

ही निवडणूक की दहशतीचा खेळ?
खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी निवडणूक सुरू असून एका गटाने दहशत माजवली आहे. काही उमेदवारांचे विशेषतः मुलींच्या पथकातील गटाचे पोस्टर फाडून ते सर्वत्र टाकण्यात आले आहेत, एवढेच नाही तर टॉयलेटमध्येही टाकण्यात आले आहेत. असा व्हिडिओ आमच्या ताब्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये मुली म्हणतात की आम्ही शांतपणे निवडणूक लढवू इच्छितो. परंतु हे काय चाललेय कॉलेजमध्ये? यासंदर्भात कॉलेजचे प्रशासन काहीतरी उपाय योजेल, अशी आमची अपेक्षा आहे. नाहीतर आम्हाला पुढे आणखी ‘खोजबीन’ करावी लागेल!
तानावडेंना निष्ठेचे फळ
राजकारणात असलेल्या व्यक्तीला आजकाल सत्तेबाहेर राहणे कठीण होते. मात्र, पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटनात्मक काम करणारे सदानंद शेट तानावडे यांच्यासारखे नेते विरळेच. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपची सत्ता कायम राखण्यात आणि संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यात तानावडे यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने आता महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. ही जबाबदारी म्हणजे त्यांच्या निष्ठेचे फळ होय. यामुळे त्यांच्या समर्थकांची छाती ३६ इंचांनी फुगली आहे म्हणे आणि ती फुगलीच पाहिजे.
राजकारणाचा ‘नवा अध्याय’
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी २०२३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी मिळाली. आता गोव्याच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. राजकारणातील अनुभव तुलनेने कमी असला तरी तंत्रज्ञान आणि माध्यम क्षेत्रातील त्यांची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकीय समीकरणांचे निरीक्षण करताना ‘जुना राजकीय चष्मा’ न लावता नवी नजर काय टिपते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जाहिरात बनावट, शोध खरा!
कर्मचारी निवड आयोगाच्या नावाने बनावट भरतीची जाहिरात सोशल मीडियावर फिरली आणि सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणानंतर एकच चर्चा रंगली आहे...पोलिसांचा धाक कमी झाला म्हणूनच की काय, आता सरकारी नोकरीही सोशल मीडियावरून ‘ऑफर’ केली जाऊ लागलीय. जाहिरात बनावट निघाली, गुन्हा दाखल झाला आणि संशयितांचा शोध सुरू झाला. मात्र नेहमीचा प्रश्न पुन्हा उभा, हा शोध संशयितापर्यंत पोहोचणार की ‘शोध सुरू आहे’ इथेच थांबणार? नोकरीच्या नावाखाली उमेदवारांना गंडा घालणाऱ्यांनी सरकारी आयोगालाही आपल्या जाहिरातीचा चेहरा बनवला. आता सायबर पोलिसांनीही या बनावट जाहिरातीच्या ‘निर्मात्याला’ शोधून काढून तपासाची खरी जाहिरात करावी, अशीच नागरिकांची मागणी.
रस्ता हरवला; दिल्लीने दाखवला!
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल गोव्यात ‘गोवा राखण यात्रे’साठीच आले, असा अनेकांचा समज झाला. प्रत्यक्षात संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीसाठी त्यांचा दोन दिवसांचा गोवा दौरा होता. दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. त्यातून वेळ काढून बुधवारी त्यांनी कुंभारजुवे येथील यात्रेत सहभाग घेतला. गुरुवारी प्रदेशाध्यक्ष, तीन आमदार, खासदार आणि कार्यकारी अध्यक्षांना त्यांनी दुपारच्या जेवणासाठी बोलावले. गोव्यातील राजकीय रणनीतीवर काही मोठी चर्चा होईल, या अपेक्षेने स्थानिक नेतेही उमेदीने पोहोचले. मात्र, जेवणाच्या टेबलावर राजकीय डावपेचांपेक्षा यात्रेच्या मार्गावरच चर्चा झाली. हायवेवरून यात्रा काढून फारसा फायदा होणार नाही; रहिवासी वस्त्यांमध्ये जा, लोकांपर्यंत पोहोचा, असा सल्ला वेणुगोपालांनी दिला. एवढे सांगून त्यांनी नेत्यांना परत पाठवले. गोव्यातील काँग्रेसला लोकांचा रस्ता दाखवायलाही दिल्लीची गरज पडली. राजकीय रणनीतीच्या नावाने वाढलेला ‘मेन्यू’ मात्र ‘लोकांमध्ये जा’ या एका डिशवरच आटोपला!
बसभाडे कमी; प्रवास लांब!
महिलांसाठी ‘कदंब’ बससेवेत भाडेसवलत देण्याच्या प्रस्तावावर महामंडळ काम करत आहे. सविस्तर आराखडा सरकारच्या आढाव्यासाठी सादर झाला आहे. ‘कदंब’ ही नफा कमावणारी खासगी संस्था नसून सार्वजनिक सेवा देणारे महामंडळ असल्याने मोठी सवलत किंवा भाडेमाफीचा आर्थिक भार कोण उचलणार, याचा निर्णय सरकारलाच घ्यावा लागणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी बसभाडे कमी करण्याच्या चर्चेला रंग चढला आहे. काही राज्यांत महिलांना मोफत बसप्रवासाची सुविधा असताना, गोव्यात आता ‘सवलतीचा प्रवास’ सुरू होणार का, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
यात्रेला देणार सभेने प्रत्युत्तर
गोवा राखण यात्रेवरून राजकीय वर्तुळात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादावर सत्ताधाऱ्यांची बारीक नजर असून, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्तरीत भव्य सभा घेण्याची तयारी सुरू असल्याची कुजबूज आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या सभेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार असून, तब्बल ३० हजारांची गर्दी जमविण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांनी स्वीकारल्याची चर्चा आहे. आता यात्रा मोठी की सभा, याचीच उत्सुकता राजकीय वर्तुळात रंगली आहे!
ब्रह्मेशानंदांचा आशीर्वाद अन् ‘संकेत’
सावर्डेचे युवा नेते संकेत आर्सेकर हे आता सरकारी सेवेतून मुक्त झाले असून त्यांनी लोकांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटाच लावला आहे. काल त्यांनी तपोभूमीत जाऊन, श्री दत्त पद्मनाभ पीठाचे सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी त्यांचा सन्मानही करण्यात आला. आर्सेकर यांनी सावर्डे मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशा परिस्थितीत स्वामींचा मिळालेला हा आशीर्वाद त्यांच्या किती कामी येतो, हे आता पाहावे लागेल.
गूढ कधी उकलणार?
पर्वरी गोळीबार प्रकरणातील पिस्तूल सापडले अन् या प्रकरणाने पुन्हा एकदा नवे वळण घेतले. गोळीबार, हल्लेखोरांचे पलायन, स्मशानभूमीजवळ सापडलेले शस्त्र आणि त्यानंतर समोर आलेले आरोप-प्रत्यारोपांचे व्हिडिओ... हे सगळे पाहता प्रकरणात नेमके नाटक कोण रचत होते, याचीच चर्चा सुरू आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तर कुजबुज आणखी रंगली. गोळीबाराचा तपास सुरू आहे की पडद्यामागील‘स्क्रिप्ट’चा? पोलिसांना पिस्तूल मिळाले, आता त्यातून सत्याची गोळी कोणाच्या दिशेने सुटते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण या प्रकरणात हल्ला झाला हे एक सत्य; पण त्यामागची खरी कहाणी अजूनही तपासाच्या पडद्यामागेच आहे!
खुर्चीचे औदार्य तिकीटापर्यंत टिकणार?
म्हापशातील काँग्रेस गोटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. ‘गोंय राखण यात्रे’च्या पत्रकार परिषदेत शशांक नार्वेकर, विजय भिके, सुधीर कांदोळकर, राहुल म्हांबरे आणि प्रतीक्षा खलप हे प्रमुख दावेदार एकाच मंचावर दिसले. त्यात मध्यवर्ती खुर्चीवर बसलेल्या विजय भिके यांनी स्वतः उठून ती खुर्ची सुधीर कांदोळकरांना दिली आणि राजकारणात क्वचितच दिसणारे ‘शेअरिंग इज केअरिंग’चे दर्शन घडवले. आता प्रश्न एवढाच, हे खुर्चीचे औदार्य तिकीट वाटपापर्यंत टिकणार की तेव्हा प्रत्येक जण आपापली खुर्ची घट्ट पकडणार? म्हापशातील राजकीय रंगमंचावर याचे उत्तर निवडणुकीच्या वेळीच मिळेल!
निवडणूक आणि ‘नाच्या’
तमाशा म्हटले की त्यात ‘नाच्या’ हे पात्र आलेच. निवडणूक हाही एक प्रकारचा तमाशाच आणि त्यातही असंख्य ‘नाचे’ असतातच. सध्या काँग्रेसबरोबरही असाच एक ‘नाच्या’ आहे, जो स्वतःला स्टेटरजिस्ट असे म्हणवून घेतो. पण जे त्याला जवळून ओळखतात ते त्याला कुठल्याही क्षणी उडी मारण्यास ‘सिद्ध’ असलेला म्हणनूच ओळखतात. ज्याच्याकडे चांदी आहे तोच आपला ‘नाथ’ अशी भूमिका घेणाऱ्या या नाच्याने आपली राजकीय तमाशातील सुरुवात काँग्रेसकडून केली होती. विजयचे बोट धरून तो राजकारणात आला पण नंतर गिरीशला चिकटला. चर्चिलचीही संगत धरली. गोव्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर ‘पर्रीकर आपला सोयरा’ अशी साळसूद भूमिका घेत काँग्रेसच्या अगदी परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या भाजपशी सोयरीक केली. त्यानंतर काही काळ गोवा फॉरवर्डबरोबर ‘कोलावरी डी’ करत आता पुन्हा काँग्रेसशी घरोबा केलाय. मात्र याचा धसका म्हणे चर्चिलने घेतला आहे. कारण हा नाच्या चर्चिलबरोबर असताना त्याला तो पैशांच्या दृष्टीने बराच महागात पडला होता. आता चर्चिल पुन्हा काँग्रेसला जवळ येऊ पाहत असताना या नाच्याशी गाठ पडल्यास ती आपल्याला महागात तर पडणार नाही, हीच चिंता त्यांना सातवत आहे म्हणे.
‘ध’चा ‘मा’ होऊ नये म्हणून सावधानता
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे सध्या आपल्या वक्तव्याबाबत कमालीचे सावध झाले आहेत. आपल्या विधानाचा वारंवार विपर्यास केला जातो, अशी त्यांचे म्हणणे. त्यामुळे सकाळी देवपूजेनंतर सरस्वती मातेचे स्मरण करूनच दिवसाची सुरुवात करतो, असे ते सांगतात. तोंडातून निघालेल्या एखाद्या शब्दाचा ‘ध’चा ‘मा’ होऊ नये, याची काळजी घेत असल्याचेही ते विनोदाने म्हणतात. ‘माझ्यावर अनेकांचे लक्ष असते; विरोधकांना मी काय करतो, यात अधिक रस असतो,’ असे सांगत त्यांनी शेवटी राजकारणातील एक जुनी म्हणही आठवली...‘फळे लागलेल्या झाडावरच दगडफेक होते’!
‘राखणदार’ नेमके गेले कुठे?
गोव्याच्या जमिनी आणि डोंगर वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची एकजूट बांधायला म्हापशात ‘इनफ इज इनफ’ची बैठक पार पडली. मात्र एरवी स्वतःला गोव्याचे ‘राखणदार’ म्हणवणारे काही प्रमुख चेहरे या बैठकीला गैरहजर राहिले. शेवटी आभार मानताना आयोजकांनी या दांभिकपणावर थेट बोट ठेवले. ‘लोकांच्या सोयीसाठी आम्ही आधी मडगाव आणि आता म्हापशात बैठक घेतली. तरीही स्वतःला गोव्याचे तारणहार म्हणवणारे दोन्ही ठिकाणी फिरकलेच नाहीत’, असा टोला लगावत खंत व्यक्त केली. गोव्याच्या अस्तित्वासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहनही आयोजकांनी केले. एरवी गोव्याच्या रक्षणाच्या बाता मारणारे हे राखणदार या खऱ्या जनचळवळीत उतरणार की सोशल मीडियावरच लढत राहणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.