Banastarim Bridge Accident बाणस्तारी येथील अपघातास कारणीभूत ठरलेला परेश सावर्डेकर आणि त्याची पत्नी मेघना हिला तत्काळ अटक करा अन् मृतांना न्याय द्या, अशी मागणी करीत दिवाडी आणि परिसरातील हजारो संतप्त नागरिकांनी म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर मंगळवारी रात्री मोर्चा नेला.
अपघातग्रस्त कारमधील महिलेची वैद्यकीय चाचणी का केली नाही, असा सवाल विचारत ‘त्या’ महिलेस अटक करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी केली.
अखेर वातावरण खूपच तापल्याने परेशच्या पत्नीस उद्या (बुधवारी) अटक करण्याची ग्वाही पोलिस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी दिल्यानंतर रात्री उशिरा जमावाने माघार घेतली.
मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी म्हार्दोळ पोलिस ठाण्याला धडक दिली. पोलिस उपअधीक्षक आशिष शिरोडकर आणि निरीक्षक मोहन गावडे हे दोघेही संतप्त जमावाला समजावण्याचा प्रयत्न करत होते.
मात्र, जमाव पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हता. यावेळी तपास अधिकाऱ्यांची बदली करा, अशी मागणी लोकांनी केली.
लॉकअपमध्ये परेश आहे की अन्य कोणी, याबाबत संभ्रम निर्माण झाला हाेता. मात्र, आमदार राजेश फळदेसाई आणि प्रतिमा कुतिन्हो यांनी कोठडीकडे जाऊन खात्री करून घेतली.
पोलिस तपासात पक्षपातीपणा होत असल्याचा दावा
पोलिसांचा तपास पक्षपाती पद्धतीने सुरू असल्याचा आरोप पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या लोकांनी केला. पोलिस परेशच्या पत्नीची पाठराखण करीत आहेत.
50 तास उलटूनही पोलिसांनी परेशच्या पत्नीच्या मोबाईलवरील ‘कॉल रेकॉर्डस’ आपल्याकडे का घेतले नाहीत, ही महिला राजकीय नेत्याची नातेवाईक आहे, म्हणून हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी यावेळी केला.
परेशचा जामीन फेटाळला
बाणस्तारी येथील अपघाताला कारणीभूत ठरलेला कारचालक परेश सावर्डेकर याचा जामीन अर्ज फोंडा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. आज (मंगळवारी) सकाळी या जामीन अर्जावर दोन्ही गटांकडून युक्तिवाद झाला.
मात्र, अपघाताची भीषणता आणि मद्यसेवनाचा प्रश्न या मुद्द्यावरून हा अर्ज फेटाळण्यात आला. सोमवारी परेशला म्हार्दोळ पोलिसांनी अटक करून नंतर फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले.
केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न
पोलिस निरीक्षकांच्या केबिनबाहेर थांबलेला जमाव अस्वस्थ झाला होता. त्यांनी केबिनचा दरवाजा उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ रोखले.
काही संतप्त नागरिकांनी कार्यकर्ते आणि पोलिस अधिकारी यांच्यातील संभाषण त्यांच्या मोबाईलवर रेकॉर्ड केले. लोकांच्या डोळ्यांमधील राग स्पष्ट दिसत होता. तासाभराहून अधिक वेळ केबिनमध्ये चर्चा चालली.
परवाना होणार रद्द
ही कार संशयित श्रीपाद ऊर्फ परेश सावर्डेकर याच्या पत्नीच्या नावावर आहे. अपघातापूर्वी वाहतूक खात्याने या कारचालकाने वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६ ई-चलन्स बजावली आहेत. ही उल्लंघने कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यासंदर्भातील चलन्स मोबाईल मेसेजद्वारे पाठवली आहेत, तसेच परवाना निलंबनाचा अहवाल पाठवला आहे.
कारचा वेगमर्यादा उल्लंघनाचा तपशील
९ जून २०२३ : दुपारी १.५५ वा.
९ जून २०२३ : संध्याकाळी ६.५५ वा.
१५ जून २०२३ : संध्याकाळी ५.५९ वा.
१४ जुलै २०२३ : सकाळी ११.२८ वा.
१५ जुलै २०२३ : संध्याकाळी ५.४३ वा.
२० जुलै २०२३ : संध्याकाळी ५.४३ वा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.