Goa Agriculture: डिचोलीत भातकापणीला वेग; अवकाळी पावसामुळे यंदा उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता

Bicholim Paddy Harvesting: पावसाने उघडीप दिल्याने डिचोली तालुक्यातील विविध भागांत भातकापणी आणि मळणीच्या कामांना वेग आला आहे.
Bicholim Paddy Harvesting
Goa AgricultureDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: पावसाने उघडीप दिल्याने डिचोली तालुक्यातील विविध भागांत भातकापणी आणि मळणीच्या कामांना वेग आला आहे. मये, सिकेरी, पिळगाव आदी भागांत यंत्रांच्या साहाय्याने ही कामे जोरात सुरू आहेत. पावसाची उघडीप कायम राहिल्यास चालू आठवड्यात भातपीक घरात येईल, असा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

भातपीक कापणीसाठी तयार झाले असतानाच गेल्या शुक्रवारी गडगडाटासह जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती त्यांना सतावत होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Bicholim Paddy Harvesting
Goa Vehicle Sales: गोव्यात दसऱ्याला वाहन खरेदीचा वेग मंदावला! नोंदणीत तब्बल 37.70 टक्क्यांची घट

यंदा उशिराने लागवड करूनही भातशेतीला समाधानकारक बहर आला होता. मात्र, भाताची कणसे धरण्याच्या काळात जवळपास पंधरा दिवस पाऊस गायब झाल्याने दाणे व्यवस्थित भरले नाहीत. त्यानंतर झालेल्या जोरदार पावसामुळे मयेसह अन्य भागांतील काही शेतीतील भातपीक आडवे झाले. या नैसर्गिक संकटांमुळे यंदा भातउत्पादनात सुमारे ५० टक्के घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कापणी, मळणी आणि भाताची साठवण पूर्ण होईपर्यंत पावसाने उघडीप द्यावी, अशी अपेक्षा सखाराम पेडणेकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी व्यक्त केली. चालू आठवड्यात पुन्हा पाऊस झाल्यास उरलेसुरलेले पीकही मातीमोल होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

Bicholim Paddy Harvesting
Goa Politics: निवडणुकीचे वारे वाहू लागले! भाजप घराघरांत, विरोधक मात्र एकीच्या प्रतीक्षेत

फाउंडेशनचे सहकार्य

कापणी यंत्रांच्या अनुपलब्धतेमुळे दरवर्षी भातकापणीला विलंब होत असताना, उद्योजक सद्गुरू धुमे यांनी धुमे फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना तीन कापणी यंत्रे मोफत उपलब्ध करून दिली आहेत. या यंत्रांच्या मदतीने मये, पिळगाव, सिकेरी आणि चोडण परिसरात भातकापणी व मळणीची कामे सुरू आहेत. यंत्रांच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना कापणीची कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत होत आहे. या सहकार्याबद्दल रोहिदास माईणकर, नागेश नाईक यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी सद्गुरू धुमे यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com