

गणपती कोणाला पावणार?
गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘गोवा फर्स्ट’ या बावट्याखाली युती जाहीर केली आहे. याचा अर्थ भाजपच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. आता भाजपच्या विरोधात काँग्रेस युती व ‘आप’ युती निवडणुकीत उतरली तर भाजपला निवडणूक सोपी जाणार व भाजप परत सत्तेवर येणार, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटते. म्हणून आता भाजप कार्यकर्ते म्हणायला लागले आहेत की, भाजपला गणपती पावला. मात्र, आता पाहूया की, गणपती ‘आप’ व गोवा फॉरवर्ड युतीला पावतो? काँग्रेस व ‘आरजी’ युतीला पावतो? की भाजपला?
भटक्या गुरांचा प्रसाद
रस्त्यावर भटक्या जनावरांचा सुळसुळाट असताना वाहनचालकांनी आता वाहतुकीपेक्षा अचानक रस्त्यावर उडी मारणाऱ्या गुरांपासून सावध राहण्याची वेळ आली आहे. कारवारहून काणकोणच्या दिशेने रविवारी येणाऱ्या कारवारच्या दुचाकीस्वाराच्या मार्गात भटक्या जनावराने अचानक उडी घेतल्याने अपघात झाला आणि त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करावे लागले. रस्ते सुरक्षित करण्याच्या दाव्यांमध्ये गुरांसाठी मात्र कोणताही वाहतूक नियम लागू नसल्याचेच या घटनेने पुन्हा दाखवून दिले. पर्वरी उन्नत मार्गावर दुचाकी बंदीचा उपाय करणारे आता गुरांना रस्ता बंदी करणार का? अशी चर्चा यानिमित्ताने ऐकू येऊ लागली आहे.
विदेश शिंदे यांचा अनोखा गणेश
श्रीगणेश ही कलाकारांची देवता. प्रत्येक कलाकार तिचा आपल्यापरीने शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. कुंकळ्ळीतील प्रसिद्ध चित्रकार विदेश शिवाजी शिंदे यांनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या कल्पकतेचा आणि कलाकौशल्याचा अनोखा आविष्कार सादर केला आहे. त्यांनी आवर्धक भिंगाच्या ग्लासचा वापर करून श्री गणपतीची आगळीवेगळी मूर्ती साकारली आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या माध्यमाचा कल्पकतेने वापर करून साकारलेली ही गणेशमूर्ती सध्या गणेशभक्तांचे आणि कला रसिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. कलेच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या विदेश शिंदे यांच्या या अनोख्या कलाकृतीने कुंकळ्ळीच्या कला क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे. विदेशचा गणपती हा सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे!
विजयचे इष्ट युतीवर नाराज?
अनेक संघटनात मतभेद आणि मनभेद वाढतात आणि ते संघटनेसाठी घातक ठरते. गोवा फॉरवर्ड पक्षाची स्थिती आता अशीच नाजूक झाली आहे. आम आदमी पक्षाशी युती केल्यामुळे पक्षाचे जवळचे नेते गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्यावर नाराज आहेत. जर युती केली नाही तर भाजपला हरविणे कठीणच नव्हे तर अशक्य असल्याचे विजय सरदेसाई यांना माहीत आहे. मात्र, या युतीमुळे विजय यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहणारे जवळचे सवंगडी गोवा फॉरवर्डपासून दूर झाले तर विजयवर गडही गेला आणि सिंहही, असे म्हणण्याची वेळ येणार आहे. आता बघूया विजय आपल्या मित्रांचे मनपरिवर्तन करण्यात यशस्वी ठरतात की नाही?
‘ई-२०’ला असाही विरोध
विरोधी पक्षातील आमदार विजय सरदेसाई यांनी टेस्ला खरेदी करून आता ‘ई-२०’ पेट्रोललाही विरोधी बाकावर बसविले आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलवर विश्वास नाही, म्हणून थेट विजेवर धावणाऱ्या गाडीचा आधार घेतला आहे. राजकारणात सरकारच्या धोरणांना विरोध करण्याची सवय असलेल्या सरदेसाईंनी आता इंधनाच्या बाबतीतही ‘विरोधी पक्षाची भूमिका’ घेतल्याचे दिसते. फरक एवढाच, सभागृहात विरोधासाठी माईक लागतो, तर टेस्लाला फक्त चार्जिंगची गरज!
उन्नत मार्ग झाला; पण...
पर्वरीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटल्याचा जल्लोष ओसरतो न ओसरतो तोच नव्या उन्नत मार्गावर झालेल्या भीषण अपघाताने अनेक प्रश्न उभे केले आहेत. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर १२ वर्षीय मुलीला गंभीर दुखापत होऊन शस्त्रक्रिया करावी लागली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल करून निष्पक्ष चौकशी आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीत वाहनचालकाने कथित बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा उल्लेख आहे. विकासाच्या मार्गावर वेग वाढविणे सोपे असते. मात्र, त्या वेगासोबत सुरक्षिततेची जबाबदारी वाढते, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. उन्नत मार्ग सुरू झाला म्हणून प्रश्न सुटत नाहीत; उलट त्यावर वेग, वाहतूक नियंत्रण, सुरक्षितता आणि नियमपालनाची खरी परीक्षा सुरू होते. उद्घाटनाच्या फिती कापणे क्षणाचे काम असते; पण अपघातानंतर जबाबदारीची फित कोण कापणार, हा प्रश्न मात्र गंभीर आहे.
म्हापशात ‘बॅनर पॉलिटिक्स’?
म्हापसा शहरात सध्या एकाच विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पालिकेची बॅनर कारवाई. एरव्ही गणेशोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत संपूर्ण शहर राजकीय शुभेच्छांच्या फलकांनी भरून जाते. कित्येक वर्षे कुणाच्याही बॅनरला हात न लावणारी म्हापसा पालिका यंदा मात्र अचानक भलतीच सक्रिय झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शहरात सत्ताधाऱ्यांचे बॅनर अगदी थाटात झळकत असताना कारवाईचा वरवंटा मात्र केवळ सामाजिक कार्यकर्ते मयूर सावकार, संजय बर्डे, सीतेश मोरे यांच्यासारख्यांच्या बॅनरवर फिरला. इतर कोणाचे नाही, तर फक्त विरोधक व आगामी निवडणुकीतील इच्छुकांचे फलक तातडीने हटविले गेले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. पालिका प्रशासनाच्या या निवडक प्रेमामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुका जवळ आल्याने नव्या चेहऱ्यांची जनतेमधील वाढती हवा सत्ताधाऱ्यांना खुपू लागली आहे का? अशी चर्चा आता म्हापशाच्या कट्ट्यांवर रंगू लागली आहे.
तुळशीदासची कोलव्यात रिएन्ट्री
कोलवा पोलिस ठाण्याला आता तुळशीदास नाईक हे नवे ‘पीआय’ लाभले आहेत. सोमवारी ते आपल्या या पदाचा ताबा घेणार आहेत. ठाण्यातील पोलिस त्यांच्या वेलकमच्या तयारीत आहेत. नाईक यांना कोलवा पोलिस ठाणे तसे नवीन नाही. यापूर्वी त्यांनी सुरवातीला या ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कामही केले होते. त्यानंतर २०२२ साली ते याच ठाण्यात ‘पीआय’ म्हणून आले होते. मात्र, अवघ्या दहा दिवसांत त्यांची येथून बदली झाली होती. आता पुन्हा एकदा ते कोलवा पोलिस ठाण्यात रिएन्ट्री करत आहेत. किनारपट्टीतील या पोलिस ठाण्यात ‘पीआय’पद म्हणजे काटेरी मुकूट. पूर्वानुभवावरून तुळशीदासना त्याचा पुरेपूर अनुभवही आहेच म्हणा. नवीन साहेब येणार म्हणून कोलवा पोलिसही खुश आहेत.
कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे!
अखेर गोळीबार प्रकरणातील एका मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यामुळे चतुर्थीपूर्वी पोलिसांना थोडा दिलासा मिळाला म्हणायला हरकत नाही. संपूर्ण यश नसले तरी महत्त्वाचा धागा हाती लागला आहे. आता दुसरा शूटरही लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येईल, अशी अपेक्षा आहे; कारण एकाला पकडले म्हणून तपास संपला असे नाही. खरी परीक्षा तर दुसऱ्याला पकडण्यात आहे. त्यामुळे पोलिसांना आता ‘कायदा-सुव्यवस्था आमच्या हातात आहे’ हे सांगण्याची संधी मिळाली आहे; पण दुसरा आरोपी सापडला तरच या दाव्याला खऱ्या अर्थाने वजन येईल.
पाणीबचतीची गरज
गोव्यात यंदा पाऊस कमी असल्याने सरकारने पाणी संवर्धनासाठी बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश चतुर्थीनंतर टप्प्याटप्प्याने हे काम होणार आहेत. मात्र, पाणी वाचवण्याची जबाबदारी केवळ सरकारचीच आहे का? सप्टेंबरच्या पहिल्या बारा दिवसांत अवघा ८३ मिमी पाऊस झाल्याने पाण्याचे संकट किती गंभीर आहे, याची जाणीव आता प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे. घराघरांत पाण्याचा अपव्यय सुरूच राहिला, तर बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय कितीही कठोर असला तरी त्याचा अपेक्षित परिणाम साधणे कठीण होईल. त्यामुळे सरकारच्या आदेशापेक्षा जनतेची पाणीबचतीची शिस्तच गोव्याचे जलभवितव्य ठरवणार आहे, असाच संदेश जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर जनतेला देत आहेत.
गुगल, ‘ए-आय’पेक्षा दादी सरस
आरतीच्या पुस्तिका वृत्तपत्रात आल्या. त्याचा लाभ सगळ्या पिढीतील सदस्यांना होईल. विनोदी कोकणी लेखक स्व. अना म्हांबरो यांनी आपल्या पुस्तकात चवथीप्रसंगी मुक्तीपूर्व काळात आरती गायनात शाब्दीक आघात कसे व्हायचे त्याचे साद्यंत वर्णन केले आहे. त्यांच्या निबंधाला काही लेखक एब्सर्ड कथा म्हणायचे. असो. आर्ततेने, भक्तिभावाने गायलेल्या आरतीचे उच्चार व्यवस्थित झाले पाहिजे, हे मात्र खरे. दिवाडीच्या दादीने एकदा तरुणांची विकेट उडवली. ‘लवथवती विक्राळा’ ही आरती कुणी लिहिली व कुठल्या गावात? हा क्वीज प्रश्न युवकांना टाकला. सामसूम, चूपचाप. दादीच वदले. लवथवे नावाचे गाव महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील परळी परिसरात (सज्जनगडाजवळ) आहे. लवथवे गावात रामदासस्वामींनी ही शिवाची आरती रचली. दादींनी आरतीतील प्रत्येक शब्दाचा उच्चार व अर्थ सांगितला. दादीसारखी ज्ञानवंत व्यक्तिमत्त्वे आज हयात नाहीत याची उणीव भासते.
केपे गणपती मंडळ बनले ‘ट्रेंड सेटर्स’
केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे गोव्यातील ‘ट्रेंड सेटर्स’ मंडळ बनले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. राज्यात सगळ्यात प्रथम मोठ्या बक्षिसाची लॉटरी सुरू करण्याचा ट्रेंड केपे मंडळाने सुरू केला व आता सगळीच मंडळे मोठ्या बक्षिसाच्या देणगी कूपन्स काढायला लागली आहेत. दोन वर्षांपूर्वी याच मंडळाने ‘तुम हमे खून दो हम तुम्हे लॉटरी देंगे’ असे म्हणत रक्तदान शिबिरास सुरवात केली व पाचशे रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेतले. केपे मंडळाचा हा उपक्रम नंतर थेट दर्शनासाठी बालाजी तिरुपती व कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातही सुरू झाला. यंदा केपे गणेश मंडळाने गणेशाचे प्रथम दर्शन (फस्ट लूक) उपक्रम सुरू करून एक नवा पायंडा घातला आहे. यावर्षी केपे मंडळाने सरकारला नवीन आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी रुग्णवाहिका भेट दिली आहे. या मंडळाचे कोषाध्यक्ष इच्छित फळदेसाई यांच्या सुपीक डोक्यातून विविध उपक्रम बाहेर पडतात व मंडळ यशस्वीरित्या असे उपक्रम राबवीत आहे जे इतर मंडळासाठी एक उदाहरण ठरत आहे.
घुमट आरतीची परंपरा
घुमट आरतीची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून कुशावती जिल्ह्यातील शंभरहून अधिक घुमट आरती मंडळांना घुमट आणि शमेळ वाटप करण्यात आले. पाच कार्यशाळांनंतर मिळालेली ही पारंपरिक वाद्ये आता घराघरांत पोहोचणार असल्याने, मोबाईलच्या तालावर वाढलेल्या पिढीला घुमटाचा ठेका शिकवण्याची वेळ आली आहे. परंपरा जपण्याचा हा उपक्रम स्वागतार्हच; फक्त वाटप केलेली वाद्ये कपाटात ठेवून ‘सांस्कृतिक वारसा’ जपला, असे समजण्याऐवजी त्यांचा निनाद पुढच्या चतुर्थीला खरोखर ऐकू यावा, एवढीच अपेक्षा!
कुत्रेमुक्त रस्त्यांची आशा!
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पशुसंवर्धन सेवा विभाग तसेच शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत भटक्या कुत्र्यांचे, पाळीव कुत्र्यांचे आणि भटक्या गुरांचे राज्यव्यापी सर्वेक्षण करतील. प्राण्यांना अन्न देणारे नागरिक आणि स्वयंसेवक यांना सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी संबंधित पंच, नगरसेवक यांच्याशी संपर्क साधावा आणि २५ सप्टेंबरपर्यंत भटक्या कुत्र्यांची व गुरांबाबतची माहिती द्यावी. ही माहिती २२ ऑक्टोबरपर्यंत पशुसंवर्धन विभागाकडे सादर करणे आवश्यक असेल. पाळीव कुत्र्यांची ओळख पटवण्यासाठी आणि नसबंदी, लसीकरण, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे यांबाबत जनजागृती करण्यासाठी घरोघरी जाऊन स्वतंत्र सर्वेक्षण केले जाईल. नोव्हेंबरमध्ये कृती योजना आखणार. महामार्गावर कुत्रे, गुरे नाही अशी स्वप्नरंजनात्मक (युटोपियन) आशा करावी का?
पोलिसांची नजर
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मडगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांची नजर अधिकच करडी झाली आहे. शनिवारी रात्रीच्या कारवाईत तब्बल बाराजणांना ताब्यात घेतल्याने स्थानकातील सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या सर्वांकडे ना वैध ओळखपत्र, ना प्रवासाचे तिकीट! सणाच्या गर्दीचा फायदा घेऊन काही संशयास्पद हालचाली तर सुरू नाहीत ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. रेल्वे स्थानकावर पोलिसांची नजर चुकविणे कठीण असल्याचा संदेश या कारवाईतून मिळाला आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या हालचालींचा नेमका उद्देश काय होता, याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे.
उदंड झाले राजकीय सर्व्हे!
राजकारणात नेतेच नव्हे, तर काही तथाकथित ‘सेफोलॉजिस्ट’ही आपली हुशारी दाखवताना दिसतात. निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा जिंकेल, कोण मुख्यमंत्री होईल, कोणता उमेदवार विजयी ठरेल, याचे अंदाज बांधणारे सर्व्हे सध्या गोव्यातही सुरू झाले आहेत. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रिपदासाठी किती पसंती, युरी आलेमाव यांना किती समर्थन, आघाडी न झाल्यास गोवा फॉरवर्डची काय स्थिती, असे अंदाज वर्तविले जात आहेत. मात्र, मागील निवडणुकांतील सर्व्हेचे अंदाज आठवले, तर या आकड्यांवर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्नच आहे. ‘आप’ला बहुमत मिळेल, तृणमूल गोव्यात परिवर्तन घडवेल, असेही अंदाज झाले होते. प्रत्यक्ष निकालांनी त्यांची हवा काढली. त्यामुळे सर्व्हेच्या आकड्यांनी खुश होण्यापेक्षा प्रत्यक्ष राजकीय परिस्थितीचा अंदाज घेणेच शहाणपणाचे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.