खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Khari Kujbuj Political Satire: मडगाव पालिकेतील एका मॅडमचे नखरे आता भलतेच वाढू लागले आहेत. बढती मिळाल्यानंतर तिने आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना ‘मला मॅडम म्हणा’ असा अलिखित फतवाच काढला आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मॅडमचा भलताच तोरा

मडगाव पालिकेतील एका मॅडमचे नखरे आता भलतेच वाढू लागले आहेत. बढती मिळाल्यानंतर तिने आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना ‘मला मॅडम म्हणा’ असा अलिखित फतवाच काढला आहे. पूर्वी बरोबरच काम केल्याने अनेकदा नकळत स्टाफ त्यांना नावानेच हाक मारतात. ते तिला खटकते. आता स्टाफने मॅडम म्हणून बोलविण्याची प्रॅक्टिस करण्यास सुरवात केली आहे. उगाच बालंट नको म्हणून हा खटाटोप. पण पडद्यामागची कुजबुज काही औरच! बढती पदाला मिळाली की व्यक्तिमत्त्वाला?, असा प्रश्न आता पालिकेच्या वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जातोय. ∙∙∙

अमितचा पुष्पगुच्छ वीरेश बोरकरला?

‘गोवा राखण’ यात्रेच्या सांगता सभेत पुष्पगुच्छानेच राजकीय चर्चेला फुलवले! संपूर्ण यात्रेत सहभागी न झालेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर समारोपाला मात्र हजर राहिले. दाबोळी विमानतळावर राहुल गांधींचे स्वागत केल्यानंतर सभास्थळीही त्यांनी राहुल यांना खास पुष्पगुच्छ दिला. राहुल यांनी भाषणात पाटकरांच्या नावाचा उल्लेखही केला. मात्र, सभेच्या थेट प्रक्षेपणात दिसलेल्या एका दृश्याने चर्चेला नवे वळण दिले. पाटकरांनी दिलेला पुष्पगुच्छ मागच्या बाजूने आमदार वीरेश बोरकरांकडे देण्यात आला आणि तो राहुल यांना देण्यास सांगितल्याचे दिसले. मग हा केवळ पुष्पगुच्छाचा प्रवास होता, की राजकीय संदेशाचा? मनोज परब-अमित पाटकर वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि ‘आरजी’च्या वर्तुळात या फुलांच्या राजकारणाची चर्चा रंगू लागली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: तीच वीट, तेच सरकार!

मग मैदान कुणासाठी आरक्षित?

काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते राहुल गांधी यांच्या गोवा दौऱ्यातील सभेसाठी मडगावात लोहिया मैदानाची परवानगी नाकारल्यामुळे अनेक प्रश्‍‍न निर्माण झाले आहेत. पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी तर भाजप सरकारवर आरोप केले आहेत. मैदान आधीच आरक्षित असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितल्याचा ठाकरे यांचा दावा आहे. मात्र, १८ ऑक्टोबरला मैदानावर कोणताही कार्यक्रम नव्‍हता. आदल्‍या दिवशी १७ ऑक्टोबरला चित्रकला स्पर्धा असल्‍याचा फलक मात्र तेथे झळकत होता. मग मैदानाचे आरक्षण नेमके कोणासाठी? स्पर्धा झाली असेल, तर तिचे आयोजन कुठे झाले? आणि झालीच नसेल, तर फलक कशासाठी? अर्थात, केवळ फलकावरून निष्कर्ष काढता येणार नाही; पण परवानगी नाकारण्यामागचे कारण स्पष्ट करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मैदान रिकामे, फलक मात्र हजर; मग सत्य कुठे दडले आहे? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: दोन पंच गेले कुणीकडे?

विदेशात डॉक्टरकी मिळविलेली ‘सीता’

रामायण महाकाव्य हे चिरंतन व भारतीय संस्कृतीचा साहित्याचा मुळाधार. रामायण (भाग १) चित्रपट 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टीव्हीवरील रामायण मालिकेत रामाची भूमिका गाजवलेले अरुण गोविल दशरथ झाले आहेत. बजेट 4 हजार कोटींचे. भारतीय व विदेशी भाषांमध्‍ये डब केलेला हा चित्रपट उत्कंठा वाढवत आहे. प्रोमो, ट्रेलर येत आहेत. सीतेच्या भूमिकेत आहे तमिळनाडूची साई पल्लवी. फारच गुणी हुशार अभिनेत्री. जॉर्जियात मेडिकल पदवी. मल्याळम, तामिळ, तेलुगू चित्रपटांत भूमिका तिने गाजवल्या आहेत. सव्वातीन तासांचा हा सिनेमा, नवे पायंडे, नवे मानदंड घेऊन येणार का, हे चित्रपट पाहूनच ठरवावे. नव्या दमाच्या कलाकारांना या कथेत ‘राम’ आहे हे दिसणं हे खूप झालं. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

शेखांची ‘चाय पे चर्चा’

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख यांनी आज गोवा फॉरवर्डबरोबर चर्चा होणार असल्याचे स्पष्ट करत, त्‍या पक्षाने आपली दारे उघडी केल्याने आनंद व्यक्त केला. विजयादशमीनंतर विजय सरदेसाईंसोबत चहा घेण्याचा बेत शेख आखत असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. आता, चहापानाला काँग्रेसचे इतर नेते येणार की नाही, हे बघावे लागेल. दुसरीकडे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आज सभेला उपस्थित राहिल्याने शेख सरांनी समाधान व्यक्त करत, माजी अध्यक्षांचा मान राखणे काँग्रेसची संस्कृती असल्याचे सांगितले. शेख सरांचे बोल अमित पालेकर, अर्चित नाईकांच्या कानांवर पडले म्हणजे झाले. ∙∙∙

सगळेच इच्छुक एकत्र

सणासुदीच्या कार्यक्रमात राजकारण कुणी घुसडवू नये असे म्हटले जाते. मात्र सावर्डे मतदारसंघात सर्व गोष्टींकडे राजकीय कोनातूनच पाहिले जातेय. त्यामुळेच करमणे-दाभाळ येथील सरस्वती पूजन कार्यक्रमही राजकीय विषय बनलाय. याचे कारण म्हणजे संकेत आर्सेकर यांनी दीपक पाऊसकर, भानुदास गावकर, रमाकांत गावकर, विलास गावस देसाई आणि अतिश गावकर यांच्या उपस्थितीत करमणे येथील सरकारी शाळेत केलेले सरस्वती पूजन. या पूजनाला उपस्थित असलेले सगळेच निवडणुकीतील इच्छूक उमेदवार असून चतुर्थीच्या वेळीही ते घोळक्याने गणेश दर्शन करताना दिसले होते. सावर्डे मतदारसंघातील खास राजकीय पॅटर्न असे याला म्हणायचे का? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: 'ते' नेते विजयना स्‍वीकारणार?

‘चाय पे चर्चा’ अन् ‘यूपीआय चलेगा’

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे सध्या विविध मतदारसंघांत फिरून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. शनिवारी मडगाव, नावेली मतदारसंघाच्या दौऱ्यात महिलांशी संवाद साधल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत त्यांनी ‘चाय पे चर्चा’ केली. पण या चर्चेत आरोग्यापेक्षा चहाच्या बिलाचीच चर्चा अधिक रंगली! कारण, बिल अदा करण्यासाठी राणेंनी थेट ‘यूपीआय’चा वापर केला. मंत्र्यांनी स्वतःच डिजिटल पेमेंट केल्याचे पाहून उपस्थित अधिकारीही क्षणभर अवाक् झाले. त्यावर राणेंनी ‘यूपीआय चलेगा’ म्हणत डिजिटल व्यवहाराचा संदेश दिला. चहाचा घोट घेताना आरोग्य व्यवस्थेचा आढावा आणि बिल भरताना डिजिटल व्यवहारांचा आग्रह करणाऱ्या राणेंची कृती मात्र चर्चेचा विषय ठरली. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: 'ते' नेते विजयना स्‍वीकारणार?

काँग्रेसने संधी दवडली!

परवानगी न मिळाल्‍यामुळे काँग्रेसचे राष्‍ट्रीय नेते राहुल गांधी यांना रविवारी मडगावात लोहिया मैदानावर सभा घेता आली नाही. वास्‍तविक काँग्रेसनेच हा मुद्दा व्‍यवस्‍थित हाताळला नाही. उलट या पक्षाचा मीडिया विभाग गोव्‍यातील वर्तमानपत्रांवर खापर फोडतोय. त्‍यांना आठवण करून द्यावीशी वाटते ती लढवय्‍ये नेते तथा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची. ८० च्‍या दशकात राष्‍ट्रीय विरोधी पक्षनेते असताना ते गोव्‍यात आले होते. त्‍यावेळी मडगावात पालिकेसमोरील रस्‍त्‍यावर मोठमोठ्या राजकीय सभा व्‍हायच्‍या. परंतु त्‍यावेळी वाजपेयींनाही सभेस परवानगी नाकारण्‍यात आली हाेती. पण त्‍यांनी कच खाल्ली नाही. लोहिया मैदानावर सभा घेतली आणि सरकारला आव्‍हान दिले. नियमभंग करण्‍याची गांधीजींनी जी चळवळ सुरू केली होती, ती जोपासली. हजारो लोकांना सोबत घेऊन लोहिया मैदानावरून पालिकेसमोरील रस्‍त्‍यावर येऊन सभा घेतली. कोणीतरी खुर्ची आणून दिली. त्‍या खुर्चीवर उभे राहून भाषण केले. सरकारवर ताशेरे ओढले. सभा यशस्‍वी झाली. अशी धमक आणि तडफदारपणा काँगेस नेत्‍यांना रविवार दाखवता आला नाही. तसे केले असते तर गोव्‍यात मोठा राजकीय ‘बवाळ’ झाला असता. सर्वांची सहानुभूती काँग्रेस आणि राहुल गांधींना मिळाली असती. पण त्‍यांनी हातची संधी गमावली. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: गेले नगरसेवक कुणीकडे?

समंजस विश्‍‍वजीत!

‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मडगावात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. काही नागरिक पोटतिडकीने आपली गाऱ्हाणी मांडत होते; पण यावेळी मंत्रिमहोदयांचा संयम पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले. मडगावातील हा त्‍यांचा शांत अवतार पाहता, स्वभावात बदल झाला की जनतेच्या दरबाराचा महिमा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आता हा संयम कायम राहिला म्‍हणजे झाले. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

क्रीडापटू जीत आरोलकरांनी टाकली ‘गुगली’

मांद्रेत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे एकत्र येण्याच्या चर्चेवर आमदार जीत आरोलकर यांनी खिलाडूवृत्ती दाखवली आहे. पूर्वी आपण क्रीडापटू होतो, याची आठवण करून देत सक्षम प्रतिस्पर्ध्याशी खेळण्यातच खरी मजा असते, असे त्यांनी सांगितले. आपल्याविरोधात दोन जुने प्रतिस्पर्धी एकत्र आले, ही तर चांगलीच बाब, असे म्हणत जीत यांनी विरोधकांच्या एकजुटीचे स्वागतच केले. वरकरणी हा खिलाडूवृत्तीचा सूर असला तरी त्यामागे आत्मविश्वासाची झलकही दिसते. आता विरोधकांनी संघ बांधला आहे; पण मैदानात कोणाचा खेळ रंगतो, हे निकालच सांगेल. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
अग्रलेख : खराब रस्ते रोजगार पुरवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

म्हापशात नवी राजकीय चर्चा

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हापसा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासह अन्‍य तीन इच्छुकांनी उमेदवारीवर दावा ठोकल्‍यामुळे चुरस निर्माण झाली आहे. पण आता एका घडामोडीमुळे समीकरणे बदलली आहेत. एरवी शहरातील विकासकामांवरून जोशुआंवर नेहमी टीका करणारे कळंगुटचे आमदार तथा गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अध्‍यक्ष मायकल लोबो यांनी नुकतीच म्हापसा पालिका भागाला अचानक भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी त्‍यांच्‍यासोबत जोशुआ हेसुद्धा उपस्‍थित होते. लोबो यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. जो नेता कालपर्यंत उणिवा दाखवत होता, तोच आज कामाचा आढावा घ्यायला आल्याने विरोधकही बुचकळ्यात पडले आहेत. आता राजकीय वर्तुळात अशी कुजबूज सुरू झाली आहे की, जोशुआ यांचे पारडे किंचित जड झाले आहे. याचा अर्थ त्‍यांचे राजकीय प्रतिस्‍पर्धी कमी पडले, असा अजिबात नाही. ते आता म्‍हणे नव्‍या जाेमाने कामाला लागले आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

पोलिसांची क्षमता, एक मोठे कोडेच

पणजी पोलिसांची कार्यक्षमता कौतुकास्पदच! कला अकादमी परिसरातील मजुराच्या खूनप्रकरणातील संशयितांना थेट नाशिकमधून पकडून आणले. गुन्हेगार गोव्याबाहेर लपले तरी पोलिस त्यांचा माग काढतात, हे पुन्हा सिद्ध झाले. पण बनावट नियुक्तिपत्र देऊन लोकांना सरकारी खात्यांत पाठवणारा अजित शंखवाळकर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती का लागत नाही, हा प्रश्न कायम आहे. हे एक वेगळेच कोडे लोकांना पडले आहे. आता चर्चा एकच, नाशिक गाठणाऱ्या पोलिसांची तपासाची गाडी अजित शंखवाळकरांपर्यंत कधी पोहोचणार? की या कोड्याचा उलगडा होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

फलकांचा उत्सव

निवडणुकीला अजून काही महिने बाकी असले तरी इच्छुकांपासून आमदार-मंत्र्यांपर्यंत सगळ्यांची तयारी जोरात सुरू आहे. प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव म्हणजे जनतेला शुभेच्छा देण्याची नामी संधी. त्यामुळे शहरात आणि गावागावांत शुभेच्छांचे फलक जागोजागी झळकू लागले आहेत. गंमत अशी की, सण संपतो, उत्सवाची धामधूम ओसरते, पण फलक मात्र जागेवरच ठाण मांडून बसतात. आता लोकांनाही प्रश्न पडू लागलाय, उत्सव साजरे होत आहेत की फलकांचा उत्सव सुरू आहे? बहुधा यंदा फलकांनाच जास्त आनंद झाला असावा! कारण निवडणूक येईपर्यंत प्रत्येक सणाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा पुन्हा झळकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे एकच चर्चा रंगली आहे, सण संपतील, उत्सव संपतील; पण निवडणूक होईपर्यंत फलकांचा उत्सव काही संपणार नाही! ∙∙∙

‘ती’ मते कोणाची? हिशेब अजून बाकी

मोरजी जिल्हा पंचायत मतदारसंघात काँग्रेसला १२००, तर गोवा फॉरवर्डला २५०० मते मिळाली. या आकडेवारीवरून मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी ‘ती मते कोणाची?’ असा सवाल करत युतीच्या गणितालाच छेद दिला. आगामी निवडणूक युतीतून लढवण्याची भाषा सुरू असली, तरी मनातील हिशेब काही जुळलेला दिसत नाही. ‘जिल्हा पंचायत निवडणुकीतून बरेच काही शिकलो,’ असे सांगणाऱ्या आरोलकरांनी जुन्या अनुभवांची उजळणीही केली आहे. त्यामुळे युतीच्या गोड बोलण्यामागे सावधगिरीचा सूर स्पष्ट ऐकू येतोय. मैत्रीचा हात पुढे असला, तरी मतांच्या हिशेबात प्रत्येकजण आपली वही वेगळी ठेवतोय की काय? ∙∙∙

म्हापशात नवी राजकीय चर्चा

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हापसा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासह अन्‍य तीन इच्छुकांनी उमेदवारीवर दावा ठोकल्‍यामुळे चुरस निर्माण झाली आहे. पण आता एका घडामोडीमुळे समीकरणे बदलली आहेत. एरवी शहरातील विकासकामांवरून जोशुआंवर नेहमी टीका करणारे कळंगुटचे आमदार तथा गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अध्‍यक्ष मायकल लोबो यांनी नुकतीच म्हापसा पालिका भागाला अचानक भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी त्‍यांच्‍यासोबत जोशुआ हेसुद्धा उपस्‍थित होते. लोबो यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. जो नेता कालपर्यंत उणिवा दाखवत होता, तोच आज कामाचा आढावा घ्यायला आल्याने विरोधकही बुचकळ्यात पडले आहेत. आता राजकीय वर्तुळात अशी कुजबूज सुरू झाली आहे की, जोशुआ यांचे पारडे किंचित जड झाले आहे. याचा अर्थ त्‍यांचे राजकीय प्रतिस्‍पर्धी कमी पडले, असा अजिबात नाही. ते आता म्‍हणे नव्‍या जाेमाने कामाला लागले आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: दोन पंच गेले कुणीकडे?

पणजी चर्चेत; सर्व चिंतेत!

राजधानी पणजी सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी चर्चेत आहे. विकासाच्या कामांनी पणजीचा चेहरामोहरा बदलतोय; पण कायदा-सुव्यवस्थेचे काय?. राजधानीचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता निसर्गरम्य दृश्यांसोबत अशा घटनांचीही चर्चा ऐकावी लागणार का? शहराचा विकास उंची गाठत असताना नागरिकांच्या सुरक्षिततेचाही आलेख उंचावणार की नाही, हा खरा प्रश्न! पोलिसांनी या घटनांचा छडा लावून सत्य जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. अन्यथा, ‘स्मार्ट राजधानी’च्या चर्चेत सुरक्षिततेचा प्रश्नच सर्वांत मोठा ठरला, तर नवल ते काय? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com