खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Khari Kujbuj Political Satire: येत्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यभरात गोवा राखण यात्रा सुरू केली आहे
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

येत्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यभरात गोवा राखण यात्रा सुरू केली आहे, परंतु विविध कारणांमुळे अनेक मतदारसंघांत या यात्रेचा फज्जा उडत असल्‍याचेच दिसून येत आहे. २०२२ च्‍या विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्‍यानंतर आठ आमदारांनी केलेल्‍या पक्षांतराचा धडा घेऊनही काँग्रेसने पक्षाला ऊर्जितावस्‍था देण्‍यासाठी म्‍हणावे तसे प्रयत्‍न न केल्‍यामुळेच काँग्रेसवर ही वेळ आल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यातच आता या यात्रे दरम्‍यानच प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर आणि पक्षाच्‍या इतर वरिष्‍ठ नेत्‍यांमध्‍ये विविध कारणांवरून मतभेद सुरू झाल्‍याने निवडणुकीपर्यंत प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार का? असा प्रश्‍‍न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

अन् ‘त्या’ ठाण्यातली हवाच बदलली!

उत्तर गोव्यातल्या एका बड्या पोलिस ठाण्यात नव्या पीआय साहेबांची एंट्री होताच संपूर्ण कारभार एका झटक्यात सुधारला आहे. वर्षभर ठाण्यात पसरलेली मरगळ आणि ढिसाळपणा संपवत नव्या साहेबांनी आल्या आल्या थेट खाबूगिरी आणि कामचुकारपणाला लगाम घातला आहे. कालपर्यंत रात्रीच्या वेळी साध्या कपड्यांत वावरणारे पीएसआय आता कडक इस्त्रीच्या वर्दीत रुबाबात दिसू लागले आहेत. कर्मचारी वेळेवर हजर राहू लागल्याने धूळ खात पडलेल्या जुन्या केसेसचा निपटारा वेगाने सुरू झाला असून हद्दीत रात्रीची गस्तही वाढली आहे. साहेबांच्या या कडक शिस्तीमुळे कामचुकारांचे धाबे पुरते दणाणले असल्याची चर्चा आता ठाण्यापासून चौकाचौकांत रंगू लागली आहे. वर्षभर गायब असलेला हा ‘नवीन’ शिस्तीचा कारभार शेवटी प्रत्यक्षात ‘अनंत’ रूपात अवतरल्याचे पाहायला मिळत आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

रितेशचे ‘धाव मरे धाव’

दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश हे निवडणूक जवळ येत चालल्यामुळे भलतेच सक्रिय झालेले दिसत आहेत. परवा त्यांनी फर्मागुढी येथे एक धावण्याची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. यात फोंड्याचे बरेच स्पर्धक असल्यामुळे रितेश भलतेच खूष झालेले दिसत होते. स्पर्धकांशी चाललेली त्यांची बातचीतही बघायला मिळत होती. आगामी निवडणुकीत फोंड्याच्या रिंगणात बरेच उमेदवार उतरणार असल्यामुळे रितेशनाही असेच धावावे लागणार आहे आणि त्याची ही सुरुवात आहे अशी चर्चा तिथे आलेल्या स्पर्धकांत सुरू होती. शेवटी निवडणुका म्हटल्या म्हणजे ‘धाव मरे धाव’ हे आलेच. आता रितेश किती वेगाने धावून आपली ‘मंजिल’ गाठतात ते मात्र बघावे लागेल. नाही का?

वजनदार ‘वर्क ॲट इज’

सध्या सरकारी प्रशासनात ‘वर्क ॲट इज’ हा परवलीचा शब्द झालेला असताना वजनदार खात्यात मात्र खरेच ‘वर्क ॲट इज’ आहे का? आणि असल्यास कुणाला हा प्रश्न काही टँकरवाले विचारू लागले आहेत. टँकरची वहन क्षमता ठरविण्याचे काम हे वजनदार खाते करत असून मडगाव आणि म्हापसा येथील कार्यालयात हे काम होते. या आधी या कामासाठी टँकरमालक खात्याच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधायचे आणि अधिकारी त्यांना तारीख द्यायचे आणि त्या दिवशी हे काम पूर्ण व्हायचे, पण आता म्हणे नवीन पद्धत सुरू केली आहे. वजनदार खात्यातील अधिकारी टँकरमालकांकडून या कामासाठी अर्ज घेतात, पण त्यांना कामासाठी निश्चित तारीख देत नाहीत. त्यामुळे टँकरमालकांना आर्जवे करून आणि टेबलाखालचा शिरस्ता पाळून वहन क्षमता निश्चित करण्याची तारीख पदरात पाडून घ्यावी लागते. मडगाव येथील एक अधिकारी सकाळी ११ पूर्वी कार्यालयातच येत नाही. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या आगमनासाठीही ताटकळत रहावे लागते. यावर तक्रार करूनही काही होत नसल्याचे पाहून आता काही टँकरमालक खुद्द मंत्र्यांना भेटून हे ‘वर्क ॲट इज’ आमच्यासाठी की तुमच्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असे म्हणे विचारण्याच्या तयारीत आहेत.

पोलिस की पोलिसगिरी?

साळगावात एका कथित पोलिस अधिकाऱ्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे म्हणे! सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एक व्यक्ती रात्री एका नागरिकाच्या घरी जाऊन आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगत धाक दाखवत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे साहेब गणवेशातही नव्हते म्हणे! संबंधित व्यक्ती पणजीत कार्यरत असल्याची चर्चा असून रात्री साळगावात त्यांची ‘अधिकृत ड्युटी’ नेमकी कोणती होती, याचीही चर्चा सुरू आहे. हा खरोखर पोलिस अधिकारी आहे का याची पोलिसांनी चौकशी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. पोलिसगिरी अधिकृत की अनधिकृत याचा खुलासा आता पोलिसांनीच करावा!

अशी ही बनवाबनवी

गोड बोलून डिजिटल स्तरावर विविध रूपात लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार राज्यात वाढत आहेत. तारकांपेक्षा अगणित असे हे भंपक, बनेल गोड-बोले साध्या नागरिकांना ठकवतात. विदेशात नोकरी देतो म्हणून, डिजिटल अरेस्ट झाली म्हणून, केवायसी मुदत संपली पीन द्या म्हणून बॅंक खाते रिते करणे अशी ही नाना रूपे आहेत. लाखो रुपयांची फसवणूक होते. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ अशी हिंदी म्हण आहे. निरूद्योगी, बेशरम लोकांनी हाच उद्योग निवडला आहे. दिवसभर मेसेजीस पाठवणे वा फेसबूकवर संपर्क साधणे, लोकांना जाळ्यात ओढणे. दिवसाला एक दोन मासे गळाला लागतात ही ठकांची धारणा. ज्येष्ठ नागरिक, गृहिणी अशा साध्या भोळ्या लोकांची नाहक फसवणूक होत आहे. ‘शेळ्या आंगार फुगांव’ ही कोंकणी म्हण फिट्ट बसते. पण हल्लीचे लेखक ती वापरत नाही, असो.

Khari Kujbuj Political Satire
Goa Marathi Academy Controversy: 'आमच्या साहित्याचं संस्थान खालसा होणार?' गोवा मराठी अकादमीच्या कारभारावरुन धुमसणारा वाद चव्हाट्यावर

दुर्घटना टाळण्यासाठी ऑडिट हवं

मडगाव मार्केटात एका इमारतीचा भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी नाही. काही महिन्यांआधी मडगावातच एका इमारतीचा कठडा कोसळला होता. काल पणजीत पार्क केलेल्या एका गाडीवर झाड कोसळलं. गाडीचं नुकसान झालं. तात्पर्य – राज्यात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या ज्या मुलभूत सुविधा आहेत त्यांचं नियमितपणे गंभीरपणे सर्वेक्षण, तपासणी होते का? इमारतींना, झाडांना वय असतं. त्यांनाही वृद्धत्व येतं. म्हातारपणी ती कोसळतात. या गोष्टी टाळणं शक्य असतं. तथापि, रस्त्याच्या बाजूला फास्ट फूड दुकानात जे तंदूर, शौरमा सळईला लावून लोंबकळलेले असतात त्या मांसावर माशा घोंघावत असतात. स्वच्छतेची खात्री नसल्याने रोगांना आमंत्रण. कोकणीत म्हण आहे – ‘दोळ्यां आड मसंड पाड’. दिसत नाही तोपर्यंत ठीक. चकाचक रेस्टॉरंट असेलही. किचनमध्ये जर स्वच्छता नसेल तर काय उपयोग? एफडीएने यांचेही कान पकडावे. इमारती, झाडं, अन्न वितरण सर्वांचं ऑडिट सातत्याने व्हावे.

गोव्याच्या राखणीसाठी कर्नाटकी

एका बाजूने कर्नाटकी सरकारच्या वरवंट्याखाली माय म्हादईचा गळा आवळला जात असताना काँग्रेसने गोव्यात सुरू केलेल्या गोंय राखण यात्रेत कर्नाटक राज्यातील खानापूर आणि बेळगाव येथील लोक येऊ लागले आहेत. गोव्याच्या काँग्रेस सहप्रभारी अंजली निंबाळकर यांनी या यात्रेत खानापूरचे लोक सहभागी झाल्याचे यापूर्वी म्हटले होते. आता या यात्रेच्या निमित्ताने गोव्यात आलेले केंद्रीय नेते पवन खेरा यांचे स्वागत करण्यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल पावणेदोन लाख मतांनी पराभव स्वीकारावे लागलेले बेळगाव मतदारसंघातील उमेदवार मृणाल हेब्बाळकर आले. त्यामुळे आता गोव्याची राखण हे खानापूर आणि बेळगावचे सुपुत्र करण्यास पुढे आले आहेत का? हा प्रश्न नेटकरी विचारू लागले आहेत. यावर आरजी पक्ष काय म्हणतो? की त्यांनीही आपले पोगो धोरण गुंडाळून ठेवले हा प्रश्न विचारला जात आहे. आहे कुणाकडे याचे उत्तर?

दीपकेंच्‍या निर्णयामुळे ‘ते’ नाराज

‘एसआयआर’ प्रक्रियेवरून केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्‍य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी करीत देशभर आंदोलन छेडलेल्‍या सीजेपीचे अध्‍यक्ष अभिजित दीपके यांनी गोव्‍यातही लवकरच आंदोलन छेडण्‍याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुंबईतील आंदोलनादरम्‍यान केली होती. विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना दीपकेंनी असे भव्‍य आंदोलन गोव्‍यात छेडल्‍यास त्‍याचा काही प्रमाणात फटका भाजपला बसेल, असे विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजी, आप या पक्षांना वाटत होते, परंतु येत्‍या ११ ऑक्‍टोबरला आंदोलन करण्‍याची घोषणा सीजेपीच्‍या गोवा विभागाकडून करण्‍यात आली असली, तरी या आंदोलनात दीपके सहभागी होणार नसल्‍याने त्‍यांच्‍या माध्‍यमातून स्‍वत:चा राजकीय स्‍वार्थ साधू पाहणाऱ्या विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांत निराशा पसरल्‍याची चर्चा आहे.

दंड भरा किंवा आक्षेप घ्या

एआयच्या नजरेतून सुटणे आता वाहनचालकांसाठी कठीणच! एआय यंत्रणेने काढलेल्या वाहतूक चलनावर आक्षेप घ्यायचा असेल, तर वाहतूक खात्याने थेट पर्वरीत तक्रार कक्ष उभारण्याची तयारी केली आहे. चलन मिळाल्यापासून ४५ दिवसांत दंड भरा किंवा ‘एआयसाहेब, तुमची चूक झाली’ असे सांगत हरकत नोंदवा. म्हणजे एआयने निर्णय द्यायचा, वाहनचालकाने त्याविरुद्ध अर्ज करायचा आणि शेवटी माणसांनी एआयचा निर्णय तपासायचा! तंत्रज्ञानाच्या या चक्रात वाहनचालकाला मात्र ४५ दिवसांची मुदत नक्की मिळाली आहे.

खेरांच्या मते तो नैसर्गिक प्रकार!

काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील मीडिया सेलप्रमुख पवन खेरा गोव्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या पक्षाचे ते प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख म्हटल्यावर त्यांच्याकडे बुद्धिचातुर्य असणारच. गोवा रक्षण यात्रेनिमित्त गोव्यात आलेल्या खेरांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात राज्यातील अनेक विषयावर भाष्यही केले. गोव्यात यापूर्वी काँग्रेसमध्ये दोनवेळा पक्षांतर झाले आणि आता २०२७ मध्ये तिसऱ्यांदाही पक्षांतर होणार, असे बोलले जाते, ते पक्षांतर रोखण्यासाठी काँग्रेस काय करणार? असा पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला. त्यावर त्यांनी ‘हा प्रकार म्हणजे नैसर्गिक असून अशाप्रकारची सफाई होण्याची आवश्यकता होती, ती आता झाली आहे,’ असे खेरा यांनी उत्तर दिले. म्हणजेच खेरा हे खरे... खरे बोलले. फक्त तिसऱ्यांदा ती नैसर्गिक प्रक्रिया होणार की नाही, यासाठी काही महिने वाट पाहावी लागेल.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

सांताक्रूझमध्ये विकास चाललाय!

सांताक्रूझमध्ये विकासासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी आज आपल्या मतदारसंघात विकासकामे सुरू आहेत, असे ठामपणे सांगितले. विधानसभा अधिवेशनात प्रत्येक आमदाराला शंभर कोटी रुपये मिळतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते, त्यानुसार सांताक्रूझमध्ये ५०० कोटींची कामे झालीत की किती कामे झालीत, असा रुडॉल्फ यांना पत्रकारांनी चिमटा काढला. त्यावर रुडॉल्फ यांनी विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. चिंबल येथील उड्डाणपूल, चार खांब येथील पूल व पदपथाचे काम ही कामे झाली आहेत, पण मेरशीच्या फुटबॉल मैदानाचे काम सुरू आहे. पावसामुळे ते थांबले होते, असे त्यांचे स्पष्टीकरण. पण गतीने कामे व्हावीत, अशी आपलीही इच्छा आहे, असेही ते सांगतात. त्यामुळे रुडॉल्फ यांनी पाच वर्षांत किती विकास केला, हे जनतेसमोर आणण्यासाठी आता विरोधक नक्कीच सरसावतील हे सांगायला नको.

आंदोलनाला युवा की ‘पाहुणे’च?

कॉक्रोच जनता पार्टीचे ११ रोजी आझाद मैदान, पणजी येथे आंदोलन होणार आहे. यापूर्वी याच पक्षाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन पुकारले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने आंदोलनाला चांगलीच रंगत आली होती, पण यावेळी मुद्दा वेगळा असल्याने मैदानावर गर्दी जमणार का, याचीच चर्चा सुरू झाली आहे! युवा वर्ग नेमका कोणता झेंडा हातात घेणार, की सोशल मीडियावरूनच आंदोलनाला पाठिंबा देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सामान्य नागरिकांपेक्षा राजकीय पक्षांची नजरही या आंदोलनाच्या ‘गर्दीच्या आकड्यावर’ असल्याचे बोलले जात आहे. मैदान भरते की नाही, हे ११ रोजीच कळणार!

हवाई यात्रा महागली

विमान प्रवासाचे तिकीट महागण्‍यासाठी कारणांची कमतरता कधीच भासत नाही. आता विमानाच्या इंधनाच्या वाढत्या दराचा भार थेट प्रवाशांच्या खिशावर टाकण्याची तयारी झाली आहे. देशांतर्गत प्रवासासाठी शंभर ते साडेतीनशे रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तब्बल अडीच हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त आकारणी होणार आहे. म्हणजे आकाशात उडताना इंधन विमानाचे असले, तरी त्याची झळ मात्र प्रवाशांच्या खिशालाच बसणार! सहा ऑक्टोबरनंतर विमानप्रवास करणाऱ्यांनी तिकीट काढण्यापूर्वी खिशाला धीर देणेच आता शहाणपणाचे ठरणार आहे.

प्रश्न विद्यार्थ्यांचे, उत्तरे मंत्र्यांची

मंत्री माविन गुदिन्हो नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसतात; पण यावेळी त्यांच्या भोवतीचा गराडा काहीसा वेगळा होता. जुने गोवे येथील एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिखली येथील ‘वू’ प्लांट आणि महिला भवनला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी मंत्री माविन यांच्याशीही मनमोकळा संवाद साधला. कचरा व्यवस्थापनापासून गोव्याच्या पारंपरिक वस्त्रकलेपर्यंत विद्यार्थ्यांनी विविध विषयांची माहिती घेतली. पर्यावरण, गोव्याचा वारसा आणि रोजगाराच्या संधी अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. नेहमी राजकीय चर्चांमध्ये व्यस्त असलेले माविन यावेळी मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसले. माविन यांची ही वेगळी भूमिका बघून उपस्थितांनाही आनंद झाला.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

धीरयोचे पोलिस सेटिंग

सासष्टीत धीरयोंचे फॅड काही नवे नाही. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खुल्या शेतजमिनीत धीरयो भरवण्यात आल्या. एवढेच नव्हे, तर एका यूट्यूब चॅनलवर त्याचे लाइव्ह प्रक्षेपणही झाले. म्हणजे कार्यक्रम ‘खुल्लमखुल्ला’ होता, असेच म्हणावे लागेल. नंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा सोपस्कारही पार पडला. मात्र, अजूनही संशयित सापडत नाहीत. सापडणार तरी कसे? पोलिसांचा आशीर्वाद असेल तर मैदान रंगणारच ना...! आता काहींनी आवाज उठवला आहे. त्यामुळे पुढे धीरयो रंगतात की मैदानच ओस पडते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com