Goa Politics: खरी कुजबुज; चर्चा ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याच्या सुट्टीची

Khari Kujbuj: मिराबाग येथे बंधारा प्रकल्‍प उभारण्‍यात येणार नसल्‍याचे तोंडी आश्‍‍वासन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्‍यानंतर तेथील स्‍थानिकांनी गेल्‍या ४९ दिवसांपासून चालवलेले आंदोलन मागे घेतले.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

चर्चा ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याच्या सुट्टीची!

कुडचडेतील सोहम नाईक प्रकरण सध्या इतकं गाजतंय, की लोकांना गुन्ह्यापेक्षा ‘सुट्टी’च जास्त संशयास्पद वाटू लागली आहे! या प्रकरणात तपास करणारा एका पोलिस अधिकारी म्हणे अचानक रजेवर गेला. प्रकरण गरम आहे म्हणून अधिकारी थंडगार सुट्टीवर गेले की काय? साहेब म्हणजे माध्यमांशी गप्पा मारत पारदर्शकता दाखवणारे अधिकारी म्हणून ओळख. त्यामुळे लोक म्हणतात, जे बोलके होते तेच अचानक शांत कसे? दरम्यान, नवीन साहेबांची एन्ट्री झाली खरी, पण तपास नेमका कुठे चाललाय याचा पत्ता मात्र कुणालाच नाही. पोलिस मात्र नेहमीप्रमाणे ‘तपास सुरू आहे’ या एका वाक्यातच सगळी उत्तरं देत आहेत. पण लोकांचं म्हणणं आहे की, ‘तपास सुरू आहे हे कळतंय, पण नेमकं काय सुरू आहे हेच कळत नाही!’ आता पुढे काय सत्य बाहेर येणार की, आणखी एखादी ‘सुट्टी’ जाहीर होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय! ∙∙∙

माघार विधानसभा निवडणुकीसाठीच!

मिराबाग येथे बंधारा प्रकल्‍प उभारण्‍यात येणार नसल्‍याचे तोंडी आश्‍‍वासन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्‍यानंतर तेथील स्‍थानिकांनी गेल्‍या ४९ दिवसांपासून चालवलेले आंदोलन मागे घेतले. स्‍थानिकांनी आंदोलन तीव्र करीत पणजीतील आझाद मैदानाला धडक देण्‍याचा इशारा दिल्‍यानंतर आझाद मैदानावर आधीच कडेकोट पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला. त्‍यानंतर मुख्‍यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेत त्‍यांच्‍या मागण्‍या मान्‍य केल्‍या. एकंदरीत, चिंबलनंतर मिराबागमधील स्‍थानिकांच्‍या आंदोलनासमोरही सरकार झुकल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच सरकार असे निर्णय घेत असल्‍याच्‍या चर्चा राज्‍यभरात सुरू झालेल्‍या आहेत. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान !

‘उताराचो मनीस’ असा कोकणीत एक वाक्प्रचार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वाक्प्रचाराचा अनुभव जनतेला करून दिला. मीराबाग बंधाऱ्यावरून तेथील स्थानिक गेल्या दीड महिन्यापासून धरणे आंदोलन करत होते. मीराबाग बंधारा होणार नाही, असे आश्वासन देऊनही आंदोलन मागे घेण्यात आले नव्हते. मंत्री सुभाष फळ देसाई, सुभाष शिरोडकर व सभापती गणेश गावकर यांनी शब्द देऊनही जनता लेखी आदेशाची मागणी करीत होती. काल मुख्यमंत्री सांगे आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यास आले असताना आंदोलन आणखी चिघळले होते. पत्रकारांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी मीराबाग येथे बंधारा होणार नाही, असा जाहीर शब्द आंदोलकांना दिला.आपण शब्द दिला असताना लेखी आश्वासनाची गरज नाही, असे सांगताच मीराबागच्या लोकांनी मुख्यमंत्र्याच्या शब्दाला मान देऊन आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्रीही जिंकले आणि मीराबागची जनताही हरली नाही, मुख्यमंत्र्यानी काढलेला सुवर्णमध्य फळास आला. ∙∙∙

हट्टी सुभाष !

हट्टी असणे वाईट असते का? ध्रुव बाळाच्या हट्टामुळे ध्रुव तारा जन्माला आला. आर्यभट यांच्या हट्टामुळे शुन्याचा शोध लागला. आणि पेय जल मंत्री सुभाष फळ देसाई यांच्या हट्टामुळे सांगे आरोग्य केंद्राची भव्य इमारत अस्तित्वात आली, असे आम्ही नव्हे खुद्द आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले. सुभाष फळ देसाई हे हट्टी असून त्यांच्याच हट्टामुळे सांगे आरोग्य केंद्राची आलिशान इमारत उभी झाल्याची कबुली आरोग्य मंत्र्यांनी दिली. तसे सुभाष हट्टीच. हट्टी स्वभावामुळे पंच पासून मंत्रिपदापर्यंत पोहचू शकले. हट्टी स्वभावामुळे सांगे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारू शकले. हट्टामुळेच त्यांना पेयजल मंत्रिपद प्राप्त झाले. सांगेच्या रखडलेल्या पुलाच्या कामासाठी सुभाष रावांचा हट्ट कामी येवो, अशी सांगेकरांची रास्त अपेक्षा आहे. ∙∙∙

सांकवाळमधील नाट्य

सांकवाळमध्ये सरपंच आणि उपसरपंचावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव बराच चर्चेचा ठरला आहे. या पंचायतीमध्ये सत्तांतर घडवण्यामागे कोणाचा हात असावा याची रसभरीत चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. या ना त्या कारणाने ही पंचायत गाजत आली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही पंचायत ताब्यात घेण्याची कोणाला गरज पडली आहे, याची कारणे राजकीय वर्तुळात पुढे केली जात आहेत. यामुळे अविश्वास ठराव तरी सरपंच व उपसरपंचाविरोधात असला तरी त्यामागे अख्ख्या विधानसभा मतदारसंघाचे राजकारण दडले असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; आधी घ्यायचा फायदा; नंतर...!

एजन्‍सी रोहितचे ऐकणार?

सोमवारी महापौरपदाची शपथ घेतल्‍यानंतर रोहित मोन्‍सेरात यांनी निवडणूक काळात पणजीतील जनतेला दिलेली आश्‍‍वासने पूर्ण करण्‍याची तसेच हॉटमिक्‍स डांबरीकरण केलेल्‍या पणजीतील रस्‍त्‍यांची खोदाई होऊ न देण्‍याची हमी दिली. अशीच हमी सार्वजनिक बांधकाम खात्‍याचा (पीडब्‍ल्‍यूडी) कारभार हाती असताना मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. त्‍यानंतर खात्‍याचे मंत्री बनलेले दिगंबर कामतही हीच ग्‍वाही वारंवार देत आहेत. परंतु, अंतर्गत वाहिन्‍या टाकणाऱ्या काही एजन्‍सी लोकप्रतिनिधींच्‍या या हमींकडे दुर्लक्ष करीत असल्‍याने त्‍या आता रोहित मोन्‍सेरात यांचे ऐकणार का? असा सवाल पणजीतील जनतेकडून उपस्‍थित केला जात आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; विजयचे एका दगडात अनेक पक्षी

कुणाची खुर्ची, कुणाला!

महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव नगरसेवक झाले, असले तरी ते अनुभवाने कमी आहेत. सोमवारी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणूक व शपथविधीवेळी ज्या जागांवर नव्याने व पुन्हा निवडून आलेले नगरसेवक बसले होते, ते पाहता माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांनी सुरेंद्र फुर्तादो यांची खुर्ची मिळवल्याचे दिसले. त्याशिवाय सुरेंद्र यांच्या पत्नी रूथ फुर्तादो या सुरेंद्र यांच्या शेजारीच बसत असल्याने त्यांची जागा माजी महापौर तथा नगरसेविका कॅरिलिना पो या बसल्या होत्या. त्यामुळे पुढील पाच वर्ष दोन्ही ज्येष्ठ नगरसेवक पुढील पाच वर्षे फुर्तादो दाम्पत्याच्या जागी बसलेले दिसणार आहे, असे वाटते. यापूर्वी मडकईकर ज्या ठिकाणी बसत होते येथे कबिर पिंटो मखिजा बसलेले दिसले. त्यामुळे नगरसेवकांनी जी खूर्ची मिळवली ती पुढच्या वेळी कायम राहील, हे स्पष्ट दिसते. कदाचित ही ‘कुजबूज’ प्रसिद्ध झाल्यानंतर पुढच्या बैठकीला नगरसेवक दुसऱ्या जागी वसलेले दिसतील, यात तेच तर नवल असणार आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com