Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मंत्र्यांच्या खुर्चीचीच चर्चा!

Khari Kujbuj Political Satire: झेवियर यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य खट्टर यांना थेट पोलिसांपर्यंत घेऊन गेले खरे; पण त्याचा ‘इफेक्ट’ आता मंत्री गुदिन्हो यांना जास्त जाणवू लागला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कोकणी भाषा मंडळाची निवडणूक

मडगावची कोकणी भाषा मंडळ ही आद्य व अग्रगण्य संस्था. या संस्थेची महत्त्वाची आमसभा रविवारी २६ तारखेला होणार. त्यात नव्या तीन वर्षांची कार्यकारिणी समिती निश्चित होण्याची शक्यता आहे. संस्थेची आर्थिक सज्जता व मजबुतीचा डोलारा पाहून कैक जण कार्यकारिणीवर जायच्या चढाओढीत हिरिरीने भाग घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक बरीच उत्कंठावर्धक होण्याची शक्यता दिसते. समितीवर नवीन चेहरे येणार, म्हणजे त्यांना संधी देणार? की पत्त्यांच्या पानांसारखी पिसून पुनर्रचना होणार? असे अंदाज, तर्क-कुतर्क कोकणीवादी काढत आहेत. तालुका प्रतिनिधींचीही घोषणा होणार. तिथेही रस्सीखेच चालू आहे, असे ऐकिवात आहे. सबका साथ, कोकणी का विकास हे ब्रीद म्हालगड्यांनी पुकारले आहे. हा सूर्य हा जयद्रथ, या न्यायाने काय घडतं ते रविवारी कळेल. नवीन समिती तरी भाषा प्रश्नावर आवाज काढते की काय हे कळेल. ∙∙∙

मिकी पाशेको पुन्हा फॉर्मात

सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात अपशब्द काढले आणि लोक रस्त्यावर उतरले. त्यावेळी मिकी पाशेको हे या आंदोलनाचे भाग नव्हते, पण तरीही त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले आणि सध्या मिकी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दर आठवड्याला न्यायालयाच्या चकरा मारत आहेत. पण आता गौतम खट्टर याने सेंट फ्रान्सिस झेवियर विरोधात अपशब्द काढल्यावर मिकी रस्त्यावर उतरले आहेत. कदाचित त्यांना मागचा वचपा काढायचा असेल कदाचित किंवा या आंदोलनाचा राजकीय फायदाही उठवण्याची त्यांची तयारी सुरू झाली असेल. काही का होईना, पण या आंदोलनामुळे मिकी पुन्हा फॉर्मात येणार असेच वाटत आहे, बुवा! ∙∙∙

आता तरी गोमंतकीय कुलगुरू?

गोवा विद्यापीठासाठी नव्या कुलगुरूंच्या शोधाला सुरुवात झाली आहे. समित्या बसल्या, निकष ठरले, अनुभवाची मापं मोजली जातायत. सगळं काही पुस्तकातल्यासारखं अगदी परफेक्ट! पण गोमंतकीयांच्या मनातला एक छोटासा (पण कायमचा) प्रश्न मात्र अजूनही तसाच उभा...“यावेळी तरी आपल्याच मातीतला कुणी कुलगुरू होणार का, की पुन्हा ‘बाहेरून आयात’?” विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम, दहा वर्षांचा अनुभव, संशोधन, नेतृत्व, हे सगळं खरं. पण गोव्यात इतकी वर्षे शिक्षणक्षेत्रात घाम गाळणारे, विद्यापीठाशी नाळ जुळलेले लोक काय फक्त पाहुणचारासाठीच आहेत का? दरवेळी प्रक्रिया सुरु होते तेव्हा आशेचा दिवा लावला जातो आणि निकाल लागला की तोच दिवा पुन्हा “आऊट ऑफ कव्हरेज एरिया”! समिती योग्य उमेदवार शोधेलच यात शंका नाही. पण प्रश्न इतकाच योग्य उमेदवार गोव्यात सापडणार नाही का, की सापडला तरी “योग्य” ठरणार नाही? गोमंतकीयांना आता पद नकोय, फक्त संधी हवी आहे. बाकी “मेरिट” आणि “निवड प्रक्रिया” तर आपण वर्षानुवर्षं बघतोच आहोत! ∙∙∙

गोव्याचा व्हायरस दिल्लीत!

गोवा हे राज्य राजकीय फुटीरतेला खतपाणी देणारे असा आरोप नेहमीच केला जातो आणि गोव्यात झालेली पक्षांतरे पाहिल्यास या आरोपात तथ्य आहे, हेही सिद्ध झाले आहे. मात्र दिल्लीतही फूट पडली. काही दिवसांपूर्वी गोव्यातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी दिल्लीत गेले होते. गुरुवारी रात्री ते परत गोव्यात आले आणि काल शुकवारी ‘आप’चे खासदार फुटल्याचे वृत्त बाहेर आले. आता पंजाब राज्यात होणारी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेऊन ही फूट पाडली आहे हे स्पष्ट आहे. मात्र आता काही जण मस्करीने म्हणू लागले आहेत, गोव्यातील हा फुटीचा व्हायरस ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली पर्यंत नेला तर नाही ना! ∙∙∙

काणकोणकरांना अखेर आधार

काणकोणमध्ये गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये बंद पडलेले आधार केंद्र पुन्हा सुरु होणार आहे. प्रश्न विचारायला हरकत नाही, ही सेवा थांबलीच का होती? आणि थांबली असेल तर पुन्हा सुरू होण्यासाठी इतका काळ का लागला? काणकोणच्या नागरिकांनी इतके दिवस आधार सेवेसाठी अक्षरशः “आधार” शोधत धावपळ केली. कुणी फोंडा, कुणी मडगाव गाठलं; वेळ, पैसा आणि संयम, सगळ्यांचा ताळेबंद बिघडला. आता सेवा पुन्हा सुरू होणार म्हटल्यावर प्रशासन स्वतःच्या पाठीवर थाप मारत असेल, पण नागरिकांच्या डोक्यात मात्र एकच प्रश्न- “ही सेवा पुन्हा कधी बंद होणार?” खरं तर ही कोणतीही नवीन योजना नाही, किंवा एखादं भव्य उद्घाटनही नाही. ही तर मूलभूत सेवा आहे. पण आपल्याकडे मूलभूत गोष्टीही “सुटकेचा निःश्वास” मिळावा इतक्या दुर्मिळ होतात, हीच खरी शोकांतिका. आता सेवा सुरू होणार आहे, ही चांगली गोष्टच. पण प्रशासनाने यावेळी इतकंच लक्षात ठेवावं, लोकांना ‘सुटकेचा निःश्वास’ देण्यापेक्षा, ‘डोकेदुखी’चं कारण होऊ नये, एवढीच अपेक्षा! ∙∙∙

काँग्रेस नेत्यांचे फोटोसेशन

काँग्रेसचे सर्व नेते सध्या फोटोसेशन करण्यात व्यस्त असून सामान्य गोमंतकीयांना ग्रासणारे विषयांवर बोलण्यास त्यांना वेळ नसल्याची भावना सध्या जनतेची बनू लागली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची पोर्तुगालच्या महावाणिज्य दूत मॅन्युएला फ्रॅंको यांनी भेट घेतली व त्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले. आता, या भेटीतून काय निष्पन्न झाले, हे पुढे कळेलच. त्यानंतर कॉंग्रेसच्या एका गटाला घेऊन युरी आलेमाव व एल्टन डिकोस्तांनी म्हापशात मिलाग्रीस सायबीण व शिरगांवात लईराई देवीचे दर्शन घेतले, ते फोटोही सर्वत्र झळकले. मागील चार वर्षे युरी आलेमाव सर्व सुखसोयींचे विरोधी पक्षनेतेपद भूषवीत आहेत. परंतु, शिष्टाचारानुसार त्यांना एखाद्या देशाचे कोणी राजदूत कधी भेटले नव्हते. कुठल्याही उत्सवात काँग्रेस नेते कधी सहभागी होत नव्हते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून हे फोटोसेशन सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली, हे यानिमित्ताने सांगणे गरजेचे. ∙∙∙

‘न बोली, न सेवा!’ ‘रुग्णवाहिका’ कागदावरच!

प्राण्यांसाठी अत्यावश्यक मानली गेलेली ‘ॲनिमल ॲम्ब्युलन्स’ योजना पुन्हा एकदा कागदोपत्रीच धूळ खात बसली आहे. कारण काय तर या योजनेसाठी एकही बोलीदार पुढे आला नाही! आता प्रशासनाने नव्याने टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, “आधीच उशीर, त्यात पुन्हा उशीर” हीच खरी योजना असल्याचं चित्र दिसतंय. प्रश्न असा की, योजना आखताना जमिनीवरील वास्तवाचा विचार झाला होता का? की फक्त घोषणांच्या गजरातच समाधान मानलं गेलं? प्राण्यांच्या आपत्कालीन सेवेसारख्या संवेदनशील विषयावरही ‘कोणी येईलच’ या आशेवर सगळं सोपवणं, ही तर प्रशासकीय दूरदृष्टीची कमालच म्हणावी लागेल. दरम्यान, जखमी-आजारी प्राणी मात्र वाट पाहत आहेत. रस्त्यावर, शेतात, गल्लीबोळात. त्यांना ना टेंडरची भाषा कळते, ना प्रक्रिया. त्यांना हवी आहे ती वेळेवर मदत. पण इथे तर ‘नो बिडर्स’मुळे ‘नो सर्व्हिस’ हीच नवी शासकीय नीती दिसतेय. आता पुन्हा टेंडर निघेल, पुन्हा कागदी फाईल्स फिरतील, पुन्हा बैठका होतील आणि कदाचित पुन्हा तोच निकाल! तोपर्यंत प्राण्यांची सेवा ही फक्त घोषणांपुरतीच मर्यादित राहणार का, हा खरा प्रश्न आहे. योजना जाहीर करताना जी गती दाखवली जाते, तीच गती अंमलबजावणीतही दिसली, तर कदाचित ‘ॲम्ब्युलन्स’ शब्दाला तरी न्याय मिळेल! नाहीतर, ही योजना देखील ‘ॲम्ब्युलन्स’पेक्षा ‘ॲम्ब्युलन्सची वाट पाहणारी’च ठरणार... ∙∙∙

अर्ज आधी ‘चेक’ मग ‘इनवर्ड’!

मडगावच्या लेबर डिपार्टमेंटमध्ये सध्या एक भन्नाटच “नवीन पद्धत” सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. इथे म्हणे इनवर्ड घेणारा कर्मचारी फक्त अर्ज घेत नाही, तर आधी तो अर्ज बारकाईने बघतो, तपासतो आणि मगच ठरवतो. घ्यायचा की परत पाठवायचा! अर्थात, हा “अर्ज परीक्षण विभाग” नेमका कधी सुरू झाला, याचे कोणाकडे उत्तर नाही. आता लोकांमध्ये प्रश्न एकच चर्चा आहे, की किती जणांना असे “पहिल्याच टप्प्यात” परत पाठवले जात असेल? आणि हे सगळं चालत असेल, तर मग ती व्यक्ती ‘इनवर्ड क्लर्क’ की ‘स्क्रीनिंग कमिटी’, हेच कळेनासं झालंय! दक्षिण गोव्यात सध्या हा एक सूर ऐकू येतोय, आज ही परिस्थिती असेल तर उद्या अर्ज देताना लोकांना आधी इंटरव्ह्यू द्यावा लागेल की काय? अशीही हलकीफुलकी चर्चा सुरू झाली आहे! ∙∙∙

मांडवीत काय होणार

राज्य सरकारने ग्रंथालय धोरणाला मंजुरी दिली. त्यात मांडवीत तरंगत्या ग्रंथालयाची तरतूद आहे. मांडवी नदीतील नौकेत हे तरंगते ग्रंथालय असेल. मांडवीत सध्या कसिनोवाहू नौकांची गर्दी आहे. शुक्रवारी दोन वेगवान फेरीबोटी पणजी बेती जलमार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी दाखल झाल्या आहेत. सहा नौका पर्यटकांना जलसफरीसाठी याच नदीत घेऊन जातात. त्याशिवाय तिसेक मच्छीमारी ट्रॉलर मालीम धक्क्यावर जागा नसल्याने नदीच्या पात्रातच नांगरल्या जातात. या भाऊ गर्दीत वाचनालय असलेल्या नौकेला जागा तरी मिळेल का याची चर्चा वेगळ्याच शैलीत सुरू झाली आहे. ∙∙∙

बोंडलातील नवे पाहुणे

बोंडला अभयारण्य मध्ये आता रंगांची उधळणच पाहायला मिळणार आहे! नूतनीकरणानंतर अभयारण्यात विदेशी मकाव पक्ष्यांचे आगमन झाले असून, पर्यटकांसाठी हा नवा आकर्षणबिंदू ठरणार आहे. लाल, निळे, पिवळे अशा उठावदार रंगांनी नटलेले हे मकाव आता बोंडलाच्या हिरवाईत अगदी रुळलेले दिसत आहेत. त्यांच्या किलबिलाटाने अभयारण्याचा माहोलच बदलून गेला आहे. जणू काही जंगलात छोटंसं “रंगीत कार्निव्हल”च भरलंय! नूतनीकरणामुळे प्राण्यांसाठी अधिक प्रशस्त आणि नैसर्गिक अधिवास तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे विदेशी पाहुणेही खुश, आणि त्यांना पाहायला येणारे पर्यटकही खुश! सेल्फीप्रेमींसाठी तर ही भन्नाट संधी “मकावसोबत फोटो” हा आता नवीन ट्रेंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, बोंडला अभयारण्यात आलेल्या या रंगीबेरंगी पाहुण्यांमुळे पर्यटनाला नवी झळाळी मिळणार, यात शंका नाही! ∙∙∙

हिंदी पुस्तक बारावीचे, मुखपृष्ठ अकरावीचे!

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हल्लीच अभिव्यक्ती - २ हे हिंदी गद्य पद्य संग्रह प्रसिद्ध करुन बाजारात विक्रीस उपलब्ध केला आहे, मात्र यात सुद्धा शिक्षण मंडळाच्या अनागोंदी कारभाराचा अनुभव सध्या पुस्तक विक्रेते व पालकांना होत आहे. अभिव्यक्ती -२ हिंदी पुस्तक जरी बारावीसाठी असले तरी मुखपृष्ठ ‘कक्षा ग्यारहवी के लिए हिंदी’ (द्वितीय भाषा) की पाठ्यपुस्तक असे छापल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. जे मुखपृष्ठ आहे, ते सुद्धा तीन वर्षांपूर्वीचे असे पालकांतर्फे सांगण्यात येते. विद्यार्थी, पालक मुखपृष्ठ पाहूनच विक्रेत्यांना हे पुस्तक परत आणून देत आहेत. त्यामुळे नंतर त्यांना समजावण्यास विक्रेत्यांना नाकीनऊ येत आहे. शिक्षण मंडळातर्फे पुस्तकांच्या बाबतीत हयगय होत असते, हा अनुभव आहे. कदाचित छपाईवाल्याची ही चूक असू शकते. तरी मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे ना, बारीक सारीक चुकांकडे लक्ष द्यायला नको का? असे विद्यार्थी व पालक मंडळाला दोष देताना दिसतात. ∙∙∙

काय करायचे बुवा?

फोंडा पोटनिवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर केतन भाटीकर यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता यासंबंधीची सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयाने सर्व संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे काही ना काही तरी निकाल लागेल, अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने नोटिसा बजावल्यामुळे कदाचित निवडणूक झाली तर काय? या शंकेने उमेदवारांसहित या उमेदवारांच्या राजकीय पक्षांना ग्रासले आहे. कारण निवडणूक रद्द होऊन आता पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता कदाचित निवडणूक घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला, तर पुन्हा एकदा मतदारांच्या गाठीभेटी घ्याव्या लागतील आणि आता तर प्रचंड उकाडा. त्यामुळे करायचे काय बुवा, हीच भीती या लोकांना ग्रासली आहे. ∙∙∙

योगायोगाचा खेळ?

अखेर खट्टरला अटक झाली आणि त्यानंतर राज्यात चर्चांना अक्षरशः उधाण आलं. पण खरी रंगत तर त्या टाइमिंगमध्येच आहे! म्हणे, ही अटक साधी नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या “स्पेशल मुहूर्तावर”च पार पडली. आता हा सगळा प्रकार आधीच ठरवलेला ‘गिफ्ट प्लॅन’ होता की फक्त योगायोगाचा भन्नाट खेळ, हे मात्र कोडंच आहे. राजकारणात वेळ साधणं ही एक कला असते म्हणतात आणि इथे तर ती कला अगदी परफेक्ट दिसतेय, अशी मिश्कील चर्चा रंगली आहे. काहीजण म्हणतात, पोलिसांना आधीच ग्रीन सिग्नल होता, फक्त केक कापायची वाट पाहत होते! आता खट्टरला गोव्यात आणणार, पण खरी मजा ही अटकेपेक्षा ‘टायमिंग’मध्येच आहे, असं राजकीय वर्तुळातल्या लोकांचं देखील म्हणणं आहे. योगायोग असो वा प्लॅनिंग, वाढदिवस मात्र लक्षात राहिला, हे नक्की! ∙∙∙

कलाकारांनी शहाणे व्हावे!

कला अकादमीचे नाट्य परीक्षकांना लाच प्रकरण ऐरणीवर आलेले दिसतं. ‘देर है अंधेर नही!’ हे खरं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने फाईल महाराष्ट्र सरकाराच्या स्वाधीन केली आहे. असली लाच प्रकरणे म्हणजे प्रथा बनून गेली आहे. त्यावर नियंत्रण, निर्बंध हवे.‘गोमन्तक’नेच याला वाचा फोडून आता पाठपुरावा बातमी दिली. विहीरीत पडूनही गटांगळ्या खात लोकांना दुषणं दिली म्हणून निर्दोषता सिध्द होत नाही. मुळातच जी अब्रू गेली, ती ‘मेकअप’चा लेप मुलामा लावून परत चकाकी आणू शकते का? कलेचे अधिष्ठान सत्यावर असते. मग्रुरी, माज यामुळे मनुष्य अंध होतो. स्थानिक पातळीवर राजकारण्यांच्या मदतीने असत्य जरी कितीही पाण्यात दाबलं, तरी ते सत्य वेळ पक्व झाल्यावर योग्य ऋतूत वर तरंगतं. कथित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी, कारवाई अटळ दिसते यावरून इतर भानगडखोर कलाकारांनी धडा घेणं उचित व शहाणपणाचं ठरेल. ∙∙∙

मंत्र्यांच्या खुर्चीचीच चर्चा!

झेवियर यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य खट्टर यांना थेट पोलिसांपर्यंत घेऊन गेले खरे; पण त्याचा ‘इफेक्ट’ आता मंत्री गुदिन्हो यांना जास्त जाणवू लागला. खट्टर तर जेरबंद झाले, त्यामुळे लोकांचा राग कदाचित थोडा शांत झाला.पण खरी ‘टांगती तलवार’ मात्र मावीन यांच्या खुर्चीवर आहे. त्यांची अवस्था म्हणजे ‘केले एकाने आणि भरले दुसऱ्याने’ अशीच झाली आहे. व्यासपीठावर गप्प बसणे, महागात पडले. मावीन आपली खुर्ची वाचवण्यात यशस्वी होतात की नाही, हा मोठा यक्ष प्रश्न आहे! कारण लोकांचा दबाव हा त्यांना मंत्रिपदावरून हटवावे, यासाठीच आहे. ∙∙∙

राजेश वेरेकर ‘फॉर्मात?’

फोंड्याची पोटनिवडणूक रद्द होण्याचा सर्वात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर तो फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांना. ही पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी मालगाडी सारखे चालणारे त्यांचे कार्य आता रद्द झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राजधानी एक्सप्रेसच्या वेगाने धावताना दिसायला लागले आहे. काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्याशी संपर्क साधण्याबरोबरच त्यांनी पत्रकार परिषदांचाही धमाका उडविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फायदा त्यांना किती होतो, हे भविष्यात कळेलच पण येत्या निवडणुकीत राजेश एक प्रभावी समीकरण म्हणून उभा राहू शकतो, अशी शक्यता मात्र दिसू लागली आहे, एवढे निश्चित. शेवटी ‘इसको बनाना उसको मिटाना यही है राजनीती की रीत!’ हेच खरे. म्हणूनच तर काल परवापर्यंत कोणाच्या खिजगणतीत नसणारा राजेश सध्या ‘टॉक ऑफ द टाऊन’ बनायला लागला आहे. आणखी काय पाहिजे, नाही का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT