खरी कुजबुज: कवठणकरांचा नेमका बाण कोणावर?

Khari Kujbuj Political Satire: काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी सुमारे महिनाभरानंतर ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली.
Khari Kujbuj Political Satire:
खरी कुजबुज: Dainik Gomantak
Published on
Updated on

दुटप्पी क्राफ्ट, चोरीचा ड्राफ्ट

सायबर चोर नवनवीन क्लृप्त्या काढतात. टोप्या घालण्याचे नवे क्राफ्ट इथून तिथून प्राप्त करतात, साद्याभोळ्यांना लुटतात. वृध्दांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना ठकवतात. मला मदत हवी म्हणून कुणीही स्मार्टफोन पुढे केला तरी मदत करू नका. ही जागृती वाढवली पाहिजे. ठकांच्या अभिनयाचे हे नवीन क्राफ्ट. तुमचा चेहरा, आवाज, ठशे सगळी माहिती गोळा करून नंतर बॅंक खात्यातील रक्कम खाली करतात. फळं, कडधान्य, छत्र्या, बूट कसलाही माल ग्राहक म्हणून खरेदी करा, तिथंही डुप्लीकेटपणाचं हे क्राफ्ट दुकानदार वापरतो. दरम्यान, मनोरंजनासाठी नाटकाला जावं तर ड्राफ्ट चोरलेला. चोरीचं समर्थन करायला वेगवेगळे ‘शाफ्ट’ लावलेले असतात. जीवन व कलेचं ग्राफ्ट (रोपटं) वृक्षात रूपांतरीत व्हायचं असेल तर ही सर्वव्यापक दुटप्पीपणा, बनेलपणा बंद व्हायला हवा. विहीरीलाच तहान लागावी तसं क्राफ्टच थोतांड झालंय, हे दुर्दैव. ∙∙∙

प्रगल्भतेचे दर्शन

पंच सदस्य ते आमदार आणि काँग्रेसच्या कार्यकारिणीतील सदस्य होण्यापर्यंत मजल मारलेले आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी रविवारी प्रगल्भ राजकारण्याचे दर्शन घडविले. केपे मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी) समाजासाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते आणि एसटी समाजाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले आहे. त्याअनुषंगाने एल्टन यांनी एसटी आरक्षणाबाबत आपले मत व्यक्त केले. ‘‘केपे मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी) समाजासाठी राखीव ठेवण्यास माझा विरोध नाही. मात्र, ही प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविली जावी. पक्षाने माझ्यावर सोपविलेली कोणतीही जबाबदारी मी स्वीकारेन,’’ असे एल्टन यांनी म्हटले. यावरून कोणताही आततायीपणा करण्याची किंवा भाजपवर टीका करण्याची घाई त्यांनी केली नाही. यालाच राजकीय प्रगल्भता म्हणावी का? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: लोबोंना उमेदवारी देऊन चूक! विश्वासघात करणाऱ्यांना आता नाही प्रवेश- गिरीश चोडणकर

‘एल्टन’चा चांगूलपणा

निवडणुकाजवळ आल्या की अफवांना पीक येतेच. हा इथून लढवणार, तो तिथून लढवणार, पक्ष अमक्याला उमेदवारी देणार नाही किंवा हा पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाणार, अशी जोरात चर्चा सुरु असते पण त्यात तथ्य काहीच नसते. कोणी म्हणतो, केपेचे आमदार एल्टन नुवेतून निवडणूक लढवणार. कोणी म्हणतो माजी खासदार नरेंद्रबाब सावईकर फातोर्डातून निवडणूक लढवणार. राजकारणात काहीही होवू शकते. तरी काही गोष्टी तर्कविरहीत असतात. पण, एल्टनबाबाने एका कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे राजकारण व आमदारकी कुणा एका माणसाची मक्तेदारी नाही. लोकांची कामे करण्यासाठी आमदार किंवा मंत्री व्हायलाच पाहिजे असेही नाही किंवा एकाचकडून निवडणूक लढवावी असेही नाही. ते सांगतात त्याप्रमाणे पक्ष जिथे आपल्याला उमेदवारी जाहीर करेल तिथून आपण निवडणूक लढवीन. एकाच मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा आपला हट्ट नाही. या त्यांच्या वक्तव्यावरुन त्यांचा चांगुलपणा दिसून येतो आणि आत्मविश्वासही... ∙∙∙

पूर्ण वेळ एसपी कधी?

दक्षिण गोवा एसपी पदावर आता शेखर प्रभुदेसाई आले आहेत. संतोष देसाई हे सेवानिवृत्त झाल्याने या जिल्ह्यातील अधीक्षकपदी त्यांची वर्णी लागली आहे. बदलीचा आदेश जारी झाल्यानंतर प्रभुदेसाई यांनी पदाचा ताबाही घेतला. मात्र, त्यांना ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोकण रेल्वे पोलिस अधीक्षक पदाचाही ताबा आहे. दक्षिण गोव्यात आता कुशावती जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला असल्याने या जिल्ह्यात पूर्ण वेळ एसपी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या जिल्ह्यात आता पूर्ण वेळ एसपी कधी लाभणार? हे कळायला तसा मार्ग नाही. मात्र, हल्लीच एसपी म्हणून बढती मिळालेले अनेक जण या पोस्टिंगसाठी इच्छुक आहेत. ‘अंदर की बात’ म्हणजे त्यांनी आपल्या राजकीय ‘गॉडफादर’कडे लॉबिंगही सुरू केलेले आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

मतदारसंघांचा कानोसा...

गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत सध्या गट समितीच्या बैठकींना धावू लागले आहेत. मये मतदारसंघात गोवा फॉरवर्डचा मागील निवडणुकीत उमेदवार होता आणि याच ठिकाणी आज गट समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. २०२७ मध्ये काँग्रेसबरोबर युती कायम राहण्याची शक्यता असल्याने मये मतदारसंघावर गोवा फॉरवर्डचा दावा असणार आहे. रविवार असल्याने दौऱ्याच्या निमित्ताने कामत यांनी डिचोलीतील एका हॉटेलमध्ये रस-ऑम्लेटची चवही घेतली. यावेळी त्यांनी दुकानाच्या मालकाशी चर्चाही केली. कदाचित डिचोली तालुक्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न त्यांनी त्याच्याकडून केला नसावा, असे वाटते. रस-ऑम्लेटच्या चवीपलीकडे जाऊन काही माहिती मिळविण्याचे आणि मतदारसंघांचा कानोसा घेण्याचे हे निमित्त त्यांनी या दौऱ्यात साधले असावे. ∙∙∙

सावर्डेत त्या गाडीची चर्चा

‘नशीब एकेकाचे’ असे म्हणतात, ते खरे. प्रयत्नांना जर नशिबाची किनार मिळाली, तर यश पाय धुवायला लागते. धारबांदोडा तालुक्यात माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर वापरत होते ती गाडी फिरताना दिसत आहे. सध्या या गाडीची चर्चा रंगत आहे. सावर्डे मतदारसंघाचे आमदार सभापती असल्याने ते पुढे राष्ट्रध्वज असलेल्या मोठ्या आलिशान गाडीचा वापर करतात. मात्र, या मतदारसंघात पर्रीकर वापरत होते ती सरकारी गाडी फिरते. त्या गाडीतून कोण सरकारी जावई फिरतो, ते सगळ्यांना माहीत आहे. त्या गाडीच्या पुढे राष्ट्रध्वज लावण्याचे स्टँड असल्याने ती गाडी आजही मुख्यमंत्र्यांचीच आहे, असे पाहायला वाटते. असे म्हणतात, या गाडीत बसणारा राजकारणी हमखास आमदार व मंत्री बनतो. आता ते भावी आमदार कोण, हे जाणून घ्यायचे असल्यास धारबांदोड्याला जावे लागणार ना! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: भाजप-मगो युती, कितने दूर कितने पास?

विश्वजीत यांचा कामाचा सपाटा...

मंत्री विश्वजीत राणे यांची प्रशासनावर जबरदस्त पकड आहे. राज्यातील विविध इस्पितळांना भेटी देण्याचा त्यांनी जणू सपाटा लावला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयालाही त्यांनी भेट देऊन आरोग्यसेवांचा आढावा घेतला, रुग्णांशी संवाद साधला तसेच डॉक्टर, परिचारिका, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या संवादांमधून आरोग्यसेवा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. असंख्य रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांचे समर्पण, करुणाभाव आणि अथक सेवा हीच गोव्याच्या आरोग्य व्यवस्थेचा खरा कणा असल्याचे त्यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले. ∙∙∙

गिरीशचे दिगंबरवर बाण

दिगंबर कामत हे काँग्रेसच्या काळात मुख्यमंत्री असताना गिरीश चोडणकर हे त्यांचे अगदी जवळचे सहकारी होते. मात्र, कामत भाजपवासी झाल्यानंतर हेच गिरीश त्यांचे पक्के विरोधक बनले असून दिगंबर यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी ते सध्या सोडत नाहीत. शनिवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गिरीश यांनी बाळ्ळी येथे जे उटाचे आंदोलन झाले, त्याला काँग्रेस नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत हे जबाबदार होते, असे म्हटले. मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेणे अपेक्षित होते, ते कामत यांनी घेतले नाहीत, असा त्यांचा रोख होता. चिराग नाईक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, त्यावेळीही गिरीश यांनी दिगंबर यांनाच ‘टार्गेट’ केले होते. हे सर्व पाहिल्यास गिरीश यांनी मडगाव मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले तर नाही ना, अशी शंका कुणालाही येणारच! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: फोंड्यात राजकीय अनिश्चिततेचे ढग, उमेदवारीच्या चर्चांना वेग; काँग्रेस आघाडीवर, भाजप-मगोची भूमिका अस्पष्ट

बेटांच्या पाहणीबाबत ‘वरातीमागून घोडे’

कारवार जिल्ह्यालगत असलेल्या, परंतु गोव्याच्या मालकीच्या १६ बेटांची पाहणी आता पावसाळ्यानंतरच होऊ शकणार आहे. गोवा प्रशासनाने या विषयाकडे पुरेसे गांभीर्याने लक्ष न दिल्याने ही पाहणी रखडल्याची चर्चा आहे. बेटांचा हा प्रश्न गोव्याच्या स्वाभिमानाशी निगडित मुद्दा बनला आहे. एका बाजूला कर्नाटक प्रशासनाने या बेटांचे नामकरण सुरू केले असून किनारी पोलिसांची गस्तही वाढविली आहे; तर दुसऱ्या बाजूला गोवा सरकार अजूनही पाहणीसाठी नौका उपलब्ध करून घेण्याच्या टप्प्यात अडकल्याचे दिसते. त्यामुळे हा सर्व प्रकार ‘वरातीमागून घोडे’ असाच असल्याची चर्चा रंगू लागली आहे. ∙∙∙

दिगंबरबाबवर स्तुती सुमनांचा वर्षाव

वन, आरोग्य, नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मडगावमध्ये एखाद्या कार्यक्रमाला आले की त्यांची दिगंबरांवर स्तुती असतेच. परवा सुद्धा पर्यावरणदिनी मडगावात आले तेव्हा त्यांनी दिंगबर कामतांची स्तुती करण्याची संधी सोडली नाही. एवढेच नव्हे, तर जेव्हा दिंगबरबाब मुख्यमंत्री होते तेव्हा गोव्याचा सुवर्ण काळ होता, असेही त्यांनी सांगितले. या स्तुती मागे विश्र्वजीत बाबाचा नेमका हेतू काय, हा प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविकच आहे. असो...दिगंबरांच्या या स्तुतीची मात्र नेहमीप्रमाणे मडगावात पुन्हा एकदा चर्चा रंगली. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Today's News: अमित शहांची सभा, थरुर यांचे आरोप; गोव्यातील ठळक बातम्या

कवठणकरांचा नेमका बाण कोणावर?

काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी सुमारे महिनाभरानंतर ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. ती नेमकी कोणाला उद्देशून आहे, हे काही जणांना उमगले असणार. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘‘काही लोकांना नेहमीच फसवता येते! सर्व लोकांना कधीतरी फसवता येते! पण सर्व लोकांना नेहमीच फसवता येत नाही. जनभावनेला गृहीत धरता येत नाही.’’ भलेही कवठणकर यांच्या फॉलोअर्सची संख्या काही शेकड्यांतच असली, तरी त्यांनी कोटी करून व्यक्त केलेले हे मत चर्चेचा विषय ठरले आहे. ∙∙∙

घरोघरी हव्यात मातीच्या चुली

गॅस सिलिंडर दिवसेंदिवस पराकोटीचा महाग होत आहे. अवघ्या तीन महिन्यांत १४.२ किलोचा सिलिंडर ९४२ रुपयांपर्यंत पोहोचला.दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक भूमिका घेत असून त्यांची भाषा अनेकदा युद्धजन्य परिस्थितीची आठवण करून देणारी ठरत आहे. जागतिक संघर्षांमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावरही परिणाम होत आहे. मध्यंतरी राज्यातील अनेक घरांना गॅस पाईपलाईनची सुविधा उपलब्ध झाली. अनेकांनी त्याचा लाभ घेतला असून तो तुलनेने स्वस्तही पडतो म्हणे. स्वयंपाकासाठी इंडक्शनचा वापरही वाढत आहे. मात्र युद्ध संपेल की नाही, जागतिक परिस्थिती पुढे काय वळण घेईल, याबाबतची अनिश्चितता कायम आहे. अशा वेळी अनेकांना आजीच्या काळातील मातीची चूल आठवते. मातीने चूल सारवताना आजीच्या खांद्यांचा चांगला व्यायाम व्हायचा. सरपणासाठी ती टेकडीवर जायची. त्यामुळे तिला वेगळ्या ‘जॉगिंग’ची गरज भासत नसे. आज मात्र पोटातील गॅस, जॉगिंग, स्ट्रेस टेस्ट, ब्लड टेस्ट यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बदलत्या काळात आणि वाढत्या महागाईत पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली हव्यात, असे वाटणे साहजिकच. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa politics: सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी; मडगाव पालिका बैठक, सरदेसाईंच्या प्रस्तावित विकासकामांवरून वाद

फुर्तादोंची इच्छा...

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप दिल्ली दरबारी पोहोचला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळावे सुरू आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाने गट समितीच्या बैठकींवर भर दिला आहे. यावरून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच पणजी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची इच्छा माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी व्यक्त केली आहे. फुर्तादो यांनी महापौर म्हणून केलेला कारभार पणजीकरांना माहीत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पदरी निराशा पडली आणि ते नगरसेवकपदापासून दुरावले. तरीही ते काँग्रेसचे कट्टर समर्थक राहिले आहेत. परंतु सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पणजीत काँग्रेसला अद्याप गट समितीही स्थापन करता आलेली नाही, हीच येथील शोकांतिका आहे. असे असले तरी पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी फुर्तादो यांची इच्छा असण्यात काहीच गैर नाही. ∙∙∙

संकल्पच्या गौप्यस्फोटाची आठवण

गोव्यात काँग्रेस पक्षात नेतृत्वबदल झाल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. समाजमाध्यमांवर सर्वाधिक गाजलेला विषय म्हणजे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतील कथित तिकीटविक्रीचा. त्यावर स्पष्टीकरण देताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी, ‘‘एका तरी उमेदवाराने पुढे येऊन पैसे देऊन तिकीट घेतल्याचे स्पष्ट करावे,’’ अशी मागणी केली. गिरीश चोडणकर यांच्या या वक्तव्यानंतर आता समाजमाध्यमांवर त्यांचे एकेकाळचे जीवलग मित्र आणि मुरगावचे विद्यमान आमदार संकल्प आमोणकर यांच्या वक्तव्याची तसेच संबंधित बातमीची लिंक व्हायरल झाली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये संकल्प आमोणकर यांनी तत्कालीन गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी कोट्यवधी रुपये घेऊन सुमारे १२ मतदारसंघांमध्ये तिकिटे विकल्याचा जाहीर दावा केला होता. आता चोडणकर त्यावर काय भाष्य करतात, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरच मुरगावातील भाजप समर्थकांचेही लक्ष लागले असल्याचे कळते. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

बबिता भाभीला बर्थडे गिफ्ट...

फातोर्डा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी बबिता नाईक यांची गुरुवारी निवड झाली. मडगाव पालिकेच्या त्या माजी उपनगराध्यक्ष तसेच माजी जेष्ठ नगरसेवक सदानंद नाईक यांच्या सौभाग्यवती. शुक्रवारी त्यांचा वाढदिवस होता. ‘बर्थडे’च्या एक दिवस अगोदर त्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी फातोर्डा भाजपा महिला अध्यक्षपदी बसवून त्यांना वाढदिवसाचे ‘गिफ्ट’ दिले. बबिता नाईक या ‘भाभी’ म्हणून फातोर्डा मतदारसंघात परिचित आहेत. दामूंच्या त्या शेजारी. पूर्वी त्या तशा भाजपाला निकट नव्हत्या. मात्र बदलत्या काळाची पाउले ओळखून पतीराजसह त्यांनी भाजपाची वाट धरली व शेवटी त्यांना त्याचे बक्षिस दामू यांनी देताना त्यांना महिला मंडळ अध्यक्षपदी विराजमानही केले. भाभी सद्या खुश आहेत तसेच त्यांचे पती देवही..! ∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com