

मुख्यमंत्री उपचार घेऊन परत आल्यानंतर त्यांच्या ‘एनर्जीची लेव्हल’ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या म्हणे. काही दिवसांपूर्वी ‘आराम’ मोडमध्ये असलेले मुख्यमंत्री आता थेट ‘ॲक्टिव्ह’ मोडमध्ये दिसू लागलेत! कला अकादमीतील कार्यक्रमात तर ते इतके फ्रेश दिसत होते की काहीजण हळूच म्हणाले ‘हे उपचार होते की फुल रिचार्ज पॅकेज?’ राजकीय भेटीगाठी आणि कार्यक्रमांचा सपाटा पाहता आता मुख्यमंत्री पुन्हा मैदानात उतरलेत हे स्पष्टच दिसतंय. आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून कार्यकर्त्यांमध्येही नवसंजीवनी आली आहे म्हणे. काही जाणकार तर मिश्किलपणे बोलू लागलेत ‘मुख्यमंत्री रिचार्ज झाले म्हणजे आता पोटनिवडणुकीचं नेटवर्कही फुल सिग्नलवर जाणार!’ एकंदरीत, मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारतेय आणि त्याचबरोबर पक्षाचंही ‘पल्स’ वाढताना दिसतंय... आता निकालाच्या दिवशी हा आत्मविश्वास किती टक्के ‘चार्ज’ राहतो, हेच बघायचं बाकी! ∙∙∙
कुडचडेतील लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांची ‘स्कॅनिंग’ तर जोरात सुरू आहे म्हणे! पण माहिती मात्र इतकी फिल्टर केली जातेय की जनतेला काहीच दिसत नाही! लोक म्हणतात, मशीनपेक्षा जास्त ‘स्कॅन’ पोलिसच करतायत. काय सांगायचं, काय लपवायचं आणि किती दिवस थांबवायचं! अधिकृत माहिती द्यायची वेळ आली, की फाईल कुठे हरवते, की नेटवर्कच जातं, हे मात्र कुणालाच कळत नाही. दरम्यान, जनतेची उत्सुकता इतकी वाढली आहे की काहीजण तर म्हणू लागलेत ‘स्कॅनरमध्ये काय सापडलं हे सोडा, आधी माहिती कुठे अडकली ते स्कॅन करा!’ प्रसारमाध्यमांनाही आता थोडं हसू येऊ लागलंय म्हणे, कारण बातमीपेक्षा ‘माहिती न मिळणं’ हीच मोठी बातमी बनली आहे. आता पुढे काय होणार? पोलिस स्वतःहून माहिती देणार की सोशल मीडियावर ‘#काय_चाललंय_पोलिसांनो?’ असा ट्रेंड व्हायरल झाल्यावरच जाग येणार? ∙∙∙
फोंड्याच्या पोटनिवडणुकीत सध्या ‘आप’विरुद्ध काँग्रेस असाच रागरंग दिसतो आहे. ‘आप’चे उमेदवार गीतेश नाईक यांच्या उमेदवारीविरुद्ध काँग्रेसवाल्यांनी हरकत घेतल्यानंतर गीतेश नाईक बचावले असले तरी आता ‘आप’वाल्यांनी आता सूड घ्यायला सुरवात केली असल्याचेच चित्र सध्या तरी दिसत आहे. ‘मगो’चे फोंड्यातील नेते केतन भाटीकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी ‘मगो’चे फोंड्यातील कार्यकर्ते भाटीकर यांच्यासमवेत प्रचारासाठी फिरत असल्याचे सचित्र ‘आप’वाल्यांनी दाखवून दिले आहे. एकीकडे सत्तेत भाजप आणि मगो सहभागी आहेत, त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मगोने पाठिंबा देणे क्रमप्राप्त आहे, मात्र ‘मगो’कडून सध्या तोंडदेखलेपणा चालला असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. ∙∙∙
फोंडा येथे येत्या ६ एप्रिल रोजी होणार असलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जरी ४ मे रोजी जाहीर होणार असले तरी राजकीय पंडित त्या निकालाचे आपल्यापरीने आडाखे बांधताना दिसतात. वृत्त वाहिन्यांवरूनही त्याबाबत वेगवेगळी चर्चा चाललेली पहायला मिळते. अनेकजण त्यावेळी २०२२ मध्ये रवी नाईक केवळ ७७ मतांच्या फरकाने जिंकल्याचेही सांगतात. पण एक गोष्ट विसरतात की त्यावेळी ते भाजपा उमेदवार होते व रिंगणात ‘मगो’ चा वेगळा उमेदवार होता. यावेळी ते भाजपा व ‘मगो’ युतीचे उमेदवार आहेत याकडे दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न त्यांचे समर्थक करतात.आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत चार हजार नावे वगळलेली असून त्याचा लाभ कोणाला मिळेल हो, असा सवालही करतात. कारण अशा प्रकारे वगळली गेलेली मते कोणाची आहेत, ते स्पष्ट झालेली आहेत हे ते म्हणे आवर्जून सांगतात. ∙∙∙
फोंडा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे कोणताही गाजावाजा न करता कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळी मतदारसंघात अनेक विकासकामांचा शुभारंभ केला आहे. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात भव्य असे नागरी आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम सुरू झाले आहे. कुंकळ्ळी चिफ्टेनस हुतात्मा स्मारकाचे पुनर्निर्माण कामास प्रारंभ झाला आहे.सगळ्या प्रभागात हॉटमिक्सिंग कामास सुरुवात झाली आहे. शिवाय फुटसाल मैदानाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्याच बरोबर मतदार संघातील पाच पंचायत क्षेत्रात विकासकामांना सुरवात झाली आहे.आता युरी यांची ही विकासकामे निवडणुकीच्या तोंडावर सुरू झाल्याने याचा फायदा युरी आलेमाव यांना निश्चितच होणार. आता युरी आलेमाव यांनी गेल्या पाच वर्षात काय केले? हा प्रश्न विचारण्याचे धाडस कोणाला होणार नाही. ∙∙∙
महापौर-उपमहापौरपदाचे शुक्रवारी सकाळी ११ वा.ची अर्ज भरण्याची वेळ होती. परंतु महापौर रोहित मोन्सेरात हे २०-२५ मिनिटे उशिरा आले. तोपर्यंत जे नगरसेवक आले होते, त्यांनी महापौरांच्या केबिनमध्ये गप्पागोष्टी करायला सुरुवात केली होती. दहा ते बारा नगरसेवकांनी कक्षात आपापसात चर्चा करण्यावर भर दिल्याचे दिसत होते. रोहित मोन्सेरात आल्यानंतर सर्वजण दुसऱ्या मजल्यावरील ‘एओ’च्या केबिनकडे निघाले आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडली. महापौरांनी नेहमीच्या शैलीत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले. हा सर्व नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर महापौरांच्या कक्षेत सर्व नगरसेवक जमले. बंद दाराआड सर्वजण जमल्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली. काही वेळानंतर या जमलेल्या नगरेसवकांनी म्हणे आपापल्या प्रभागातील मान्सूनपूर्व कामे सूचित केली. आता महानगरपालिकेच्या बैठकीत मांडायचे विषय नगरसेवकांनी महापौर-उपमहापौर निवडीपूर्वीच मांडल्याची चर्चा सायंकाळी उशिरापर्यंत महानगरपालिकेत सुरू होती. ∙∙∙
दोन दिवसांपूर्वी झालेली म्हापसा पालिकेची बैठक चांगलीच गाजली. या बैठकीत नगरसेवक एकमेकांवर वैयक्तिक टीका करताना दिसले. विशेष म्हणजे, सत्ताधारी आणि विरोधी गटातील काही नगरसेवकांमध्ये एकी पाहायला मिळाली आणि त्यांनी मिळून उपनगराध्यक्षांना धारेवर धरले. ज्या पद्धतीने पालिका सभागृहाचे रूपांतर जणू ‘मैदानात’ झाले होते, ते पाहता हा सर्व पूर्वनियोजित डाव असल्याचे स्पष्ट जाणवत होते! या घटनेमुळे सत्ताधारी गटात ताळमेळ नसल्याचे आणि प्रत्येक जण केवळ स्वतःच्या राजकीय हितासाठी काम करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत जेव्हा सत्ताधारी गट आपले पॅनेल उभे करेल, तेव्हा त्यांची खरी कसोटी लागणार आहे. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो, हेच या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.