झुम्बा नृत्याची. हे एरोबिक व्यायामाभिमुख नृत्य मध्यमवयीन महिलांचे. वजन कमी होते, चरबी कमी होते, असे दावे केले जातात. ही लाट मुंबईहून आली. गोव्यात महिलांसाठी प्रशिक्षक महिलाच असतात हे बरे. म्हापशानजीक एका शेताजवळच्या सभागृहात अलीकडेच झुम्बासारखा नाच संध्याकाळी चालायचा. कारण कळलं नाही, पण तो बंद झाला. मध्यंतरी मडगावला एका स्कूलमध्ये संध्याकाळी झुम्बाचा थरार चालत असे. आवाजाने भवताल दुमदुमून जाई. जीममध्ये महिला जास्त प्रमाणात जाण्याची लाट ओसरली नाही. झुम्बा असो की साल्सा, नाच असो की जीम, महिलांसाठी महिला प्रशिक्षक असणं सुरक्षित. नाच, जीम या आधुनिक नव-लाटा गावागावांत पोहोचताहेत हे उन्नतीचे लक्षण असावे बहुधा. ∙∙∙

मडगाव पालिका अन्‌ घोटाळे!

मडगाव पालिका आणि घोटाळा हे आता एक समीकरणच होऊन बसले आहे. त्यामुळेच या पालिकेत एखादा घोटाळा झाला तर लोकांनाही त्याबाबत नवीन असे काही वाटत नाही. आता तर या पालिकेत सफाई कामगार असलेल्या महेश गलाटगे याने मुख्याधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी व बनावट शिक्का मारून कायदेशीर सोपस्कार पार पडल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याला सध्या सेवेतून निलंबित करण्‍यात आले आहे. पोलिसांत तक्रारही केली आहे. यापूर्वी याच पालिकेत योगेश शेटकर याचा घोटाळा गाजला होता. त्यानंतरही लहान-मोठे घोटाळे घडले. मात्र त्यांची वाच्यता झाली नाही ही वेगळी बाब. या पालिकेतील बहुतांश कर्मचारी हे राजकीय वशिल्‍याच्या तट्टूने नोकरी मिळविलेले आहेत. त्यांच्या मागे राजकीय गॉडफादर असल्याने ते कुणाला जुमानतही नाहीत. असे कर्मचारी असल्याने घोटाळे होणार नाही तर आणखीन काय होणार? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

सिद्धनाथचे गीत!

गोव्याचे संगीतकार, गायक सिद्धनाथ बुयांव हे काल गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीला हजर होते. आता, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सिद्धनाथ कसे काय? असा प्रश्न अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पडला होता; परंतु आता अशी माहिती समोर येतेय की, सिद्धनाथ बुयांवनी एका गीताची रचना केली आहे आणि ते त्यांनी माणिकराव ठाकरे व इतरांना काल बैठकीत ऐकविले. तामिळनाडू-पुडुचेरीत कॉंग्रेस प्रचाराचे सुमारे ४.५ कोटींचे कंत्राट मिळविल्यानंतर आता गोव्यात कॉंग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी बुयांवकडेच जाणार, अशी चर्चा यावेळी कार्यालयात सुरू होती.

कारवाई थंडावली?

वाहनांवर काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांवर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी सांगितल्यानंतर वाहतूक पोलिसांनी आपल्या कामाला सुरवात केली होती. टिंटेड ग्लासवर कारवाई सुरू करताना अनेकांना दंडही ठोठावला होता. आता मात्र ही कारवाई थंडावल्याचे दिसून येते. पोलिसांनी ‘सीएम’चा आदेश बासनात गुंडाळून ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. सासष्टीत अनेकजण आपल्या आलिशान कारला टिंटेड काचा लावून पोलिसांच्या डोळ्यांदेखत वाहने हाकतात. पोलिस मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात. याला काय म्हणणार? कदाचित वाहन अडवून दंड दिला व ती असामी ‘पॉलिटिकल स्ट्रॉंग’ असल्यास प्रकरण अंगलट येऊ शकते, या भीतीनेच पोलिस अशा वाहनचालकांच्या वाटेलाच जात नसावेत? ∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: गद्दारांना काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद! गिरीश चोडणकरांचा पक्षांतरी नेत्यांवर थेट हल्ला; 2022 मधील निर्णय कायम

फळ मिळणार का?

आम आदमी पक्षाचे (आप) राष्‍ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी पुन्‍हा एकदा तीन दिवसांच्‍या गोवा दौऱ्यावर आले आहेत. राज्‍य विधानसभा निवडणूक जवळ येत असल्‍याने ‘आप’ने तयारीला वेग दिलेला आहे. त्‍याचाच भाग म्‍हणून केजरीवाल आणि आतिषी हे दोन महत्त्‍वाचे नेते वारंवार गोव्‍यात ये-जा करीत आहेत. पण, राजकारणात ‘पट्टी’च्‍या समजल्‍या जाणाऱ्यांपैकी एकही नेता ‘आप’कडे नसल्‍यामुळे केजरीवाल आणि आतिषींची ही धडपड फलदायी ठरेल की नाही? याकडे सर्वांचेच लक्ष असेल. ∙∙∙

सूत्रसंचालनाचा कौटुंबिक जिव्हाळा?

फोंडा कला मंदिरात सूत्रसंचालनासाठी एक अधिकारी आपल्याच नातेवाईकाला बोलावतो. परत परत आपल्याच घरच्यांना आमंत्रित करणे योग्य नाहीच. अंत्रुज महालात संगीता अभ्यंकर, सुभाष जाण, रघुनाथ साकोर्डेकर, अशोक नाईक व अन्य अनुभवी सूत्रसंचालक असताना हे मनमानी कारभार चालतात. सूत्रसंचालकांना मूलभूत माहिती उपजत ज्ञात असावी. कलेविषयी व कलाकारांच्या नावाविषयी ज्ञान हवे. प्रसिद्ध कलाकाराचे नाव घेताना चुकणे, अडखळणे म्हणजे तो त्या कलाकाराच्या हयातभर केलेल्या सेवेचा अनादर ठरतो. कोकणी क्षेत्रात संस्थानिक झालेत तरीही काही अधिकारी, सगेसोयऱ्यांनाच पुढेपुढे रेटत आहेत, त्याला वेळीच आळा घातला नाही, तर हे दुखणे बळावत क्रोनिक व्याधीत रूपांतरित होईल, अशी संतापजनक चर्चा कला मंदिरातच सुरू आहे. अध्यक्ष नसल्याने कारकूनच निर्णयांची गाडी चालवत आहेत. ∙∙∙

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com