क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

David Warner Sandpaper Scandal: डेव्हिड वॉर्नरने १४ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली.
David Warner Sandpaper Scandal
David Warner Sandpaper ScandalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Cricket Australia Ball Tampering Investigation

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील बहुचर्चित सँडपेपर प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान घडलेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाबाबत माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याने आपल्या आत्मचरित्रातून केलेल्या खुलाशानंतर या वादाला नव्याने सुरुवात झाली. या प्रकरणाची माहिती संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना होती, असा दावा ख्वाजाने केला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने हा दावा फेटाळून लावत त्याला पूर्णपणे निरर्थक म्हटले. आता या प्रकरणात बंदीची शिक्षा भोगलेल्या डेव्हिड वॉर्नरने केलेल्या आरोपांमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन चौकशीवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपासावर वॉर्नरने उपस्थित केले प्रश्न

डेव्हिड वॉर्नरने १४ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. २०१८ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशीदरम्यान संघातील काही प्रमुख गोलंदाजांची चौकशी झाली होती की नाही, याबाबत त्याने शंका व्यक्त केली. त्याच्या माहितीनुसार, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली नव्हती.

वॉर्नरच्या मते, जर या तिन्ही गोलंदाजांची चौकशी झाली नसेल, तर गोलंदाजांना चेंडू छेडछाड प्रकरणाची माहिती नव्हती, असा निष्कर्ष क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसा काढला? तपासाच्या सुरुवातीपासूनच कोणाला दोषी ठरवायचे, हे निश्चित केले गेले होते का, असा सवालही त्याने उपस्थित केला. ही चौकशी केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप वॉर्नरने केला. तसेच या प्रकरणाबाबत तयार करण्यात आलेली अधिकृत भूमिका कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

David Warner Sandpaper Scandal
Goa Dairy Employees: गोवा डेअरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार विरियातो फर्नांडिस यांचा पाठिंबा; सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

२०१८ मधील सॅण्डपेपरगेट प्रकरण नेमके काय होते?

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी चेंडूची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. या प्रकरणात कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट चेंडूवर सँडपेपर वापरताना दिसला होता. त्यानंतर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची, तर बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची मोठी बदनामी झाली होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आरोपांना दिले उत्तर

वॉर्नरच्या आरोपांनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही आपली भूमिका स्पष्ट केली. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, संस्थेने सांगितले की, सुरुवातीच्या चौकशीदरम्यान सर्व खेळाडूंना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतरच्या आठ वर्षांतही कोणाकडे नवे पुरावे असतील, तर ते सादर करण्याची संधी उपलब्ध होती, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले.

खेळाडू आणि माजी क्रिकेटपटूंना त्या घटनेबाबत आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचा आदर संस्थेकडून नेहमीच केला जात असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, वॉर्नरने उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचे थेट उत्तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेले नाही. जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांची प्रत्यक्षात चौकशी झाली होती की नाही, याबाबत संस्थेने स्पष्ट माहिती दिलेली नाही.

David Warner Sandpaper Scandal
Goa Government Spending: गोव्यात 5 वर्षांत इव्हेंट-महोत्सवांवर 675 कोटींचा खर्च; जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा दुर्गादास कामत यांचा आरोप

जुन्या वादाला पुन्हा फुटणार तोंड?

उस्मान ख्वाजाच्या खुलाशानंतर पॅट कमिन्सने केलेले खंडन आणि आता डेव्हिड वॉर्नरने उपस्थित केलेले प्रश्न यामुळे सॅण्डपेपरगेट प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या खेळाडूंवर कारवाई झाली असली, तरी तत्कालीन चौकशीची व्याप्ती आणि पारदर्शकता याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. वॉर्नरचे आरोप आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे उत्तर यांमधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तीन प्रमुख गोलंदाजांची चौकशी झाली होती की नाही. याबाबत स्पष्टता येते का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.