Goa Politics: भाजप-मगोच्‍या युतीवर अनेकांचे भवितव्‍य, पेडणेत बाबूंची डरकाळी; संयमी राजन कोरगावकरांनी रोवली पाळेमुळे

BJP MGP alliance Goa politics: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पेडणे मतदारसंघातील राजकीय समीकरणांबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः भाजपची उमेदवारीबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.
BJP MGP alliance Goa politics
BJP MGP alliance Goa politicsDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पेडणे मतदारसंघातील राजकीय समीकरणांबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः भाजपची उमेदवारीबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.

भाजपचे विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, कला आणि संस्कृती खात्याचे माजी उपसंचालक मिलिंद माटे, तसेच डॉ. उदय कुडाळकर व डॉ. संजय कोरगावकर हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. भूमिपुत्र म्हणून भाजपचे निष्ठावंत मंडळाध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांचेही नाव घेतले जात आहे.

पेडणे मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असल्यामुळे राजकीय पक्ष स्थानिक भूमिपुत्राला उमेदवारी देण्यास मागेपुढे करत नाहीत. मागील निवडणुकीत काँग्रेसने ॲड. जितेंद्र गावकर यांना उमेदवारी दिली होती.

कोरगावात जन्मलेले मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर मगोतर्फे रिंगणात उतरले होते. कामाच्या निमित्ताने ते मडगावात राहत होते; तरी त्यांनी साडेनऊ हजाराहून अधिक मते मिळवून लक्ष वेधले होते. येत्‍या निवडणुकीत मगो व भाजप यांची युती होते की ते स्‍वतंत्र लढतात यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

डॉ. संजय कोरगावकर यांनी मागील सहा महिन्यांपासून विविध स्पर्धा व कार्यक्रमांतून आपली उपस्थिती दर्शवत आहेत, यासाठी लाखो रुपये खर्च करताना दिसत आहेत. भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर हे प्रमुख दावेदार असून ते लोकांना मदत करत आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी इतर इच्छुकांनी कंबर कसली आहे. सध्या सत्तेच्या विरोधात जाण्यास कोणी तयार नसल्यामुळे सर्वांना भाजपच्या उमेदवारीची अपेक्षा आहे.

BJP MGP alliance Goa politics
Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

लोकही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या मागे उभे राहतात. तसेच सत्तेविरोधात उभे राहिल्यास सूडाचे राजकारण होऊ शकते, त्यामुळे अनेकजण त्यापासून दूर राहतात. दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आमदार प्रवीण आर्लेकर, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर व डॉ. संजय कोरगावकर यांनी महिला मेळावे आयोजित करून महिला मतदारांना आपलेसे करण्‍याचा प्रयत्न केला. या मेळाव्यांना महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला मतदार पेडणेचे भविष्य ठरवू शकतात.

गावस, कलशावकर यांची भूमिका महत्त्वाची

पेडणेतील निवडणुकीत माजी सरपंच तुळशीदास गावस यांची भूमिका लक्षवेधी ठरते. त्‍यांची अशी काही मते आहेत. तसेच धारगळचे माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण हरमलकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

उमेदवारांचे कार्यालय: अनेक उमेदवार लोकसंपर्कासाठी प्रमुख ठिकाणी कार्यालय उघडतात. निवडून आल्यावरही ही कार्यालये सुरू ठेवली जातात. ‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगावकर हे २०२२ च्या निवडणुकीत पराभूत झाले, तरी त्यांनी आपले कार्यालय बंद केले नाही; आजही ते सुरू आहे. उलट, पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी आपले कार्यालय बंद केले होते. नुकतेच ते पुन्हा सुरू करण्‍यात आले आहे.

‘आपण जनतेसाठी काम केले असल्यामुळे भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळेल. माझा पक्षावर विश्‍‍वास आहे. केलेल्‍या कामांची मला पोचपावती मिळेल. त्‍याबद्दल मी निश्‍चिंत आहे. - प्रवीण आर्लेकर, विद्यमान आमदार

BJP MGP alliance Goa politics
Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

‘समाजकारणासाठी राजकारण महत्त्‍वाचे ठरते. माझ्‍याकडे कोणतेही पद नाही. परंतु नेहमीच मी जनतेशी कनेक्‍ट कायम ठेवला. सद्‌विचार, कृतीचा पुरस्‍कार केला. येत्‍या निवडणुकीत मला यश मिळेल. - राजन कोरगावकर, मिशन फॉर लोकल

जनतेची कामे करण्‍यासाठी दमदार नेतृत्‍व लागते. दम लागतो. माझ्‍या कार्यकाळात पेडणेवासीयांनी ते अनुभवले आहे. मी त्‍यांच्‍या सेवेत कायम आहे. पुढील टर्म माझीच असेल, अशी मला खात्री आहे. - मनोहर आजगावकर, माजी आमदार

प्रवीण आर्लेकर

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मतदारसंघातील आपला प्रभाव कायम ठेवला आहे. विविध पंचायत क्षेत्रांतील विकासकामांना त्यांनी चालना दिली आहे. तसेच महिला गट, कला, क्रीडा व अन्य संस्थांना पाठबळ दिले आहे. मतदारसंघातील बेरोजगारी तसेच पाणी, वीज, रस्ते यासारख्या प्रश्नांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, ते शांत असल्‍याने मागे पडतात, अशी विरोधक त्‍यांच्‍यावर टीका करतात. तथापि, त्‍यांना मानणारा एक वर्ग आहे. त्‍यांच्‍या मते आर्लेकर पुन्‍हा प्रचंड मतांनी विजयी होतील.

राजन कोरगावकर

शांत, सुस्‍वभावी राजन कोरगावकर यांचे ‘मिशन फॉर लोकल’तर्फे भरीव कार्य राहिले आहे. महिला व युवा उत्‍थानाचे त्‍यांचे लक्ष्‍य आहे. अनेक आरोग्‍य सेवाही त्‍यांनी गरजूंना पुरवल्‍या आहेत. समाजात संस्‍कारी पिढी घडावी, अशा हेतूने त्‍यांची मार्गक्रमणा राहिली आहे. गेल्‍या विधानसभा निवडणुकीत त्‍यांचा केवळ ३,४१८ मतांनी पराभव झाला. यावेळी भाजप व मगोप युती होते का? आणि झाल्‍यास पेडणेची जागा कुणाला मिळते, यावर बरेच गणित अवलंबून आहे. अर्थात कोरगावकर यांनी पुढील निवडणूक लढण्‍याची पुरती तयारी केली आहे.

बाबू आजगावकर

गोव्‍याच्‍या राजकारणात मनोहर उर्फ बाबू आजगावकर हे महत्‍वाचे मोहरे मानले जातात. बेधडक नेतृत्‍व अशी त्‍यांची ख्‍याती आहे. त्‍यांना राजकारणाचा गाढा अभ्‍यास आहे. राजकीय क्षेत्रातील त्‍यांनी दोन पिढ्या पाहिल्‍या आहेत. हात लावीन तेथे सोने करण्‍याची धमक त्‍यांच्‍यात असल्‍याचे त्‍यांचे चाहते सांगतात. आजगावकर यांना भाजपकडून तिकिटाची अपेक्षा आहे. तसे न झाल्‍यास ते अपक्ष म्‍हणूनही पेडणेतून लढू शकतात. तूर्त संपर्क कार्यालय सुरू करून त्‍यांनी लोकांशी नाळ अधिक घट्ट करण्‍याचा प्रयत्‍न चालवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com