Goa Politics: फोंड्यात राजकीय अनिश्चिततेचे ढग, उमेदवारीच्या चर्चांना वेग; काँग्रेस आघाडीवर, भाजप-मगोची भूमिका अस्पष्ट

Ponda assembly constituency election updates 2026: आगामी गोवा विधानसभा निवडणूक जवळ येत असताना फोंडा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: आगामी गोवा विधानसभा निवडणूक जवळ येत असताना फोंडा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या सात-आठ महिन्यांतील घटनांकडे पाहता हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या कधी पुढे तर कधी मागे गेल्यासारखा भासत आहे.

आमदार रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंडा मतदारसंघ आमदारविहीन झाला. त्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीकडून नव्या नेतृत्वाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी न्यायालयाच्या आदेशामुळे पोटनिवडणूक रद्द झाल्याने मतदारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.

या घडामोडीनंतर काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि समाजकार्यात सक्रिय असलेले डॉ. केतन भाटीकर यांच्या आकस्मिक निधनाने फोंड्याच्या राजकारणाला आणखी एक मोठा धक्का बसला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या भाटीकर यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वारशाचे नेतृत्व कोण स्वीकारणार, याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.

रद्द झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या भाटीकर यांच्या निधनामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राहिलेले राजेश वेरेकर यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने उमेदवारीसाठी त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.

भाटीकर यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य पुढे नेणारा वारसदार कोण, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्येही चर्चा सुरू आहे. काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र भाटीकर ट्रस्टतर्फे खांडेपार येथील एका शाळेला नुकतेच वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आले असून या कार्यक्रमाला त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यामुळे भविष्यात एखाद्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Goa Politics
Goa Noise Pollution: ध्वनिप्रदूषण नियमांची 'ऐशीतैशी', कारवाईत पक्षपातीपणा; किनारी भागातील स्थानिकांचा आरोप

भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) यांच्यात आगामी निवडणुकीत युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी जागावाटपाचा प्रश्न निर्णायक ठरणार आहे. मगोचा प्रमुख भर प्रियोळ मतदारसंघावर असल्याचे मानले जाते. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अलीकडेच प्रियोळमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद असल्याचे सांगितल्याने मगोने फोंडा मतदारसंघाकडे लक्ष वळविल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Goa Politics
Goa Congress: गिरीश चोडणकर पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खजिनदारपदी दत्ता दामोदर नायक यांची निवड

जर मगोने फोंड्यात उमेदवार उभा केला किंवा भाजपने हा मतदारसंघ मगोच्या वाट्याला दिला, तर रद्द झालेल्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार रितेश नाईक तसेच इच्छुक नगरसेवक विश्वनाथ दळवी यांची पुढील भूमिका काय राहणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसकडे राजेश वेरेकर यांच्या रूपाने तुलनेने स्पष्ट चेहरा असल्याने पक्ष काहीसा आघाडीवर दिसत आहे. तर भाजप-मगो आघाडीबाबत अनेक शक्यता आणि ‘जर-तर’ची समीकरणे कायम असल्याने अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com