

काँग्रेस विचार बदलणार?
राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. गेल्या चौदा वर्षांपासून राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी युती करून निवडणूक लढवली पाहिजे, अशी मते विरोधी पक्षांतील नेत्यांसह अनेक भागांतील सूज्ञ नागरिकांकडूनही व्यक्त होत आहेत. केंद्रात स्थापन झालेल्या इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या आम आदमी पक्षानेही (आप) गोव्यात विरोधकांच्या युतीसाठी हाक दिलेली आहे. परंतु, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून मात्र अजूनही याबाबत हालचाली सुरू झालेल्या नाहीत. युतीबाबत काँग्रेस विरोधी पक्षांना अखेरपर्यंत ताटकळत ठेवते आणि शेवटच्या क्षणी आपल्या पदरात अधिक जागा पाडून घेते, असाच समज विरोधात असलेल्या पक्षांसोबतच अनेकांचा झालेला आहे. त्याचीच पुनरावृत्ती काँग्रेस आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत करणार? की विरोधी पक्ष आणि मतदारांचा विचार बदलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
सत्ताधाऱ्यांचे मंथन...
विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार, यावरून रोज एक नवीन तारीख मार्केटमध्ये फिरतेय. एकीकडे तारखांची ही धमाल सुरू असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने म्हापसा मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा, याची चाचपणी सुरू केली आहे. सध्याच्या चर्चेनुसार, दोन मुख्य चेहरे आधीपासूनच रांगेत उभे आहेत. एक विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा आणि दुसरे सामाजिक कार्यकर्ते मयूर सावकार. पण, आता या शर्यतीत आणखी एक एन्ट्री झाली आहे. म्हापशातील एका नामांकित उद्योगपतीची! पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी शहरातील काही खास आणि प्रमुख चेहऱ्यांसोबत गुप्त बैठका घेऊन या नावांवर खलबते केली आहेत! येत्या काळात म्हापशातील राजकीय हवा नक्की कोणत्या दिशेने वाहते किंवा कुणाचा वरचष्मा राहतो आणि कोणाचे पारडे जड होते, यावरच सत्ताधारी पक्ष या तिघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करणार आहे. आता या तिघांपैकी कोणाची वर्णी लागते आणि कोणाचा पत्ता कट होतो, हे पाहणे रंजक ठरेल.
राजकीय चुणूक
पर्ये मतदारसंघात भाजपचे कमळ फुलविणाऱ्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या कार्याची चर्चा आता मतदारसंघात सर्वत्र होत आहे. प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुर्लक्षित राहिलेल्या वन विकास महामंडळाला नव्या उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले असून, महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन आणि निसर्गसंवर्धनाला चालना दिली आहे. अलीकडे धबधब्यांवरील स्वच्छतेबाबत पसरलेल्या अफवांना त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले. सत्ता ही सेवेसाठी असते, याची जाणीव ठेवून जनतेच्या हितासाठी तत्परतेने निर्णय घेणे आणि चुकीच्या गोष्टींना वेळीच आळा घालणे, ही त्यांची कार्यशैली ठरत आहे. त्यांच्या या राजकीय चुणूक आणि सक्रिय नेतृत्वाची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे.
आर्थिक योग की योगायोग?
जनतेच्या पैशांचा पै पै हिशोब ठेवावा लागतो. ज्या कामासाठी पैसा खर्च केला जातो, त्याचा हिशोब मागण्याचा अधिकार जनतेला निश्चित आहे. राष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनात क्रीडा खात्याने किती निधी खर्च केला? निधी कसा खर्च केला? निधी खर्च केला की हडप केला? यावरून नवीन वाद सुरू झाला आहे. काँग्रेस पक्षाने योगा निधीचा हिशोब मागल्याने क्रीडा खात्याचे संचालक डॉ. अजय गावडे संतापले. क्रीडामंत्री रमेश तावडकर यांनाही या आर्थिक योगाची माहिती नाही. आता प्रश्न राहतो खरेच योगा एवढा महाग आहे का? क्रीडा खात्याचा आर्थिक योगा समाजमाध्यमावर गाजतोय, हे मात्र खरे.
दामोदरचा अभिषेक...
मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हे देवभोळे. राजकारण्यांची ती आता गरजही बनली आहे. शिर्डीच्या साईबाबांवर त्यांची अपार श्रद्धा. गुरुपौर्णिमेनिमित्त ते शिर्डी वारीवर होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर येथे महालक्ष्मी मंदिरात अभिषेकही केला. पालिका निवडणुका कधी होणार हे निश्चित झालेले नाही. दामूबाब आपल्या पूर्वीच्या प्रभागात पुन्हा निवडणूक लढविणार, हे निश्चित. मात्र, त्यांना पुन्हा एकदा नगराध्यक्षही बनायचे आहे. हे स्वप्न साकार होण्यासाठी दामू यांनी महालक्ष्मीकडे नक्कीच साकडे घातले असावे. ते सार्थ होण्यासाठी बदललेले राजकारणही त्यांना आधाररूप ठरणार का, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
काँग्रेस विचार बदलणार?
राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. गेल्या चौदा वर्षांपासून राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी युती करून निवडणूक लढवली पाहिजे, अशी मते विरोधी पक्षांतील नेत्यांसह अनेक भागांतील सूज्ञ नागरिकांकडूनही व्यक्त होत आहेत. केंद्रात स्थापन झालेल्या इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या आम आदमी पक्षानेही (आप) गोव्यात विरोधकांच्या युतीसाठी हाक दिलेली आहे. परंतु, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून मात्र अजूनही याबाबत हालचाली सुरू झालेल्या नाहीत. युतीबाबत काँग्रेस विरोधी पक्षांना अखेरपर्यंत ताटकळत ठेवते आणि शेवटच्या क्षणी आपल्या पदरात अधिक जागा पाडून घेते, असाच समज विरोधात असलेल्या पक्षांसोबतच अनेकांचा झालेला आहे. त्याचीच पुनरावृत्ती काँग्रेस आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत करणार? की विरोधी पक्ष आणि मतदारांचा विचार बदलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
दुर्गादास ‘गोव्याचे अहमद पटेल’!
गोवा फॉरवर्ड पक्षाचे संघटन सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी मडगाव येथील एका खासगी सभागृहात आपला वाढदिवस थाटात साजरा केला. निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आलिशान कार्यक्रमाला गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, पक्षातील अनेक नेते तसेच गोव्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. केक कापण्याच्या वेळी एक रंजक प्रसंग घडला. फॉरवर्डचे तडफदार नेते व माजी विद्यार्थी नेते प्रशांत नाईक यांनी दुर्गादास कामत यांची तुलना काँग्रेसचे ताकदवान दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी केली. काँग्रेस पक्षासाठी पडद्यामागे राहून अहमद पटेल जसे दिवस-रात्र काम करत होते, त्याचप्रमाणे दुर्गादास कामत हेही गोवा फॉरवर्ड पक्षासाठी काम करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दुर्गादास हे पक्षातील सध्या सर्वांत प्रबळ संघटनात्मक नेते ठरले आहेत; ते झोकून देऊन काम करतातच, शिवाय सरदेसाईंचे निकटचे आहेत. गोव्याच्या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी दुर्गादासचे महत्त्व जाहीरपणे विषद केल्याने दुर्गादास पक्षात किती शक्तिशाली बनले आहेत, याची प्रचिती सर्वांना आली.
दुर्गादासचे राजकीय नेटवर्क
गोवा फॉरवर्डचे संघटन सरचिटणीस दुर्गादास कामत हे सुरवातीला खरे तर भाजपचे कार्यकर्ते. नंतर त्यांनी भाजप सोडला आणि गोवा फॉरवर्ड पक्ष धरला. मात्र, अजूनही दुर्गादास कामत यांचे भाजपच्या गोटात असलेले नेटवर्क कमी झालेले नाही. काल कामत यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने मंगळवारी त्यांनी मडगावच्या नानूटेल हॉटेलमध्ये एक डिनर पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला पक्षाचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाषण करताना गोवा फॉरवर्डचे अल्पसंख्याक विभागाचे निमंत्रक कादर शाह यांनी दुर्गादासच्या या नेटवर्कचा खास उल्लेख करताना भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीचा अजेंडा दुर्गादासकडे पोचतो, असे सांगितले. दुर्गादासचा भाजपकडे असलेला संबंध अजूनही कमी झालेला नाही हे त्यातून सिद्ध होत नाही का?
विरोधक काय करतात?
अधिवेशनाचा कालावधी कमी होणार, अशी चर्चा आधीपासूनच होती. आता तसेच झाल्यावर अनेकजण मिश्कीलपणे म्हणू लागलेत की, ‘सरकारच्या मनात काय आहे, हे आम्हाला आधीच कळले होते!’ मग प्रश्न असा पडतो की, ही चाहूल सामान्य नागरिकांना लागली, तर विरोधकांना लागली नसेल का? आणि लागली असेल, तर सरकारला अडचणीत आणणारी धारदार रणनीती कुठे हरवली? अधिवेशनाच्या दिवसांपेक्षा विरोधकांच्या आक्रमकतेचे दिवसच कमी पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. सरकार आपल्या डावाने समाधानी असेलही; पण विरोधकांनी तरी एकाच पटावर खेळायला हवे होते, अशा कानगोष्टी सुरू आहेत. कारण सध्या लोकांमध्ये एकच प्रश्न फिरतोय- सरकारची स्क्रिप्ट आधीच माहीत होती, मग विरोधकांची भूमिका तीव्र का दिसली नाही?
अशीही तत्परता
पर्रा येथे रस्त्याच्या कडेला उभी असलेली स्कूटर क्षणार्धात जळून खाक झाली; पण राज्यकर्त्यांच्या आश्वासनांची ‘फायर सेफ्टी’ मात्र नेहमीप्रमाणे धुरातच गेली! अग्निशमन दल पोहोचेपर्यंत दुचाकीची राख झाली होती. सुदैवाने जीवितहानी टळली; पण ‘आग नेमकी कशी लागली?’ याचा तपास सुरू आहे. गोव्यात आता वाहनांना आग लागते की व्यवस्थेलाच, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. आग विझविण्यापेक्षा कारणे शोधण्यातच यंत्रणा अधिक तत्पर दिसत असल्याची उपरोधिक चर्चा रंगू लागली आहे.
ढवळीकर इप्सित साध्य करणार!
काणकोण, शेळ-मेळावली, सांगे येथील स्थानिकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने अखेर नियोजित आयआयटी प्रकल्प बांदोडा पंचायतीत येणाऱ्या फर्मागुढीत उभारण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पासाठी अधिसूचित केलेली जमीन आयआयटी प्रशासनाकडे सुपुर्द करण्याच्या सूचनाही शिक्षण मंत्रालयाने गोवा सरकारला केल्या आहेत. त्यातच आता बांदोड्यातील जनतेने मात्र फर्मागुढीत हा प्रकल्प येऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. परंतु, वीजमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मात्र आयआयटी प्रकल्प फर्मागुढीतच हवा आहे. नागरिकांना गप्प बसवून आपले इप्सित ते साध्य करतील का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गुरूंचा आशीर्वाद
बुधवारी गोव्यात सगळीकडे गुरुपाैर्णिमेचा सण साजरा झाला. यावेळी कित्येकांनी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतला. सारस्वत समाजामध्ये मठाच्या अधिपतीला संपूर्ण समाजाचा गुरूचा मान आहे. बुधवारी गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून मडगावचे युवा नेते प्रभव नायक यांनी पर्तगाळचे स्वामी श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. याचे फोटो प्रभव यांनी समाजमाध्यमावरही अपलाेड केले आहेत. यावेळी त्यांनी नेमकी काय प्रार्थना केली, ते मात्र समजू शकले नाही. ते राजकारणाबद्दलच बोलले असणार...
...तर जनतेला अधिक समाधान!
लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामांच्या यात्रेपेक्षा पंढरपूर-अक्कलकोट यात्रेलाच जास्त वेग आला, असे चित्र दिसतेय. साळगाव मतदारसंघातील शंभरहून अधिक महिलांना तीर्थयात्रेला पाठवण्याचा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह; पण मतदारसंघातील रस्ते, पाणी, वाहतूक, रोजगार आणि प्रलंबित प्रश्नांचीही अशीच ‘वारी’ प्रशासनाच्या दारात घडली तर जनतेला अधिक समाधान वाटेल. देवदर्शनाबरोबरच विकासदर्शनही झाले, तरच लोकप्रतिनिधींच्या सेवेला खरी पूर्णता लाभेल.
गरजेच्या सुविधा पुरवा!
जर पाया मजबूत नसेल तर कळस कसा चढेल? मुख्यमंत्री शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासने देत आहेत. आता शिक्षणात मोठ्या प्रमाणात ‘एआय’ पद्धतीचा वापर करण्यात येणार, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ‘एआय’ व आधुनिक उपकरणांचा वापर शिक्षणात होणे वाईट नाही. आता खडू-फळा गेला, स्मार्ट बोर्ड व आधुनिक डिजिटल बोर्डाचा जमाना आला आहे. मात्र, या सुविधा उपलब्ध करण्यापूर्वी शाळांतील बालरथ योजना राबविण्यासाठी वेळेवर निधी उपलब्ध व्हायला हवा, कंत्राटी व तासिका पद्धतीवर काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळायला हवे, शाळांना वाचनालयासाठी, प्रयोगशाळेसाठी व क्रीडा उपकरणे खरेदीसाठी निधी उपलब्ध व्हायला हवा, शाळांना मिळणारे मेंटेनन्स ग्रांट वेळेवर मिळायला हवे, प्रत्येक शाळेत वीज, पाणी, मैदान, शौचालय व इंटरनेट सुविधा उपलब्ध असायला हव्यात, अशा मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत.
मला गणवेश, रेनकोट का नाही?
जात, धर्म, उच्च-नीच असा भेदभाव करणे पाप आहे, असे मुलांना शाळेत शिकविले जाते. अशाच एका सरकारी शाळेतील एक सत्य घटना. शाळेतील राखीव गटातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सरकारमार्फत गणवेश व रेनकोट मिळविण्याबाबत शाळेतील शिक्षिका विद्यार्थ्यांची नावे घेत होती. या शाळेत काही बिगरगोमंतकीय दारिद्र्य रेषेखालील मुलेही शिकतात. चौथीच्या वर्गातील एका हुशार विद्यार्थिनीने आपल्या शिक्षिकेला प्रश्न केला. बाई रेनकोट व गणवेश गरीबांना मिळतात ना? माझे पालक गरीब आहेत. मग मला सरकारकडून गणवेश व रेनकोट का मिळत नाही? बाई मी गरीब नाही काय? त्या मुलीच्या प्रश्नाला बाईंकडे उत्तर नव्हते. त्या बिचाऱ्या मुलीला कदाचित वाटले असणार गरिबी ही जातीवर आधारित असते. खरे म्हणजे आपल्या देशाची हीच खरी शोकांतिका आहे.
जनजागृती नक्की कुठे?
राज्यात ऑनलाइन आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस समोर येत आहेत. प्रत्येक वेळी पोलिसांकडून ‘जनजागृती सुरू आहे’ असे सांगितले जाते. मात्र, लोक विचारू लागले आहेत की, ही जनजागृती नेमकी कुठे होते? कारण जिथे तिची सर्वाधिक गरज आहे, तिथेच लोक फसत असल्याचे चित्र दिसते. जागृतीचे फलक लावले जातात, भाषणे होतात की फक्त अहवालातच मोहिमा यशस्वी ठरतात, अशी चर्चा रंगली आहे. आता गुन्हेगारांपेक्षा जनजागृतीचा पत्ताच शोधण्यासाठी स्वतंत्र मोहीम काढावी लागेल की काय, असेही चिमटे काढले जात आहेत. कारण लोकांचे म्हणणे एकच- फसवणूक कमी व्हायची असेल, तर जनजागृतीची दिशा बदलावी लागेल; नाहीतर फसवणूक करणारे पुढे आणि जागृती मागेच राहणार!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.