भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोव्यासाठी नियुक्त केलेल्या प्रभारी डॉ. भारती पवार आणि सहसंघटनमंत्री शिवप्रकाश हे दोन्ही नेते रविवारी गोव्यात दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. पवार आणि शिवप्रकाश गोव्यात दाखल झाल्याने भाजपने विधानसभा निवडणुकीच्या रणनितीला आणखी गती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही नेते सोमवारी मंत्री आणि भाजप आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. याची माहिती समजताच पदाला अपेक्षित न्याय देऊ न शकलेल्या काही आमदारांच्या काळजात धस्स झाल्याची चर्चा सुरू आहे. ∙∙∙
साखळी येथे झालेल्या काँग्रेसच्या राखण यात्रेत राष्ट्रीय नेते सचिन पायलट उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे कुशावती जिल्हाप्रमुख राजेश वेरेकर आणि पायलट यांच्यात सुरू असलेली ‘गुप्तगू’ उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चर्चेचा विषय बनली होती. वेरेकर पायलट यांना नेमके काय सांगत होते, हे कळायला मार्ग नसला तरी आगामी निवडणुकीत प्रचारासाठी फोंड्यात येण्याचे निमंत्रण देत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. नाही तरी, आताच ‘बुकिंग’ केले तरच हे मोठे नेते हाताला लागतात. हेही खरे. गोव्याबरोबरच देशातील आणखी चार राज्यांत निवडणुका होणार असल्याने मोठ्या नेत्यांची मागणी वाढणार हे ओघाने आलेच. त्यामुळे वेरेकरांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, असे या ‘गुप्तगू’वरून दिसते. आता प्रत्यक्षात पायलट फोंड्यात येतात की नाही, हे पुढे कळेलच! ∙∙∙
कसलाही उत्सव, सण वा कार्यक्रम असला की गावांत वा शहरात बोर्ड लावले जातात. हल्ली सोशल मीडियावर जाहिरात क्षणात होते. तरीही येणाऱ्या-जाणाऱ्यांना माहिती द्यावी म्हणून चौकाचौकांत हे बोर्ड लावलेले असतात. त्याचा लोकांना फायदाही होतो. पण कार्यक्रम संपले, दिवस लोटले, आठवडे सरले, महिने उलटले तरीही काही फलक तसेच असतात. विजेच्या खांबांवर रेलून ते पाऊस, ऊन, दंव, पाण्याचा सामना करत असतात. काही पोरके, काही अनाथ असे काही फलक दिसतात. गाड्या जाताना चिखल उसळत असतो. बोर्डावर जे मान्यवरांचे फोटो असतात, त्यांच्यावर चिखलाचे फटकारे उसळतात. ही अप्रतिष्ठा संबंधित आयोजकांना कशी दिसत नाही, हेच गूढ. चतुर्थीचे फलक दिवाळीच्या नरकासूर स्पर्धेपर्यंत राहू नयेत. सामुदायिक स्वच्छतेलाही स्मरावं. ∙∙∙
‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ असे म्हणतात. एल्विस गोम्स एकेकाळी वातानुकूलित कार्यालयात बसून प्रशासन चालवायचे. आता राजकीय कारकीर्द यशस्वी करण्यासाठी ते घराघरांत फिरत आहेत. कुंकळळी मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार, असे एल्विस यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या प्रचारकार्यालयालाही सुरुवात केली. एल्विस गोम्स आपल्या समर्थकांना घेऊन मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला भेटत आहेत. त्यांना मतदारांकडून ‘आम्ही आहोत आपल्या बरोबर’, असे आश्वासन मिळत असल्याचे सांगण्यात येते. राजकारण्यांप्रमाणे आता मतदारही आश्वासन देण्यात पटाईत झाले आहेत, हे कदाचित गोम्स यांनाही माहीत असणार. मात्र, गोम्स कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार, याचे उत्तर तूर्त त्यांच्याकडेही नाही. त्यांचे ‘वेट अँड वॉच’ मतदारांच्या पचनी पडते की नाही, हे पाहावे लागेल. ∙∙∙
ग्रामसभा म्हटली की ग्रामस्थांचे प्रश्न, तक्रारी आणि चर्चा अपेक्षितच. मात्र, उसगाव-गांजे पंचायतीच्या ग्रामसभेत रविवारी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. चर्चेसाठी एकही विषय नाही आणि उपस्थितीही अवघी तीन ग्रामस्थांची! सरपंचांनी स्वागत केले, सचिवांनी मागील सभेचा अहवाल वाचला आणि विषय नसल्याने ग्रामसभा आटोपती घेण्यात आली. आता प्रश्न एवढाच, ग्रामस्थांना खरोखरच काही विषय नाहीत की ग्रामसभेलाच विषय उरलेला नाही? इतर वेळी गावातील समस्या आणि विविध विषयांवरून ग्रामसभा तापताना दिसतात. त्यामुळे यावेळी विषयच नसल्याने आटोपती घेतलेल्या उसगाव-गांजे ग्रामसभेचीच आता गावात चर्चा रंगू लागली आहे. ∙∙∙
सम्राट क्लबच्या पदग्रहण समारंभानिमित्त प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर रविवारी गोव्यात होते. दोनापावला येथील कार्यक्रमात त्यांनी दीर्घ भाषणही केले. या भाषणात बोलताना त्यांनी, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आपल्याला जिथे आवडतात, तिथे आवडतात आणि आवडत नाहीत, तिथे नाही. पण, मोदी तसे काही बोलत नाहीत’’, असे वक्तव्य केले. त्यानंतरच लगेचच, ‘‘एखादी गोष्ट आवडली नाही, तर त्याविरोधात बोलायलाच हवे, पण आंदोलनाची भाषा बदलणे गरजेचे आहे’’, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानानंतर नानांनी आंदोलनाची भाषा बदलण्याचा सल्ला नेमका कुणाला दिला? आणि ते कुणाच्या बाजूने बोलत आहेत? हे मात्र लपून राहिले नाही. ∙∙∙
सम्राट क्लबचा रविवारी सायंकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हजर राहणार होते, त्यापैकी पाटेकरच आले. पाटेकरांनी शेवटच्या अर्धा तासात उपस्थितांचे मनोरंजन केले आणि दिलखुलास नाना दिसून आले. यावेळी त्यांनी, ‘ज्या भाषेत स्वप्न पडतात, ती आपली भाषा. आपल्याला सतत मराठीतून स्वप्न पडतात, गेल्या काही दिवसांमध्ये थोडी कोकणीतही पडतात,’ असेही विनोदाने सांगितले आणि उपस्थितांनी दादही दिली. त्याशिवाय, मारामारी करीत असताना चारजण मारायला आले की त्यातील एकाला असा मारायचा, तो पडला की सर्वजण पळून जातात, ही नेमकी स्ट्रॅटेजी काय, ते माहीत पाहिजे. ‘हे उत्पल पर्रीकर, तुझ्यासाठी महत्त्वाचे बोलतोय बरं का!’ आता नानांनी उत्पल यांना जो काही सल्ला दिला, तो ते काही मनावर घेणार नाहीत, हे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट होते. पण यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हुशारीचे या कार्यक्रमात कौतुक का केले, हा काहीजणांना नक्कीच प्रश्नही पडला असणार. ∙∙∙
लुईझिन फालेरो हे गोव्यातील राजकारणातील एक धुरंधर. त्यांच्या मनातील बात कुणालाही कधीच कळणार नाही. आपण राजकीय संन्यास घेतल्याचे ते सांगतात. मात्र, आपला सुपुत्र रवी याला विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असेल, तर तो त्याचा निर्णय असेल, असे सांगताना आपली काही हरकत नसल्याचे सांगून ते मोकळेही झाले. लुईझिन हे एकेकाळी नावेली मतदारसंघाचे अनभिषिक्त सम्राट होते, हे कुणी नाकारू शकत नाही. तब्बल सात वेळा त्यांनी या मतदारसंघाचे आमदारपद भूषविले. आता रवीच्या रूपाने राजकीय वारसा पुढे नेण्याची त्यांची सुप्त इच्छा आहे, हेही काही लपून राहिलेले नाही. डॅडींची राजकीय परंपरा पुढे नेण्यासाठी रविबाब आगामी विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघाच्या ‘होम पीच’वर मैदानात उतरणार का, याबाबत सासष्टीतील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता खरी गंमत कुठे आहे, तर ज्युनियर फालेरो कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर मैदानात उतरणार? जर कॉंग्रेसच्या तिकिटासाठी ते प्रयत्नशील असतील, तर नावेलीत कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी आतापासूनच सिप्रु, वालांका तसेच प्रतिमा यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता रवीच्या नावाची भर पडली आहे. त्यामुळे लुईझिन यांच्या चालीकडे सासष्टीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ∙∙∙
नवीन काही उभारलं तर ते पक्कं आदर्श कसं असेल, याचा सांगोपांग विचार नियोजनपूर्वक व्हायला हवा. पर्वरीचा उन्नत मार्ग हा इतका कोंडीमय झाला आहे की, अगोदरची व्यवस्था बरी होती, असे पर्वरीकर म्हणताहेत. उद्घाटन होऊन २० दिवसांहून अधिक काळ लोटला असला, तरीही या मार्गावर वाहनांच्या प्रवेशावर अजूनही निर्बंध आहेत. त्यामुळे, ज्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हा मार्ग बांधला गेला होता, त्या खालच्या चारपदरी रस्त्यांवरील कोंडीत फारसा फरक पडलेला नाही. अलीकडेच एक प्रवेशद्वार आणि एक एक्झिट मार्ग खुला करूनही, गर्दीच्या वेळची वाहतूक कोंडी कमी होतच नाही. २ ऑक्टोबरच्या सुट्टीच्या काळात परिस्थिती अधिकच बिकट झाली; त्यावेळी राज्याबाहेरील वाहने आणि पर्यटकांच्या भाड्याच्या गाड्यांमुळे वाहतुकीचा ताण वाढला. दरम्यान, त्रुटी दूर करण्यासाठी दिलेली मुदतही उलटून गेली आहे. या कॉरिडॉरमुळे वाहतूक सुधारण्याऐवजी ती अधिकच बि घडली आहे, असे एका अभियंत्याने सांगितले. ∙∙∙
‘बॉस इज अल्वेज राईट’ अशी इंग्रजीत म्हण आहे. मात्र, एका शासकीय शिक्षण संस्थेतील प्राचार्य नियमितपणे आणि वेळेवर कामावर येत नसल्याची तक्रार त्याच संस्थेतील एका कर्मचाऱ्याने केल्याने मॅडम आणि तक्रारदार कर्मचाऱ्यात चांगलेच ‘शीतयुद्ध’ सुरू झाल्याची चर्चा आहे. मॅडम वेळेवर कामावर येत नसतील तर पालक तक्रार करतील, विद्यार्थी तक्रार करतील किंवा भाग शिक्षण अधिकारी विचारणा करतील, हे साहजिकच. पण आपल्याच हाताखालील कर्मचाऱ्याने तक्रार करावी आणि माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवावी, हे मॅडमच्या जरा जास्तच जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. आता तक्रारदार कर्मचाऱ्याची फाईलच उघडली जात असल्याची चर्चा सुरू आहे. मॅडम आणि कर्मचाऱ्याच्या या ‘शीतयुद्धा’चा परिणाम मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये, एवढीच अपेक्षा. शेवटी साहेब आणि मॅडमना हे कोण सांगणार? ∙∙∙
पेडण्यात ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रवीण आर्लेकरांनी गर्दी जमवली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत येणार म्हटल्यावर त्यांना ही गर्दी जमवावीच लागली. एका बाजूला आर्लेकर यांचे आमदारपद धोक्यात असल्याची चर्चा आहे. त्यात पक्षाच्याच सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. परंतु ‘सरकार तुमच्या दारी’ या कार्यक्रमाला लोक स्वतःहून आले की आणावे लागले, याची सध्या चर्चा आहे. याच मतदारसंघातून सध्या मगोपचा गट सक्रिय आहे आणि ती जागा आता मगोप स्वतःसाठी मागणार असल्याचेही बोलले जाते. याठिकाणी मगोपच्या उमेदवारानेही वातावरणनिर्मिती केली आहे आणि त्यांनी एक कार्यक्रम करून लक्षही वेधले. आता आर्लेकरांनी गर्दी जमवली म्हटल्यावर भाजपचेच त्यांचे विरोधक बाबू आजगावकर आता कोणता कार्यक्रम करून शक्तिप्रदर्शन करणार, याकडे पेडणेकरांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙
ग्रामसभा म्हटली की ग्रामस्थांचे प्रश्न, तक्रारी आणि चर्चा अपेक्षितच. मात्र, उसगाव-गांजे पंचायतीच्या ग्रामसभेत रविवारी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. चर्चेसाठी एकही विषय नाही आणि उपस्थितीही अवघी तीन ग्रामस्थांची! सरपंचांनी स्वागत केले, सचिवांनी मागील सभेचा अहवाल वाचला आणि विषय नसल्याने ग्रामसभा आटोपती घेण्यात आली. आता प्रश्न एवढाच, ग्रामस्थांना खरोखरच काही विषय नाहीत की ग्रामसभेलाच विषय उरलेला नाही? इतर वेळी गावातील समस्या आणि विविध विषयांवरून ग्रामसभा तापताना दिसतात. त्यामुळे यावेळी विषयच नसल्याने आटोपती घेतलेल्या उसगाव-गांजे ग्रामसभेचीच आता गावात चर्चा रंगू लागली आहे. ∙∙∙
निवडणूक जवळ आल्या तरी कुंकळळी मतदारसंघात तशी राजकीय पक्षांची तळमळ अजून कार्यात सक्रिय झालेली पाहायला मिळत नाही. भावी आमदार व इच्छुक उमेदवार चिरीमिरीत प्रचार करताना दिसतात. ‘आप’ सोडून एकही राजकीय पक्षाचे कार्यालय अजूनपर्यंत सक्रिय झालेले नाही. आम आदमी पक्षाच्या कार्यालयात मात्र मोठ्या हालचाली पाहायला मिळतात. ‘आप’ची टीम कार्यालयात सक्रियपणे वावरताना दिसते. मतदारांची डेटाबँक तयार करण्याचे काम कार्यालयात सुरू झाले असून, ‘आप’चे स्वयंसेवक विविध भागात भेटी देऊन आपला प्रचार करताना दिसतात. मात्र, आम आदमी पक्षाचा उमेदवार कोण? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ∙∙∙
२०२२च्या निवडणुकीत भाजपने काही पक्षांची निर्मिती करून इतर राज्यांतील पक्ष गोव्यात आणले. त्यात रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचाही समावेश होता. या पक्षामुळे काँग्रेसला १० जागा गमवाव्या लागल्या, असे गिरीश चोडणकर यांनी एका काँग्रेसच्या कार्यक्रमात सांगितले होते. तृणमूल काँग्रेसनेही मोठा गाजावाजा केला, तर आम आदमी पक्षाने दोन जागा जिंकल्या, असेही त्यांनी नमूद केले. आता मात्र याच रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षासोबत युती झाली आहे. त्यामुळे ‘ज्यांच्यामुळे काँग्रेसच्या दहा जागा गेल्या, त्यांच्यासोबत आता हातमिळवणी कशासाठी?’ असा सवाल होत आहे. त्यात २०२७च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपसोबत युती असलेला आणखी एक पक्ष गोव्यात नशीब आजमावणार असल्याचे गिरीशबाब सांगतात. मग हा पक्ष कोणता? गिरीशबाबांचे कालचे वक्तव्य आणि आजची राजकीय समीकरणे यांचे गणित नेमके कसे जुळते, याचीच चर्चा जोरात सुरू आहे. ∙∙∙
पर्यटकांशी दादागिरीची भाषा करणाऱ्या या दलालांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याची चर्चा आहे. पर्यटकांना ‘मायाजाळा’त अडकवून गोव्याची बदनामी होत असल्याने हा विषय गंभीर बनला आहे. पर्यटनमंत्र्यांनीही यावर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर रविवारी आमदार दिलायला लोबो यांनीही मुख्यमंत्री हा विषय गांभीर्याने घेत असून, ‘सर्व काही लवकरच नियंत्रणात येईल’, असे सांगितले. म्हणजे मॅडम म्हणाल्या, ‘ऑल इज वेल!’ मात्र, पर्यटकांपासून स्थानिकांपर्यंत अनेकांना त्रास देणाऱ्या दलालांवर केवळ आश्वासनांनी नियंत्रण येणार का, हा प्रश्न आहे. कारवाईची भाषा अनेकदा ऐकायला मिळते; आता प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर या दलालांना कुणाचा ‘आशीर्वाद’ आहे का, याचीही चौकशी व्हावी, अशी चर्चा आता सुरू आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.