

फोंडा पोटनिवडणुकीची रंगत वाढत चालली असताना एक गोष्ट मात्र भाजपला आता अगदी पक्की समजली आहे विश्वनाथ दळवी खूष तरच विजय निश्चित. त्यामुळेच सध्या पक्षात दळवींना शांत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू झाली आहे. ‘आपल्यावर अन्याय झाला’ असे सांगत दळवीबाब नाराज आहेत आणि त्यांना खूष करण्यासाठी पक्षाचे मोठे नेते अक्षरशः धावपळ करत आहेत. आता तर चर्चा अशी रंगली आहे की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुण्याहून परतल्यावर विश्रांती वगैरे बाजूला ठेवून थेट दळवींच्या भेटीला जाणार आहेत. यात खरा ट्विस्ट म्हणजे दळवींना मिळणारी मोठ्ठे ‘गिफ्ट’. पण हे गिफ्ट नेमके काय?, मोठे पद? २०२७ ची उमेदवारी? की अजून काही गुपित पॅकेज?. हा सस्पेन्स इतका वाढलाय की भाजप कार्यकर्त्यांपासून सामान्य गोमंतकीयांपर्यंत सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. आता फक्त गिफ्ट उघड होण्याची वाट सगळे पाहत आहेत. ∙∙∙
सध्या गॅस सिलिंडरचा असा काही लपंडाव सुरू आहे की, लोक म्हणतात गॅस मिळणे म्हणजे लॉटरी लागल्यासारखंच झालंय! हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवाल्यांची तर अवस्था ‘गॅस नाही तर धंदा नाही’ अशी झाली आहे. कर्मचाऱ्यांचा पगार, भाजीपाला, वीजबिल सगळं तयाय, पण सिलिंडर नाही. त्यामुळे काहींनी ‘गॅस शोध मोहीम’ सुरू केल्याचीही चर्चा आहे. कुणी ओळखी लावतोय, कुणी फोनवर फोन करतोय तर कुणी म्हणे ‘जुगाड’ लावतोय. गावोगावी एक नवा शब्द ट्रेंडमध्ये आलाय ‘ब्लॅक मार्केट’. या मार्केटमध्ये सिलिंडर दुप्पट किमतीने विकला जातोय. सरकारी गोडाऊनमध्ये सिलिंडर नाहीत, पण ब्लॅकमध्ये कसे काय मिळतात? हा प्रश्न आता चहाच्या टपऱ्यांपासून सोशल मीडियापर्यंत विचारला जात आहे. ∙∙∙
गोव्यात सध्या काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या आमदारांमध्ये ‘तू-तू मैं-मैं‘ सुरू असले तरी त्याचा फारसा परिणाम पक्षसंघटना व कार्यकर्त्यांवर झालेला दिसत नाही. शनिवारी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. वरद म्हार्दोळकर, युवक काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक तसेच गोवा फॉरवर्डचे संघटन सचिव दुर्गादास कामत हे सर्वजण एनएसयुआयचे राष्ट्रीय सरचिटणीस अहराज मुल्ला यांच्या निवासस्थानी एकत्र दिसले. दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो यांच्या वाढदिवसानिमित्त गोवा फॉरवर्डच्या अनेक नेत्यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्याचे कळते. त्यातच दुर्गादास कामत यांची काँग्रेसचे सरचिटणीस राजेश वेरेकर तसेच काँग्रेसचे फोंड्यातील उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्यासोबत निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बैठक झाल्याने पक्षसंघटना पातळीवर तरी ‘ऑल ईज वेल’ असेच दिसते. आता, आमदारांमधील कलगीतुरा कधी मिटतो ते पाहूया. ∙∙∙
गोव्यातील राजकारण, पावसाळा आणि हत्ती या तिघांचे वेळापत्रक कुणालाच कधी समजले नाही, असे आता लोक हसत-हसत म्हणू लागले आहेत. ‘ओंकार’ हत्ती पेडण्यातून बाहेरगावी गेला होता, तेव्हा काहींनी त्याला ‘महाराष्ट्राचा पाहुणा’ ठरवलं तर काहींनी ‘इतर राज्यातून आलेला व्हीआयपी’ म्हणत चर्चा रंगवली. आता म्हणे, दोन महिन्यांनी पुन्हा तोच ओंकार पुन्हा आलाय. पण गंमत म्हणजे हा खरा ओंकार की ‘ओंकार २.०’ यावर गावकऱ्यांमध्येच मतभेद. काही जण म्हणतात, हा आपलाच जुना ओंकार, तर काहींचा ठाम दावा नाही रे, हा दुसराच कलाकार, असा आहे. पुन्हा सरकारला निवेदन देऊन ‘हत्तीला परत पाठवा’ मोहीम सुरू होणार का? की ओंकार पुन्हा फुल ऑन टूर काढणार आणि मग लोक सरकारला धारेवर धरणार? एकूण काय, गोव्यात सध्या ‘हत्ती आला रे आला’ या ब्रेकिंग न्यूजपेक्षा ‘हा तोच का?’ हा मोठा प्रश्न झालाय. ∙∙∙
पणजीतून आगामी विधानसभेची निवडणूक आपण अपक्ष लढणार असे उत्पल पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल हे भाजपमध्ये येऊ शकतात. आम्ही सारे भाजपमध्ये एकत्र राहू शकतो, असे सांगून उत्कंठा वाढवली होती. मात्र पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ‘एकला चलो रे’ भूमिका घेतली तर लोकांचा पाठिंबा मिळतो, हे उत्पलनी अनुभवले आहे. महापालिकेच्या निमित्ताने सारे विरोधक एकवटल्याचे चित्र निर्माण झाले होते. तरी सारा भार उत्पल यांनाच घ्यावा लागला होता. विधानसभेच्या निमित्ताने सारे विरोधक एकत्र येतील का, याबाबत शंकाच आहे. सारे एकत्र आले तरी उत्पल यांच्यासारख्या अपक्षासाठी ते मतदारसंघ सोडतील का, हासुद्धा प्रश्न आहे. मात्र उत्पल यांनी आत्ताच ठाम भूमिका घेत पणजीतील मतदारांपर्यंत जो संदेश पोचवायचा आहे तो मात्र योग्य प्रकारे पोचवला आहे. ∙∙∙
फोंडा पोटनिवडणुकीसाठी भाजपने माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते विश्वनाथ दळवी यांचेही नाव रितेश नाईक यांच्यासोबत केंद्रीय समितीकडे पाठवले होते. त्यामुळे पक्ष घराणेशाहीकडे दुर्लक्ष करून आपल्या नावावर शिक्कामोर्तब करेल, असा ठाम विश्वास दळवींना होता. पण, लोकांच्या सहानुभूतीचा विचार करून भाजपने ही उमेदवारी रितेश यांनाच दिली. त्यामुळे दळवी आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज व आक्रमक झाले आहेत. खुद्द प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी समजूत काढल्यानंतरही दळवी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या चर्चेच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील काळातील राजकारणात आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचे असल्यामुळेच दळवी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी चर्चा फोंड्यात सुरू आहे. ∙∙∙
फोंडा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल होणार असले तरी राजकीय पक्षांनी ‘थांबून काय फायदा?’ असा विचार करत प्रचाराला आधीच सुरुवात केली आहे. म्हणजे आता निवडणूक प्रक्रियेलाही ‘फास्ट ट्रॅक’ मोड लागला की काय, अशीच चर्चा. भाजपकडून रितेश नाईक, काँग्रेसकडून केतन भाटीकर आणि ‘आप’कडून गीतेश नाईक यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. प्रचाराला रंग येत आहे. अजून अर्ज भरायचे आहेत, पण पोस्टर, बॅनर आणि भाषणांचा ओघ मात्र जोरात सुरू झालाय. या सगळ्या धावपळीत दोन पक्ष अजूनही ‘एंट्री कधी घ्यायची?’, या मूडमध्ये दिसत आहेत आणि ते म्हणजे आरजी आणि गोवा फॉरवर्ड. त्यांचा उमेदवार कोण, की ते कोणाला पाठिंबा देणार, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. आता गंमत अशी की, हे दोन्ही पक्ष भाजपविरोधी असल्याने काँग्रेस आणि ‘आप’ या दोघांच्याही नजरा त्यांच्या दिशेने लागल्या आहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.