खरी कुजबुज: एका नावाने उडवली अनेकांची झोप

Khari Kujbuj Political Satire: म्हापसा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनी जोर आला आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

एका नावाने उडवली अनेकांची झोप

म्हापसा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनी जोर आला आहे. सत्ताधारी गटातील एका प्रमुख गटाची महत्त्वाची खलबते नुकतीच पार पडली. या बैठकीला पक्षाच्या गाभा समितीचे सदस्य, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आणि स्थानिक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. आगामी निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असावा, यावर मंथन झाले असून विशांत पानकर यांचे नाव चर्चेत आले. ही बातमी बाहेर येताच तिकिटाची आस लावून बसलेल्या इतर इच्छुकांच्या चेहऱ्यावरील हवाच गुल झाली आहे. अनेक इच्छुक आता थेट वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून परिस्थितीची चाचपणी करत आहेत. निवडणुका आल्या की आमदारकीची महत्त्वाकांक्षा जागी होतेच; मात्र शेवटी पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, यावरच अंतिम निर्णय ठरेल. अद्याप उमेदवारी निश्चित झालेली नाही. पण हीच राजकीय खेळी कायम राहिल्यास, भविष्यात श्रेष्ठींच्या या निर्णयापुढे इच्छुक माघार घेणार की स्वतःची वेगळी चूल मांडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ही वादळापूर्वीची भयाण शांतता?

जेव्हा गोंधळ जास्त होतो तेव्हा योग्य दिशा सापडणे कठीण होते, असे म्हणतात ते खरे. राज्यात राजकीय आरक्षण लागू होणार म्हणून काही दिवसांपूर्वी मोठा गोंधळ चाला होता. राजकीय आरक्षणाचे समर्थक व विरोधक आक्रमक झाले होते. मात्र आता सगळीकडे सामसूम. याचे कारण काय? काही जाणकार सांगतात, ही वादळापूर्वीची शांतता आहे. तर काही राजकीय जाणकार यावेळी राजकीय आरक्षण लागू होणे कठीण असल्याचे सांगतात. काही जाणकार म्हणतात, राजकीय आरक्षण लागू होणार.केंद्र सरकारने आपला अधिकार वापरून सर्व कायदे-नियम वेगळे ठेवून निवडणूक आयुक्तांना राजकीय आरक्षणाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र एसआयआरच्या वादात सापडलेले निवडणूक आयुक्त राजकीय आरक्षणाचा अधिकार स्वीकारण्याचे धाडस दाखविणार का?

Khari Kujbuj Political Satire
Goa Weather: गोव्यात पावसाने 1980 नंतरचा विक्रम मोडला; 31.5 टक्के तूट, 'ऑक्टोबर हिट'ची शक्यता

योगीराजचा षटकार

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे पुत्र योगीराज कामत हे पूर्वी फारसे प्रकाशझोतात राहणे पसंत करत नसत. त्यामुळे त्यांच्यावर ‘वडिलांच्या पंखाखाली राहणारा’ अशी टीका व्हायची. मात्र २०२२च्या निवडणुकीत योगीराज यांनीही वडिलांच्या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्या निवडणुकीचे व्यवस्थापन स्वतः योगीराज यांनी केले आणि तेही यशस्वीरित्या. त्यानंतर त्यांनी बीपीएस क्लब निवडणुकीत आपले पॅनल उतरवून त्याही निवडणुकीत निर्विवाद यश मिळवले. यावेळीसुद्धा या क्लबवर त्यांचेच पॅनल जिंकून आले. शिवाय या पॅनेलमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आले. योगीराज यांनी या निवडणुकीत चक्क षटकारच मारला!

खुर्च्यांचा जेव्हा सोफा होतो!

सर्वांत जास्त खाणारे ते पोलिस खाते, हे आता सर्वांनाच माहीत झाले आहे. या खात्यातील कुठलाही विभाग घ्या, तो खाण्यासाठी माहीर असतोच. अशातच या खात्यातील लेखा विभागात कुणाची वर्णी लागली तर त्याची चांदीच चांदी. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलिस उपमुख्यालयात अशीच एक आसामी, जिचे असले गोरखधंदे वाढल्यावर त्याची बदली रायटर विभागात करण्यात आली. पण जुनी खोड जात नसते. त्याने म्हणे लेखा विभागात नसतानाही कोलवा पोलिस स्थानकात १० खुर्च्यांची गरज असल्याचे सांगून एका वितरकाला ऑर्डर दिली. मात्र असे समजते की या १० पैकी फक्त दोन खुर्च्याच कोलवा पोलिस स्थानकात पोहोचल्या. इतर खुर्च्यांचे म्हणे सोफामध्ये परिवर्तन होऊन तो ऑर्डर देणाऱ्याच्या घरी पोहोचला. ही ऑर्डर लेखा खात्याकडून रितसर गेली नव्हती. त्यामुळे त्याचे पेमेंट अडून राहिले. साहजिकच त्या वितरकाने पोलिस मुख्यालयात जाऊन चौकशी केली असता, ज्याने ही ऑर्डर दिली त्याची लेखा विभागातून कधीचीच बदली झाली आहे हे त्याला कळून चुकले. आता कपाळावर हात मारून घेण्याची वेळ त्या वितरकावर आली आहे म्‍हणे. आता बोला!

अन्‌ तो इतिहास जिवंत होणार!

जो प्रांत आपला इतिहास (भूतकाळ) विसरतो, त्या प्रांताला उज्‍ज्वल भविष्य नसते असे म्हणतात. साडेचारशे वर्षांपूर्वी कुंकळ्‍ळीच्या शूरवीरांनी पोर्तुगिजांना आव्हान दिले होते. सोळा महानायकांनी या युद्धात हौतात्म्य पत्करले. हा इतिहास आता पाठ्यपुस्तकात आला आहे. त्‍यास राज्‍यमान्‍यता मिळाली आहे. आता हा इतिहास जिवंत रुपात जनतेसमोर येणार आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या प्रयत्नांमुळे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारच्या सहयोगाने कुंकळ्‍ळी हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण करण्यात येऊन सोळा महानायकांचे पुतळे उभे करण्यात येणार आहेत. यासाठी कला महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने चिफटन ट्रस्टच्या सहयोगाने खास पुतळ्यांची आखणी केली आहे.

वाढदिवस की शक्तिप्रदर्शन?

मडगावातून विधानसभा लढविण्याची इच्छा चिराग नायक यांनी लपवून ठेवलेली नाही. काँग्रेसच्या तिकिटासाठी त्यांची तयारी सुरू आहे. त्यातच वाढदिवस थाटामाटात साजरा झाला आणि शुभेच्छा देण्यासाठी राजकीय मंडळींसह विविध स्तरांतील नागरिकांची गर्दी जमली. बस्स! मग काय, वाढदिवसाचा केक संपायच्या आतच राजकीय कुजबुजला क्रीम चढले! शुभेच्छा देणारी गर्दी म्हणजे पाठिंब्याची ‘रिहर्सल’ तर नव्हे ना, अशीही चर्चा रंगली. केकचा स्वाद गोड होता; पण राजकीय चर्चेची चव त्याहून गोड!

Khari Kujbuj Political Satire
Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

विरोधी पक्षनेत्यांचे कर्मचारी चर्चेत

काँग्रेसची ‘गोवा रक्षण यात्रा’ पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनी म्हणे बरेच निर्णय एकतर्फी घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात सरकारी पगारावर काम करणारे काँग्रेसच्या यात्रेत टी-शर्ट घालून सहभागी झाले होते. त्‍यांच्‍यावर काय कारवाई होते, याकडे भाजपवाल्‍यांचे लक्ष लागले आहे. म्हापशातील यात्रेत विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो भाजपच्या हाती लागला. त्‍यानंतर भाजपवाले गप्‍प बसणार का? हाती आयतेच कोलीत सापडले!

शेट्ये ‘लकी’

नादोडा गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कुपनांमध्‍ये आमदार चंद्रकांत शेट्ये यांना चक्क तीन बक्षिसे मिळाली. पहिले बक्षीस स्कूटर, पाचवे बक्षीस सायकल आणि उत्तेजनार्थ बक्षीस मिक्सर. म्हणजे प्रवासासाठी स्कूटर, पर्यावरणपूरक भ्रमंतीसाठी सायकल आणि घरगुती कामासाठी मिक्सर; सगळेच एका ड्रॉमध्ये! आता एवढेच बाकी, पुढच्या ड्रॉमध्ये मतदारांसाठीही एखादे बक्षीस निघते का ते पाहायचे. राजकारणात नशीब साथ देत असेल तर प्रचारखर्चाचीही बचत होईल, अशी मिश्किल चर्चा सुरू झाली आहे.

शाळेची घंटा वाजतेय, पण विद्यार्थी कुठे गेले?

पावलांचा आवाज न करता बदल होत असतात, पण सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची घट आता दुर्लक्ष करण्याइतकी छोटी राहिलेली नाही. यंदा प्राथमिक शाळांतील मुलांची पटसंख्या तब्बल दोन हजारांनी घटली आहे. विभाग म्हणतो, पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्षांची अट काटेकोर झाल्याने हा परिणाम; पण २०१६-१७ पासूनची घट मात्र वेगळीच कहाणी सांगते. मुलांचा ओढा अनुदानित आणि खासगी शाळांकडे वाढतोय. सरकारी शाळांच्या घंटा वाजत आहेत, वर्ग सुरू आहेत; फक्त ‘विद्यार्थी कुठे गेले?’ या प्रश्नाचे उत्तर अजून शोधायचे आहे. पटसंख्येची ही घसरण सरकारला खुपली तर उपाययोजनांची घंटाही लवकर वाजेल, असे म्‍हणायला हरकत नाही. ∙∙∙

चक्क ट्रॅक्टरचीच मागणी

पेडण्यात सध्या मदत करणाऱ्यांचे हात पुढे सरसावलेले आहेत. त्यात काही राजकारणी, काही ट्रस्टी आणि काही सामाजिक तथा राजकीय नेत्यांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व मदतकार्य सुरू आहे, हे तेथील जनतेला कधीच उमगलेले आहे. त्यामुळे मिळणारी मदत नाकारायची नाही, असा पण करून पेडणेकर सध्या ती मदत हसत-हसत स्वीकारत आहेत. सध्या चर्चेत असलेल्या एका दात्याकडे एकाने जी मागणी केली, ती ऐकून तो दाता आश्चर्यचकितच झाला. आपल्याला नवा ट्रॅक्टर द्यावा, अशी म्हणे त्याची मागणी. आता शेतकामासाठी लागणारा ट्रॅक्टर सेवा पुरवण्याचे काम दात्याकडून केले जाते. पण त्यालाही असा कोणी ट्रॅक्टरचीच मागणी करेल, असे स्वप्नातही वाटले नसावे. पण या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

रितेश ॲक्शन मोडमध्ये

सुभाष शिरोडकर यांच्या जनता दरबारात रितेश नाईक फोंड्याच्या कामांची भलीमोठी ‘होमवर्क’ची वही घेऊनच पोहोचले. पालिका आणि मतदारसंघातील कामांची यादी सादर करून ती तातडीने मार्गी लावण्याची मागणीही झाली. सुभाषभाऊंनी ‘यादी द्या, कामे पाहू’ म्हणत चांगला प्रतिसाद दिला. रितेशची ही कामाबाबतची तत्परता पाहून उपस्थितांना रवी पात्रांवची आठवण झाली म्हणे. फोंड्यात कामांची लिस्ट बदलतेय की चेहरे, याचीच आता चर्चा!

Khari Kujbuj Political Satire
Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

चोरीचा मामला!

सरकारी कार्यालयात चोरी झाली. संगणक गेले, केबलच्या तारा गेल्या आणि चोरमंडळी आपले काम करून पसारही झाली. पण आता खरी चर्चा चोरीची कमी आणि पोलिसांत तक्रार का नाही, याचीच जास्त रंगू लागली आहे. सरकारी कार्यालयाची सुरक्षा एवढी ‘मजबूत’ की चोरांनीही बहुधा आधी खात्री केली असावी ‘इथे तक्रारच दाखल होणार नाही!’ कार्यालयातून वस्तू गायब झाल्या, पण जबाबदारी कोणाची?, सुरक्षा व्यवस्था कुठे होती?, तक्रार दाखल करण्यास एवढा वेळ का लागतोय? असे सवाल आता उपस्थित होत आहेत. म्हणजे चोरांनी सरकारी माल नेला आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चर्चा मात्र मागे ठेवून गेले! चोरीचा पंचनामा होण्याआधीच निष्काळजीपणाचा पंचनामा सुरू झाल्‍याची कुजबूज रंगली आहे.

आता फुटबॉललाही फिक्सिंगची कीड

‘फुडले जोत वता तशे फाटले जोत वता’ अशी कोकणीत एक म्हण आहे. क्रिकेट हा सगळ्यांत श्रीमंत खेळ. या खेळाने आपल्या देशांत मॅच फिक्सिंगची कीड आणली. आता ही कीड गोव्यातील फुटबॉल खेळालाही लागली आहे. फुटबॉल हा खेळ आजही गोव्यात अतिप्रिय. गावागावांत फुटबॉल स्पर्धा खेळविण्यात येतात. चर्चिल, साळगावकर, धेंपो यांनी फुटबॉल खेळाला कीर्ती मिळवून दिली. मात्र या खेळालाही मॅच फिक्सिंगची कीड लागणे हे दुर्दैव.गोवा फुटबॉल संघटनेने चौदा जणांवर बंदी घातली असून प्रकरण गुन्हा शाखेकडे सुपूर्द केले आहे. या मॅच फिक्सिंगमध्ये फुटबॉल कोच असलेल्या एका पोलिसाचाही समावेश आहे.फुटबॉल सामन्यात मोठ्या प्रमाणात बेटिंग होत असल्याने अशा प्रकारचे मॅच फिक्सिंग होत असल्याचा दावा फुटबॉलप्रेमी करतात.आता पाहुया, या कारवाईनंतर फुटबॉल खेळ ‘साफ’ होतो की नाही ते!

भाषांतर सोपे; अर्थांतर नको रे बाबा!

आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस; पण गोव्यात सक्षम अनुवादकांची वानवा पाहता हा दिवस काहींच्या लक्षात तरी आहे का, असा प्रश्‍‍न निर्माण होतो. डिजिटल साधने अनुवाद करतात खरी, पण एका शब्दाचा अर्थ बदलला तर कायद्याचा खेळच बदलू शकतो. साहित्यिक अनुवादात तर रूपक, प्रतीक आणि अंतःप्रवाहासाठी मशीनलाही घाम फुटावा! गोव्यात राजपत्र कोकणीत आणायचे म्हटले की अनुवादक कुठे मिळणार, हा प्रश्न अजूनही अनुवादितच झालेला दिसतो. ‘गुगलभाऊ’ मदतीला आहेत; पण शब्दांच्या मागचा अर्थ पकडायला माणूसच हवा. त्यामुळे अनुवादकाच्या शोधात गोव्याची भाषिक गाडी अजून किती दिवस ‘वेटिंग’वर राहणार, याचीच कुजबूज!

राजेशबाबची तिसरी इनिंग?

फोंड्यात काँग्रेसची हालचाल वाढली असून राजेश वेरेकर यांचाही जनसंपर्क चांगल्‍या प्रकारे वाढला आहे. मागील दोन निवडणुकांतील मतांची बेरीज-वजाबाकी लक्षात घेता, तिसऱ्या इनिंगसाठी राजेशबाबनी तयारी सुरू केल्याचे दिसते. लोकांचे मूलभूत प्रश्न हाती घेणे, गाठीभेटी वाढवणे आणि जनसंपर्क आणखी वाढविणे, यावर जोर दिला आहे. त्यामुळे ही आमदारकीच्या सामन्यापूर्वीची नेट प्रॅक्टिस तर नाही ना? अशी चर्चा फोंड्यात रंगली आहे. आता काँग्रेसचा ‘कॅप्टन’ कोण आणि तिकिटाचा चेंडू कोणाच्या हातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पीयूसी केंद्रांसमोर अस्तित्वाचे संकट

‘पोल्युशन अंडर कंट्रोल’ (पीयूसी) केंद्रांना व्यवसायाच्या व्यवहार्यतेचे आव्हान निर्माण झाले आहे. उपकरणांचा आणि कामकाजाचा वाढता खर्च, प्रतिवाहन मिळणारा मर्यादित नफा यामुळे हा व्यवसाय टिकवून ठेवणे आव्हान झाले आहे. राज्यातील १२० अधिकृत केंद्रांपैकी सध्या केवळ ८० केंद्रे कार्यरत आहेत. परिणामी, अनेक भागांतील वाहनचालकांना पीयूसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बऱ्याच अंतराचा प्रवास करावा लागतो. मात्र, २०२६ च्या पहिल्या ५५ दिवसांत पीयूसी उल्लंघनासाठी ७,५८८ चलन जारी झाली. आता तर तालाव देणारे ‘ए-आय’ कॅमेरे बसवलेत. डिजिटल डोळ्यांतून पीयूसी, इन्शुरन्स एका क्षणात टिपता येते. दरम्यान, पीयूसी केंद्रांत वाढ व्हावी, अशी मागणी चाललीय.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

दिवस हे कुणबी पोषाखाचे

कुणबी साडीला हल्ली बरकत आलेली दिसते. कुणबीची मुळे गोव्याच्या लोकवेद संस्कृतीशी जोडलेली असल्याने सर्वांना तो पोषाख आपल्या वारशाची, परंपरेची, संस्कृतीची ओली जाणीव करून देतो. अमेरिका युरोपातील गोमंतकीय मॉडेल युवती तिथल्या कॅट वॉकमध्ये कुणबीचा वापर करताना दिसतात. त्याला प्रतिसादही उत्साहवर्धक असतो. हल्लीच साखळीत एका कार्यक्रमात काही कलाकारांनी कुणबीचे उपरणे खांद्यावर घेतलेले दिसले, निवेदिकाही कुणबीच साडी परिधान करून होती. कधी कुणाचे नशीब फळफळेल सांगता येत नाही. गोव्यातील काही वस्त्र आस्थापनांनी कुणबी साडीला देश-विदेशात ऑनलाईन मागणी वाढती आहे, असे सांगितले. या वस्त्राचे गुलाबी बटवे मध्यंतरीच्या काळात आले होते. पर्यटन हंगाम सुरू होत आहे. कुणबीची पर्यटन केंद्रीत भरभराट होण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com