खरी कुजबुज: गिरे तो भी टांग उपर

Khari Kujbuj Political Satire: काँग्रेसचे राष्‍ट्रीय नेते राहुल गांधी यांच्‍या रविवारच्‍या मडगावच्‍या सभेला काँग्रेस पक्ष अपेक्षित असलेली लोकांची गर्दी जमवू शकला नाही. त्‍यामुळे असेल किंवा अन्‍य कारणामुळे असेल कदाचित, आता त्‍यासाठी ब्‍लेम गेम सुरू झाला आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गिरे तो भी टांग उपर

काँग्रेसचे राष्‍ट्रीय नेते राहुल गांधी यांच्‍या रविवारच्‍या मडगावच्‍या सभेला काँग्रेस पक्ष अपेक्षित असलेली लोकांची गर्दी जमवू शकला नाही. त्‍यामुळे असेल किंवा अन्‍य कारणामुळे असेल कदाचित, आता त्‍यासाठी ब्‍लेम गेम सुरू झाला आहे. ही सभा आयोजित करण्‍यासाठी जागा मिळू नये यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला असा आरोपही केला गेला. राहुल यांचे भाषण सुरू असताना लोक सभास्‍थळाहून बाहेर पडत हाेते व याचा व्‍हिडिओ गोमन्‍तक टीव्‍हीने प्रसारित केला. त्‍यामुळे काल मडगावात झालेल्‍या पत्रकार परिषदेत गोमन्‍तकचे नाव न घेता गिरीश चोडणकर यांनी, काही प्रसारमाध्‍यमे भाजपच्‍या अधीन होऊन काँग्रेसविरोधात बातम्‍या देतात. हे तर गोदी मीडिया असेही म्‍हटले. वास्‍तविक आयोजनात ढिलाई झाली काँग्रेसकडून आणि त्‍याचे खापर मात्र मीडियावर, हे जरा अतिच झाले नाही का? ∙∙∙

काँग्रेस पक्षाची विश्‍वासार्हता

सध्या काँग्रेस पक्षातील नेते हवालदिल झाले आहेत. गोवा राखण यात्रेनंतरही विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न त्यांचा पिच्छा सोडत नाही. कारण त्यांनी जरी ‘आरजी’च्या वीरेश बोरकरशी युती केलेली असली तरी ‘या पक्षाचे आमदार सोडून जातात, त्यांची काय विश्‍वासार्हता’ असा प्रश्‍न करणारा त्यांचा व्हिडीओ सतत व्हायरल होत होता. राहुल गांधींचे भाषण चालू असताना लोक बाहेर पडतात, हे प्रेक्षक प्रत्यक्ष व्हिडीओवर बघत होते. तेव्हा प्रसारमाध्यमांच्या विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न काँग्रेसचे काही पगारी व्यावसायिक व एक निवृत्त माहिती खात्याचा कर्मचारी उपस्थित करत होता. व्यावसायिकाने यात्रेच्या नावे चार कोटी रुपये खिशात टाकले आहेत. यापूर्वी कला व संस्कृती खात्याकडून त्यानेच ५० लाख रुपये उकळले आहेत. सर्व पक्षांचे पाणी प्यालेला हा सिद्धनाथ सध्या काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याशी भागिदारीमध्ये आहे. माहिती खात्याचा निवृत्त अधिकारी एका माजी मंत्र्यांचा पीए होता. त्यावेळी मान खाली घालून उभे राहण्याशिवाय त्याने दुसरे काही केले नाही. या जॉनला आता पत्रकारितेच्या विश्‍वासार्हतेची चिंता लागून राहिली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

डिसेंबरमध्‍ये शाळांना सुट्टी?

‘गणपती माती काढून मारुती लावप’ असे कोकणीत एक बोधवाक्य आहे. आपले सरकारी अधिकारी असेच करतात.राज्यात डिसेंबर महिन्यात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे.यासाठी नेमलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी जनगणेसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांची नेमणूक केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या कामासाठी ८० टक्के शिक्षकांची नेमणूक केलीय. आता अर्ध्याहून जास्त शिक्षक जर जनगणनेच्या कामाला गेले तर शाळा चालवणार कोण? मुलांना शिकविण्याचे सोडाच, त्यांची काळजी कोण घेणार? त्‍यामुळे डिसेंबरात शाळांना सुट्टी देण्याशिवाय पर्याय नसेल. आता जर मुलाना शिकविले जाणार नसेल तर ती मुले परीक्षा कशी देणार? याचा अर्थ जनगणेसाठी शालेय मुलांच्‍या शिक्षणाचा बळी देण्यात येणार, हे निश्चित. ∙∙∙

स्वकल्याणाची अशीही यात्रा!

सिद्धानाथ याचे पोट राजकीय पक्षाची भाटगिरी चालविण्यावर चालते हे आता सिद्ध झाले आहे. जे जे पक्ष सत्तेवर येतात, त्यांच्यासमोर हात पसरवून तो आपला ‘पसरा’ चालवितो. त्याची बहीण त्याची री ओढते. हे संपूर्ण कुटुंब सध्या काँग्रेसच्या भरीव अनुदानावर चरितार्थ चालवते आहे. त्यांचीही विश्‍वासार्हता शून्य! चार कोटी रुपयांचे प्रचाराचे कंत्राट त्यांनी कसे मिळविले, त्याला अडचण आणणाऱ्या एका निरीक्षकाला कशी शिवीगाळ केली हे प्रकरण सध्या काँग्रेस पक्षात चवीने चघळले जातेय! इतके करून हा पक्ष सत्तेवर येणार आहे का? सध्या विरोधी पक्षाच्या युतीच्या प्रयत्नांची वाताहत झाली आहे. त्यामुळे पक्षाला सत्तेवर आणायचे सोडून द्या, तत्पूर्वी आपल्या पोळीवर तूप ओढून घ्यायची संधी मिळते ना, ती संधी का दवडा, असा स्वकल्याणाचा मंत्र येथे जपला जातोय. या चार कोटींत काही पक्षाचे नेतेही गुंतले असण्याची शक्यता असल्याने त्यांचीही या प्रयत्नांना साथ मिळते आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: तीच वीट, तेच सरकार!

स्टेडियम टू बायलेन्स

काँग्रेसची तथाकथित गाजलेली राज्यस्तरीय ‘गोंय राखण’ यात्रा अखेर मडगावातील डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमच्या बायलेन्समध्ये (गल्लीबोळात) पार पडली, अशी मल्लिनाथी भाजप नेते नरेंद्र सावईकर यांनी केली आहे. यावेळी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते राहुल गांधी उपस्‍थित होते. सावईकर यांनी यासंदर्भात आपल्या फेसबुकवर काँग्रेसच्या या ‘सदाबहार’ युवा नेत्याच्या उपस्थितीत सभा पार पडली असे म्हटले आहे. गर्दी इतकी अफाट होती की लोकांना सामावून घेण्यासाठी गल्लीबोळही कमी पडले, तर संपूर्ण स्टेडियम मात्र रिकामेच राहिले, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ∙∙∙

व्‍हेंझी ‘आप’पासून दूर!

राज्‍यात सध्‍या राजकीय हालचालींना वेग आला असून वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्‍या राजकीय नेत्‍यांना भेटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आप’चे काही नेते म्‍हणे चर्चिल आलेमाव यांना भेटले. त्‍यामुळे बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस सध्‍या नाराज आहेत म्‍हणे. मिळत असलेल्‍या माहितीप्रमाणे या घटनेनंतर व्‍हेंझीने आपल्‍या जवळच्‍या समर्थकांची एक बैठकही घेतली. असे म्‍हणतात की, या बैठकीत काही समर्थकांनी व्‍हेंझीना त्‍यांना हवे असल्‍यास त्‍यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा यासाठी हिरवा कंदीलही दाखविला. यासंदर्भात ‘अाप’च्‍या पदाधिकाऱ्यांना विचारले तर ते फक्‍त ‘या अफवा’ असे म्‍हणतात आणि दुसऱ्या बाजूने राधारावसारखे राजकीय विश्र्‍लेषक ‘आज ना उद्या व्‍हेंझी आणि क्रुझ काँग्रेसमध्‍ये जाणारच’ असे छातीठोकपणे सांगतात. एकूणच हे सर्व वातावरण गोंधळाचे असे वाटत नाही का? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: बुद्धी तल्लख, पण नैतिकता नापास!

यात्रेच्‍या कचऱ्याला आग

‘शिमगा संपला तरी त्‍याचे कवित्‍व बाकी राहते’ असे म्‍हटले जाते. ‘गोंय राखण’ यात्रेबद्दलही तसेच म्‍हणावे लागेल. काँग्रेसने रविवारी या यात्रेची सांगता करताना, मडगावच्‍या राजेंद्र प्रसाद स्‍टेडियमच्‍या पार्किंगच्‍या बोळात राहुल गांधींची सभा आयोजित केली. अशी सभा आयोजित केल्‍यावर तेथे आलेल्‍या लोकांकडून कचरा केला जाणे तसे अपेक्षितच असते. या सभेच्‍या ठिकाणीही कचरा तयार झालाच. शेवटी या कचऱ्याची विल्‍हेवाट आग लावून करण्‍यात आली. ही कचरा विल्‍हेवाटीची जबाबदारी एनसीसी क्‍लबवर होती की अन्‍य कुणावर हे कळू शकले नाही. पण कचऱ्यची विल्‍हेवाट कशा घातक प्रकारे केली जाते, हे मात्र दिसून आले. आता याला जबाबदार कोणाला धरायचे? ∙∙∙

सावर्डेत राजकीय बदलाचा सूर

सावर्डेचे माजी आमदार व माजी मंत्री दीपक पाऊसकर यांच्‍या ५३व्‍या वाढदिवसानिमित्त रविवारी गिरीश भवनमध्‍ये एक कार्यक्रम झाला. वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा देण्‍यासाठी जरी हा कार्यक्रम आयोजित केला असला तरी राजकारण्‍याचा कार्यक्रम असल्‍याने त्‍यास राजकीय किनार असणे स्‍वाभाविकच. केक कटींगच्‍यावेळी दीपक पाऊसकर यांच्‍याबरोबर माजी खासदार विनय तेंडुलकर यांच्‍यासह यावेळच्‍या निवडणुकीस उतरण्‍यास इच्‍छुक असलेले बालाजी गावस, रमाकांत गावकर, संकेत आर्सेकर, विलास देसाई असे कित्‍येकजण उपस्‍थित होते. संकेतसह सर्वांनी ‘सावर्डेत बदल हवा’ असा सूर उमटवला अाणि हा बदल घडवून आणण्‍यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्‍न करावेत अशी भावना व्‍यक्‍त करण्‍यात आली. अाता हा बदल घडवून आणण्‍यासाठी कोण-कोण एकत्र येणार, हे पाहणे उत्‍सुकतेचे ठरेल एवढे नक्‍की. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

कॅप्टन-बाबाशान भेट

पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गर्जना करणारे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासमोर आता बाबाशान यांनी नवा पेच उभा केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीवेळी कॅप्टन आपल्याला भेटले आणि पाठिंबा मागितला, असा गौप्यस्फोट माजी आमदार बाबाशान ऊर्फ विल्फ्रेड डिसा यांनी केला. आता कॅप्टन काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष. कारण गद्दारांना पक्षात घेण्यास विरोध आणि त्यांचाच पाठिंबा मागण्याची चर्चा, यात नेमका मेळ कसा घालायचा? राजकारणात सोयीनुसार भूमिका बदलतात, पण आठवणी मात्र पुसल्या जात नाहीत. म्हणूनच राजकीय क्षेत्रात कुजबुज रंगलीय, दुसऱ्यांना धडा शिकवताना स्वतःचा धडा विसरू नका, कॅप्टनसाहेब! ∙∙∙

लोबोंचा रेडकरांना टोला

कळंगुटच्या राजकीय कट्ट्यावर सध्या एकाच विषयाची कुजबूज रंगली आहे, हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर यांनी आमदार मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी आमदार दिलायला लोबो यांना खुल्या डिबेटचे दिलेले आव्हान. पण मायकल लोबो यांनीही आपल्या नेहमीच्या मुरब्बी शैलीत त्यावर उत्तर दिले आहे. लोबो यांनी सुनावले आहे की, वादविवाद हा आपल्या तोडीच्या नेत्याशी किंवा किमान माजी आमदाराशी शोभतो. रोशन रेडकर यांनी तर आत्ता फक्त निवडणूक लढवण्याची ‘हौस’ व्यक्त केली आहे; आधी राजकीय पक्षाचे तिकीट तरी खिशात आणा, उमेदवारी निश्चित होऊ द्या, मग विकासाच्या गप्पा मारू! तिकीट मिळण्याआधीच लोबोंनी लगावलेल्या या चिमट्यामुळे कळंगुटमधील निवडणुकीचा राजकीय पारा चांगलाच तापला आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

कुडचडेत काँग्रेसमध्‍ये इच्छुकांची गर्दी

‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणण्याची वेळ काँग्रेस पक्षावर काही मतदारसंघांत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुडचडे मतदारसंघात ‘गोंय राखण’ यात्रेला काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्‍यांनी आपापले शक्तिप्रदर्शन करण्‍याचा प्रयत्न केला. माजी नगरसेवक पिंटी ऊर्फ बाळकृष्ण होडारकर यांनी कुडचडे बाजारात मोठमोठे कटआऊट्‌स लावून आपली आमदार बनण्याची इच्छा स्पष्ट केली. त्यात माजी नगरसेवक पुष्कल सावंत यांनी आपले शक्तिप्रदर्शन करून काँग्रेस हायकमांडला खूष करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व गेल्या वेळी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून काठावर पराभूत झालेले अमित पाटकर या यात्रेला दिसले नसले तरी त्यांनी उमेदवारीवर दावा सोडलेला नाही. याचा अर्थ कुडचडे मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी मारामारी आत्तापासूनच सुरू झाली तर पुढे काय होणार, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

एल्टनची अलिशान गाडी ‘अँटिक''

काँग्रेसच्‍या ‘गोवा रक्षण’ यात्रेच्या समारोपासाठी राहुल गांधी गोव्यात आले आणि आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांच्या आलिशान गाडीतून त्यांनी प्रवास केला. आता या गाडीची शानच काही और! उद्या कोणी विचारले, ‘गाडी खास का जपता?’ तर एल्टनसाहेब अभिमानाने सांगू शकतील, ‘याच गाडीतून राहुल गांधी गेले होते!’ मग गाडीला साधी गाडी कशी म्हणायची? तिचा इतिहासच आता व्हीआयपी झाला! आता या गाडीच्या आठवणींचा प्रवास दीर्घकाळ सुरू राहणार, अशी चर्चा आहे. राजकारणात नेत्यांच्या भेटींची छायाचित्रे जपली जातात; एल्टनसाहेबांकडे तर आठवण जपण्यासाठी अख्खी गाडीच आहे! ∙∙∙

उर्फान हॅप्‍पी मूडमध्ये, पण...!

उर्फान मुल्ला यांची सलग दुसऱ्यांदा गोवा हज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यामुळे साहजिकच ते हॅप्‍पी मूडमध्ये आहेत. ‘बबलू’ या टोपणनावाने आपल्या मित्रपरिवारात ते ओळखले जातात. काँग्रेसच्या मुशीत ते वाढले, मात्र बदलत्या राजकारणाची नस ओळखून यथावकाश भाजपमध्‍ये प्रवेश केला. आता ते कमळाबरोबर बऱ्यापैकी रमलेही आहेत. उर्फान हे भाजपासाठी मुस्लिम चेहरा आहेत. विधानसभा निवडणूक आता जवळ येऊन ठेपली असून, त्यांच्यावरील जबाबदारही वाढली आहे. मुस्लिम धर्मीयांची मते भाजपकडे खेचून आणण्याचे कसब त्यांना दाखवावे लागेल. विशेषत: नावेली मतदारसंघात. समझने वाले को इशारा काफी है! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

काँग्रेसमध्ये ऐक्याचे झाले दोन तुकडे!

‘गोंय राखण’ यात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी मडगावात आले, सभा झाली, नेत्यांची भाषणे झाली; पण मडगाव काँग्रेसमधील ऐक्याचे काय? यात्रेत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या दोन तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणांहून निघाल्याचे चित्र दिसले. एक गट लोहिया मैदानावरून, तर दुसरा आना फोंत गार्डनकडून. दोन्हीकडे कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने चर्चेला आणखी फोडणी मिळाली. ही केवळ नियोजनातील गडबड की इच्छुकांनी आपापले शक्तिप्रदर्शन करण्याची संधी साधली? मडगावकरांच्या मनात प्रश्नच प्रश्न! जिथे यात्रेच्या वाटेवरच दोन रस्ते, तिथे निवडणुकीच्या मैदानात एकदिलाने लढणार कसे? काँग्रेसचे नेते ऐक्याचा नारा देतात; पण मडगावात मात्र ऐक्याची परीक्षा सुरू असल्याची कुजबूज रंगली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

नाक दाबल्याशिवाय तोंड उघडेना

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्‍हापशातील सरकारी कार्यालयाला अचानक भेट देताच भ्रष्ट अधिकाऱ्यांना थेट बडतर्फीचा इशारा दिला. पेडण्यातही घर नावावर करण्याच्या सरकारी प्रक्रियेत जनतेला सहकार्य न करणाऱ्या ग्रामपंचायत सचिवावर कडक कारवाईचे निर्देश दिले. एरव्ही शांतपणे निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही प्रशासनाची गाडी रुळावर आणण्यासाठी कडक पवित्रा घ्यावा लागतो. जनतेची कामे वेळेत होण्यासाठी वारंवार इशारे देण्याची वेळ येत असेल, तर मग अधिकारी नेमके करतात तरी काय? ‘नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही’ या म्हणीची आठवण करून देणाऱ्या या घटनांमुळे, आता मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा बडगा आणखी कुणावर उगारला जाईल, याचीच कुजबुज प्रशासनात सुरू आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: गेले नगरसेवक कुणीकडे?

अन्‌ सरकारी शाळा चमकल्या

‘जे चकाकते ते सगळेच सोने नसते’ असे म्हणतात ते खरे. गावागावांत खासगी शैक्षणिक संस्‍था उभ्या राहिल्यामुळे व गोव्यात मोठमोठ्या ब्रँडेड शाळांची संख्या वाढल्यामुळे भाऊसाहेब बांदोडकरानी सुरू केलेल्या शाळा बंद पडल्या व काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पालक आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्‍ये पाठविण्यास राजी नाहीत. गावांतील मुलं आता सरकारी शाळेत पाय ठेवत नाहीत आणि सरकारी शाळा ओस पडल्या. मात्र या ओस पडलेल्या शाळा सरस्वती पूजनाच्या वेळी मात्र चमकायला लागतात. मृत झालेल्या शाळांत एक नवीन जीवनज्योत निर्माण होते. ज्या शाळेत आपल्या पाल्यांना पाठवत नाहीत, त्या शाळेत सरस्वती पूजन करण्यासाठी मात्र गावाचे लोक एकत्र येतात. मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतात. याला काय म्हणावे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com