ST Political Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Political Reservation: 'एसटी' आरक्षणाची ग्वाही; गोव्याच्या राजकारणात उलथापालथ? चार मतदारसंघांत नवी समीकरणे

Goa Assembly Constituency Reservation: सांगे, केपे, नुवे, प्रियोळ हे चार मतदारसंघ ‘एसटीं’साठी राखीव होण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

सांगे, केपे, नुवे, प्रियोळ हे चार मतदारसंघ ‘एसटीं’साठी राखीव होण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. त्‍यामुळे अनेकांना दिलासा, तसेच काहींना अपेक्षित धक्‍का बसणे स्‍वाभाविक आहे. संभाव्य आरक्षणामुळे कोणाचे राजकीय गणित जुळणार, कोणाची समीकरणे बिघडणार आणि नव्या संधी कुणासाठी खुल्या होणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा आढावा...

आगामी विधानसभा मुख्यमंत्र्यांच्या संकेतानंतर वेगवेगळ्या समीकरणांची शक्यता

मडगाव/फोंडा/काणकोण: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रियोळ, केपे, सांगे आणि नुवे हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव ठेवण्याचे संकेत दिल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या संभाव्य आरक्षणामुळे विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवारांसमोर नवे आव्हान उभे राहू शकते. प्रियोळमध्ये भाजपचे आमदार गोविंद गावडे आणि ‘मगो’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यात उमेदवारीवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ ‘मगो’ला सोडल्यास सुनील जल्मी यांचे नाव चर्चेत येऊ शकते. त्यामुळे भाजप-मगो युतीतील जागावाटपाचा प्रश्न गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे.

नुवेमध्ये प्रबळ ‘एसटी’ उमेदवारांचा अभाव असल्याने काँग्रेस आणि भाजपला नव्या चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागू शकतो. केपे आणि सांगेमध्येही माजी आमदार प्रकाश वेळीप व वासुदेव मेंग गावकर यांच्यासह अनेक इच्छुक सक्रिय होण्याची शक्यता आहे. या संभाव्य आरक्षणाचा परिणाम शिरोडा आणि कुडचडे मतदारसंघांतील राजकीय गणितांवरही होऊ शकतो. त्यामुळे आरक्षणाचा अंतिम निर्णय आणि त्यानंतरचे जागावाटप याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काणकोण मतदारसंघ ‘एसटीं’साठी राखीव होण्याची शक्यता कमी असल्याचे सरपंच सविता तवडकर यांनी सांगितले. त्यामुळे इच्छुक उमेदवार चेतन देसाई, इजिदोर फर्नांडिस आणि विजय पै खोत यांना दिलासा मिळाला आहे. युती न झाल्यास अपक्ष लढणार असल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

नेत्यांकडून कार्यकर्त्यांना सक्रिय करणे सुरू

१ केपे आणि सांगे हे दोन मतदारसंघ ‘एसटी’साठी राखीव झाल्यास बाबू कवळेकर आणि सुभाष फळदेसाई या दोघांना या मतदारसंघाची दारे बंद होतील. मात्र, माजी मंत्री प्रकाश शंकर वेळीप आणि माजी वासुदेव मेंग गावकर यांच्याकडून दावा सादर होण्याची शक्यता वर्तवली जात असून दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणे सुरू केले आहे.

२ याशिवाय केपे मतदारसंघातून भाजपचे कुशावती जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गावकर आणि खुशाली वेळीप यांच्याकडून दावा सादर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनचे निमंत्रक ॲड. जुआव फर्नांडिस यांचे नाव पुढे येऊ शकते. आमदार एल्टन डिकॉस्टा यांचे खंदे समर्थक मालू वेळीप यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

३ सांगे मतदारसंघात भाजप उमेदवारीवर माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांच्यासह माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, भाजप मंडळ अध्यक्ष सुभाष वेळीप, मळकर्णेचे माजी सरपंच राजेश गावकर यांच्यासह शशिकांत गावकर व मंत्री फळदेसाई यांचे स्वीय साहाय्यक सुहास देयकर यांच्याकडून दावे पेश होणार आहेत. काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार म्हणून सत्यवान गावकर यांना पुढे केले आहे व माजी आमदार प्रसाद गावकर हेही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एसटी राजकीय आरक्षणासंदर्भात आश्वस्त केले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. राजकीय आरक्षण हा आमचा हक्क आहे. मात्र, एका बाजूला आरक्षणाची प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या बाजूला या कायद्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सुनावण्यांमध्ये सरकारकडून सक्षमपणे बाजू मांडली जात असल्याचे जाणवलेले नाही. एसटी समाजाला दिलासा देण्यासाठी सरकार ज्या तत्परतेने प्रयत्न करत आहे, त्याच ताकदीने न्यायालयातही बाजू मांडावी, अशी आमची अपेक्षा आहे.

- रवींद्र वेळीप, ‘उटा’चे संयोजक

‘एसटी’ समाजाचे राखीव मतदारसंघ हे तेथील लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ठरतात. ज्या मतदारसंघात ‘एसटी’ समाजाची लोकसंख्या अधिक, तेथे प्राधान्य दिले जाते. मी या समाजाचा आमदार झालो, हा योगायोग होता.

- रमेश तवडकर, आदिवासी कल्याण मंत्री.

‘भाजप-मगो’ युतीतील जागावाटपाकडे लक्ष

प्रियोळसह सांगे, केपे आणि नुवे हे चार मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव ठेवण्यात येणार असून, लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सूचित केल्याने प्रियोळमधील अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या प्रियोळचे प्रतिनिधित्व भाजपचे गोविंद गावडे करतात. ते २०१७ मध्ये अपक्ष, तर २०२२ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यापूर्वी ‘मगो’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी या मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केले आहे. संभाव्य आरक्षणानंतर भाजप-मगो युती झाल्यास प्रियोळची जागा कोणाला मिळणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गावडे यांनी भाजपची उमेदवारी मिळण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, ‘मगो’ला जागा मिळाल्यास जिल्हा पंचायत सदस्य सुनील जल्मी यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. त्यामुळे आरक्षणाच्या निर्णयासोबतच युतीतील जागावाटपाकडेही लक्ष लागले आहे.

प्रियोळात अद्याप हॅट्‌ट्रिक नाही!

प्रियोळ मतदारसंघात एखादा लोकप्रतिनिधी दोन वेळाच निवडून आला आहे. त्यात गोविंद गावडे आणि दीपक ढवळीकर यांचा समावेश आहे. मागच्या दोन निवडणुकांत साधारण दोनशे मतांचा फरक विजेत्या आणि पराभूत उमेदवारांत आहे. त्यात २०२२च्या निवडणुकीत भाजपचे गोविंद गावडे यांना ११,०१९ मते तर ‘मगो’चे उमेदवार दीपक ढवळीकर यांना १०,८०६ मते पडली होती. त्यामुळे अटीतटीची लढत यावेळेलाही होणार, हे निश्चित.

सद्यस्थितीत मगो-भाजपची युती झाल्यास ठिक; पण युती फिसकटल्यास ‘मगो’ पक्षाने ‘एकला चलो’चे धोरण स्वीकारल्यास ‘मगो’तर्फे सुनील जल्मी उमेदवार असतील. मात्र, ‘मगो’ने युतीची शक्यता गृहीत धरून फोंडा आणि शिरोड्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे फोंडा तालुक्यात मडकई, फोंडा आणि शिरोडा असे तीन मतदारसंघ स्वतःच्या पदरी पाडून घेण्याचे ‘मगो’ नेत्यांचे मनसुबे आहेत. मात्र, या जर-तरच्या गोष्टी असून येणारा काळच राजकीय आखाड्यातील चित्र स्पष्ट करणार आहे.

मच्छिंद्र शिरोडकर इच्छुक

मडकई मतदारसंघातील आणखी एक युवक प्रियोळ मतदारसंघातून नशीब आजमावण्यास सिद्ध झाला आहे. सरकारी सेवेत असलेला मच्छिंद्र शिरोडकर हा युवा नेता प्रियोळ मतदारसंघातून भाजप उमेदवारीवर निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्यासाठी सरकारी नोकरीला तिलांजली देण्यासही हा युवक तयार असून सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहे.

हा एक योगायोगच!

काणकोण मतदारसंघाचे आमदार ‘एसटी’ समाजाचे असणे, हा योगायोग असल्याचे पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर यांनी सांगितले. आवश्यक टक्केवारीत ‘एसटी’ मतदार नसल्याने काणकोण मतदारसंघ राखीव होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे इच्छुक उमेदवार चेतन मंजू देसाई, इजिदोर फर्नांडिस आणि विजय पै खोत यांना दिलासा मिळाला आहे. गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती न झाल्यास अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. देसाई यांनीही पालिका क्षेत्र, गावडोंगरी आणि पैंगीण येथे कार्यकर्त्यांसह प्रचार सुरू केला आहे.

अधिसूचना आल्यावरच विश्वास ठेवू : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनुसूचित जमातींसाठी मतदारसंघ राखीव ठेवण्याबाबत केलेल्या घोषणेचे स्वागत करू. मात्र, आरक्षणासंदर्भातील अधिसूचना जारी झाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवू, असे मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनचे निमंत्रक तथा ‘उटा’चे उपाध्यक्ष ॲड. जुआव फर्नांडिस यांनी सांगितले. सरकारकडून आजवर केवळ आश्वासने मिळाली असून, प्रत्यक्ष मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असे ते म्हणाले. आरक्षणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल असून, सरकार न्यायालयात समाजाची बाजू प्रभावीपणे मांडत असल्याबद्दलही त्यांनी साशंकता व्यक्त केली. त्यामुळे अधिसूचना जारी झाल्यानंतरच सरकारच्या घोषणेवर विश्वास ठेवू, असे ॲड. फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

नुवे मतदारसंघ नव्या उमेदवारांना खुला

१ काँग्रेसधार्जिणा असलेल्या नुवे मतदारसंघातून काँग्रेस आमदार सतत दोनवेळा फुटल्याने हा मतदारसंघ नव्या उमेदवारांना खुला झाल्याने लिंडन मोंतेरो, पॉवसिलिप दोरादो आदी नव्या उमेदवारांबरोबर माजी आमदार बाबाशान डिसा यांनी दावा केला होता; पण हे सर्वजण बिगर ‘एसटी’ असल्याने या सर्वांसाठी दरवाजे आपोआप बंद होणार आहेत. या परिस्थितीत उमेदवार म्हणून कुणाला पुढे आणावे, हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहणार आहे.

२ अशा परिस्थितीत नुवेचे ‘एसटी’ पंचसदस्य मॅन्युएल बोर्जीस आणि वेर्णाचे पंचसदस्य मारियो परेरा हे काँग्रेस उमेदवारीवर दावा करू शकणार आहेत. यातील बोर्जीस यांना स्थानिक गट समितीचा पाठिंबा असेल. याशिवाय कुडतरी मतदारसंघातील ज्येष्ठ काँग्रेस ‘एसटी’ नेते जोसेफ वाझ यांचाही या मतदारसंघावर डोळा असेल. भाजप पक्षाच्या वतीने अँथनी बार्बोझा यांना उमेदवार म्हणून उभे करण्याची शक्यता असून त्यांना तसे संकेत देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

कुडचडे आणि शिरोड्यावरही परिणाम

१ प्रियोळ, नुवे, सांगे आणि केपे हे चार मतदारसंघ ‘एसटी’साठी राखीव झाल्यास त्याचा परिणाम कुडचडे आणि शिरोडा मतदारसंघांवरही होऊ शकतो. प्रियोळ राखीव झाल्यास ‘मगो’ पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना हा मतदारसंघ खुला नसेल त्यामुळे ते शिरोड्यावर दावा करतील आणि या एका मुद्यावरून भाजप-मगो युतीत बाधा येऊ नये, यासाठी शिरोडा ‘मगो’ला सोडला जाईल, अशी शक्यता आहे.

२ सांगे राखीव झाल्यास सुभाष फळदेसाई कुडचडे मतदारसंघात जाण्याची शक्यता असून तसे झाल्यास विद्यमान भाजप आमदार नीलेश काब्राल अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा हे वेळ्ळीतून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने तिथेही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Legal Metrology Department: गोव्यात वजन-माप विभागाला झडती, जप्तीचे अधिकार; गैरप्रकारांचा संशय आल्यास थेट कारवाई

Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर सुरू होतं प्री-वेडिंग फोटोशूट, अचानक वाऱ्याचा झोत आला अन् नवरी हवेत... फोटोशूटदरम्यान थरारक घटना; पाहा व्हिडिओ

CM Helps Accident Victim: मुख्यमंत्र्यांमधील 'डॉक्‍टर'झाला जागा! ताफा थांबवून अपघातग्रस्त युवकावर केले उपचार

DA Hike Calculation: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 63 टक्के! 18,000 ते 50,000 रुपये मूळ वेतन असणाऱ्यांचा पगार किती वाढणार? समजून घ्या संपूर्ण गणित

देश परदेशातील माणसं, संस्कृती अन् रंजक अनुभव! अशोक डांगे यांच्या पुस्तकाची अनोखी सफर

SCROLL FOR NEXT