

मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली
विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तयारीला सुरवात केली आहे. विरोधकांवर थेट टीका करण्यापेक्षा सरकारच्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यावर सध्या त्यांचा भर दिसतो. राज्याच्या विविध भागांत वचनपूर्ती मेळावे, कृषीविषयक उपक्रम आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’च्या माध्यमातून कार्यक्रमांची मालिकाच सुरू आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमांना महिला आणि युवकांची लक्षणीय उपस्थिती दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कोणताही गाजावाजा न करता मतदारांशी संपर्क वाढविण्याची नियोजनबद्ध रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. आता या शांत तयारीचे राजकीय पडसाद निवडणुकीत किती उमटतात, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
लुईझिनचा संन्यास
राजकारणी मरतो; पण तो कधी निवृत्त होत नाही, अशी प्रतिक्रिया गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या फ्रान्सिस लुईस गोम्स यांच्या पुण्यतिथी दिनी व्यक्त केल्याने ते चर्चेत आले होते; पण मागच्या दोन वर्षांत सासष्टीतील साळ नदीमधून बरेच पाणी वाहून गेले असावे. असे वाटण्याचे कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी गोम्स यांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी पत्रकारांनी त्यांना यावेळी ते नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? असे विचारले असता, नाही, आता मी राजकीय संन्यास घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. नावेलीत यापुढे आपली मात्रा चालणार नाही, हे समजल्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखांची, हे तत्त्व मनी बाळगून हे विधान केले असावे; पण असेही म्हणतात लुईझिन जेव्हा नाही म्हणतात त्याचा अर्थ लोकांनी हो, असा घ्यायचा असतो. यातील काय खरे असेल बुवा? काही दिवसांत कळेलच म्हणा!
पुतण्यासाठी मोर्चेबांधणी
गोव्याच्या राजकारणात दयानंद नार्वेकर म्हणजे एक मोठे नाव! सक्रिय निवडणूक राजकारणापासून स्वतःला काहीसे अलिप्त ठेवणाऱ्या या माजी उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या राखण यात्रेत पाऊल टाकले आणि राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. म्हापसा अन् थिवीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून चालत त्यांनी दाखवलेली सक्रियता काँग्रेसजनांचा उत्साह वाढवणारी नक्कीच ठरली; पण राजकीय विश्लेषकांच्या मते, ही केवळ पक्षनिष्ठा नसून पडद्यामागून खेळलेली एक नवी खेळी आहे. थिवी मतदारसंघात नार्वेकरांचा स्वतःचा हक्काचा मतदारवर्ग अजूनही शाबूत आहे. स्वतः निवडणुकीच्या मैदानात न उतरता, आपले बंधू सुभाष नार्वेकर यांचे चिरंजीव तथा काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष शशांक नार्वेकर यांच्यासाठी थिवीतून आमदारकीचे तिकीट मिळवण्याची ही पद्धतशीर मोर्चेबांधणी असल्याचे बोलले जात आहे. थिवीवर पुन्हा एकदा नार्वेकर घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काकांनी ही राजकीय वाट चोखाळली खरी; पण मतदारराजे त्यावर विजयाची मोहोर उमटवणार का?
शांत स्वभावाचे उल्हास!
काही दिवसांपूर्वी नावेली मतदारसंघाचे आमदार उल्हास तुयेकर एका कार्यक्रमात गेले असताना एका धर्मगुरूशी त्यांची भेट झाली. तो धर्मगुरू उल्हास तुयेकर यांचा कट्टर विरोधक. उल्हास व भाजपला मत मारू नका, असे आपल्या अनुयायांना सांगणाऱ्या या धर्मगुरूचे एक काम होते जे सरकाराने केले नाही म्हणून तो धर्मगुरू आमदार निष्क्रिय आहे, विकासकामे होत नाहीत, असे आमदारांच्या तोंडावर बोलू लागला. आमदारांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकले व त्या धर्मगुरूला आपल्या विकासकामांची यादीच दिली आणि काही न बालताच त्याचे तोंड बंद करून टाकले.
प्रसाद गावकरांचे कमबॅक?
कोणाच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे, हे सांगणे कठीण. सांगे मतदारसंघाचे माजी आमदार प्रसाद गावकर आमदारकी गेल्यावर राजकारणापासून लांब गेले होते. प्रसाद गावकर यांची जागा नव्या चेहऱ्यांनी घेतल्यामुळे कोण प्रसाद? असा प्रश्न ‘जेन झी’ विचारीत होती. मात्र, आता राजकीय आरक्षणामुळे प्रसाद गावकर यांचे ‘कमबॅक’ होणार असल्याची चर्चा आहे. जर सांगे ‘एसटी’साठी आरक्षित झाला तर प्रसादना सांगे मतदारसंघात तसा सक्षम पर्याय नसल्याचे काँग्रेसवाले व भाजपावालेही सांगतात. आता पाहूया प्रसाद गावकर यांचे तारे चमकतात की नाहीत?
मुहूर्त मिळेना की काय?
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब राजकारणात परतणार असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती, ती अखेर अफवा ठरली, असेच म्हणावे लागेल. परब यांनी अजूनही आपण राजकारणात परतणार, असे काही सूतोवाच केले नाही. जे काही तर्क मांडण्यात आले आहेत, ते त्यांच्या समाजमाध्यमांतील पोस्टवरून; परंतु काही दिवसांपासून कोणाचाही कॉल न स्वीकारणाऱ्या; पण समाजमाध्यमांवर सक्रिय झालेल्या परब यांनी शुक्रवारी समाजमाध्यमांत पोस्ट टाकली आहे. त्यांनी या पोस्टवर ‘स्वतःच्या आयुष्याचे लेखक बना, दुसऱ्याच्या कथेतील केवळ एक पात्र नाही. इतरांसाठी तुमचे महत्त्व कदाचित एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच असू शकते; पण स्वतःसाठी मात्र, शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे महत्त्व असते,’ असे म्हटले असून स्वतःचे जलतरण तलावाजवळ उभे राहून काढलेले छायाचित्र त्यांनी अपलोड केले आहे; परंतु ‘स्टाईल मे रेहनेका’ला हॅशटॅग केले असल्याने परब वेगळीच वाट शोधत तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काब्राल यांची गरवणी
गुरुवारी कुडचडे येथे आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना कुठल्याही परिस्थितीत कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, अशी घोषणा करून पुन्हा एकदा चर्चेत आलेले कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हे झुआरी नदीत होडीत बसून माशांची ‘गरवणी’ करताना दिसले. गांधी जयंतीच्या निमित्ताने कुडचडे येथील काही युवकांनी झुआरी नदीतील प्लास्टिक कचरा साफ करण्याची मोहीम हाती घेतली होती. या कामाची पाहणी करण्यासाठी काब्राल स्वतः होडीत बसून या मोहिमेत सामील झाले होते. त्यावेळी मध्येच त्यांनी नदीत पाण्यात मासे पकडण्यासाठी गळही टाकला. त्यांच्या गळाला मासे लागले की नाही, हे माहीत नाही. मात्र, सध्या कुडचडेच्या भाजप उमेदवारीवरून काहीसे वातावरण गढूळ झालेले असताना शांत चित्ताने झुआरी नदीत गळ घालून बसलेले काब्राल पाहिल्यावर कितीही पाणी खवळले तरी मी डगमगून जाणार नाही, असेच त्यांना सांगायचे आहे, असे वाटल्याशिवाय राहिले नाही, एवढे मात्र खरे! ∙
राजेश वेरेकरांचा ‘धुमधडाका’
काँग्रेसचे कुशावती जिल्हाप्रमुख राजेश वेरेकर हे फोंड्याचे इच्छुक उमेदवार असल्यामुळे सध्या त्यांनी कार्यक्रमाचा धुमधडाका लावलेला दिसतो आहे. गांधी जयंतीचा मुहूर्त साधून शुक्रवारी त्यांनी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. पाच तारखेला फोंड्यात येणाऱ्या राखण यात्रेचे नियोजन करण्यातही ते मग्न आहेत. त्यानंतर ते दीवाळीपर्यंत फोंड्यात घराघरांत फिरून काँग्रेसच्या कारकिर्दीत फोंड्याचा कसा विकास झाला होता आणि भाजपच्या कारकिर्दीत तो कसा ठप्प झाला आहे, हे उदाहरणे देऊन पटवून देणार आहेत. आता बघूया राजेशचे हे म्हणणे फोंडेकराना पटते की नाही ते; पण काही का असेना, राजेशनी तयारी तर जोरदार केली आहे. बघूया पुढे काय होते ते?
काँग्रेसवर टीका
फोंड्यातील सरकारी कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान काँग्रेसवर घसरले. मुद्देसूद भाषण करण्यात शिवराजसिंह चौहान प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमात सरकारच्या योजना आणि त्या लागू करण्यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न यांचे छान विवेचन करताना शेवटच्या टप्प्यात मात्र शिवराजबाबूनी काँग्रेसवर टीका केली. गोवा राखण यात्रा करण्यापूर्वी स्वतःची राखण आधी करा, असा टोला त्यांनी लगावला. भाजपच्या कामाचा धसका काँग्रेसने घेतला असल्याचा तसेच इतर अनेक आरोपही त्यांनी काँग्रेसवर केले. अर्थात कार्यक्रम वेगळाच; पण त्या कार्यक्रमात शिवराजबाबूंनी संधी साधली, अशी चर्चा तेथे सुरू होती.
आणि आसन मिळाले!
पत्रकारांना आता लोक गृहित धरायला लागले की काय, अशी शंका येऊ लागली आहे. फोंड्यातील सनग्रेस गार्डनमधील कार्यक्रमात आसनव्यवस्था ठीक नव्हती. विशेष म्हणजे पत्रकारांना आसनव्यवस्थाच नव्हती, त्यामुळे काही पत्रकार सुरवातीला उभेच राहिले. आसनव्यवस्था करताना आयोजक कसल्या धुंदीत होते कुणास ठाऊक. बसायला जागा नसल्याने कार्यक्रम पाहायचा की नाही, असा प्रश्न चिडलेल्या पत्रकारांनी विचारला; पण उत्तर मिळाले नाही. मात्र, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचा एक अधिकारी पत्रकारांना ‘शांत’ करताना दिसला. हा बिचारा अधिकारी पत्रकारांची बसायची सोय करण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसला. शेवटी एकदाची व्यवस्था झाली बुवा..!
विरोधक आणि लोकांचा वेगवेगळा सूर
देशभर ‘एसआयआर’चा मुद्दा तापला, मतदारांच्या नावांवरून आरोप-प्रत्यारोप झाले, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली. आंदोलनांची दृश्ये सोशल मीडियावरही चांगलीच फिरली. गोव्यातही राजकीय पक्षांकडून आवाज उठतोय; पण गोव्यात रस्त्यावरचा आवाज मात्र तितका मोठा नाही, याचीच चर्चा सुरू आहे. लोकांचा मुद्दा घेऊन लोकांना एकत्र आणण्याचे काम विरोधकांचे; पण विरोधकच आपापले राजकीय मुद्दे घेऊन लोकांसमोर उभे राहिले, तर मतदारांच्या मुद्याला कोण जागा देणार? त्यामुळे ‘विरोधकांचा सूर’ आणि ‘लोकांचा सूर’ वेगळा तर नाही ना, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
शकुन आणि अपशकुन
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गोवा राखण यात्रेत सहभागी होण्यासाठी सचिन पायलट आज गोव्यात आले, त्यापूर्वी त्यांनी पणजीत काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सचिन पायलट हे काँग्रेससाठी ‘ब्लेसिंग’ असल्याचे सांगितले. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पायलटांनी कुंकळ्ळी व हळदोणे मतदारसंघात प्रचार केला होता व त्यामुळेच आम्ही जिंकलो, असेही युरीबाब म्हणाले. आता यात्रेत डी. के. शिवकुमार, रेवंथ रेड्डी व राहुल गांधी येणार आहेत याची चर्चा सुरू झाली. मागच्या निवडणुकीत राहुल गांधी गोव्यात आले होते व त्यांनी मुरगाव, मडगाव, कुडचडे, कुडतरी, सांताक्रुझ, सांतआद्रे, पणजी व साखळी मतदारसंघांत भेट दिली होती. यातले मुरगाव, मडगाव व सांताक्रुझचे काँग्रेसचे उमेदवार जिंकले खरे; पण अवघ्या सहा महिन्यांत भाजपमध्ये गेले. आता गोवा राखण यात्रेच्या समारोपाला म्हणजे १८ ऑक्टोबरला राहुल गांधी कुंकळ्ळीत येणार असल्यामुळे विविध प्रकारच्या चर्चांना उकळी फुटली आहे.
घुमटवाद्याचा ऋतू
ऋतू कधी कसा येईल, फुलेल, फळेल आपल्या हातात नसते. घुमट वाद्याचा सध्या बहर आहे. डिजिटल युगात रमणारी तरुणाई घुमटाच्या तालावरही तितक्याच उत्साहाने डुलत असल्याचे चित्र सध्या गावोगावी दिसत आहे. घुमट आरती स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद त्याचीच साक्ष देतो. समेळ, कासाळेची लय आत्मसात करणारे कॉलेजकुमार आता वादनात प्रवीण होत आहेत, काहीजण प्रशिक्षणही देत आहेत. नवता स्वीकारतानाच परंपरेचा ताल जपणाऱ्या या तरुणाईची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
चार लाखांचे बिल...
भाटलेतील एका सरकारी इमारतीतील ‘स्टेअरकेस’चे वीज बिल ऐकून तुमच्या भुवया उंचावतीलच. तब्बल चार लाख रुपये हे बिल ‘पीडब्ल्यूडी’ विभागाने प्रलंबित ठेवले असून, आता त्याचा फटका सदनिकेत राहणाऱ्या नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. वीज खात्याने ‘पीडब्ल्यूडी’ला नोटीस बजावत, ३० दिवसांत बिल भरा; अन्यथा वीज जोडणी कायमची बंद केली जाईल, असा इशारा दिला आहे. नागरिकांचे बिल थकित राहिले तर वीज खाते नोटिसांवर नोटिसा पाठवते, दंड आकारते आणि कारवाईही करते. मग, सरकारी खात्याच्या बिलाबाबत एवढी चालढकल का? ‘पीडब्ल्यूडी’ने वेळेत बिल भरले असते, तर वीज खात्याची नोटीस आली नसती आणि आता नागरिकांसमोर वीज जोडणी बंद होण्याचे संकटही उभे राहिले नसते. सरकारी खात्यांतील समन्वयाचा अभाव असो किंवा बिल भरण्यातील चालढकल; त्याचा भुर्दंड मात्र नागरिकांनी का भरायचा? अशी चर्चा आता या परिसरात सुरू आहे.
असाही साहसी प्रकार
शिवोली-गणेशपुरीमार्गे रस्त्यावर वाहनांची उंची मर्यादीत ठेवण्यासाठी लोखंडी कमान सरकराने उभारली. मात्र, या कमानीला वाहन धडकवण्याची जणू सध्या स्पर्धा सुरू आहे. शुक्रवारीही एक मालवाहू टेम्पो या कमानीला धडकला आणि कमानीला अडकला. रस्त्यावर उंचीचा अडथळा पुन्हा एका मालवाहू वाहनाला ‘वरून’ धडा शिकवून गेला. वाहन अडकल्याने वाहतूक कोंडीचा नवा अध्याय सुरू झाला. फलक वाचण्यापेक्षा त्याच्याशी प्रत्यक्ष भिडण्यावर काही चालकांचा अधिक विश्वास दिसतो. प्रशासनाने आता उंचीच्या फलकावर ‘कृपया डोके वर करून पाहा’ असाही संदेश द्यावा काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
सोयीस्कर भूमिकेचे दर्शन!
गोव्यात म्हादई हा जसा संवेदनशील विषय आहे, तसाच तो कर्नाटकातही आहे. काँग्रेसच्या गोवा सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर या खानापूरच्या. म्हादई नदी त्यांच्याच तालुक्यातून वाहते. मागे पत्रकारांनी म्हादईवर अंजलीताईंना प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी साखळीत ‘गोवा राखण यात्रेत’ महात्मा गांधी तसेच ‘म्हादई’ची प्रतिकात्मक वेशभूषा केलेली एक मुलगी सहभागी झाली होती. यात्रा सुरू झाल्यानंतर कुणीतरी त्या मुलीला सर्वात पुढे चालण्यासाठी आणले. यात्रेच्या अग्रस्थानी सचिन पायलट, माणिकराव ठाकरे, डॉ. अंजली निंबाळकर, गिरीश चोडणकर, युरी आलेमाव असे प्रमुख नेते चालत होते. म्हादईची वेशभूषा केलेली ती मुलगी पाहताच ताई हळूच मागे-मागे सरकत एकदम चौथ्या रांगेत पोहोचल्या. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात म्हादईवर कुणी काही विचारले तर पंचाईत व्हायला नको म्हणून ताईंनी मागे राहणेच पसंत केल्याचे बोलले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.