Goa Freedom Fighter: 10 वर्षांचा एकांतवास, मृत्यूची खोटी बातमी अन् मायभूमीची ओढ; गोव्याचे लोहपुरुष नारायण हरी नाईक यांची संघर्षगाथा

Narayan Hari Naik: ४५० वर्षांच्या हुकूमशाही पोर्तुगीज राजवटीत सर्वाधिक काळ तुरुंगवास भोगणारे गोमंतकीय स्वातंत्र्यसेनानी म्हणून नारायण हरी नाईक यांची नोंद आहे.
Narayan Hari Naik
Goa Freedom FighterDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

ॲड. जयप्रकाश नाईक

४५० वर्षांच्या हुकूमशाही पोर्तुगीज राजवटीत सर्वाधिक काळ तुरुंगवास भोगणारे गोमंतकीय स्वातंत्र्यसेनानी म्हणून नारायण हरी नाईक यांची नोंद आहे. त्यांचे जीवन हे अहिंसक वि‌द्यार्थी चळवळीपासून ते सशस्त्र क्रांतिकारक लढा व शेवटी शोषित-वंचितांच्या न्यायासाठीचा संघर्ष अशा अतुलनीय धैर्याची गाथा आहे. नारायण नाईक यांची आजपासून जन्मशताब्दी साजरी होत आहे, त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी...

स्वातंत्र्याचा तिरंगा मुक्त गोव्याच्या आकाशात फडकल्यानंतर कित्येक दशकांनंतरही ‘नारायण हरी नाईक’ हे नाव इतिहासाच्या पानांवर सातत्य, निष्ठा आणि धैर्याचे प्रतीक म्हणून कोरलेले आहे. ताळगावसारख्या कृषीप्रधान गावातून पुढे आलेल्या नाईक यांनी त्यांच्या २९ वर्षाच्या एक एकूण शिक्षेपैकी १४ वर्षे आणि ५ महिने देशोधडीची (निर्वासित) कैद भोगली. यामध्ये १० वर्षांच्या अत्यंत खडतर एकांतवासाचा समावेश होता. ४५० वर्षांच्या हुकूमशाही पोर्तुगीज राजवटीत सर्वाधिक काळ तुरुंगवास भोगणारे गोमंतकीय स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांची नोंद आहे. त्यांचे जीवन हे अहिंसक वि‌द्यार्थी चळवळीपासून ते सशस्त्र क्रांतिकारक लढा आणि शेवटी शोषित-वंचितांच्या सामाजिक-आर्थिक न्यायासाठीचा संघर्ष अशा अतुलनीय धैर्याची गाथा आहे.

Narayan Hari Naik
Goa Ring Road Plan: गोव्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'रिंग रोड'चा विचार! CM सावंत यांचे मोठे संकेत

वि‌द्यार्थी चळवळीपासून सशस्त्र क्रांतीकडे २८ ऑक्टोबर १९२६ रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नाईक यांचे बालपण अभ्यासातील शिस्त आणि खेळातील आवडीने घडले. मात्र, त्या काळात संपूर्ण उपखंडात स्वातंत्र्याची लाट उसळली होती. महात्मा गांधींचे ‘भारत छोडो’ आंदोलन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद फौज’च्या पराक्रमाने प्रेरित होऊन, पणजीत शिक्षण घेणाऱ्या तरुण गोमंतकीय विद्यार्थ्यांनी वसाहतवादी जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली.

१८ जून १९४६ रोजी गोव्यात नागरी स्वातंत्र्यासाठी डॉ. राममनोहर लोहिया यांना अटक करण्यात आली हा दिवस आज ‘क्रांती दिन’ म्हणून साजरा केला जातो. या घटनेने संतप्त झालेल्या नाईक यांनी बाबला सिंगबाळ आणि लक्ष्मीदास बोरकर यांसारख्या विद्यार्थी नेत्यांच्या साथीने पणजी पोलिस मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला. महिला आणि मुलांवरही झालेल्या अमानुष पोलिस लाठीहल्ल्याला न घाबरता, या तरुणांनी माघार घेण्यास नकार दिला आणि अखेर ‘गोवा विद्यार्थी कॉंग्रेस’ची स्थापना केली.

अहिंसक सत्याग्रहाचा लढा जेव्हा वसाहतवा‌द्यांच्या अमानुष अत्याचाराने चिरडला गेला, डिसेंबर १९४६ मध्ये सांगे येथे नाईक यांना अटक करून खोल नदीच्या पाण्यात फेकून बेदम मारहाण करण्यात आली होती. तेव्हा अहिंसक अर्जांना पोर्तुगीज सरकार भीक घालत नाही, याची जाणीव नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना झाली. मार्च १९४७ मध्ये त्यांनी दत्तात्रेय देशपांडे आणि विश्वनाथ लवंदे यांसारख्या दिग्गज क्रांतिकारकांच्या साथीने ‘आझाद गोमंतक दल’ची स्थापना केली. एका भूमिगत क्रांतिकारक सैन्याप्रमाणे काम करत, या दलाने पोलिस चौक्यांवर, म्हापसा येथील शासकीय तिजोरीवर आणि वाहतूक मार्गावर धाडसी छापे टाकून मुक्ती लढ्यासाठी निधी आणि शस्त्रे गोळा केली.

चौदा वर्षाचा तुरुंगवास

७ डिसेंबर १९४७ रोजी बांबोळीजवळ एका बातमीदाराच्या खबरीवरून नाईक यांना अटक करण्यात आली. अमानुष चौकशी आणि गोव्यातील तुरुंगवासानतर लष्करी न्यायालयाने त्यांना २८+१ वर्षाच्या देशोधडीच्या (हद्दपारीच्या) कैदेची आणि एकांतवासाची शिक्षा सुनावली. जून १९५२ मध्ये नाईक यांना जहाजाने लिस्बनला नेण्यात आले आणि त्यानंतर पश्चिम आफ्रिकेतील अंगोला येथील ‘फोर्ट रोझाडास’ तुरुंगात निर्वासित करण्यात आले. कैदेतील त्यांची वर्षे अत्यंत हाल अपेष्टांनी भरलेली होती.

Narayan Hari Naik
Goa Politics News: 'वाद नको, गोवा रक्षणाचा विचार करा'; तृप्ती बकाल यांचा मनोज परब, अजय खोलकरांना टोला

अंगोलातील उठाव

अंगोलात स्थानिक वसाहतवादविरोधी चळवळी तीव्र झाल्या असताना, तुरुंग प्रशासनाने नाईक यांच्यावर अंगोलातील तुरुंगावर छापा टाकण्याचा कट रचल्याचा खोटा आरोप ठेवला. ऑक्टोबर १९६० मध्ये रक्षकांनी कै‌द्यांचे अमानुष हत्याकांड केल्यानंतर, नाईक यांना ४५ दिवसांसाठी जमिनीखालील एकांतवासाच्या कोठडीत (सॉलिटरी सेल) डांबून ठेवण्यात आले. अंगोलातील तुरुंगातील गोळीबारात नाईक यांचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी भारतीय रेडिओवर पसरली. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही बातमी ऐकून त्यांच्या वडिलांचे हृदयभंगाने निधन झाले.

डिसेंबर १९६१ मध्ये गोव्याच्या मुक्तीची बातमी पोहोचताच तुरुंगातील राजवटधार्जिण्या समर्थकांनी त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला, ज्यातून ते बालंबाल वाचले. गोव्याच्या मुक्तीनंतरही त्याची सुटका होण्यास उशीर झाला. अखेर कराचीमार्गे ६ मे १९६२ रोजी त्यांनी मुक्त गोव्याच्या भूमीत पाऊल ठेवले, जिथे त्यांचे अभूतपूर्व आणि भव्य नागरी स्वागत करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर सामाजिक सुधारणांचे शिल्पकार स्वातंत्र्यानंतर वैयक्तिक प्रसिद्धी न शोधता नाईक यांनी आपली ऊर्जा गोव्यातील भूमीहीन शेतकरी, कुळ आणि मुडकारांच्या उद्धारासाठी पणाला लावली. १९६२ मध्ये पहिल्या सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून त्याची नियुक्ती झाली आणि त्यांनी महत्त्वाच्या जमीन सुधारणा आयोगामध्ये काम केले.

शेतकऱ्यांचे कैवारी

‘गोवा शेतकरी परिषद’चे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी शेतमजुराच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. त्याच्या या संघर्षाचे फलित म्हणजे १९६४ चा ‘शेती कुळ कायदा’ आणि १९७५ चा संरक्षण देणारा ‘मुंडकार कायदा’ होय.

तळागाळातील विकास

ताळगावचे पहिले सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावात पक्के रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, शाळा आणि आरोग्य सेवा यासारख्या पायाभूत सुविधा आणल्या.

Narayan Hari Naik
Goa Cyber Fraud: 28 हजार कोटींच्या सायबर घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील वकिलाला ईडी कोठडी VIDEO

स्वातंत्र्यसैनिकांचे कल्याण

गोवा दमण, दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे नेते म्हणून नाईक यांनी वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन, गृहनिर्माण आणि वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी अनेक दशके कार्य केले.

२५ जानेवारी २००९ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी नारायण हरी नाईक यांचे निधन झाले. भावी पिढ्यांना स्वातंत्र्याचा श्वास घेता यावा, यासाठी त्यांनी आपले संपूर्ण तारुण्य एका क्रूर साम्राज्याविरुद्ध लढण्यात घालवले. आज गोवा समृद्ध होत असताना प्रदीर्घ यातना सहन करणाऱ्या या स्वातंत्र्यसैनिकाची अदम्य जिद्द आणि त्याग प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचे मोल काय असते याची आठवण करून देणारा दीपस्तंभ ठरतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com